24 April, 2014

ते आहेत म्हणून बोटाला शाई लागते


सकाळी सात वाजताच मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचलो. तिथे चोख व्यवस्था दिसत होती. केंद्राबाहेरच वाहतूक पोलिस, दारावर पोलिस, गृहसक्षक दलाचे जवान तैनात होते. आत गेलो तर एका स्थानिक ‘फुढार्‍य़ाला’ हिरोगीरी करताना पोलिसांनी रोखलेला दिसला. इकडे कशाला आला अहात? या पोलिसांच्या प्रश्नाला ‘मतदानाला’ असे त्याने उत्तर देताच ‘मग मतदानाच्या रांगेत उभे रहा, इकडे तिकडे जायचं नाही’ असं सुनावलं. पोलिसांच्या कडक समजावणीने त्या फुढार्‍याचा माज तत्काळ उतरलेला दिसला. ते पोलिस आहेत म्हणून बोटाला शाई लागते अन्यथा सगळी मतं त्या फुढार्‍यांच्या जमातीने एकगठ्ठा लाटली असती. 

८२ कोटी मतदार असलेली ही मतदानाची प्रचंड कवायत हे पोलिस नसते तर चाललीच नसती. त्यांच्या केवळ उपस्थितीने किती फरक पडतो. पण हा फरक सरकार काही समजावून घ्यायला तयार नाही.

आजच्या लोकसत्तामध्ये माजी पोलिस महासंचालक श्री. अरविंद इनामदार यांचा डोळे उघडायला लावणारा लेख आला आहे तो जरूर वाचा.

महसूल विभागातील अधिकाऱ्यांना निवडणूक कामासाठी, तर ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊ नये म्हणून खास भत्ते देणाऱ्या सरकारने पोलिसांचा कसा विचार केला नाही, असा आरोप करतानाच समान न्यायाची मागणी करणारे आणि पोलीस दलातील ठसठस मांडणारे हे टिपण.. एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने लिहिल्यामुळे महत्त्वाचे..
१२५ कोटींवर लोकसंख्या असलेल्या खंडप्राय भारत देशात निवडणुका म्हणजे एक युद्धच असते. सगळ्या जगाचे डोळे या लोकसभेच्या मतदानावर लागलेले आहेत. १९५२ साली सुमारे २७ कोटी मतदार होते तर आज सुमारे ८२ कोटी आहेत. मतदानाची व्यवस्था करणे तर जिकिरीचे काम आहेच, पण त्यापेक्षा १० पटीने अवघड मतदानयंत्रे, मतदारांचे संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था राखणे हे आहे. प्रचारकाळात आरोप-प्रत्यारोप, घणाघाती प्रचार, प्रचंड मिरवणुका, लाखालाखांच्या प्रचार सभा, रोड शो, चर्चा यांना ऊत आला. कमरेखाली सपासप वार करणे चालूच राहिले. त्यात भर म्हणून आतंकवादाची कृष्णछाया पडलेलीच आहे. नक्षलवाद्यांनी नुकतेच घडवून आणलेले स्फोट, दिलेले आव्हान, (गडचिरोलीत एक पोलीस हुतात्मा झाला, अनेक जखमी झाले) बंडखोरी, आयाराम-गयाराम, वाट्टेल त्या मार्गाने (त्यात हाणामाऱ्या, धाकदपटशा, एकमेकावर हल्ले, भेद आणि दाम पण आले) सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न याचा गेली दोन महिने पोलिसांवर किती ताण आला आहे हे आमचे आम्हालाच माहिती! आधीच दिवसाला १२ ते १४ तास काम करणाऱ्या पोलीस दलाची दमछाक होते आहे. निवडणुका आल्या की जाड खाकी गणवेश घालूनही आमच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो. मतदानाच्या दिवशी तर डोळ्यांत तेल घालून बंदोबस्त करावा लागतो. ब्रह्मांडच आठवते. त्यानंतर विजयी उमेदवारांच्या गगनभेदी मिरवणुका आणि जल्लोष.  शरीर थकते, मन कंटाळते- ताकदच संपते, पण काम संपत नाही.
कामाच्या, तणावाच्या ओझ्याखाली आम्ही आधीच त्रस्त आहोत, त्यात ९ एप्रिलला निवडणुकांतच आमच्यावर आणखी एक बॉम्ब पडला. ९ एप्रिलच्या सरकारी अधिसूचनेप्रमाणे निवडणूक कार्यास मदत करणाऱ्या महसूल खात्यातील वर्ग २ व वर्ग १ अधिकाऱ्यांना विशेष भत्ता २५००० पासून ७०००० हजारांपर्यंत.. अगदी मुख्य सचिवापर्यंत मिळणार आहे. गेल्या अनेक निवडणुकांत हेच चालू आहे. त्यांना भरघोस मानधन तर पोलिसाच्या नशिबात फक्त दगड, ना धन ना मान! गेले काही आठवडे आमची साप्ताहिक सुट्टीही रद्द झाली आहे. आम्ही एक तर पोलीस स्टेशनमध्ये असतो किंवा रखरखीत उन्हात रस्त्यावर असतो. आम्हाला वगळा, एकही निवडणूक पार पडू शकणार नाही. शिव्या, दगड, निरनिराळ्या अस्त्रांचा मारा, गोळ्या, स्फोटकांना आम्ही सामोरे जायचे आणि सरकारने त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करावयाचे! काय सरकारी न्याय! वातानुकूलित खोलीत बसणाऱ्या सचिवांना मनाला उल्हसित करणारा करकरीत नोटांचा थंडगार भत्ता आणि पोलिसाच्या नशिबात खस्ता! सरकारी कृपेचा-दयेचा मेघ महसूल खात्याच्या डोंगरमाथ्यावर पर्जन्याची बरसात करतो तर पोलिसाच्या राजस्थानी वाळवंटात आला की कोरडा ठणठणीत होतो. हे सारेच अन्यायाची परिसीमा गाठणार आहे. मेहनत करे मुर्गा.. नुसतीच मेहनत नाही तर 'जान से जाये मुर्गी और अंडा खाये फकीर' असाच हा उफराटा न्याय आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, निवडणूक आयुक्तांना- मुख्य सचिवांना आम्ही दिसतच नाही का? बंदोबस्ताला, संरक्षणाला पोलीस हवेत, पण काही द्यायचे म्हटले की हात मागे जातो- इच्छाच संपते. जी मंडळी पोलिसाला- कायद्याच्या रखवालदाराला न्याय देऊ शकत नाहीत ती बाकीच्यांना काय देणार? यांना आमची कणवच कधी येत नाही. गेल्या २६ निवडणुकांत फक्त १९९९ सालच्या निवडणुकीत खूप सांगितल्यावर विशेष भत्ता कसा तरी एकदा मिळाला.
स्वातंत्र्यानंतर पोलिसाला चांगले दिवस येतील असे वाटू लागले होते. एक आशा आम्हाला दिसू लागली होती. सत्तेचे विकेंद्रीकरण महाराष्ट्रात जिल्हा-परिषदांमुळे, ग्रामपंचायतीमुळे झाले, पण आमच्या मानेभोवती गृहखात्याची पकड जास्तच आवळली गेली. सन्मान तर सोडाच, पण मानही संपला.. फक्त पदोपदी असा अपमान मात्र आला. गृहसचिवांना पोलिसाबद्दल प्रेम तर सोडाच, पण साधी आस्थाही नसते. मनात जे असते तेच जी. आर.मधून उभरते. लोकप्रतिनिधी तर आम्हाला बुकलण्यातच पुढे असतात. भर रस्त्यात दुपारच्या उन्हात गणवेशातील आमच्या पोलीस भगिनींची जेव्हा अब्रू धोक्यात आली. (११-८-१२ आझाद मैदान आठवा) तेव्हा कुणीही सत्ताधारी कृष्ण आमच्या मदतीस शालू तर सोडाच पण चिंधीही घेऊन धावला नाही. गोकुळाला इंद्राच्या प्रचंड पावसातून वाचवण्यासाठी कृष्णाने गोवर्धन उचलला, पण इथे कुणी बोटही उचलले नाही. ही आमची शोकांतिका आहे. अपेक्षा आम्ही वाघासारखे काम करावे याची, पण वागणूक सावत्र पोरासारखी. महसूल खात्याच्या नशिबात थंडगार सरबत तर आमच्या नशिबात साधे थंड पाणीही नाही.
हे एकदाच घडलेले नाही. याआधीही घडले आहेच.
आमचे मुख्यमंत्री दिल्लीहून आले. त्यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयात अतिशय महत्त्वाच्या जागेवर काम केलेले. क्षितिज मोठे- म्हणून आमची त्यांच्याकडून मोठय़ा मनाचीही अपेक्षा होती. पण झाले भलतेच. मंत्रालयातील आयएएस अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीपासून परावृत्त करावे म्हणून त्यांना दरमहा ठोक भरपाई करण्यात आली. सुमारे एक वर्षांपूर्वी हा शासन निर्णय झाला. सरकारला आयएएसबद्दल केवढा कळवळा-केवढे औदार्य, किती काळजी! याशिवाय इंटरनेट, निवासी शिपायाऐवजी रोख भत्ता, वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके, संगणकाच्या देखभालीचा लॅपटॉप-आयपॅड हेही दिले. ठीक आहे; ते द्या, पण वर दरमहा ठोक भरपाई याप्रमाणे* देण्यात आली.
सचिव- रु. १५००० दरमहा,
प्रधान सचिव- रु.२२५००
अपर मुख्य सचिव- रु. ३२७५०,
मुख्य सचिव- रु. ४९,१२५,
(* अशी माझी माहिती आहे, फरक असू शकतो)
बाकीच्यांनी इंजिनीअर, पोलीस अधिकारी, प्राध्यापकांनी नोकऱ्या सोडल्या, पण त्यांच्या सहकाऱ्यांना काही मिळाले नाही, पण भा.प्र.से.बद्दल केवढा उदार दृष्टिकोन- राजा उदार झाला. आयएएससाठी न्यायाचा- प्रेमाचा उमाळा भरभरून वाहू लागला. पण डीजीपी ऑफिसमधील किंवा अन्य सेवांना एक छदाम दिला नाही. कारण आम्ही नावडते. आमच्या पोलीस निरीक्षक-उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची श्रेणी कमी केली, आम्ही ओरडून ओरडून थकलो. सगळे पालथ्या घडय़ावर पाणी. आमच्या अर्ज-विनंत्यांना विचारतो कोण? भा.प्र.से.ला ठोक भरपाई तर आमच्या नशिबात काठीने ठोक. याशिवाय या अधिकाऱ्यांनी एक वर्षांत किती जास्त काम केले? काही आढावा घेतला का, एखाद्या अभ्यासगटाकडून?
महसूल आणि पोलीस या दोन अतिमहत्त्वाच्या चाकावर प्रशासन चालते. त्यांना दिले तर आमची ना नाही, पण तोच न्याय सर्वाना लावा किंवा कुणालाच देऊ नका. न्याय सर्वाना सारखा पाहिजे. सर्वानाच राज्यकर्त्यांनी एकाच दृष्टीने पाहिले पाहिजे. एकास एक तर दुसऱ्यास वेगळे असता कामा नये. पोलिसावरच अंतर्गत सुरक्षा आहे. सुरक्षा आहे तर सर्व आहे, नाही तर प्रशासन काय करणार? राज्यकर्त्यांचा हात सर्वाच्या पाठीवरून एकसारखा फिरला पाहिजे. नाही तर कोणत्या जोरावर आम्ही नक्षलवाद्यांशी, अतिरेक्यांशी, संघटित गुन्हेगारीशी, राष्ट्रविघातक शक्तीशी लढणार? दरवर्षी अनेक पोलीस अधिकारी, अन्य हवालदार, शिपाई जातात, बलिदान करतात, त्यांच्याही मनोबलाचा विचार करा. लढायचे आम्ही, मरायचे आम्ही आणि भरपाई न लढणाऱ्यांना! बढती नाही, पूर्वी देत असलेला पगार नाही, प्रचंड ताण, एकसारखे काम. आम्ही रंजिस आलो आहोत. सरकारने दाखवून दिले पाहिजे की फक्त तगायचे नसते तर राज्य कसे करायचे व वागायचे कसे हे आचारातून दाखवावे लागते.
भरपाई कुणाला, किती, कशी द्यायची हे वेतन आयोगाला ठरवू द्या. मध्यवर्ती सरकार वा अन्य राज्यांत अशी प्रथा नाही असेही कळले. हा एक सेवेचा प्रश्न नाही-सर्वाचाच आहे. डावे-उजवे करू नका. अनिष्ट पायंडे पाडू नका, आमचेच नाही तर बाकीच्या सेवांचे मनोबल असे खच्ची करू नका. हे कुणाच्याच हिताचे नाही. खाकीचा, हवालदाराचा असा तेजोभंग करू नका. हे राज्य श्रींचे आहे असे शिवछत्रपती सांगून गेलेत, तसेच हे राज्य सर्वाचे आहे. 'य: क्रियावान् स पंडित:।' या उक्तीनुसार- जो करतो, जो मरतो, तोच खरा पंडित.

*लेखक महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आहेत.

18 April, 2014

दादरा नगर हवेली


मुंबई बाहेर दोन दिवस जायचं म्हटलं तर दादरा नगर हवेली हे ठिकाण उत्तम आहे. मुंबईपासून सिल्वास १८० कि.मी. एवध्या अंतरावर आहे आणि वापी किंवा भिलाड रेल्वे स्टेशन पर्यंत ट्रेनने जावून पुढे जाण्यासाठी रिक्षाचा वापर करता येतो. वापी शहर आणि औद्योगिक भाग मागे पडल्यावर सुरू होणारी गावं आपल्याला सहलीला आल्याचा आनंद द्यायला लागतात. एक सुंदरशी कमान ओलांडून आपण दादरा नगर हवेलीत प्रवेश करतो आणि पुढे दमणगंगा नदी आपल्याला दर्शन देते. आता आम्ही गेलो तेव्हा एप्रिल महिना असूनही नदीला बर्‍य़ापैकी पाणी होतं. वाटेत ते पाणी अडवणारा बंधारा लागला तरी पुढे नदीपात्रात पाण्याचा सुकाळ होता. अख्या दादरा नगर हवेलीत ही दमणगंगा वाहत जाते. गुजरात राज्याच्या सीमेलगत दुधनी येथे प्रवेश केल्यानंतर समुद्राला लागेपर्यंत अनेक ठिकाणी या नदीवर बंधारे बांधले आहेत.

सिल्वास हे दादरा नगर हवेलीचं प्रशासकीय मुख्यालय नेटकं आहे. केंद्रशासीत प्रदेश असल्याने राजकीय बजबजपुरीचा अभाव असल्याने असेल रस्ते, नदी नाले, झाकलेली गटारं, बगीचा सगळीकडे प्रशासनाचा दरारा दिसत होता. महाराष्ट्रातल्या शहरात असतात तसे गल्लीतले दादा-भाई आणि त्यांचा रस्त्यावर उतूजाणारा उपद्रव इथे पहायला मिळाला नाही आणि एका समंजस समाजात आपण वावरत आहोत असं प्रथमच वाटलं. बाहेरून आला आहे म्हणून लुटा अशी शहरी अरेरावी नाही आणि फसवणं तर नाहीच नाही. इथली माणसं ‘माणसं’ वाटली.


आमच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळच असलेलं स्वामीनारायण मंदीर आणि त्याचा परीसर मनाला आल्हाद देणारा होता. या दिवसात नकोशी करणारी गर्मी नव्हती आणि पहाटेच्या गारवार्‍यासोबत पुर्वेला उगवणारा सुर्यनारायण आणि समोर मनोहारी दिसणारं स्वामीनारायण मंदीर या मुळे इथे आल्याचं सार्थक झालं. मंदीराच्या हिरवळीवर गडबड करणारे पक्षी, चिमण्या आपल्या अल्लड चाळ्यांनी लक्ष वेधून घेत होत्या. मंदीर आहे म्हणून भल्यापहाटे बोंबलणारा कर्णा इथे नव्हता पण आपली नित्यनेमाची कामं सुरू करण्याआधी सेवा करणारे सेवेकरी मात्र इथे दिसत होते. मंदीराचा परीसर तेच तर झाडून स्वच्छ करीत होते. रेखिव नक्षीकाम असणारं हे मंदीर पर्यटकांचं आकर्षण ठरलं आहे. पोशाखी दिखावा नसला तरी इथल्या व्यवस्थापनात एक अंगभूत शिस्त दिसत होती. 

मोहाचं झाड 
सिल्वासहून दुधनीकडे जाणारा रस्ता बहूतांश आदीवासी पाड्यांमधून जातो. उत्तमस्थितीत असलेल्या या रस्त्यावरून प्रवास करायला मजा येते. सिल्वासहून जवळच असलेल्या डिअर पार्क मध्ये हरणांनी चागलं दर्शन दिलं. दोन वेळा नीलगायही दिसली. पानझडीच्या या जंगलात झाडं उघडी बोडकी असली तरी त्याला एक स्वत:चं असं सौदर्य होतं. जवळच्याच लायनसफारीतही एकच सिहं आहे. या दोन्ही ठिकाणी जंगलातून फेरफटका मारण्याचा आनंद मिळतो. पावसाळ्याच्या दिवसात तिथे गेल्यास हिरवंगार जंगल आणि झुळझुळणारं पाणी पहायला नक्कीच मजा येईल. पुढे मधूबन धरणाचा फुगवटा लागतो. एका बाजूला जंगल, टेकड्या आणि दुसरीकडे नीळंशार पाणी बघत प्रवास करता करता अचानक मोहाची बरीच झाडं पहायला मिळाली. मोहाची फुलं बहराला येण्याचा हा हंगाम होता आणि ठिकठिकाणी आदीवासी लोक ती वेचताना दिसत होते. बहराला आलेले हे वृक्ष खुलून दिसत होते. दुधनी जलाशयाजवळ दादरा नगर हवेली पर्यटन खात्याचं रिसॉर्ट आहे. 



वाटेत वनखात्याचं फुलपाखरू उद्यान लागतं ते मुद्दाम थांबून पाहिलंच पाहिजे. त्या उद्यानाची देखभाल उत्तम रितीने केलेली दिसत होती आणि त्या बाहेत हर तर्‍हेची फुलपाखरं आणि फुलं होती. हे सर्व करून  परतताना प्रशस्थ वाणगंगा बोटींग गार्डन मध्ये बोटींगचा आनंद लुटत संध्याकाळचा वेळ आनंदात जातो.      
                       
अगोदर पोर्तूगीजांच्या अधिपत्याखाली असलेला दमण पश्चिमेला आणि दादरा नगर हवेली पुर्वेला. हे दोन्ही प्रदेश केंद्रशाशीत आहेत. असं असलं तरी दमण पेक्षा दादरा नगर हवेली अधिक स्वच्छ आणि सुंदर वाटलं. दमणला एकतर शेवटपर्यंत गजबजलेला रस्ता आणि कुठल्याही बकाल शहरात वाढलेली असतात तशी बांधकामं. तिथला समुद्र किनाराही जेमेतेम आहे. काळी वाळू आणि टपर्‍यांमुळे मुळचा लांबलचक आणि सरळ असलेला हा किनारा आता बापूडवाणा वाटतो. सहज बघता आला तर ठिक पण मुद्दामहून वाट वाकडी करून जावं असं तिथे काही नाही.
 
दादरा नगर हवेली हे ठिकाण मुंबई, गुजरातच्या जवळ असूनही पर्यटन दृष्ट्या अजून दुर्लक्षीतच आहे. म्हणूनच निवांतपणे फेरफटका मारायचा असेल तर या ठिकाणी गेलं पाहीजे.                     







 



06 April, 2014

गोवा मेरी जान


बिकिनी, बाटली आणि बे म्हणजेच गोवा असा गोव्याबाहेरच्या कित्येकांचा समज असतो. गोव्याला जाणारे सगळेच फक्त आणि फक्त याच गोष्टींचा आनंद घेतात असा समज असणार्‍यांनी गोव्याच्या ग्रामिण भागात फेरफटका मारला तर त्याला नितांत सुंदर गोव्याच्या अंतरंगाचं दर्शन खचीतच घडेल.

गेली तीस वर्षं मी याच गोव्याच्या प्रेमात पडलो आहे. बाखिबा बोरकरांचं बोरी गाव, डॉ. रामाणींचं वाडी तळावली, तांबडी सुर्लाचं मंदीर, तेरेखोल, बोंडला अभयारण्य, दुधसागर धबधबा कोकणीत सांगायचं झालं तर हा खरा ‘सुना परांत’, सोन्याचा प्रदेश. अप्रतिम समुद्र किनारे ही तर गोव्याची ओळख पण गेले दोन दिवस गोव्याच्या अंतरभागात फिरताना मन मोहून गेले. अशा सफरीत जीवाभावाची आवडती माणसं बरोबर असली की त्या सफरीचा आनंद काही औरच असतो. मांडवी एक्सप्रेसने थिवी स्टेशनला उतरलो तेव्हापासून उमाकांत भाईंनी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल करून टाकली.

गोव्याच्या प्रसन्न हवेत कालच्या दिवसभरच्या प्रवासाचा शीण नाहीसा झाला आणि सकाळी सहालाच झोपेतून जाग आली. खमंग गोवन न्याहारीने दिवसाची सुरूवात झाली आणि मग दिवसभर पोटोबा सुखावतच राहीला. धुळेर म्हापसाहून सुरू झालेला तो प्रवास स्मरणीय झाला. म्हापसा- मोय्रा-अळदोणा मार्गे जात असताना केबलने तोलून धरलेला पुल लागला, पुढे खाडीतून बार्ज आली की फाटक उघडल्यासारखा बाजूला होणारा ब्रिज लागला. गोव्यातल्या खाणी सध्या बंद असल्याने सगळीकडे हिरवाई पसरून राहिली होती.  त्या पुला खालून वाहणारं पाणी नितळ होतं.

रस्त्याचा दुतर्फा भाजीचे वाफे नेत्रसुख देत होते आणि आंबा, फणस काजूची तोरणं बांधावी तशी झाडं स्वागताला हजर होती. एवढ्यात एक सप्तपर्णीचं झाड सामोरं आलं आणि माझी चंगळ झाली. पंधरा-वीस वर्षांपासून न खाल्लेली तोरणं (कोकणीत चुन्ना) माझ्या दृष्टीस पडली आणि मी वेडा झालो. उन्हाची तमा न बाळगता भर दुपारी मी त्या काटेरी झुडूपाला भिडलोच. अशी तोरणं काढून खाण्यातला आनंद माझ्या मुंबईवासी मुलीला समजणार नाही. शहराने आमच्या या पुढच्या पिढीचे असे कितीतरी आनंदाचे क्षण हिरावून घेतले आहेत महाराजा.  उमाकांत भाईंनी मला प्रोत्साहन देताच तिथल्याच कुमयाच्या पानांचे द्रोण करून ती तोरणं त्यात जमा केली. दोन्ही हातात द्रोण घेवून पुन्हा गाडीत बसताना मला स्वर्ग प्राप्तीचा आनंद झाला होता. या पहिल्या एक-दिड तासात माझा दिवस सार्थकी लागला होता आणि नंतरचा पुर्ण दिवस आणि त्यात केलेली चंगळ माझ्यासाठी बोनस होता. 

आज मला आधीच देव पावला होता आणि मग आम्ही तिकडे सप्तकोटेश्वराच्या देवळाला भेट दिली. महाराष्ट्राबाहेर कुठेही गेलं आणि आपले जाणते राजे शिवाजी महाराज यांनी इतिहासावर उमटवलेल्या खुणा पाहिल्या की उर भरून येतो. महाराजांनी आदेश दिला आणि या सप्तकोटेश्वराच्या मंदीराचा जिर्णोद्धार झाला ती तारीख होती 6 एप्रिल 1668. आज त्या गोष्टीला 348 वर्षं झाली. त्या जाणत्या राजाने केलेली प्रत्येक कृती आज साडेतीनशे वर्षांनंतरही दाद देण्यासारखी असते. राजांच्या आठवणीला उजाळा देता देता जवळच्याच कुळागाराकडे पावलं वळली. माड, पोफळी, त्यावर चढलेल्या मिरवेली, केळी हे पहाता पहाता जवळच्या बिमलाच्या झाडाकडे लक्ष गेलं. तुरट-आंबट चवीची झाडाच्या खोडाला लगडलेली ती बिमलं पाहून हात नकळतच तिकडे गेला. तिथल्या मालकानीही हवी तेवढी घ्या म्हणून परवानगी दिली आणि मग पडत्या फळाची .............

बिमलं
मये तलावाकडे गाडी थांबवली आणि पुन्हा एकदा पेट्रोल भरून घेतलं ते गाडीत नव्हे तर पोटात. तलावाकाठच्या बगिच्यात बसून गप्पा मारताना पाणकावळा, घार, ब्राम्हणी काईट, बदकं आपले खेळ करून दाखवतच होते. तासभर गप्पा मारून मग नार्वे गावाकडे प्रस्थान ठोकले ते मासळीच्या जेवणावर ताव मारण्यासाठी. सुग्रास जेवणाला खरी बहार आणली ती त्या चणक नावाच्या 

माशाने. गोव्याच्या  खाडीत मिळणारा हा चवदार मासा खावा तर अशा खाणावळीतच. अर्थात कोळंबी, बांगडा, दोडकारे यांचं हौतात्म्य आम्ही वाया जावू दिलं नाहीच हे वेगळं सांगायला नको.

पोटातले मासे थोडी सुस्ती आणत होते पण उमाकांत भाईंचा उत्साह ओसंडून वाहत होता. वाट वाकडी करून ते आम्हाला काजूच्या रानात घेवून गेले. यतेच्छ बोंडू खाल्ले, तिथल्या कुळागारात फेरफटका मारला आणि गोव्याची प्रसिद्ध फेणी कशी बनवतात ते पहायला गेलो. फेणीचं दुरदर्शन घेवूनच आम्ही म्हापश्याच्या प्रसिद्ध बाजारात गेलो. त्या बाजारात म्हणे आई-वडील सोडून बाकी सगळं मिळतं. खरचं तिथे यच्ययावत गोष्टींचा बाजार मांडला होता. त्या तेवढ्या गर्दीत माझ लक्ष वेधून घेतलं ते ब्रम्हवठार देवस्थानाने. त्या बाजारात तो भलामोठा पिंपळ ठामपणे उभा आहे. दगडाला देवत्व देण्या पेक्षा त्या
ब्रम्हवठार
झाडला दिल्यामुळे ते झाड वाचलं आहे. त्या ब्रम्हवठाराकडून आम्ही थेट परब्रम्हाकडे म्हणजे वागातूर  सागर किनार्‍यावर दाखल झालो. इतर किनार्‍यावर असलेली गर्दी इथे नव्हती. तिन्ही सांजेला सागर किनारी असण्यासारखं सुख नाही आणि तोंडी लावायला भेळ असली तर मजा काही औरच असतो. उजव्या बाजूला रेडी बंदर आणि डावीकडे मुरगाव बंदरात उभ्या असलेल्या बोटीवरचे दिवे आम्हाला घरी परतायची आठवण करून देत होते. एक दिवस खरच साजरा झाला होता आणि तृप्तीचा ढेकर देतच आम्ही परतलो पुन्हा जेवण्यासाठी.  







LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates