30 September, 2014

अंगामी योध्ये



ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख :  

आसाम-मणिपुरमध्ये चहाच्या बागांमधल्या उत्पादनाकडे तत्कालीन ब्रिटीश सरकारचं लक्ष गेलं तेव्हा त्यानी तो भाग आपल्या अधिपत्याखाली घेण्याचं ठरवलं. सुनियोजित आराखडा आणि सैनिकी बळ यांचा वापर करून तो भाग आपल्या अधिकारात येईल आणि स्थानिक जनतेला चहाच्या मळ्यात कामगार म्हणून राबवता येईल हा ब्रिटीशांचा मानस मात्र इथे सहज यशस्वी झाला नाही. या सर्वाला कारण होते ते तिथले नागा योध्ये. वृत्तीने अत्यंत साधे असले तरी आपल्यावर परकी शासक अंमल करणार ही गोष्टच त्यांना मान्य नव्हती. ब्रिटीशांना मात्र हा भाग येणकेणप्रकारेण पादाक्रांत करायचाच होता.

आज आसाममधल्या गुवाहाटीपासून 340 कि.मी. अंतरावर असलेल्या अंगामीला जायला तेव्हा रस्ता नव्हता. एकदा का रस्ता तयार झाला म्हणजे या भागावर अधिपत्य गाजवता येईल हे ब्रिटीशाना माहित होतं. 1832 साली शेकडो शिपाई बरोबर घेवून जेव्हा ब्रिटीश अधिकारी मणिपूरला जायला निघाले तेव्हा तिथल्या प्रत्येक नागा खेड्यात त्यांना कमालीच्या आणि चिवट संघर्षाला तोंड द्यावं लागलं. पहिला प्रयत्न व्यर्थ गेल्यावर मणिपुरचे राजे गंभिर सिंह यांच्या मदतीने ब्रिटीशानी पुन्हा एकदा वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले. बरीच ताकद खर्च केल्यावर पोलिसचौकी स्थापित करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले. परंतू काही महिन्यातच मिझोमा आणि खोनोमा जमातींनी त्या चौक्या जाळून टाकल्या. 1950 पर्यंत ब्रिटीशांनी अशा दहा मोहिमा राबवल्या. 1850 च्या हिवाळ्यात ब्रिटीशांनी पुन्हा एकदा पाचशे शिपायांसह नागा टेकड्यांवर हल्ला केला त्या वेळीही सोळा तास तीव्र संघर्ष करीत नागा विरांनी ब्रिटीशांना रोखून धरलं पण एका बाजूला बंदुका आणि दुसर्‍या बाजूला बाण आणि भाले यांच्या विषम लढाईत नागांना गाव सोडून माघार घ्यावी लागली. ब्रिटीशांनी मोकळ्या झालेल्या गांवामध्ये प्रवेश करून नागां लोकांच्या वस्त्या जाळून टाकल्या. मणिपुरच्या खिक्रूमा गावापर्यंत हा संघर्ष जेव्हा पोहोचला तेव्हा तिथल्या रहिवाशांनी जोरदार विरोध केला आणि सुमारे शंभरच्यावर गावकरी कामी आले. कोहीमापर्यंत हा सिलसिला सुरू होता. शेकडो नागा योध्ये कामी आले आणि ब्रिटीशांवरचे हल्ले सुरूच राहिले. शेवटी गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने ही मोहीम थांबवण्याचं ठरवलं आणि तिथल्या पोलिस चौक्यांमधून शिपायी माघारी बोलावले.

स्थानिक नागा ज्या लोकांना ‘कंपनी मॅन’ म्हणून ओळखत त्या ब्रिटीशांना त्यानी आपल्या भूमीवर थारा दिला नाही. 1879 पुन्हा एकदा ब्रिटीशानी दिमंत या राजकीय अधिकार्‍याला सैनिकी सौरक्षणात नागा भूमीवर पाठवलं. अंगामी योध्यांनी त्या अधिकार्‍य़ा बरोबरच त्याच्या सोबत असलेल्या 39 सैनिकांना कंठस्नान घातलं आणि बाकिचे सैनिक जंगलात पळून गेले. पण याच सुमारास तिथे ख्रिश्चन मिशनर्‍यांनी यायला सुरूवात केली होती. नागा लोकांपैकी काहींना त्यांनी आपल्या धर्माची दिक्षा दिली होती तेच लोक मग ब्रिटीशांना हेरगिरीसाठी वापरता आले. असं असलं तरी शूर नागा लोकांनी संघर्ष सुरू ठेवला ब्रिटीशांनी पुन्हा माघार घेतली.

1880 मध्ये पुन्हा एकदा मोठ्या फौजफाट्यासह ब्रिगेडीयर जनरल जे.एल. नॅशनच्या नेतृत्वाखाली मणिपुरवर हल्ला केला गेला. नागा जनतेने दर्‍याखोर्‍यांचा आसरा घेवून गनिमी युद्ध चालू ठेवलं. ब्रिटीश सैनिकांनी कोहीमा गावाला आग लावून ते भस्मसात केलं. पण नागांचा संघर्ष चालूच होता. त्यानी ब्रिटीशांच्या ताब्यातील चहाच्या मळ्यांवर हल्ला चढवला आणि सोळा कामगारांसह मॅनेजरला ठार केलं. पण परतीच्या रस्त्यावर नॅशनने त्यांची कोंडी केली आणि अन्न पाण्याविना नागा लढवैयाना प्राण गमावण्याची पाळी आली. शेवटी नागांनी शस्त्र खाली ठेवली. नागांना जबर दंड ठोठावण्यात आला. सर्व शस्त्रात्रं काढून घेण्यात आली. त्याची शेतं आणि गावं जप्त करण्यात आली तसंच चहामळ्यांवर गुलाम म्हणून नेण्यात आलं. ब्रिटीशांनी विजय महोत्सव साजरा केला आणि गव्हर्नरला सगळा वृतांत तारेने कळवण्यात आला.

एवढ्या सगळ्या मोहिमानंतरही नागांचा संघर्ष सुरूच राहिला. आपल्या शेतात, दर्‍याखोर्‍यात वास्तव्य करून ते ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडत होते. या वेळी मात्र मिशनरी ब्रिटीशांना सहाय्यकारी झाले. हळूहळू बदल होत होता. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ‘आझाद हिंद सेना’ कोहिमाला पोहोचली तेव्हा याच नागावीरांनी त्यांना मदत केली, नेताजींच्या आझाद हिंद सेनेने तिथे ब्रिटीशांचा पराभव केला. 

हेच नागा धर्मांतरानंतर मात्र बदलले. स्वातत्र्यानंतर तिथे आपल्याच देशाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या. आपल्या स्वातंत्र्याचं प्राणपणाने रक्षण करणारे आणि ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडणारे  नागा आता मात्र आपल्याच नागरीकांचे आणि जवानांचे शत्रू झाले आहेत, हत्या करीत आहेत.     
                                                                     

29 September, 2014

ईशान्य राज्यातील पर्यटन समज - गैरसमज


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत भाषण करताना ईशान्य भारतात पर्यटन वाढले पाहिजे असा आग्रह धरला. भारतात असलेल्या तीस हजार महाविद्यालयातून दरवर्षी शंभर विद्यार्थी जरी पुर्वांचलाच्या सफरीवर गेले तरी तीथल्या पर्यटनात खुपच वाढ होईल आणि त्या रांज्यांमधील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची मदत अशा पर्यटनातून घडेल यावर पंतप्रधानांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. केंद्र सरकार पुर्वांचलाबबत किती संवेदनशील आहे आणि नव्या सरकारने ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी जो रोडम्याप तयार केला आहे त्याचं सुतोवाच पंतप्रधानांच्या भाषणात प्रतीबिंबीत होत होतं. अरुणाचल प्रदेश मधून निवडून आलेले श्री. किरेन रिजीजू हे गृहखात्याचे राज्य मंत्री आहेत तर आसामच्या लखीमपूरचं प्रतीनिधीत्व करणारे सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे क्रिडा आणि युवक कल्याण खात्याच्या स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुर्वांचलातील या मंत्रांच्या रुपाने तिथल्या जनतेला आपला आवाज दिल्लीपर्यंत समर्थपणे पुहोचवता ये ईल. नव्या केंद्र सरकारमुळे संपुर्ण देशात आशादायक वातावरण निर्माण झालं असून ईशान्य राज्यातील जनताही त्याला अपवाद नाही.


असं असलं तरी ईशान्य राज्यातील पर्यटन हे तितके सोपे आहे का? अशी शंका अनेकजण व्यक्त करतात आणि त्याचं निराकरण होणं आवश्यक आहे. ईशान्य राज्यातील पर्यटन म्हटलं ही सगळ्यात पहिल्यांदा आठवत ते आसाममधलं काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मेघालयातलं चेरापुंजी. गुवाहाटी, कामाख्या मंदीर, तेजपूर, शिलॉंग, तळ्यांच तवांग, माजूली बेट अशी अनेक ठिकाणं अभ्यासू पर्यटकांना साद घालू लागतात. अभ्यासू म्हटलं कारण पर्यटनाच्या असंख्य संधी असूनही गेल्या साठवर्षात या भागाकडे कुणीही जाणीवपुर्वक पाहिलं नाही. त्या मुळे सर्वसाधारण पर्यटक तिकडे फिरकलाच नाही.  सात राष्ट्रीय उद्यानं, एकशे आठ तळ्यांचा अद्भूत देखावा दाखवून डोळ्याचं पारणं फेडणारं ‘तळ्यांच तवांग’, पुर्वांचलाचं सांकृतीक केंद्र असलेलं माजूली बेट, छाया-प्रकाशाचा खेळ खेळत राहणारं मेघालय, ब्रम्हपूत्रेचं खोरं असलेलं आसाम, हिमालयाच्या पर्वत रांगांचा सुखद अनुभव देणारा भालूकपॉंग, दिरांग, बोमडीला हा प्रदेश, नागालॅन्डमध्ये दरवर्षी तिथल्या सतरा जनजातींचं निवासी गाव वसवून   महिनाभर साजरा होणारा हॉर्नबील फेस्टीवल ही ठळक आकर्षणं आणि याहूनही मनोवेधक अशी कितीतरी ठिकाणं या राज्यांमध्ये असून पर्यटकांसाठी हा भाग म्हणजे नंदनवनच आहे.                              

गेल्या दहा वर्षात आरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालॅन्ड मधलं पर्यटन वाढीस लागलं असून तिथली जनता आणि पर्यटन विभाग आपल्या स्वागताला तयारच असतात. उत्तम व्यवस्था असलेली रिसॉर्टस, हॉटेलं या बरोबरच सर्वप्रकारच्या खाण्याचा अस्वाद देणारी साखळी खानपान गृह हमरस्त्या शेजारी आढळून येतात. पर्यटकांना येजा करण्यासाठी वाहनं आणि रस्ते यांची बर्‍यापैकी असलेली उपलब्धता भारतातील कुठल्याही प्रदेशासारखीच असल्याने आपण फार दुर्गम भागात आलो आहोत असं वाटत नाही.

आपल्या देशात आंतरराष्टीय सिमेच्या लगत जायचं असेल तर पर्यटकांना ‘इनर लाइन परमिट’ घ्यावं लागतं. इनर लाइन परमिटची मुदत सात दिवस असते आणि नंतर आवश्यकता असेल तर ते वाढवून देण्यात येतं. (इनर लाइन परमिटसाठी एक फोटो आणि मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड सारखं ओळखपत्र सादर करावं लागतं.) त्या राज्याच्या निवासी आयुक्तांकडून अशी परमिट दिली जातात. आता बर्‍याच ठिकाणी या गोष्टीचं सुलभीकरण करण्यात आलं आहे किंवा त्यात बदल केला असून चेक नाक्यावर केवळ नोंदी करून पर्यटकांना त्या भागात प्रवेश दिला जात आहे. (जम्मू काश्मिर राज्यातल्या नुब्रा खोर्‍यासारख्या ठिकाणी जायचं असेल तर पुर्वी इनर लाइन परमिट घ्यावं लागत होतं. या वर्षीच्या मे महिन्यापासून ते स्थगीत करण्यात आलं आहे.)

पर्यटन संस्थेची मदत न घेता जाणार्‍या पर्यटकांना या भागात अजूनही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता असते. त्यातली मुख्य समस्या म्हणजे ‘इनर लाइन परमिट’ ही होय. अर्थात ईशान्येकडच्या राज्यात अरूणाचल प्रदेश मधल्या तवांग किंवा झायरो अशा ठिकाणी जायचं असेल तर ‘इनर लाइन परमिट’ घ्यावं लागतं. अन्यथा वर उल्लेख केलेल्या बहुतांश ठिकाणी त्याची आवश्यकता नाही. निवासी आयुक्तांच्या कार्यालयात जावून ‘इनर लाइन परमिट’ घेणं यात सहलीतला एक महत्वाचा दिवस खर्ची पडतो. हे टाळायचं असेल तर भुतान सारख्या देशात भारतीयांना रस्ते मार्गाने प्रवेश करण्यासाठी देण्यात येणार्‍या परमिट सारखी व्यवस्था करण्यात आपल्या देशातील प्रशासनाला कोणतीच अडचण यायला नको असं वाटतं. भुतान मध्ये प्रवेश करताना संगणकावर फोटो घेतला जातो आणि ओळख पत्राची (पारपत्र, मतदार ओळखपत्र इत्यादी पैकी एक) प्रत घेवून परमीट देण्यात येतं. हा वेळ ही वाचवता येवू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पुर्ण करून इच्छूकांना घरबसल्या परमिट देण्याची प्रक्रिया पर्यटन विभागाने सूरू केल्यास या भागातील पर्यटनाला चालना तर मिळेलच शिवाय पर्यटकांचा अमुल्य वेळ ही वाचू शकेल.                          


इशान्येकडल्या आरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालॅन्ड या राज्यात देशातील इतर राज्याप्रमाणे आपण विनाव्रत्यय प्रवास करू शकतो. मात्र मणीपूर, मिझोराम या राज्यात अजूनही अशांतता असल्याने तिथलं पर्यटन तितकसं सोपं नाही.         

28 September, 2014

चोकलांगन – एक अस्पर्श गाव


ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख : 

तिथे जायला गाडी रस्ता आहे पण तो नावालाच. पस्तीस किलोमीटर गाडीरस्ता पार करायला तीन-साडेतीन तास लागतात.  जवळच्या नोकलॅक या शहरवजा खेड्याला जोडणारा हा रस्ता तयार झाला तोच मुळी 2010 साली. अगोदर हाच पल्ला पार करायला नवू दहा तास लागायचे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि ब्रम्हदेशाला (म्यानमार) लागून असलेलं हे गाव म्हणजे चोकलांगन. एका अर्थाने बाहेरच्या जगाचा वाराही न लागलेलं. आपलं आपल्यातच गुंतलेलं आणि गुंफलेलं एक स्वयंपुर्ण खेडं.

ब्रम्हदेशाच्या सीमेला लागून असलेल्या या खेड्यातील लोक आपल्या आपतेष्टांना भेटायला जातात ते डोंगरा पलिकडल्या गावात ब्रम्हदेशात. ब्रिटीशांनी भारत सोडताना नकाशावर मारलेल्या रेषांनी या गावकर्‍यांमध्ये अंतर पाडलं नाही. नागालँड राज्यातला तुएनसंग हा सिमावर्ती जिल्हा हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांचा बनलेला आहे, याच जिल्ह्यात हे गाव आहे. चोकलांगनसारख्या गावातील डोंगर उतारावर वस्ती करून असलेले गावकरी निसर्गाचा मान राखून, त्याला न दुखावता आपलं जीवनक्रमण करीत आहेत. आधुनिक शिक्षण आणि आरोग्य सेवेचा मागमूसही नसलेल्या या ठिकाणी भारत आणि इंडीया या मधली दरी प्रकर्षाने जाणवत राहाते. आज या एकविसाव्या शतकात जग वाटचाल करीत असताना एकोणीसाव्या शतकातल्या राहाणीमानाशी साधर्म्य असलेलं हे गाव अजून आपल्याला किती भारत निर्माण करायचं राहून गेलं आहे याचा दाखला देतं. मोबाईल तर दूरची गोष्ट पण इथले विजेचे खांबही दिवसा उजेडीच प्रकाश बघतात आणि पुर्वांचलात लवकर होणार्‍य़ा सुर्यास्ताबरोबरच काळोखात गुडूप होतात. 2010 साली तयार करण्यात आलेला रस्ता आता नावालाच शिल्लक आहे. आपला शेजारी देश चिन भारताच्या सिमेलगत जगातले सर्वोत्तम रस्ते निर्माण करीत आहे आणि आपण तयार केलेले रस्ते दुसर्‍याच दिवशी फक्त कागदावरची रेष असतात आणि प्रत्यक्षात कालचा दिवस बरा होता म्हणण्याची पाळी स्थानिक जनतेवर येते.

तीनकशे घरटी असलेल्या चोकलांगन गावात 2640 गावकरी वसती करून आहेत असं तिथली व्यवस्ता सांगते. या एवढ्या लोकवस्तीला भारतात सर्वसाधारण गावात असलेली कुठलीच सेवा-सुविधा किंवा सोय सवलत आज तागायत मिळालेली नाही. सरकार दप्तरी या गावाला  1986 साली विज पुरवठा केल्याचा उल्लेख आढळला तरी 2002 साली पुन्हा एकदा हे गाव विजेच्या तारांनी जेडलं गेलं पण त्या तारांमधून अभावानेच विज प्रवाह खेळत असतो. हे आपल्यां कडून असं असलं तरी ब्रम्हदेशातल्या शेजारी तैगन गावामधून जीवाभावाचा अनोखा प्रवाह या गावापर्यंत सतत वहात असतो. खैमुनगन या एकाच जमातीतले हे लोक चोकलांगन आणि तैगन गावात वसती करून पिढ्यानपिढ्या रहात आहेत. दोन वेगवेगळ्या देशात राहूनही या लोकांमधला बंधूभाव तसूभरही कमी झालेला नाही.

एवढ्या समस्या असल्या तरी इथले लोक खुपच समाधानी आहेत. या गावात गेल्यास अगदी प्रत्येक घर अभ्यागताचं स्वागत करायला उत्सुक असतं. बांबुच्या झोपडीवजा घराशेजारी खेळ खेळणारी लहान मुलं दगड, बांबू, लाकूड अशाच गोष्टी हातात घेवून खेळत असतात. शाळेत शिकायच्या या वयात मात्र त्याना शिकायला शाळाच नाही. पण हे पट्ठे बांबू हातात धरायला शिकल्यानंतर त्याच बांबूपासून तर्‍हतर्‍हेच्या वस्तू बनवायला केव्हा शिकतात ते त्यांचं त्यानाच कळत नाही. इथला प्रत्येकजण परंपरागत बांबूकामात पारंगत आहे. वर्षभरात अल्पकाळ केली जाणारी डोंगर उतारावरची शेती सोडल्यास उरलेल्या वेळी बांबूकामात गुंतलेले इथले हात वयाच्या ऎशीव्या वर्षीही थकत नाहीत.

चोकलांगन हे खेडं जरी आधुनीक जगापासून आणि सोयी सुविधांपासून कोसो दूर असलं तरी याच आधुनीक जगाच्या शोषणा पासून इथला निसर्ग वाचला आहे. म्हणूनच इथली निसर्ग संपदा पाहाताना आपल्याला माणसाने अनिर्बंध वापर करायच्या आधीचं जग पाहिल्याच सुख नक्कीच मिळतं. म्हणूनच हे खर्‍य़ा अर्थाने न बिघडवलेलं जग पहाण्यासारखं आहे. या गावाकडे घेवून जाणारा रस्ता भले ओबडधोबड आहे पण तो ओलांडून गेल्यावर हिरव्यारंगात न्हालेल्या अनंत छटा, निळाईत आणि धुक्याच्या दुलईत धुसर होत जाणारे डोंगर कडे, झुळझुळत जाणारे झरे, बांबूची बेटं असं दिसणारं तिथलं दृष्य आपलं मन मोहून टाकेल यात शंकाच नाही.

या चोकलांगनबद्दल ऎकलं आणि मला माझ्या लहाणपणची कोचरा या गावातून परुळ्याला जाणारी डोंगरातली वाट आठवली. झाड-झाडोरा, तुफान वारा, इकडून तिकडे सतत हालचाल करणारे पक्षी, कधी चुकून दिसणारे पण मनाचा थरकाप उडवणारे बिबळा, रान डुक्कर किंवा रानरेड्यासारखे  हिंस्र प्राणी. दूरवर समुद्रात पसरलेला सिधुदुर्ग किल्ला. वर निळं आकाश आणि पायाखाली कधीही चुकूशील म्हणणारी पाऊलवाट. एक डोंगर चढावा आणि दुसर्‍या बाजूला उतरावं. सहा ऋतू आणि त्रिकाळ वेगवेगळ्या रुपात दर्शन देणारा निसर्ग. आधुनिकतेचं वारं नसलं तरी सतत कात टकत जाणारा हा सगळा परिसर मनाला मोहवून टाकत असे.  

27 September, 2014

मुंबईचा पाऊस


महाराष्ट्र मंडळ न्युयॉर्कच्या स्नेहदिप अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख:

मुंबईत सदासर्वकाळ घामाचा पाऊस पडत असतो. ट्रेन, बस, फुटपाथ कुठेही जा घाम हा ठरलेला. त्याला कुणी इथलं दमट हवामान कारणीभूत आहे असं म्हणत असलं तरी मला ते तेवढं पटत नाही. कारण इथला माणूस सतत धावत असतो, श्रम करीत असतो. फुकट चकाट्या पिटत  बसलेला माणूस इथे दिसणार नाही. ट्रेनच्या गर्दीत या घामाच्या पावसाचा जोर वाढतो आणि अनेक वेळा दोन  माणसांच्या घामाचा संगमही होतो. खरा पाऊस बरसला की मात्र या घामकर्‍यांची धांदल उडते. पाऊस आला तरी दोन-चारदा भिजल्याशिवाय खरा मुंबईकर छत्री हातात घेत नाही. इमारतींचा आसरा घेत, टॅक्सी......, ऑटो........ असं ओरडत तो घर किंवा ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमीच यशस्वी होतो असं नाही. पाऊस आला रे आला की सगळॆ रिक्षा टॅक्सीवाले तुम्हाला हवं ते ठिकाण सोडून विरुद्ध दिशेलाच जायला उत्सुक असतात. वाहन पकडण्याच्या नादात मात्र आपण ते पकडायच्या आधीच चिंब होतो. कधी पावसाने तर कधी रस्त्यातल्या खड्ड्यातल्या पाण्याचा सपकारा एखादं वाहन असं उडवतं की आपण नखशिखांत भिजून जातो. छत्री असल्याने भिजणारे किंवा भिजलेला रेनकोट घालून ट्रेनच्या गर्दीत घुसणारे कावळॆ दुसर्‍या स्टेशनला उतरताना अंग पुसून साफरूफ होवून बाहेर पडतात.   

कालच्या भिजण्याच्या अनुभवाने शहाणा झालेला मुंबईकर आता छत्री घेऊन बाहेर पडतो आणि पहिल्याच पावसाने बावरून गेलेली लोकल त्याला ‘आजका दिन मेरा है” अशा थाटात जेरीस आणते. नुकत्याच सुरू झालेल्या पावसाने ही ‘लोकल’ मुंबईच्या ‘लो’ लाईन एरीयामे पानी भरने के कारण अभी ‘कल’ ही चलेगी असं वाटायला लागतं. ती लोकल मग जलराणीच होऊन जाते. वरून पडणारा पाऊस दारं-खिडक्यांची तमा नबाळगता आतल्या गर्दीला सर्दी होईल याची काळजी घेत असतो, काही भाग्यवान लोक जर त्यापासून बचावलेच तर मग छपरातून होणारा अभिषेक ती कमी भरून काढतो. वर हे जलधारांचं नाट्य तर खाली रुळांवर साचलेलं पाणी नौकानयनाचा आनंद देतं असतं. एका छोट्याश्या प्रवासात आणि अल्प दराच्या तिकीटात असे अनेक अद्भूत अनुभव देणारी वाहतूक जगाच्या पाठीवर दुसरी नसावी. आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली मेट्रोही यात मागे नाही. रस्त्यावरील गर्दीला  टाटा करीत उन्नत मार्गावरून ऎटीत जाणारी मेट्रो सध्या कौतूकाचा विषय बनली आहे.  वातानुकुलीत असल्याने या मेट्रोत घाम येत नाही. उंचावरून प्रवास चालू असल्याने आता ट्राकमध्ये पाणी भरलं म्हणून वाहतूक अडणार नाही. मेट्रोने प्रवास करणार्‍यांचे तरी आता ‘अच्छे दिन’ आले असं वाटायला लागलं. पण स्वयंचलीत दरवाजे बंद झाल्यावर पावसाचं पाणी आत येण्याची शक्यता नसल्याने बाहेर पडणार्‍या पावसाची मजा घेत प्रवास करणार्‍या मुंबईकरावर त्या दिवशी छपर फाडके पावसाची बरसात प्रत्यक्ष मेट्रोत झालीच. मुबईचा पाऊस लोकांशी जवळीक साधायला असा कुठूनही प्रगट होत असतो.

मुंबईत पावसाळ्याआधी करण्याची कामं मात्र मुबईकर पहिल्या पावसाच्या सरी पडल्यानंतरच करताना दिसतो. या गोष्टीला महापालिका आणि रेल्वे प्रशानही अपवाद नाही. पहिल्याच पावसाने दणका दिल्यावर सगळेच जागे होतात आणि मग कामाला लागतात. महापालिकेचं अर्ध काम पाऊसच करतो. गटारात साचलेला कचरा वाहून जातो आणि ते साफ केल्याचं श्रेय मात्र अधिकारी घेत असतात. मुंबईचा डबेवाला सोडून मुंबईत कुणी टोपी घालताना दिसत नाही पण हल्ली बर्‍याच इमारतीना पावसाळ्यात टोप्या घातलेल्या दिसतात. (नशीब इकडे तो केजरीवाल नाही, अन्यथा त्याने या टोप्यांवर ही ‘हुँ आम इमारत’ असं लिहून टाकलं असतं.)

या मुंबईत तिनशे पासष्ठ दिवस काहीना काही उत्सव सुरू असतात. धार्मिक नसले तर मग ‘मुंबई फेस्टीव्हल’, ‘फिल्म फेस्टीव्हल’ असे अनेक उत्सव इथे घडत असतात. पावसाळ्यात शाळा कॉलेज सुरू झाल्यावर वर्षा सहलींचा एक उत्सव सोहळाच सुरू होतो. दर आठवडा अखेर जवळच्या नदी, तलाव, धबधबे, समुद्र किनारा जिथे म्हणून पाणी आहे तिथे हौशी आणि दर्दींची झुंबड उडते. माणसं आणि पाणी दोन्ही उसळत असतात. समुद्राला उधाण येत आणि गर्दीलाही. पावसाळ्यात ट्रेकिंगला जाणारा मुंबईकर तेवढाच निसर्ग आपल्या कवेत घेवून सुखावतो. मामाचं गाव, गावाकडचं घर या संकल्पना आता पातळ होत चालल्यात पण दर आठवडा नाही जमलं तर निदान पंधरवड्याला तरी ट्रेकिंग करणारे अनेक मुंबईकर आपल्याला दिसून येतील.

मुबईकरांना असलेलं हे पावसाचं कौतूक पाहून कधी कधी पाऊसही हुरळून जातो आणि तो त्याची भेट घेण्यासाठी थेट त्याच्या घरात प्रवेश करतो. २६/७ ही तारीख मुंबाईकर विसरू शकत नाही २६/११ ला दहशत वाद्यांनी जशी दहशत माजवली तशीच दहशत त्या पावसाने २००५ साली माजवली होती. इमारतीच्या आवारात पाणी आलं म्हणून नातवाला घेवून कागदी होड्या पाण्यात सोडणार्‍य़ा आजोबांना काही वेळाने खर्‍या होड्यामधून सुरक्षीत स्थळी सोडावं लागलं. दहशतवाद्यांनी मारली तशीच माणसं पावसाने डोळ्यादेखत ओढून नेली. अवघी मुंबई जलमय झाली.

यंदा मात्र जुलै उजाडला तरी पाऊस बरसलाच नाही आणि मुंबाईकराच्या तोंडचं पाणी पळालं. शब्दश: पाणी पळालं. नळाला पाणी नाही तर काय करायचं? कुठं जायचं? मायानगरी म्हणून सगळे इकडे धाव घेतात आता या संकट समयी मुंबईकराने कुठं जायचं? कित्येक वर्ष चावून चोथा झालेले उपाय पुन्हा वर्तमान पत्रांचे रकाने भरून वाहू लागले. हे उपाय वेळीच केले असते तर पाणी राखता आलं असतं. आता काय करायचं? पावलोपावली अडथळ्याची शर्यत असल्याने सतत खाली बघून चालणारा मुंबईकर कधी नव्हे तो आभाळाकडे टक लावून पाहू लागला.  दोन दिवस पाऊस पडला आणि पाण्याची समस्या कमी झाली असं इथे होत नाही. चांगला महीनाभर पाऊस पडल्यानंतर इथल्या नळाला पाणी येतं. महापालिकेने पाणी कपात केली आणि बालदीत घ्यायचं पाणी मुबईकराला कपात घ्यायची पाळी आली. आता काय करायचं? बेडकाच लग्न लावायचं?  बेडकाच लग्न लावलं म्हणजे म्हणे पाऊस पडतो. कशाने का होईना पाऊस पडूदे म्हणून बेडकाची शोधाशेध सुरू झाली. आधीच पाऊस नाही, तो नाही म्हणून चिखल नाही, चिखल नाही म्हणून बेडूक नाही अशी साखळी समस्या उभी ठाकली. मुंबईत बेडूक नसतातच, अशा परिस्थितीत ते आणखी दुरापास्त. काय करावं? हल्ली मुंबईत कसलीही कमतरता भासली की चिनी ती भरून काढतात. मागे कांद्याची आवक घटली तेव्हा चिनी कांदे बाजारात आले होते. बघून कळतच नव्हतं ते खरे की खोटे. तर या वेळीही चिनी बेडूक वाजारात दिसले तेच बेडूक घेवून त्यांची लग्न लावली गेली. थेडा पाऊस पडला लगेच चिनी छत्र्या बाजारात आल्या. हल्ली सगळच चिनी असतं इकडे. फक्त बसक्या चिनी नाकाचाच कायतो तुटवडा आहे.


कुणाच्याका बेडकाने पडेना पण पडलेल्या पावसाचं मुंबईकराला भारी कौतूक. एकदा पाऊस पडला की तलावात किती पाणी भरलं याची आकडेवारी वर्तमानपत्रात यायला लागते. वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, मोडकसागर एकदा का भरली की मुबईकरांचा जीव भांड्यात पडतो, तो भांड्यात जमवलेलं पाणी ओतून टाकतो आणि नळाचं पाणी वहायला लागतं, पुन्हा थेंब... थेब... गळे पर्यंत. 


25 September, 2014

लोटे परशुराम ते परशुराम कुंड


परशुरामाने जोडलेला दुवा

त्रेता युगापासून संपुर्ण भारत वर्षात एक आख्याईका बनुन राहीलेल्या भगवान परशुरामाने त्या काळात  हिंदुस्थानभर संचार केल्याच्या खुणा सापडतात. आपल्या असामान्य पराक्रमाच्या जोरावर त्यानी दुष्ट आणि नराधम राज्यांचा निप्पात केला आणि धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी जिवाचं रान केलं. 

परशुरामाने बाण मारून समुद्र मागे हटवला आणि कोकण प्रांताची निर्मिती केली असं म्हटलं जातं. भारतात समुद्रालगतच्या अनेक ठिकाणी हिच कथा सांगितली जाते. कोकण प्रांताला तर परशुराम भूमी म्हणूनच ओळखलं जातं. तिकडे देशाच्या पुर्वोत्तर राज्यातही परशुरामाच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मातृ आणि पितृ भक्त परशुराम तर जगविख्यात आहे. पित्याच्या आदेशाला शिरसावंद्य मानून त्याने स्वत:च्या आईचंच शिर धडावेगळं केलं आणि पुन्हा पिता प्रसन्न होताच आईसाठी जीवन मागून घेतलं. आईच्या हत्तेचं हे पाप धुण्यासाठी त्याने ज्या कुंडात उडी टाकली त्या लोहीत नदी मधल्या कुंडाला परशुराम कुंड म्हणून ओळखलं जातं. त्या काळापासूनच दर संक्रातीला या कुंडात स्नान करण्यासाठी हजारो श्राद्धाळू एकत्र येत असतात. 

या वर्षीच्या मकरसंक्रातीच्या पवित्रस्नाच्या वेळी पन्नास हजार भाविकांनी परशुराम कुंडाला भेट दिली. त्यापैकी तीस हजार यात्रेकरू भारताच्या विविध भागातून आले होते अशी माहिती लोहीत जिल्ह्याच्या वाक्रो प्रांताचे अतिरीक्त सहाय्यक आयुक्त श्री. दाक्तो रिबा यांनी दिली आहे. यात्रेकरूंची ही संख्या गतवर्षा पेक्षा कमी आहे असंही रीबा म्हणाले. यात्रेकरूंची ही घटती संख्या प्रशासनालाही अपेक्षीत नव्हती.

आपल्या अरुणाचल प्रदेश राज्यातला लोहीत जिल्हा निसर्गसंपदा आणि सौदर्याने भरलेला आहे. या जिल्ह्यातून वाहणार्‍या लोहीत नदीवरूनच या जिल्ह्याला लोहीत हे नाव दिलं गेलं आहे. अनेक पौराणिक आणि ऎतिहासिक कथांशी जोडल्यागेलेल्या या ठिकाणी पर्यटनाला खुपच वाव आहे. शहरी प्रदुषणाचा मागमुस नसलेला हा प्रांत बर्फाच्छादीत शिखरं, खळाळते जलप्रवाह, नद्या, सदाहरीत जंगलाने परीपुर्ण असून पर्यटकाना सदोदीत साद घालत आहे. इथली गावं देश विदेशातील पर्यटकांच आकर्षण ठरू शकतील एवढी देखणी आहेत आणि त्यानी आपली पारंपारीक नृत्य आणि कलांची जपणूकही केली आहे. पर्वतारोहण, राफ्टींग, जंगल सफारी आणि हत्तीवरून फेरफटका मारणं  अशा पर्यटनाच्या अनेक संधी असूनही त्या दृष्टीने हा भाग अजून दुर्लक्षीत राहीला आहे. परशुरामकुंड हे अरुणाचल मधील तिर्थस्थळ,  भालुकपॉंग, दिरांग, बोमदीला, से ला पास,  ही चिन-भारत युद्ध भूमी,   तळ्याचं तवांग या सर्वांचा इतिहास-भूगोलात असलेला उल्लेख एवढाच आपला असलेला संबंध असं न राहाता हिमालयाच्या कुशीत वसलेला अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा भाग असलेला कोकण प्रांत यांचं नातं परशुरामकुंड तसंच पर्यटनाच्या निमित्ताने घट्ट झालं तर विविधतेत असलेली एकात्मता या म्हणण्यालाही काही अर्थ प्राप्त होईल, नाही का?  

                     

24 September, 2014

जंगल संपत्तीचा विनाश


ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख :  
विकासाच्या नावाखाली भकास होत जाणारी वनसंपदा ही अवघ्या जगाचीच समस्य होवू घातली आहे.  एकेकाळी आपला पश्चिम घाट हा इथल्या जैव विविधतेसाठी प्रख्यात होता, आजही आहे पण विकासाच्या नावाखाली त्याच्या नरडीला नख लावायला इथले राजकर्तेच पुढे सरसावले आहेत. तिकडे अमेरिकेत कॅलिफोर्नियात समुद्र किनाऱ्यालगत,  प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आणि खूप उंच वाढणाऱ्या 'रेडवूड' या वृक्षाचं जंगल आहे. विशेष म्हणजे जगात हा वृक्ष इतरत्र कोठेही आढळत नाही. फर्निचरच्या व्यवसायासाठी अमेरिकन लाकूड कंपन्या या वृक्षाची सर्रास तोड करतात. जंगल संपत्तीचा विनाश हा किती घातक ठरू शकतो याचा धडा उत्तराखंडाने दिल्याला अजून वर्षही झालेलं नाही.

हिमालयाच्या कुशीत वसलेलं देवभूमी उत्तराखंड निसर्ग सौदर्याने ओसंडून वाहात होतं. या राज्यात काय नाही ते विचारा. गंगा, यमुना, भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, धवलगंगा, पुष्पावती, भिलंगणा, सोंगनदी सारख्या नद्या, नैनिताल, मसुरी, रानीखेत अशासारखी तीन डझन थंड हवेची ठिकाणं, बिनसर, जिम कॉर्बेटसह चार अभयारंण्य. आणि या निसर्गसंपदे बरोबरच बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हरिव्दार, हृषीकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, हेमकुंड साहेब, जोशीमठ, कर्णप्रयाग, देवप्रयाग अशी हजारो वर्षाची धार्मिक परंपरा लाभलेली तिर्थक्षेत्रं. या सर्व संपदेवर माणसाची वाईट नजर पडली आणि त्याच्या स्वार्थानेच या प्रदेशाचा घात केला. लोभापायी नद्या, पहाड, जंगलाचा ताबा घेतला गेला. हे सर्व करताना १९९८ साली रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठची भूस्खालनाची घटना आणि तिने झालेली जीवित तसंच वित्तहानी दुर्लक्षीली गेली. अलकनंदा नदीला चार दशकापुर्वी आलेल्या महापुराचा सर्वांनाच विसर पडला. ते रौद्रतांडव विसरल्यामुळेच  आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार देण्यात येणारा धोक्याचा इशारा नजरे आड केला गेल्यानेच  त्याहून मोठा प्रलय गेल्याच वर्षी पाहावा लागला.

वनसंपदेचा मानवाला असलेला फायदा किंबहूना त्या वनसंपदेवरच टिकून असलेला माणूस आज त्या त्या वनांचाच वैरी झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया असो की आपला पश्चिम घाट संपत्तीच्या हव्यासापायी ही वन क्षेत्रं आक्रसत चाललीत पण तिकडे दूर पुर्वोत्तर राज्यांमध्येही हिरव्यागार वनराजींनी व्यापलेलं हजारो एकर जंगल वणव्यांच्या भक्षस्थानी पडत आहे. या आगी मुद्दामहून लावल्या जात आहेत हे विशेष. फिरत्या शेतीच्या (jhum cultivation) अघोरी हव्यासामुळे इथली जंगलं अगदी दर वर्षी आगीच्या भक्षस्थानी पडतात आणि हिमालयाच्या पर्वतराजींमधली ही अमुल्य जंगलं नष्ट तर होतातच पण तिथले डोंगर उघडे बोडके होवून आपणच विनाशाच्या सीमारेषेवर येवून उभे राहतो हे तिथल्या जनतेच्या लक्षातही येत नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या भागात फेरफटका मारल्यास पर्वतच्या पर्वत जळत असतात आणि आसमंतात धुराचे लोटच्या लोट उठत असतात. अरुणाचल प्रदेश आणि मणीपूर मध्ये हे दृष्य या महिन्यात नेहमीच पाहायला मिळतं. भारत सरकारच्या वन सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहाणीत जे तथ्य समोर आलं आहे ते खरंच थरकाप उडवणारं आहे. या सर्वेक्षणानुसार दरवर्षी 2100 चौरस किलोमीटर जंगल जाळण्यात येतं.  नेमकी आकडेवारी पाहायची झाली तर 2009 साली 1000 चौ.कि.मी., 2010 साली 2118 चौ.कि.मी., 2011 साली 1119 चौ.कि.मी., एवढा संपन्न जंगलांचा भाग आगीच्या भक्षस्थानी पडला आणि त्या जमिनीवर स्थलांतरीत किंवा फिरती शेती केली गेली. शेकडो वर्षांच्या कालखंडात उभी राहिलेली जंगलं नष्ट झाली आणि त्याखालची हजारो वर्षापासून संरक्षीत असलेली उपजावू जमीन धुतली गेली. या जळीतकांडामुळे उघडी पडलेली जमीन हे उद्या येवू घातलेल्या संकटाची नोटीसच आहे.

आपल्या भारत देशातला पुरवांचलाचा प्रदेश म्हणजे हिमालयाच्या अंगाखांद्यावरचा आणि म्हणूनच निसर्गसंपदेचं वरदान लाभलेला भाग आहे. वनसंपदे मुळे त्या खालच्या जमीनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते, जर वरची जंगलंच नष्ट झाली तर मात्र त्या उघड्या बोडक्या जमीनीची धुप तर होईलच पण पाणी साठवण्याची क्षमता नष्ट होवून तो सगळा टापूच वैराण होवून जाईल. ब्रम्हपूत्रा, जीया बोरोली, शोणीत अशा अनेक नद्या याच भागात वाहात असून इथल्या जनतेला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू देत नाहीत. पण या नद्यांच्या आजूबाजूची जंगलं नाहीशी नष्ट तर मात्र या नद्यांचं पाणी आटून जाईल. पुर्वांचलाची शुभ्र बर्फाच्छादीत शिखरं, प्रसन्न मोकळी आल्हादायक हवा, हिरवागार परिसर आणि खळाळत्या नद्या या सर्वांमुळे हा भाग तिथे गेलेल्या प्रत्येकालाच भुरळ घालतो. अशा ठिकाणची जंगलं जर नाहीशी झाली तर उत्तरंचलात अलिकडेच झाली तशी ढगफूटी झाली तर काही काळायच्या आतच होत्याचं नव्हतं होईल आणि सगळीकडे हाहाकार माजेल. नंतर निसर्गाला दोष देण्यात काहीच अर्थ उरणार नाही. अशी आपत्ती आल्यावर नेहमीच निसर्गाच्या नावाने बोटं मोडली जातात. पण या सगळ्या आपत्तीची तयारी आपणच करून ठेवतो. वर दिलेली आकडेवारी या तयारीचीच जाणीव करून देत आहेत. पुर्वांचलात काहीही दुर्घटना घडली की त्याचा दोष चीनच्या माथी मारण्याची आपल्याला सवयच झाली आहे. ते काही अंशी खरं असलं तरी आपल्याच हाताने आपण लावलेल्या या आगीना आपणच जबाददार आहोत. चीन कितीही नीच असला तरी त्याला या बाबतीत तरी दोष देता येणार नाही.

काही वेळा नैसर्गिक वाटणार्‍या आपत्ती या मानव निर्मितच असतात. फक्त माणसाने हळूहळू त्या आपत्तीची तयारी केकेली असते आणि निसर्ग एकच घाव घालून ती खुली करून टाकतो. जगातली सर्वात तरूण आणि पृथ्वीच्या उत्पती नंतर सर्वात शेवटी तयार झालेला ठिसूळ प्रदेश म्हणजे हिमालय. जोराच्या वार्‍यानेही या जमीनीची सतत धुप होत असते. तिव्र डोंगर उतारावरून वाहत येणारे प्रवाह तर ही माती घेवून पठारी प्रदेशाकडे सतत धाव घेत असतात. याला अडवायचं कुणी? निसर्गानेच याचं उत्तर शोधलं आणि वनराई आणि वृक्षांच्या मदतीने ही धुप थांबवली. जमीन थोडी स्थिर झाली. या झाड झाडोर्‍याच्या मदतीने तिथल्या कष्टाळू भुमीपुत्रांनी आपलं जीवन सुखकर नसलं तरी सुसह्य बनवलं आहे. तिथली जनाता निसर्गाच्या कलाने घेत आपलं जीवन जगत आहे तो पर्यत निसर्गही त्याला साथ देणार पण हा निसर्गाचा आधार आपल्या हातानेच आपण काढून घेतला तर मात्र मग इथे हात द्यायला कुणीच उरणार नाही. 

आगीचे वणवे पेटले की तिथली निसर्ग संपदा नष्ट होते. ही निसर्ग संपदा म्हणजे केवळ झाडंच नसतात तर त्यांच्या आश्रयाने रहाणारे हजारे प्राणी, पक्षी, जीव-जीवाणू, सरपटणारे प्राणी, किटक, मुंग्या, अनेक सुक्ष्म प्राणी या सर्वांचीच आहूती दिली जाते आणि त्यांचा आधीवासच नष्ट केला जातो. किती तरी जाती कायमच्या नाहीशा होतात. हे नुकसान तर पुन्हा कधीही भरून येणार नसतं.   उत्तराखंडाचे तांडव आता हिमालयातील सर्व राज्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. गंगेसारखे रौद्र रुप जर ब्रम्हपुत्रेनं घेतलं तर तिथल्या अनेक राज्यात उत्पात घडू शकतो. विनाशाच्या या इशार्‍यांनी आपण जागे होणार आहोत का हा खरा प्रश्न आहे. भारतात दरवर्षी दहा लाख हेक्टर जंगल नष्ट होत आहे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. आपल्या पश्चिम घाटाचीही अशीच घुसमट होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत चंगळनगर्‍या उभ्या राहात आहेत. जैवविविधतेचं जागतिक वारसास्थळम्हणून घोषीत झालेल्या याच सह्याद्रीच्या संदेदनशील भागाचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी सुचवलेल्या उपायांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून त्याला विरोधही करण्यात येत आहे. पश्चिम घाटाच्या दर्‍या-डोंगरामधून रस्त्यांची, शहरीकरणाच्या प्रकल्पाची कामं होवू घातली आहेत. कोकणातल्या स्थानिक जनतेचा विरोध डावलून धनदांडग्यांचं हित जपलं जात आहे. माथेरानचा ४९८ चौरस कि.मी.चा टापू २००२ च्या फेब्रुवारीत पर्यावरण संवेदनशीलम्हणून घोषीत केला गेला आणि २००३ मध्ये  मात्र ते क्षेत्र २१५ चौरस कि.मी.वर आणलं गेलं. महाराष्ट्रातल्या सर्वच नद्यांच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून बारमाही वाहणार्‍या कित्येक नद्या आता पावसाळ्यातच तग धरून असतात आणि पाऊस निघून गेल्यावर कोरडया पडतात. नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या रासायनीक द्रव्य आणि मळीमुळेही इथला आधीवास धोक्यात आला आहे. अवैध खाणींच्या मुद्द्यावरून गोव्यातील खाणी गेली दोन वर्ष बंद आहेत. पण त्या  आधीच केलेल्या अनिर्बंध खोदकामामुळे तिथल्या निसर्गाची पर्यायने जनसामान्यांच्या सपत्तीची फार मोठी हानी झाली आहे. जैवविविधतेच्या आणि अन्नसाखळीच्या वरच्या  स्थानावर असलेल्या वाघांच्या संखेत वेगाने होणार्‍या गळतीमुळे ती साखळीच धोक्यात येणार आहे. या सर्वाचे तिव्र आघात इथल्या जैवविविधता,  हवामान,  पूरस्थिती,  लोकांची उपजीविका, सुरक्षितता यावर होत असतो याचं भान वेळीच ठेवलं गेलं नाही तर हिमालयातली सुनामी सह्याद्रीत यायला वेळ लागणार नाही. पर्यावरण संवर्धन आणि जतन ही आता लोक चळवळ झाली पाहिजे.  

आगीच्या वणव्यात जळणारी ही जंगलं हवामान बदलालाही आमंत्रण देत आहेत. नुकताच अर्धा अधिक महाराष्ट्र गारपीटीने चेचून निघाला. उभी शेतं भूईसपाट झाली, हजारे उडते पक्षी प्राण गमावून बसले, तीच हालत उघड्यावरच्या जनावरांचीही झाली. त्या आस्मानी मार्‍यापासून माणूसही सुटला नाही. नुकतंच जरा थांबलेलं आत्महत्येचं सत्र पुन्हा सुरू झालं. विनाशाला आपण थांबवू शकत नसलो तरी त्याला निमंत्रण तरी देता कामा नये. नैसर्गिक संकट आलं की मग मागे वळूनही पाहाता येत नाही.


19 September, 2014

'मर्यादा पुरूषोत्तम' - प्रदर्शन: चित्रकार वासुदेव कामत



जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांचं मर्यादा पुरूषोत्तम हे चित्रप्रदर्शन  १६१ बी, एम, जी रोड, जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४०० ०२३ येथे माडलं जाणार आहे. हे प्रदर्शन दि. २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०१४ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.

‘रामायण’ हा सर्वच मानव जातीचा श्रद्धेचा विषय राहीला आहे. याच रामायणातील काही प्रसंग कॅनव्हासवर चित्रीत करताना त्यातील भाव आत्मसात करण्याचा प्रयत्न चित्रकाराने केला आहे. या विषयी बोलताना चित्रकार वासुदेव कामत म्हणतात “परिस स्पर्शाने लोखंडाचं सोन होतं असं म्हणतात पण मुळात परिस आहे का? हा जसा प्रश्न पडतो तसंच रामकथा हे वास्तव की कविकल्पना असा विचार करीत बसण्यापेक्षा या कथेचं सार लक्षात घेवून त्यातून होणारे संस्कार खुप महत्वाचे आहेत. रामलीला आणि ग.दि.मांचं ‘गीतरामायण’ यांनी बालपणापासून माझ्यावर चांगले संस्कार केले आहेत आणि ती पुंजी आयुष्यभर पुरण्यासारखी आहे. त्यापासूनच प्रेरणा घेवून ‘मर्यादा पुरूषोत्तम’ ही चित्रमाला रंगविण्याचा संकल्प सिद्धिस नेला.”


आजवर अनेक माध्यमातून रामायण सर्वांसमोर आलं आहे. यात आणखी काय भर घालणार असं वाटत असतानाच रामसेतू उभारताना चिमुकल्या खारूताईचं जे योगदान होतं ते पाहून मला प्रेरणा मिळाली असं सांगताना कामत म्हणतात की   त्या खारीएवढंच योगदान देवून मी पूर्वसुरींच्या साहित्य आणि कलाकृतींना जोडला जावू इछितो.


या प्रदर्शनात चित्रकार वासुदेव कामत यांनी प्रेम, मैत्री, वचन, त्याग आणि दृढता अशा अनेक भावना व्यक्त होणारी ‘रामदास हनुमान’, ‘राम-चंद्र दर्शन’, ‘जनक सूता सीता’, ‘अहल्या उद्धार’, ‘भरत मिलाप’, ‘कपिसे उऋण हम नही’, ‘गुंफिते बदरी बिजांची तपमाला’, ‘भरत राज’ अशा अनेक चित्रांची गुंफण केली आहे.

आज रावणालाही लाजवेल अशा दुष्ट प्रवृत्ती माजल्या असून त्याचं निर्दालन करणारा राम आपल्या मनात जागृत झाला तर तेच या प्रदर्शनाचं फलित असेल.

पौराणिक कथा कॅनव्हासवर जिवंत होताना पाहण्याचा हा ऎतिहासिक क्षण रसिकांनी अनुभवण्यासारखा आहे.  



17 September, 2014

सर्वात पुढे आहे हात मारूक माहाराष्ट्रावर माझ्या


राज्य परिवहन  - यथा राजा तथा

पार्श्वभूमी : लाल मातीच्या कोकणात काळ्या डांबरी रस्त्यांची पार दुर्शशा उडालेली आहे. चतुर्थीचे दिवस असल्याने MH 01 ते  MH 47  अशा नंबरप्लेट असलेल्या अनेक गाड्या गावोगावी रस्तोरस्ती उभ्या दिसत असल्या तरी एस. टी. ची वाट पहाणारी मंडळी “आजून कशी एस्टी इली नाय” असा त्रासिक चेहरा करून कान आणि डोळे तिकडे लावून बसलीय. पवसाची रिपरिप अधूनमधून चालूच. रडणार्‍या पोराला रपाटा घालू का नको अशा संभ्रमात आये आहे.

एवढ्यात एस्टी येते. एवढा वेळ चारा-पाचच वाटणारी पण आता पाच-पंचवीस झालेली मंडळी तुटून पडतात.

“चड चड बाबा, आता चडलस नाय तर मोदी मंत्रीमंडळात घेवचो नाय” – एक म्हातारा

भराभर सगळे प्रवासी गिळून एस्टी निघते. आत जागा असूनही बरेच जण उभेच. सिट भिजलेल्या. असो…, या सिट पावसात नायतर कधी भिजणार?  थांबलेला पाऊस पुन्हा बरसू लागतो तसा छतातून अभिषेक सुरू होतो. या सिट त्यामुळेच भिजलेल्या होत्या तर. “गळकी एस्टी कळवा, एक हजार रुपये मिळवा’ या घोषणेचं काय झालं असा विचार मनात आला. की आता त्याचं  “धडकी एस्टी कळवा, एक हजार रुपये मिळवा’”  असं झालय? वरचे थेंब चुकवत उभं राहाण्याची कसरत करीत असतानाच अनंत गचके खात प्रवास सुरू असतो.  पाच-सहा किलोमिटरचा प्रवास होतो आणि पत्रा फाटल्या सारखा जोरदार आवाज येतो.

आता आणि गाडीर काय पडला? असा प्रश्न पडला असतानाच गाडीवर नाही तर खाली प्रॉब्लेम झाला आहे हे लक्षात येतं. गाडी थांबवून डायव्हर खाली उतरतो. मागच्या चार टायर पैकी एक पंक्चर झालेला असतो.

आता.............................. असा सवाल सगळ्याच्याच चेहर्‍यावर वाचता येतो. पुढे तीन तासानी येणार्‍या एस्टीवरच आता मदार हे अर्धे अधिक ओळखून असतात.

“वर स्टेपनी आसा पण जॅक नाय”  इती कंडक्टर 

“चला घेवन तशीच” एक प्रवासी.

प्राप्त परिस्थितीत हळूहळू गाडी पुढच्या प्रवासाला निघते. मग अनंत सुचना सुरू होतात. वानगी दाखल काही पुढे देत आहे.

”पाठसून येणारी पांग्रड तरी मिळात, चला तुमी अशीच कडावलीक जावदे.”

“असे गेलो तर पुढची गाडी कशी मिळणार? कंडक्टर नुसते काय बसलात? डेपो मध्ये फोन करा, 
दुसरी गाडी मागवा, हे चालणार नाही. कुणी तरी बोललच पाहिजे” इती संतप्त मुंबईकर.

कंडक्टर हू की चू करत नाही. (केलं तरी त्या खडखडाटात काय ऎकू येणार?)

”आता दुसरं काहीतरी बघितलं पाहिजे, ओ कंडक्टर आमचे पैसे परत द्या” दुसरा संत्रस्त मुंबईकर.

गाडी कुपवडा-पांग्रड-कडावल दर्शनाला निघाल्यासारखी डोलत चाललीय. नेहमीचे मुरलेले मालवणी 
प्रवासी गप्प बसून “गाडी न्हेता मा, गप बासाया” असं न बोलताच म्हणत असतात.

कडावल बाजाराच्या अलिकडे गाडी बाजूला थांबते. सगळे प्रवासी उतरून मागून येणार्‍या पांग्रड एस्टीची वाट बघत असतात.

“आता ती भरान इली म्हणजे झाला” इती याक चेडू.

“हे बघा बाबा, दादा आमका हसतत, कशे तुमका गंडवलव म्हणान. मायxxxनी फसवल्यानी रे, हे पैशे खातत आणि आमची ही परस्थिती. हसतत बग तरी कशे, नुसते जायराती ‘सर्वात पुढे आहे हात मारूक माहाराष्ट्रावर माझ्या” एक अस्सल मालवणी.

“आता नाय येवचे निवडान” दुसरा

“येवन खातले काय, फुटक़ी गाडी” पहिला.

मागाहून येणारी पाग्रड गाडी येवून उभी रहाते.

पुन्हा तशीच झुंबड, मंडळी तुटून पडतात.

असे अंक गावोगावी चालूच आहेत.      

        

                       

13 September, 2014

तुमने तब तब छेद किये है, जब जब हमने थाली दी|



ओ जन्नत के वाशिंदों,अब क्यों इतने लाचार हुए,
कहाँ तुम्हारी पत्थर ईंटे,कहाँ सभी हथियार हुए,
कहाँ गया जेहाद तुम्हारा,पाक परस्ती कहाँ गयी,
कहाँ गए वो चाँद सितारे,नूरा कुश्ती कहाँ गयी,
कहाँ गयी बाज़ार की बंदी,दीन के फतवे कहाँ गए,
केसर कहवा,सेब और अखरोटी रुतबे कहाँ गए,
पुन्य हिमालय की छाया में रहकर उसको गाली दी,
तुमने तब तब छेद किये है जब जब हमने थाली दी,
खूब जलाया ध्वजा तिरंगा,झंडा हरा उठाया था,
लाल चौक पर जब जी चाहा तब कोहराम मचाया था,
भारत के फौजी न तुमको फूटी आँख सुहाए थे,
नारे मुर्दाबाद हिन्द के तुमने रोज लगाए थे,
कुदरत कुछ नाराज़ हुयी तो,अल्ला अकबर भूल गए,
दाढ़ी टोपी तकरीरें,लाहौर पिशावर भूल गये,
अब क्यों चढ़े छतों पर घर की,क्यों झोली फैलाए हो,
जिन आँखों में नफरत थी क्यों उनमे आंसू लाये हो,
अरे मोमिनो,क्या अब भी आँखों पर पत्थर छाये है,
देखो,काफिर फौजी तुमको रोटी देने आये हैं,

कश्मीर के हालात पर एक कविता-----  म्हणून  आज वॉट्सऍपवर  एक कविता आली आणि पुन्हा जुन्या जखमा दुखायला लागल्या. ‘सायमन परत जा’ सारखं ‘Go Back Indian’ असे शब्द श्रीनगरच्या काळ्या गुळगुळीत रस्त्यावर मी ऑगष्ट २०१० मध्ये वाचले होते. तो रस्ताही आपल्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने बांधला होता. जम्मू-काश्मिरचाच एक भाग असलेल्या लडाखमध्ये तेव्हा ढग फुटीने हाहाकार माजला होता. श्रीनगरला एक दिवस थांबून पुढे लडाखला चाललो असताना हे वाचायला मिळालं. लडाखींना मदत तर सोडाच पण तिथे श्रीनगरमध्ये कडकडीत बंद पाळला जात होता. रस्त्यावरून चालणार्‍या एखाद दुसर्‍या  वाहानाला लक्ष केलं जात होतं.

आजपर्यंत कधीही श्रीनगरला गेलं की मनापासून स्वागत झालं नाही, की पैसे दिले म्हणूनतरी त्याला जागण्याची वृत्ती नाही. आता श्रीनगरमध्ये जलप्रलय आला आहे तरी दुशणं भारतवासीयांनाच मिळत आहेत, मिळणार आहेत. मग प्रतिक्रीयाही तशीच असणार. वरील कविता ही प्रातिनिधीक प्रतिक्रीया म्हणावी लागेल. 

या जवानाचा अभिमान वाटतो. 

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नदीवर पुल बांधणारे जवान  


आपल्याच देशात या घरभेद्यांमुळे असे फलक पहावे लागतात.  

नजरेनेच शिवी हासडणारे असे हजारो आहेत.

केवळ यांच्यामुळे 'काश्मिर हमारा है'

पंचवीस वर्षं होत आली ही काश्मिरी पंडीतांची घरं ओस पडलीत. तेव्हापासून तिथे महापूरच आहे पण तो व्देषाचा.   

काश्मिरी पंडीतांवर आफत कोसळली पण ती यांची.   

तीच पिलावळ आता अशा कठीण प्रसंगीही मदत न करता फक्त व्देश पसरवत आहे. 

12 September, 2014

संजय उवाच - फुकट देणारे एकच आवस-बापूस


संजय, महाभारतामुळे हा सगळ्यानाच माहित आहे. युद्धभूमीवर काय चाललय याचं धावतं समालोचन हा करायचा आणि आंधळ्या दृतराष्ट्राच्या मन:चक्षूसमोर युद्धाचे प्रसंग हुबेहूब उभे करायचा. मला वाटतं संजय या नावातच हा गुण असावा. आता महाभारताच्या वेळची तपस्या या काळात कुणी करित नसल्याने त्याला दिव्य दृष्टी असणं शक्य नसलं तरी झालेले प्रसंग हुबेहुब समोर उभं करण्यात या भारतातल्या संजयला नक्कीच जमलं आहे.

या भारतातला हा संजय आमच्या मालवणचा. नेमकंच सांगायचं झालं तर देवबागचा. हो देवांच्या बागेतलं हे फळ. हा माणूस तसा महाप्रतापी. त्याच्या एका नसलेल्या हातावर जावू नका. एकदा असाच भेटला असताना त्याने नुसत्या छतीने जी धडक मला दिलीय ती बापजन्मात विसरणं शक्य नाही. काय जोर होता महाराजा. मी पडता पडता वाचलो.

देवबाग मध्ये थोडी सामंतांची घरं आणि बहुतांशी गाबीत, म्हणजे मच्छीमार. कोकणात समुद्र किनारी सुशेगात असलेलं हे अप्रतिम गाव शाळेत असताना मी पाहिलय. आता तुम्ही पाहता ते इथल्या पर्यटनामुळे. मच्छीमारी करून उरलेल्या वेळात मोलमजुरी करणारा इथला कोळी समाज आपला उदरनिर्वाह करण्याएवढंच पदरी बाळगून होता. अशीच कामाची घाई असताना एकदा संजयच्या हातातली लोखंडी शिग विजेच्या तारेला लागली आणि क्षणार्धात तो आणि आणखी तीघेजण जखमी झाले. त्या तीघांना पणजीच्या इस्पितळात दाखल केलं गेलं पण संजय पैशाअभावी घरीच राहिला. त्याला उपचाराअभावी त्याचा उजवा हात गमवावा लागला तशी पायाची तीन बोटंही. या जबर धक्क्यानेच एखादा गळपटून गेला असता. पण संजय उठून उभा राहिला. एक हात आणि अधू पायचीच साथ असतानाच त्याने दर्यात होडी ढकलली आणि कामाला सुरूवात केली.

पर्यटकांना डॉल्फिनची सफर करवण्यासाठी आपली होडी बिनदिक्कत समुद्रात घेवून जाणार्‍या या पठ्याला पाहात असताना आपल्याला जाणवतच नाही की याला एकच हात आहे, एवढ्या सफायीदारपणे हा होडी हाकत असतो. तोंडाचा पट्टा चालू असतो आणि रुबाब बघाल तर ‘समिंदराचा राजा’ असल्या सारखा.

दोन खोल्यांचा पर्यटकांसाठीचा निवास त्याने आपल्या घराशेजारी बांधला होता. या पावसाळ्यात त्या खोल्या वाळूने भरून गेल्या, समुद्राचं पाणी खोल्यात शिरलं. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला “तो आपली करामत करतलो, आपण आपला काम करीत र्‍हव्हाक व्हया. समुद्रार रवाचा आसा मा मग ह्या होतालाच. काम करुकच व्हया. फुकट गावाचा नाय. फुकट देणारे एकच आवस-बापूस. बाकी हो (समोरच्या गणपतीकडे बोट दाखवून) सुद्धा म्हणता कष्ट कर; मगच गावतला. ”

संजाच्या डोळ्यात चमक आहे, विश्वास आहे, धमक आहे. तो पुर्ण साकारात्मक विचाराचा आहे. देवबागची इतंभूत माहिती त्याच्याकडे आहे. कुठली जमिन कुणी विकत घेतली आणि कुठे कुणाचं हॉटेल होतय, सगळं त्याला माहित आहे. काल-आज आणि उद्याचं भान असलं तरी कोकणी स्वभावामुळे तो पण असाच भणंग राहिला आहे. हॉटेलवाले आणि जमिनदार यांच्याशी त्याचे संबंध आहेत म्हणण्यापेक्षा त्यांनी आपल्या स्वार्थाकरीता त्याच्याशी संबंध ठेवले आहेत. “भायली माणसा” देवबागात जमिनी घेतात म्हणून त्याचा जीव तुटतो, “बंगाली सुद्धा इले” म्हणताना तो व्याकुळ होतो.  

पण जमिनीवर त्याच काय? त्याचं साम्राज्य तिकडे दर्यावर, उसळत्या लाटांवर स्वार होण्यासाठी प्रत्येक सकाळची वाट तो पहात असतो. त्याच्या नसलेल्या हाताला आधार आहे तो त्या दर्याचा. प्रचंड उर्जा असलेला हा माणूस म्हणजे संजय मोंडकर (9421236398, 3823062231). देवबागला गेलात की एकदा आजमावून पहा, कायमचा लक्षात राहिल.    
            

11 September, 2014

यांचं काय झालं?








दरवेळी लडाखला जाताना एक दिवस श्रीनगरला रहायचो, मुख्यत: नगीन लेकच्या हाऊसबोट मध्ये. २००७ पासूनचा हा रिवाज या वर्षीही जुलै महिन्यात पाळता आला. आयबीएन लोकमतची टीम बरोबर असल्याने यावेळी आत्मा आणि मी एक दिवस लवकर श्रीनगरला गेलो होतो. आयबीएनची अमृता आणि कॅमेरामन रमेश सोबत होते तशाच रेणू दिदिही होत्या. नगीन लेकच्या संथ पाण्यातून निवांत गप्पा मारत फेरफटका मरला आणि संध्याकाळी हाऊस बोटमध्ये बसून श्रीनगरचं सौदर्य न्याहाळताना आयुष्यातले आनंदाचे अमुल्य क्षण अनुभवले.

त्याच श्रीनगरमध्ये आज हा हाकार उडाला आहे. अख्खं श्रीनगर पूराच्या पाण्याने वेढलं आहे. काही जीव गेले, उरलेले वाचण्यासाठी धडपड करीत आहेत.                      

त्या दिवशी तलावातल्या बदकाकडे बोट दाखवत रेणू दिदि म्हणाल्या होत्या “एकट्याने सगळ्या जीवनसंघर्षातून तरून जाण्याची निसर्गाची मूळ प्रवृत्ती आहे. ते बदक बघा एकटंच फिरतय.” तेव्हा कुठे माहित होतं की काही दिवसात हा संघर्ष आणखी तेव्र होणार ! निसर्गानेच एका प्रहारात दल लेक,  नगीन लेकची वाताहात करून टाकली. कुणालाच फोन लागत नाही, कशाचाच पत्ता नाही. तिथल्या हाऊस बोट, शिकारे यांचं काय झालं?



                       


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates