20 February, 2015

सोंगाड्यांच्या हाती सत्ता


यावर आणखी एक मजला बांधायला प्रोत्साहन
शहर किती आणि कसं बकाल करायचं याचे धडे घ्यायचे असतील तर गेली कित्तेक वर्षं मुंबई महापालिकेत सता भोगणार्‍य़ा पक्षाकडे पहावं लागेल. रस्ते, पाणी आणि नागरी सुविधांचं व्यवस्थापन किमान चांगलं ठेवून, शहरातील रस्त्यालगतच्या फुटपाथ( याला पादचारी मार्ग असा पर्यायी शब्द आहे. ) वरून नागरिकांना व्यवस्थीत चालता आलं पाहिजे एवढीही सेवा ज्या सत्ताधारी पक्षाला देता आली नाही ते आता या शहराची  उरली सुरली झोप उडवायच्या मागे लागले आहेत. प्रत्येक गोष्टींमध्ये केवळ स्वत:चाच विचार करणार्‍या आडमुठ्या नेतृत्वाचे दशावतार गेले काही महिने आपण पाहतोच आहोत, त्यात आता या पुढच्या पिढीच्या वारसदारांनी मुंबईची दुर्दशा करायचा चंग मांडला आहे. 

ही सुधारणा
इथे येणारा पर्यटक आणखी एक दिवस (खरं तर रात्र) थांबला तर महसुलात भर पडेल म्हणणार्‍य़ांना आणि उठसुट शिवरायांचं नाव घेणार्‍यांना महाराष्ट्रातले गड-किल्ले का दिसत नाहीत? पाच वर्षात एक किल्ल्याला जरी त्याचं पुर्वीचं रुप देता आलं तरी जगभरातील पर्यटकांचा ओघ या मराठी भूमीत वळल्याशिवाय रहाणार नाही. ते करायचं सोडून नाईट लाईफच्या मागे लागायचं म्हणजे अतीच झालं. असलेल्या लोकांना किमान सुविधा न देता ‘झोपडपट्टी वासियांना मोफत घरं’ असल्या भंपक आणि कधिही पुर्‍या न होणार्‍या घोषणा करून मुंबईत गर्दीला निमंत्रण धाडून हे शहर अधिक विद्रूप केलं गेलं आहे, आता झोपडीच्या वरच्या मजल्यालाही संरक्षण देण्याचं आश्वासन पुढील निवडणूकांवर डो:ळा ठेवून दिलं जात आहे. खरं तर झोपड्या कधी हटत नाहीत. तिथली माणसं इमारतीत रहायला गेली तरी पुन्हा त्या जागेवरची झोपडी तशीच असते. कायद्याच्या मर्यादा कुणीच पाळत नाही. “स्वाईन फ्लू हा हृदयविकार आहे  आणि तो उष्णतेमुळे होतो आणि त्यावर उपाय म्हणून शहरात झाडं लावणार आहोत” अशी मुक्ताफळं उधळणारी व्यक्ती महापौर पदी आहे.
यांच्या लाईफचं काय? 
त्यांचे कर्ते-करविते ‘नाईटलाईफ’ चा गेम सुरू करण्याच्या मागे आहेत.  प्रत्यक्षात आश्वासनपुर्ती करता आली नाही की नवनवीन क्लुप्त्या काढून पुढील निवडणूक जिंकायची असा धंदा आहे आणि जनहिताचं सोग आणून हे सोंगाडे आपल्याला झुलवू पहात आहेत. सोंगाड्यांच्या हाती सत्ता किती दिवस ठेवायची? मोकळ्या जागा व्यापणं आणि जनतेने दिलेल्या करातून ज्योत पेटवणं हेच कायते यांचं कर्यव्य आणि करून दाखवणं.

08 February, 2015

‘स्नेह’संमेलन


खरं तर अशा संमेलनात मी बावचळून जातो.  स्नेहसंमेलनात, लग्नाच्या हॉलमध्ये बसून नेमकं काय करायचं? एवढ्या गजबजाटात ना धड कुणाशी बोलता येत, ना सर्वांची खुशाली विचारू शकत. त्यात पुन्हा एखादा राहून गेला तर पुन्हा रुसवा! (असं आपलं उगीचच आपण वाटून घ्यायचं.)  पण काल ईशा टूर्सच्या स्नेहसंमेलनात खरी मजा आली, कारण तिथे जमलेली मंडळी आत्माराम परब या माझ्या लाडक्या मित्राच्या प्रेमाखातर जमली होती आणि त्यामुळे उद्देश स्पष्ट होता. त्या पैकी कित्तेकाना मी ओळखच नव्हतो त्यामुळेही डॉ. दिपक रेवंडकर, नाईक काका, धायीमाडे दांपत्य, साळसकर दांपत्य  असे मोजके लोकंच संवाद साधण्यासाठी मला उपलब्ध होते. आणखी एक म्हणजे आपली नेहमीची ‘टीम ईशा’ बर्‍याच दिवसांनी भेटणार होती.



 कालचं संमेलन वेगळं होतं. वर उल्लेखलेले सगळे भेटलेच पण मला व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाल्याने तिथून मला जमलेल्या मंडळींचे चेहरे न्याहाळता येत होते. ती मंडळी खरंच आत्माच्या प्रेमापोटी वेळ काढून आली होती. सगळ्यांच्या चहर्‍यावर उत्साह होता आणि ती आत्माने सांगितलेल्या गोष्टी मनापासून ऎकत होती. मी सुद्धा मला माहित असलेल्याच गोष्टी पुन्हा नव्याने ऎकत होतो. या  माणसाला ऎकणं, त्याच्या सहवासात चार घटका व्यतीत करणं म्हणजे एक आनंद सोहळा असतो. सतत उत्साहाचं कारंजं जवळ घेवून हा माणूस वावरत असतो. नवनवीन कल्पना, नवी माणसं, सहलीचं सोनं व्हावं म्हणून होणारी धडपड आणि मुख्य म्हणजे सकारात्मक विचार यामुळे माणसं त्याच्याकडे खेचली जाताता, त्याचीच होवून जातात.  काल हे मी अनुभवत होतो.


‘ईशा टूर्स’ च्या सहलींना गेलेले पण त्या सहलींना आत्माराम गेला नव्हता असे अनेकजण ईशा टूर्स बद्दल बोलत होते ते ऎकून आणखी बरं वाटलं कारण आत्माच्या अनुपस्थितीतही त्या सहली तेवढ्याच यशस्वी झाल्या होत्या. आम्ही ईशा टूर्सबरोबरच सहलीला का जातो यावरचं प्रत्येकाचं मत ऎकताना मुठभर मास अंगावर चढत होतं.    
मित्रहो, जीवन हा एक प्रवासच आहे. त्या प्रवासात येणारी सगळीच ठिकाणं आपल्याला आवडतीलच असं नाही, पण आपण ठरवून केलेल्या सहली मात्र अशा चीरस्मरणीय होणार असतील तर त्याहून चांगलं असं काही नसतं. त्या सहलींचा दरवळ आठवणींच्या रुपाने असा पुन्हा पुन्हा अनुभवता यावा म्हणून अशा सहलींना गेलं पाहिजे, अशी संमेलन होत राहिली पाहिजेत. काल त्याचा एक भाग बनता आलं आणि सुखद स्मुतींच्या हिंदोळ्यावरचे ते क्षण पुन्हा एकदा जगता आले. “टीम ईशा’, आत्मा धन्यवाद.

असा विसावा या भूमीवर 

तुझ्या संगती सदा घडूदे!

स्नेहाळांच्या हिंदोळ्यावर

पुन्हा एकदा मला झुलूदे! 

ता.क. काल मांडलेल्या खुर्च्या कमी पडल्या आणि त्या आणखी मागवाव्या लागल्या. अनीला मॅडम तुम्ही इतरांच्या कष्टाचं सोनं केलत. 

वैद्यसर उत्तम सुत्रसंचालन, किती गोड बोलता तुम्ही!     

नरेंद्र प्रभू 





LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates