16 February, 2014

ते लहाने होते म्हणूनी


भर दिवसाही ज्यांच्या डोळ्यासमोर केवळ अंधाराचंच साम्राज्य असतं त्याला प्रकाशाचा एक किरण पाहाण्याची केवढी मोठी आस लागून राहाणार याची कल्पना डोळसांना येणं कठीणच आहे.  कधी काळी देवाची आपल्यावर कृपादृष्टी होईल आणि आपल्याला दृष्टी येईल याचीच याचानामय प्रार्थना हे लोक देवाजवळ नक्कीच करीत असतील, पण तो देवही एवढा दयाळू असेल का? मुळात तो दयाळू असता तर त्याने तो प्रकाशच आमच्या डोळ्यासमोर का येवू दिला नाही?  असं.... ते आर्त स्वरात आपलं दु;ख़ व्यक्त करणार्‍याच्या हाकेला खरंच एकदा देव ओ देतो. डॉ. लहानेंच्या स्वरूपात तो त्याना दर्शन देतो. आता दर्शन देतो म्हटल्यावर दृष्टी ही यायलाच हवी,  ती दृष्टी सुद्धा हा लहानेदेव देतो. हा देव शिबिरं भरवतो. केवळ आपला फायदा व्हावा म्हणून समुहाला वापरून घ्यायच्या या युगात दृष्टीहिनांच्या समुदायाला एकत्र करून त्याना दृष्टीदान करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारा हा महामानव आपली नित्य जबाबदारी पार पाडत असतानाच वरोर्‍याच्या आनंदवनातही अगदी नेमाने जातो. एरवी स्वत:ला उपेक्षीत समजणाराही ज्यांच्यापासून चार हात दूर उभा राहतो अशा  कुष्टरोग्यांवरही लहानेसाहेब आईच्या ममतेने आणि बापाच्या जबाबदारीने शस्त्रक्रिया करतात. चार दिवसापुर्वी रुग्णांविषयी वाटणार्‍या काळजीतूनच त्यानी निदर्शनं करणार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर आज त्यांनाच अटकपुर्व जामिनासाठी धावपळ करावी लागत आहे.

याच समाजाचा एक भाग म्हणून डॉ. लहानेसाहेब मी तुमची माफी मागतो. केवळ आणि केवळ सामाजासाठीच जगणार्‍यावर ही अशी किटाळं कधी तरी येतात आणि त्याची जखम खुप खोलवर होते याचीही मला कल्पना आहे. या प्रसंगातून आपण नक्कीच सुखरूप बाहेर याल आणि पुन्हा तेजाने चमकाल अशी खात्री आहे. डोळस ‘माणसांना’ तुम्ही हवे अहात.....  खरंच... ते म्हणताहेत:

ते तात्या होते म्हणूनी
मी घोर तमातून तरलो
अंधार्‍या दुनियेमधुनी
मी प्रकाश भरूनी उरलो

ता.क. अंबानीच्या अंबारीत आसनस्त होणं सोडून तुम्ही जनसामान्यांसाठी जे.जे.लाच आपलं केलं याची जाणीव आहे समाजाला.      

आपला हितचिंतक
नरेंद्र प्रभू  

                        

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates