19 May, 2015

नारकांडा


घरी बसल्या बसल्याच घामाच्या नुसत्या धारा लागल्यात. या उन्हाळ्याने जीव नकोसा झाला की आठवतात ते थंडीचे दिवस. आता लगेच त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हिमालयात जाण्याखेरीज दुसरा पर्याय नाही. हिरवागार निसर्ग, वसंतोत्सवाचा परमोच्य बिंदू, आल्हाददायक हवा या सर्वाचा पुरेपूर अनुभव घ्यायचा तर हिमाचल प्रदेश हे आपलं हक्काचं ठिकाण. या वर्षी मे महिन्यातले पहिले दहा दिवस याच हिमाचलाच्या किन्नौर व्हालीत जाण्याचा योग आला आणि त्या आठवणीने आताचा हा मुंबईतला उन्हाळाही मानसिक दृष्ट्या थोडा सुसह्य वाटायला लागलाय. मित्रहो अशा ठिकाणांची आपल्या देशात वानवा नाही आणि निसर्गरम्य अनेक ठिकाणं गहिर्‍या रुपात आपल्याला साद घालत असतात.

या वर्षी हवामान बदलामुळे असेल पण चंदिगडचं तपमान बर्‍यापैकी सुसह्य होतं. तरी दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा जाणवत होत्या, पण अर्ध्या पाउण तासात  राष्ट्रीय महामार्ग २२ वरून चंदिगडची वेस ओलांडली आणि मग हवेतला गारवा जाणवायला लागला. रखरखीतपणा मागे टाकून गाडी जसजशी पुढे जायला लागली तसतशी रस्त्याच्या दुतर्फा झाडांची दाटी आणि फुलांची आरास दिलखुश करू लागली. हिमालयात जेवढ्या वेळा आपण जाला तेवढ्या वेळा त्याच्या गारुडाने मन त्याचं होवून जातं. आपण आपले रहात नाही हेच खरं.




निलमोहरांची रांग बघून क्षणभर इथेच थांबू म्हणणारं मन पुढच्या क्षणी दुसर्‍या रंगाच्या प्रेमात पडायचं.  मागचे रंग आणि हे रंग यांची रंगपंचमी सुरू असतानाच उन्ह कलायला लागली. सुचीपर्णी वृक्षांचा दबदबा वाढायला लागला आणि मैलांचे दगड शिमला जवळ आल्याचं खुणावू लागले. नारकांड्याला पोहोचता पोहोचता काळोखच झाला. आवराआवर करून झोपेस्तोवर चंद्र बराच वर आला होता, समोरच्या पहाडावर चांदण्याचा वर्षाव होत होता.
  
पहाटेच्या स्वच्छ हवेत सुर्य किरणांनी न्हावून निघालेल्या  हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळच्या हॉटेल हाटूमधून समोरच्या पहाडावरची फुलांनी बहरलेली सफरचंदाची झाडं लक्ष वेधत होती. सात-आठ किलोमीटर दूर असलेल्या हाटू पीकवर जायला निघालो, कालपासून दर्‍य़ाखोर्‍यातील धोकादायक वळणावर लिलया गाडी चालवणार्‍या चालकांचं कौतूक वाटतच होतं, पण आज मात्र हाटू पीकवर जाणारा हा रस्ता त्यांची परिक्षा घेणाराच होता. जेमतेम एक गाडी जाईल अशा रत्यावर समोरून आलेल्या वाहनाला वाट करून देताना त्यांचं कसब पाहून त्यांना सलाम करीतच आम्ही हाटू पीक गाठलं. ११,००० फुट उंचीवर असलेल्या तिथल्या सर्वात उंच ठिकाणी दुपारीही बर्‍यापैकी थंडी वाजत होती. हाटू मंदीरात प्रवेश करण्यासाठी जेव्हा बूट काढले तेव्हा जमिनीचा बर्फासारखा स्पर्श तपमापकाची उणीव भरून काढत होता.

हिमाचली स्थापत्यकलेचा नमुना असलेलं हाटू मंदीर, तिथला परिसर आणि सभोवार पसरलेल्या दर्‍या डोंगर मनाच्या प्रसन्नतेत भर घालत होते. समोर आभाळ दाटून आलं होतं. हिमालयात असं अचानक वातावरण बदलतं आणि क्षणार्धात फिरत्या रंगमंचाप्रमाणे सगळ बदलून जातं. काचा वर घ्यायला लावणारा जोरदार पाऊस सूरू झाला आणि गारव्याचा वेगळा अनुभव घेत गाडीची चाकं हॉटलकडे वळली. 
हॉटेल हाटू, नारकांडा
हाटू मंदीर








                                       
             


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates