05 January, 2014

संभवामी युगे युगे


"यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं स्रुजाम्याहं
परित्राणाय साधुनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे"


भगवान श्रीकृष्णाने दिलेलं हे वचन कसं पुर्ण होणार?

कारण:
घरातून बाहेर पडावं तर चालायला रस्तेच नाहीत अशी शहरांची अवस्था तर गावा गावात रस्त्यांचंच गटार झाल्याची अनुभूती, शाळेत जावं तर पैसे चारून नोकरीला लागलेले मास्तर आणि नेत्याकडे जावं तर त्याच मास्तराकडून पैसे खावून गब्बर झालेला नेता. ‘आदर्श’ वाल्यांचाच मुख्यमंत्री आणि पूढे तिकडे दिल्लीत त्यांचाच वाचाबसलेला पंतप्रधान. बाजारात जावं तर कांद्याचा भाव सुद्धा विचारण्याची भिती, करण तो विचारून चक्कर आली तर एवढा महागलेला कांदाही कुणी नाकाशी धरणार नाही. शाळेत शिक्षण नाही, सरकारात दम नाही, न्यायालयात न्याय .. ... .. . (नाय आणि गांगुली हाय). एवढं सारं झालं म्हणून मिडीयात जावं तर तिकडे करूण की काय म्हणतात तो निस्तेजपाल बसलाय.
सगळी यादी करायला गेलं तर टाईप करून करून बोटं मोडतील.  
कसं व्हायचं म्हाराजा?

असं असलं तरी तो सांगून गेलाय

संभवामी युगे युगे

आता त्यानेच म्हटलय म्हणजे तो येणारच, आलाच पाहिजे, आलाही असेल कदाचीत,

पण आपण त्याला कसे ओळखणार?

तो केजरीवाल तर नाही?

छे देव काय असा असतो? तो ‘आप’लाच आहे. म्हणून त्याला सध्या सोडून देवूया. त्याला किती का खोल्यांच्या असेना पण एकदाचा घरात जाऊदे. तो पाणी फुकट वाटतोय विज अर्ध्या किंमतीला देतोय म्हणजे तो देवच असणार पण तिकडे गोव्यात विज याच्यापेक्षा स्वस्त आहे, पेट्रोल तर सगळ्या देशाभरापेक्षा स्वस्त, त्यांचा मनोहर कारकुनाच्या कपड्यात स्कुटरवरून मंत्रालयात येतो, इकॉनॉमी क्लासने फिरतो, कटींग चाय पितो. 
तो देव असेल काय?  

छे...!  देव एकदम दोन अवतार कसे घेईल?  नाय?

देव बिटकॉईन असेल काय बिटकॉईन?

बिटकॉईन माहीत नाय?

बिटकॉईन, बिटकॉई...न.

अहो.... व्हर्च्युअल चलन.  

नाय समजलं, जयराज साळगावकरांचा लोकसत्ता मधला लेख वाचा म्हणजे जरा समजेल (मला पुर्ण समजलय पण मी सांगणार नाही (कळ्ळच नाही तर सांगणार काय, असं कोण म्हणालं ते?)
देशोदेशीच्या केंद्रींय बँकांतून चाललेल्या एकाधिकारशाहीला आव्हान देऊन अर्थकारणाचे राजकारण करून सामान्यांचे आर्थिक नुकसान करणार्‍या राजसत्तांना आणि अघोरी संपत्तीमुळे आलेल्या त्यांच्या माजाला चाप लावण्याचे काम बिटकॉईन करू शकेल असं म्हणतात.

देशात राजकिय पातळीवर आणि जगात आर्थिक आघाडीवर होऊघातलेल्या बदलातच पुन्हा धर्माचं राज्य येईल, त्याने ‘संभवामी युगे युगे’ म्हटलं होतं त्याच्या या पाऊलखुणा तर नसतील? अपेक्षा करायला काय हरकत आहे. Be Positive.       

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates