18 June, 2014

ईशान्येकडील तीन राज्यांत १० वर्षांत पर्यटन वाढले!


ईशान्य राज्यातील पर्यटनाविषयी लोकसत्तामध्ये आलेल्या मताचा प्रतिवाद करणारं माझं पत्र आजच्या लोकसत्ता आलं आहे. 

http://www.loksatta.com/sampadkiya-news/readers-reaction-on-news-612411/

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतात पर्यटन वाढले पाहिजे असे म्हटले आहे, त्यावर १७ जूनच्या लोकमानसमध्ये हे पर्यटन तितके सोपे आहे का? अशी शंका व्यक्त करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. ईशान्य भारतातील आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत गेल्या दहा वर्षांत पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सुविधा झाल्या असून श्रीनगर किंवा तत्सम ठिकाणांप्रमाणेच या राज्यांमध्ये आरामात फिरता येते. आसाममधील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा काझीरंगा, कामाख्या मंदिर, गुवाहाटी, माजुली बेट आणि नामेरी राष्ट्रीय उद्यान, मेघालयातील शिलाँग, चेरापुंजी, मॉसिनराम अशा ठिकाणी जाण्यासाठी 'इनर लाइन परमिट' घ्यावं लागत नाही. (या दोन राज्यांत ही ठिकाणं मुख्यत: पर्यटनाच्या नकाशावर आहेत.) मात्र अरुणाचल प्रदेशमधल्या तवांग किंवा झायरो या ठिकाणी जायचे असेल तर 'इनर लाइन परमिट' घ्यावे लागते. या परवान्याची मुदत सात दिवस असते आणि नंतर आवश्यकता असेल तर ते वाढवून देण्यात येते. (इनर लाइन परमिटसाठी एक फोटो आणि मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्डसारखे ओळखपत्र सादर करावे लागते.) जम्मू-काश्मीर राज्यातही नुब्रा खोऱ्यासारख्या ठिकाणी जायचे असेल तर इनर लाइन परमिट घ्यावे लागत होते. (या वर्षीच्या मे महिन्यापासून ते स्थगित करण्यात आले आहे.)

सन २००४ सालापासून तीनदा मी या भागात पर्यटनासाठी इतर पर्यटकांसह गेलो आहे. २००४ साली तिथल्या राजकीय अस्थिरतेमुळे पर्यटकांची संख्या अगदीच कमी होती. असे असले तरी तिथल्या स्थानिक जनतेच्या सहकार्याने मी भारावून गेलो होतो. मात्र त्यानंतर २०११ आणि २०१३ मध्ये गेलो असता मोठय़ा प्रमाणावर पर्यटक आढळून आले. २०१३ मध्ये तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सफारीसाठी नेणारी वाहने कमी पडत होती. गेल्या काही वर्षांत तिथल्या आधारभूत सोयीसुविधांमध्ये वाढ होत असून पर्यटकांना हा भाग आकर्षित करीत आहे.

नरेंद्र प्रभू, विलेपार्ले  (मुंबई)


मुळ पत्र खालील प्रमाणे होते.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/is-that-tourism-easy-in-states-north-east-609467/

ईशान्य राज्यातील पर्यटन तितके सोपे आहे का?


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आभार व्यक्त करताना सामूहिक नेतृत्वाविषयी व्यक्त केलेल्या काही मौलिक कल्पना व्यवहारात आणणे फारसे कठीण नाही असे वाटते. नित्य व्यवहार करताना सामान्य नागरिकाकडून देशसेवा घडू शकते याची उदाहरणेसुद्धा व्यावहारिक वाटावीत अशी आहेत, किंबहुना सुट्टीच्या काळात शाळकरी विद्यार्थ्यांनी देशाच्या ईशान्य भागातील राज्यांना सहलीच्या रूपाने भेट देऊन तेथील जनजीवनाची व संस्कृतीची ओळख करून घ्यावी, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, मणिपूर ही 'सेव्हन सिस्टर्स' म्हणून ओळखली जाणारी सात राज्ये भारतात असली तरी तेथे सहलीला जाणे हे काश्मीरमधील श्रीनगरला जाण्याइतके सोपे नाही हे प्रथम लक्षात घेतले पहिजे. 

राजकीय म्हणा, तेथील संस्कृतीचे रक्षण करण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा घुसखोरीपासून सुरक्षितता यासाठी या सात राज्यांत भारतीय नागरिक मुक्तपणे प्रवास करू शकत नाही. या प्रत्येक राज्यात भारतीय पर्यटक म्हणून जाणाऱ्यास, राज्यानुसार 'इनर लाइन परमिट' हा प्रवेश-परवाना आवश्यक  ती  सारी कागदपत्रे दाखल करून घ्यावा लागतो. तसेच अशा पर्यटकास तेथे फार मर्यादित वास्तव्य करण्याची परवानगी दिली जाते. असे परवाने मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेतून जाताना किती वेळ जाईल आणि प्रत्यक्ष तेथे काय पाहता येईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. शिवाय तेथे गेल्यावर स्थानिकाकडून पर्यटकांचे कसे व किती स्वागत केले जाते हा पूर्णपणे वेगळा विषय म्हणावा लागेल!

डॉ. श्रीकांत परळकर, दादर (मुंबई)



डॉ. श्रीकांत परळकर, दादर (मुंबई)

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates