19 February, 2016

॥ढेपेवाडा॥


आत्माराम परब या माणसाला ठिकाणं जणूकाही भेटायलाच येतात. चाकोरीबाहेरची अशी अनेक ठिकाणं याने शोधून काढली आणि तिथे तिथे तो गेलाच, मग ते देशात असो की परदेशात. ढेपेवाडा हे असंच एक ठिकाण,  पुण्याजवळचं पौड गाव तिथून अकरा किलोमिटरवर असलेल्या गिरीवनमध्ये असलेला हा ढेपेवाडा खरंतर मी ऎकलेला सुद्धा नव्हता. तिथे जायचं सुतोवाच करताच तारिख ऎकून मी होकार भरला कारण आत्माबरोबर गेलं की घटनांची लयलूट असते. सतत काहीतरी घडत असतं.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग सोडून गाडी पवना धरणापाशी आली आणि समोर उंचवर जाणारा रस्ता पाहून हा धोपटमार्ग नाही याची खात्री पटली. एक टेकडी पार केल्यावर पुढे पौड गाव लागलं, त्या गावातून पुढे गिरीवनकडे जाणार्‍या गावाकडे वळलो. पवना आणि मुळशी धरणांच्या मधला हा परिसर खुप छान आहे. सभोवताली शेतं, उसाचे फड आणि गार वारा. मनाला आल्हाद देणारं सगळं वातावरण आणि गप्पांना आलेला उत.      


गाडी गिरीवनची टेकडी चढताना रानवारा उल्हसीत करत होता आणि सुर्य डोक्यावर आला तरी हवेत गारवा टिकून होता. गिरीवनची शिस्तबद्ध आखणी आणि फुलांची नाव असलेले रस्ते पाहताना हे काही वेगळं आहे असं वाटत असतानाच ढेपेवाड्याच्या दारात येऊन पोहोचलो. मराठी स्थापत्यकलेचा नमूना असलेला हा वाडा प्रथमदर्शनीच खुप आवडला. वाड्याच्या वरच्याबाजूला ललतमध्ये (सगळ्या रहाण्याच्या खोल्यांना रागांची नाव दिली आहेत.) बॅगा ठेवल्या आणि तसेच बाहेर पडलो. अख्खा वाडाभर आम्ही लहान होऊन हुंदडलो. वाड्याच्या खालच्या बाजूलाच जेवणाची व्यवस्था आहे. पाट, चौरंग आणि शुद्ध शाकाहारी जेवण. एवढ्या सात्विक वातावरणात पाटावर बसल्यावर ‘अन्न हे पुर्णब्रम्ह’ हे कितीतरी दिवसांनी आठवलं.


जेवण आटोपल्यावर देवघर, ओसरी, स्वयंपाकघर, बैठकिची खोली, दिवाणखाना, पडवी, चौक, अंगण, विहीर, परसबाग ही विस्मरणात गेलेली अनेक ठिकाणं खुप कौतूकाने फिरलो. कौतूक दोघांचं हा पुर्णपणे नवा ‘वाडा’ बांधणार्‍या नितीन ढेपे यांचं आणि आम्हाला इथे अगत्याने घेऊन येणार्‍या आत्माराम परब या माझ्या मित्राचं.

आताना या वाड्याने आम्हाला खरंच भारून टाकलं होतं. इतिहासाच्या ज्या ज्या म्हणून खुणा मनात घर करून होत्या त्या वर उफाळून आल्या, त्यात तिथल्या व्यवस्थापकने आम्हाला शिवकालिन कपडेपट उघडा करून भर घातली. पगडी, धोतर, टोप, अंगरखा, पायजमा काय विचारू नका. मग ती वस्त्र परिघान करून आम्ही धमाल उडवून दिली. इतिहासातल्या अनेक व्यक्तीरेखा जगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो हेच खरं जगणं असतं. शांत मोकळ्या वातावरणात सुमधूर संगीताच्या साथीने वाफाळता चहा-कॉफी पित गप्पांचा गोघ संपता संपत नव्हता.


दुसर्‍यादिवशी निघायची वेळ आली. अचानक पंचवीस-तीस मंडळी वाड्यात प्रवेशकरती झाली. आमची तंद्री भंग पावली. पण ते बरंच झालं ध्यानीमनी नसताना नितीन ढेपे यांची भेट घडली. त्या मंडळीना घेवून ढेपेसाहेब स्वत: आले होते. तो वाडा आणि त्याचा तो ‘जाणता’ मालक यांची भेट सदैव लक्षात रहाण्यासारखी.

हा वाडा बांधण्यामागची पार्श्वभूमी:

नितीन ढेपे हे पुण्यातले नामवंत बांधकाम व्यावसायीक. पुण्यातले अनेक जुने वाडे पाडून त्याजागी बहुमजली इमारती त्यानी उभ्या केल्या आहेत. हे जुने वाडे पाडताना एक माणूस म्हणून ते सतत अस्वस्थ होत होते. जुन वैभव आपण आपल्या हातानी नाहीसं करतोय असं त्याना वाटत राहीलं. मग त्यानी हा जुन्या पद्धतीचा नवा वाडा बांधण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. पैसे सगळेच कमावतात पण प्रत्येकाला अशी जाण असतेच असं नाही, नितीन ढेपेसरांना ती आहे याचं विशेष कौतूक.






No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates