18 December, 2014

कधी सांजवेळी


कधी सांजवेळी नदीच्या किनारी
तुझे हात हातात मी घेतले
अशा रम्यवेळी वसंतातल्या ग
तुझे अंग प्रत्यांग गंधाळले     

कधी सांजवेळी खगांची विमाने
तुला पाहूनीया जरा थबकती
कधी सांज वेळी लता-वेलीही त्या   
तुझे गुज रानामध्ये ऎकती

कधी सांजवेळी उन्हेही पळाली
तुला पाहूनीया जरा मागूती
कधी सांजवेळी आकाश तारे
लगबगून येती तुझ्या संगती

कधी सांजवेळी नवा चंद्र आला
तुला पाहूनीया जरा हासला
आरक्त गालात तुझीया सखे ग
नवा प्रेम अंकूर मी पाहिला   

अशा सांजवेळी उल्हासीता तू
तुझ्या बाहूपाशी मला घेतले
कुणाची कुणाला पडली मिठी ती
न तू पाहीले ना मी पाहिले     

(माझे मित्र डॉ. दिपक रेवंडकर यांनी फेसबुकवर एक फोटो अपलोड केला आणि त्या शीर्षक दिलं ‘कधी सांजवेळी’ या वरूनच ही कविता स्फुरली.)

नरेंद्र प्रभू
१८/१२/२०१४
    

    

16 December, 2014

आत्मास


प्रिय आत्मा...

तुझ्या यशाच्या दिव्य पताका
पुण्य भूमीवर फडकू दे
तुझ्या ‘ईशा’च्या या वळणावर
सकल चांदणे बहरू दे

सह्य-हिमालय करीशी सोपा
सुविधांचा तो पुर्वांचल
दुर्गम नाही उरला आता
अंदमानचा सेल्युलर

कर भ्रमण कर विदेशातही
तुझाच आहे धृव उत्तर
त्रिखंडातही नाव होवूदे
नसेल जागा धरणीवर

तू सहलसाथी हो सर्वांचा अन
दाखव जग हे सकल जना
उदंड होईल ईशकृपेने
‘ईशा’ नाव हे मना मना

तुझ्या यशाच्या दिव्य पताका
या भूमीवर फडकू दे
तुझ्या साथीने देश-विदेशी  
सफर जनांना घडवू दे


(आज ईशा टूर्सच्या पुण्याच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे, मी जावू शकलो नाही पण हे शब्द तरी जावूदे)
नरेंद्र प्रभू
१६ डिसेंबर २०१४ 

08 December, 2014

नित्य नवे रंग तुझे


तुझे नित्य नवे रंग अन
नव्हाळीचं आकाश
तुझा नित्य नवा श्वास अन
उत्साहाचाच अवकाश

पहाटेचं दव जणू
तुझ्या मायेचा ओलावा 
झाडां झुडूपां मधून
तुच वाजवशी पावा  

उडणारे पक्षी असे
तुझे अफाट विहरणे 
पाखरांचे गुज जणू
तुझे मंजूळ गाणे 

उब घेवून येती तुझी
कोवळी रवी किरणे
चराचरात पुन्हा एकदा
नव्याने जीव भरणे

वरचा तारा, मंद वारा
आसमंत सारा
तुझाच देवा असे असा
अनंत पसारा

नरेंद्र प्रभू
१७-१२-२०१४

   

       

26 November, 2014

शशीकांत धोत्रे: एक सिद्धहस्त कलाकार


शशीकांत धोत्रे या सिद्धहस्त कलाकाराच्या कलाकृतींचं प्रदर्शन ‘इंडीया आर्ट फेस्टीव्हल’च्या चौथ्या प्रदर्शनात मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये भरणार आहे. नेहरू सेंटर, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई ४०० ०१८ या ठिकाणी दि. २८ ते ३० नोहेंबर २०१४ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सदर प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनामुल्य खुलं राहील. रंगीत पेन्सीलने चितारलेली ही चित्रं म्हणजे चित्रकलेचा अनोखा नजराणा आहेत.     

 

अवखळ मुलगी ते संसारात रममाण झालेली स्त्री या दरम्यान तीच्या प्रगल्भ होत जाणार्‍या भावना, हळवं प्रेम, हुरहुर, आत्ममग्न मन, दळण दळत असताना सखीशी केलेलं हितगुज, घडीभर विश्रांती घेणारी गृहिणी, मेंदीची नक्षी काढण्यात दंग असलेल्या मैत्रिणी, मातीची भांडी रंगवण्यात मग्न झालेली तरुणी अशी सुमारे वीस चित्रं या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. प्रथम दर्शनी छायाचित्रंच वाटणारी ही हुबेहूब चित्रं पाहून पाहणारा दंगच होवून जातो.                    

रंगीत पेन्सीलने चित्रीत केलेली ही चित्रं म्हणजे शशीकांत धोत्रे यांच्या आगळ्या वेगळ्या शैलीची नजाकत आहे. या माध्यमाचा उपयोग करून एवढ्या मोठ्या प्रमाणात हुबेहूब काढलेली चित्रं पाहण्याच्या योग या प्रदर्शनानंतर भारतभरातील रसिकांना लाभणार आहे. पुढच्या संपुर्ण वर्षात भारतभर भ्रमण झाल्यावर मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत वर्षअखेर हे प्रदर्शन भरणार आहे.

        
या प्रदर्शनाला आर्ट सोसायटी ऑफ इंडीया(२००८), बॉम्बे आर्ट सोसायटी(२००९) चा प्रथम पुरस्कार, राज्यस्थरीय आशा दीप पारीतोषीक (२०१०), इंडीया आर्ट फेस्टीव्हल चा प्रथम पुरस्कार (२०११), महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (२०१३) अशा अनेक नामंकीत संस्थांकडून परितोषीकं मिळाली असून मुंबईतल्या नामांकीत कलादालनांमधून शशीकांत धोत्रे यांनी चित्रंप्रदर्शनं मांडली आहेत.       
            
पुढील एका वर्षात देशभरातील सत्तावीस शहरात एकाच कलाकाराने मांडलेलं हे एकल प्रदर्शन भ्रमंती करणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं हे एकमेव प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनाला मुंबईकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि कलेचा आस्वाद घ्यावा.          



06 November, 2014

मराठी संस्कृतीचा दळभद्री गुण


गोड गोड लिहीण्यापेक्षा सडेतोड लिखाणासाठी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर प्रसिद्धच आहेत. श्रीमंत होण्यासाठी आधी तसे संस्कार व्हावे लागतात, मग तसे विचारमनात येतात. नंतर त्या अनुशंगाने कृती होते आणि मग वाटा दिसायला लागतात. नंतर प्रयत्न आणि मग सिद्धी. हा असा मार्ग असताना मुळातच 'धट्टीकट्टी गरिबीच बरी, अंथरुण पाहून पाय पसरा, देवाला भिकारदास आणि गरिबाला दरिद्रीनारायण असली नाव आणि म्हणी प्रथम हद्दपार केल्या पाहिजेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला एकवीस वर्ष पुर्ण झाली त्या निमित्ताने लोकसत्ताचा हा अग्रलेख प्रत्येक मराठी माणसाने वाचलाच पाहिजे.        


अर्थव्यवस्था बदलत असताना भांडवली बाजारात घपले घडू लागले, ते टाळण्यासाठी एक छोटे- पण महत्त्वाचे पाऊल २० वर्षांपूर्वी उचलले गेले. आर एच पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या नव्या, संगणकाधारित भांडवली बाजाराने - 'एनएसई'ने २१ व्या वर्षांत सशक्तपणे पदार्पण केले आहे..

मराठी संस्कृतीचा सर्वात दळभद्री असा कोणता गुण असेल तर संपत्तिनिर्मितीस कमी लेखणे. पैसे कमावणे हे जणू काही पापच आहे आणि ते न कमावणारे हेच थोर थोर आहेत अशा स्वरूपाचे संस्कार मराठी मनांवर लहानपणापासूनच होतात. परिणामी जरा कोणी पैसे मिळवणारा वा मिळवताना दिसला की तो नक्की भानगडबाजच असणार अशा स्वरूपाची खात्री मराठी मनामनात आपोआपच होते. त्याचमुळे देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार, बाँबे स्टॉक एक्स्चेंज, या मराठी राज्याच्या राजधानीत असूनही मराठी पावले त्याकडे वळलीच नाहीत आणि मराठी माणूस त्या बाजारास सट्टाबाजार म्हणून खिजवत आपले भिकार नैतिक दारिद्रय़ मिरवत राहिला. समस्या ही की मराठी समाजातील हा दुर्गुण दूर करण्याचा प्रयत्न करावा असेदेखील कोणा राजकीय पक्ष वा संघटनेस वाटले नाही. मराठी अस्मितेच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची बौद्धिक कुवत वडापावच्या गाडीच्या आसपासच घुटमळत राहिली आणि स्वत:ची धन करण्यापलीकडे मराठी माणसाच्या संपत्तिनिर्मितीत महत्त्व द्यावे असे या मंडळींना कधी वाटले नाही. मुंबई महाराष्ट्रात राहणार की जाणार अशा काल्पनिक मुद्दय़ांवर लढण्यात या मंडळींना शौर्य वाटत होते. मुंबई महाराष्ट्राच्या सीमांत राहिली खरी पण मुंबई तुमची भांडी घासा आमची, हेच ऐकण्याची वेळ मराठी माणसावर आली. या सगळ्याचा दूरगामी परिणाम असा की मराठी माणूस आर्थिक  संपन्नांच्या सान्निध्यात अजूनही कानकोंडा होतो आणि विपन्नांच्या संगतीतच त्यास हायसे वाटते. तेव्हा या अशा मुंबई नगरीत स्थापण्यात आलेली नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनएसई, ही यंत्रणा आज एकविसाव्या वर्षांत पदार्पण करीत असून तिच्या वाटचालीची दखल घेणे हे या मराठी मानसिकतेवर काही प्रमाणात तरी उतारा ठरू शकेल.

ही अशी दखल घेण्याची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे या एनएसई नामक भांडवली बाजाराने भारतीय अर्थव्यवस्थेतील एका महत्त्वाच्या घटकात शिस्त आणली आणि त्यायोगे बाजारपेठेवरील विश्वास वाढवला. हे झाले तो काळ पाहिल्यास याचे महत्त्व पटेल. हर्षद मेहता नामक व्यापारी सांडाने बाजारात धुमाकूळ घातला होता. भांडवली बाजार आणि बँकिंग व्यवस्था यांतील कच्चे दुवे चतुरपणे हेरत हर्षद मेहता याने भारतातील पहिला मोठा भांडवली बाजार घोटाळा करून दाखवला आणि स्वत:चे आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचेही अध:पतन घडवून आणले. हा काळ पंतप्रधानपदी नरसिंह राव आणि अर्थमंत्रिपदी मनमोहन सिंग यांच्या असण्याचा. देशाच्या सीमा आर्थिक सुधारणांच्या वाऱ्यांनी मुक्त झालेल्या आणि परकीय भागभांडवल भारताकडे संभाव्य गुंतवणूक गंतव्यस्थान म्हणून पाहू लागले होते. परंतु भांडवली बाजारातील या घोटाळ्याने भारताविषयीच्या विश्वासास मोठाच तडा गेला होता. अर्थात हा तडा घालवण्याचे पुण्यकर्म करणारा हर्षद मेहता ही काही पहिली विभूती नव्हे. त्याआधी दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्यांनी समभाग प्रमाणपत्रांची बनावट मालिका छापून बाजाराची झोप उडवली होती. त्या काळात समभाग हे कागदी स्वरूपात असत आणि अनुक्रमांकांनी त्यांची नोंद ठेवली जात असे. परंतु या थोर महाशयांनी या अनुक्रमांकांचीच चोरी केली. परिणामी एकाच अनुक्रमांकाचे अनेक समभाग बाजारात उपलब्ध झाले आणि एकच हलकल्लोळ झाला. तेव्हा इतक्या मागास आणि लबाडांना आवतण देणाऱ्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज वाटू लागली होती. त्यासाठी पर्याय होता बाँबे स्टॉक एक्स्चेंजमध्येच आमूलाग्र सुधारणा घडवणे वा स्पर्धा म्हणून एक स्वतंत्र एक्स्चेंज जन्माला घालणे. यातील दुसरा निवडला गेला. याचे कारण जुन्या पडक्या वाडय़ाची डागडुजी करण्यापेक्षा नवीन इमला बांधणे अधिक सोपे आणि आर्थिकदृष्टय़ा परवडणारे असते. खेरीज नवीन घर हे बदलत्या काळानुसार बांधता येते. त्याचमुळे असे नवीन घर बांधण्याचा निर्णय झाला.

हे नवीन घर म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज. ही घटना १९९२ सालची. म्हणजेच आर्थिक सुधारणांना वर्ष होत असतानाची. त्या वेळी या नव्या घराची चावी कोणाच्या हाती द्यावी यासाठीदेखील मोठा खल झाला होता. या जबाबदारीसाठी लायक व्यक्ती अनेक होत्या तरी लायकीइतकीच निष्ठा आणि बांधीलकी हे गुण असणे अधिक महत्त्वाचे होते. कारण मुंबई भांडवली बाजारात जे काही उद्योग सुरू होते ते पाहता ही नवीन बाजारपेठ पूर्णपणे घोटाळामुक्त असणे गरजेचे होते. या सर्व निकषांवर निवडली गेलेली व्यक्ती ही मराठी होती ही बाब लक्षात घेण्यासारखी आणि एनएसईची विशी साजरी करण्यासाठी आणखी एक कारण ठरणारीदेखील. त्या वेळी आयडीबीआय या बँकेच्या प्रमुखपदी होते एसएस नाडकर्णी. या नाडकर्णी यांनी अनेकांना घडवले आणि त्या घडलेल्यांतील एका व्यक्तीने पुढे नाडकर्णी यांच्या हाताखाली काम न करता स्वतंत्रपणे काही नवे करण्यासाठी आयडीबीआय सोडली. यांच्याचकडे एनएसईची सूत्रे देण्यात आली. रामचंद्र पाटील हे त्यांचे नाव. पुढील काळात आरएच पाटील या व्यक्तीच्या नावावर अनेक आर्थिक संस्थांची नोंद झाली. परंतु या अनेक संस्थांतील मानाचा तुरा म्हणजे एनएसई. या बाजाराने भारतीय भांडवली बाजाराचा चेहराच बदलून तो अधिकच साजिरा आणि आश्वासक केला. कोणत्याही नव्या व्यवस्थेस नाके मुरडणे, तिचे अहित चिंतून ती कशी अपयशी होईल याचे प्रयत्न करणे हे आपल्या समाजाचे लक्षण. त्या लक्षणांना सामोरे जाण्याची वेळ एनएसईवरदेखील आली. लीधो-वेचो करीत समभागांची खरेदी-विक्री करणाऱ्यांचे वर्तुळ एनएसईत कधीच नव्हते. सुरुवातीपासून चोख संगणकीय पद्धतीने व्यवहार करणाऱ्या एनएसईला कधीही बाजारपेठीय गोंगाटाचा स्पर्श झाला नाही. त्या अर्थाने या नवीन पद्धतीत विक्रेत्यांची कलकल, वर्दळ वा गलका कधीच नव्हता. त्यामुळे हा बाजार बाजार वाटायचाच नाही. तेव्हा जन्मल्या जन्मल्या त्याचे मृत्युलेख लिहिले जाणे अपरिहार्य होते.

परंतु ते सर्व फोल ठरले आणि भारतीय कल्पनाही करू शकत नव्हते अशा स्वरूपाचे एक्स्चेंज यातून उभे राहिले. या बाजारपेठेचे यश साजरे करण्याचे आणखी एक कारण म्हणजे या व्यवस्थेच्या निमित्ताने आणखी एका, पूर्ण भारतीय महाकंपनीचा जन्म झाला. एनएसईची स्थापना, तिचे पूर्ण संगणकीकरण, संगणकीय आज्ञाप्रणाली, यंत्रसामग्री आदी प्रचंड पसारा हाताळण्याचे काम अनेक बलाढय़ परदेशी कंपन्या स्पर्धेत असतानाही एका तुलनेने नगण्य अशा भारतीय कंपनीस दिले गेले. ती कंपनी म्हणजे टीसीएस. यातील वैशिष्टय़ाची बाब ही की टीसीएसने या बाजाराची उभारणी दिलेल्या मुदतीच्या आधीच पूर्ण केली आणि अखेर ४ नोव्हेंबर १९९४ या दिवशी एनएसईवर पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, बडय़ा विकसित देशांत होतात तशाच पद्धतीने व्यवहारांस सुरुवात झाली. या काळात वरळीतील एका बडय़ा इमारतीत अत्यंत छोटेखानी खोलीत पाटील यांचे कार्यालय होते. त्यांना भेटावयास गेलेल्या एका उद्योगपतीने ते पाहून अधिक मोठय़ा कार्यालयाची गरज व्यक्त केली. त्यावर पाटील म्हणाले, मोठेपणा विचारात हवा, कार्यालयासाठी एक टेबल आणि संगणक इतकेच पुरेसे असते. जेव्हा जन्माला आले त्या वेळी एनएसईत एका सेकंदात दोन व्यवहार इतकेच व्यवहार होत. सहा वर्षांत त्याची गती एका सेकंदात ६० व्यवहार इतकी झाली. आजमितीला या एक्स्चेंजमध्ये एका सेकंदात तब्बल एक लाख ६० हजार व्यवहार होतात आणि जगातल्या पहिल्या २० एक्स्चेंजमध्ये त्याची गणना होते. 

तेव्हा अशा तऱ्हेने पूर्ण भरात आलेल्या, अर्थक्षमतेने मुसमुसत्या या बाजारपेठेचा विसावा जन्मदिन साजरा करणे हे आपले कर्तव्य ठरते. त्याची आठवण करून देण्यासाठीच हा प्रपंच.

01 November, 2014

वा! ते कामाला लागले


काल घरी येऊन बातम्या लावल्या, नव्या मुख्यमंत्र्याचा शपशविधी पहावा म्हटलं तर पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये ‘सेवा हमी कायदा’ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री मा. देवेद्र फडणवीस सांगत होते. हे कसं शक्य आहे. साडेपाचला सोहळा संपला असेल, पंतप्रधानांपासून सगळे नेते मुंबईत आहेत, विदर्भातून जिव्हाळ्याची माणसं लोटलीत, दुर्लभ असं मुख्यमंत्री पद लाभलय ते कुटुंब, मित्रमंडळीसह ‘साजरं’ करायची वेळ असताना लगेच कॅबिनेट बैठक होते काय आणि त्यात निर्णय होतो काय, थोडं धक्कादायक होतं. रात्री आठ वाजता सह्याद्री वाहीनीवर तर ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत चालू होती, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर ती घेत होते. एका तासाच्या विनाव्रत्यय मुलाखतीत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस प्रामाणिक उत्तरं देत होते. हेवा वाटला! बर्‍याच वर्षांनी महाराष्ट्राला एक खमकं, आशादायी नेतृत्व लाभल्याचं जाणवत राहीलं.


आज सकाळी ११ ते ५ या वेळेत कॅबिनेटची सलग बैठक होणार आहे. वा! खरंच ते कामाला लागले. महाराष्ट्राला चांगले दिवस येण्याची ही सुरूवात मानुया, नव्या सरकारला शुभेच्छा देवूया.   

बरे झाले देवा
देवेंद्र लाभला
मोहरा आहे हा  
आश्वासक ||  

ता.क.
वार्ताहर अमेय तिरोडकर यांचं एक स्टेटस फेसबुकवर वाचायला मिळालं ते बोलकं आहे. वाचा:   
    
शपथविधीला एक पंचाऐंशी वर्षांच्या आजी भेटल्या. डॉ. थत्ते त्यांचं नाव. गाव चिपळूण. काठी टेकत रखरखत्या उन्हात अनवाणी पायाने चालत आल्या होत्या. जनसंघाच्या स्थापनेपासूनच्या कार्यकर्त्या. मी विचारलं, "आजी ह्या वयात चालत आलात...देवेंद्र तुमचा नातेवाईक लागतो का ?" म्हणाल्या..."अहो, तो ज्याचा कळस आहे ना...त्या पायाचे दगड आम्ही आहोत. आम्ही खपलोत गेली पन्नास वर्षं. हे आमचं भाग्य आहे की आमच्या हयातीत देशात आणि राज्यात एकहाती सत्ता आलेली पहायला मिळाली"

भाजपाला आज जो हा दिवस दिसलाय ना त्यामागे थत्ते आजींसारख्या असंख्य 'पायाच्या दगडांचं' योगदान आहे.




30 October, 2014

युग कुठलं ही असेना का!











दुष्ट प्रवृत्तीचा नाश करावा म्हटलं तरी
नरकासूरांचाच माज आहे
कितीदा भेद केला तरी
जरासंधाचाच बाज आहे   


तू म्हणाला होतास संभवामी युगे युगे, म्हणजे
तुझ्या येण्याची वाट पाहावी लागणार
आणि देवा तोपर्यंत तरी
आई-बापाला तुरूंगात सडावं लागणार

तुझी बहीण असली तरी
द्रोपदीची विटंबना होतच रहाणार, आणि
दुर्योधनाची मांडी फुटेस्तोवर
वाट ही पहावीच लागणार

म्हणजे मग भिम असण्याला
काय अर्थ आहे?
अर्जुनाचं गांडीवही
तिथं कुठं श्रेष्ठ आहे?

पण कर्ण आणि युधीष्ठीर होण्यापेक्षा   
भिम अर्जुनच योग्य आहेत
ते व्दापार युगातले, आणि
हे कलियुगातले असा भेद आहे

युग कुठलं ही असेना का!
तुझा पाठिंबा त्यास आहे
जो अन्यायाविरुद्ध उठतो
तुझा तिथेच वास आहे

29 October, 2014

नाही करणार पुन्हा माज



काय भाई सांगू? कसं हो सांगू?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज!

उगीच बोलूनी गोलो खान
गीडिवचला तव अभिमान
त्या रागाचा, त्या माजाचा
अंगावर मी ल्यालो साज
काही तरी होऊन गेलंय आज!

जरी लाजरा,  झालो धीट
घुरत राहिलो त्याला नीट
सेनेचा हा पोर कसा मी
विसरुन गेले रीतरिवाज?
काही तरी होऊन गेलंय आज!

सहज बोलले सले मी
मलाच हरवुन बसलो मी
एक अनावर हासडली जादा
नाही चालला काही इलाज
काही तरी होऊन गेलंय आज!

अमीत यताची शाही थोर
लहान आहे माझा पोर
सत्तेसाठी धरतो हाता  
नाही करणार पुन्हा मा
काही तरी होऊन गेलंय आज!



         

18 October, 2014

दक्षता दिवाळी अंकात हा लेख वाचा


जगभरातल्या पर्यटकांना ज्या हिमालयाने आकर्षीत केलं तो हिमालयच भारतभूने आपल्या शिरोभागी धारण केला आहे. या हिमालयाचं कितीही वर्णन केलं तरी काहीतरी सांगायचं उरतच. हिरव्यागार सूचीपर्णी वृक्षांनी, अनंत फळा-फुलांनी, अनेकविध पशू-पक्षांनी, खळाळते  नद्या-नाले, हिमाच्छादीत शिखरं आणि दर्‍याडोंगराने सुशोभित केलेली ही देवभूमी कितीही धुंडाळली तरी मन भरत नाही. एकदा का त्या हिमालयात गेलं की तो पुन्हा पुन्हा बोलावतच राहातो. त्या हिमालयाचंच एक साजरं रुप म्हणजे ‘लडाख’. 
        

17 October, 2014

चिनी फटाके नकोच नको


दिवाळी तोंडावर आली असताना फटाक्याच्या बाजारात गर्दी उसळेल. सगळीकडे प्रकाशाची उजळण आणि उधळण करताना करोडो रुपयांचे फटाकेही फोडले जातील. पण हे फटाके आता चीनी बनावटीचेच असतात आणि स्वस्त म्हणून त्याला मागणीही असते. पण आता आपल्याला भारतीय म्हणून विचार करायची वेळ येवून ठेपलेली आहे. चीन हा आता भारताचा सगळ्याच क्षेत्रातला प्रतीस्पर्धी आहे आणि सीमावर्ती भागात चीनच्या हालचाली या सतत त्रासदायक होवून बसल्या आहेत. लडाखसारखा प्रांत असो की अरूणाचल प्रदेश मधले रस्ते बांधकाम, चीन सदोदीत भारताची अडवणूक करीत आला आहे.

अरूणाचल प्रदेशच्या सिमेवरच्या भागात चीनच्या बाजूने प्रशस्त सहा पदरी रस्ते, विमानतळ असं बांधकाम झालं असताना भारताने मात्र आपल्या सीमेत रस्त्यांचं बांधकाम करूच नये असंच चीनला वाटत आलं आहे. ही दादागिरी भारत सरकार आपल्या पातळीवर मोडून काढेलच पण एक भारतीय नागरीक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. आजच्या जगात व्यापार हे सुद्धा एक अस्त्र आहे. आणि ते सगळ्यानाच पुरून उरतं. आज भारताच्या सगळ्या बाजारपेठा चीनी मालाने तुडुंब भरल्या आहेत. कपडे, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक उपकरणं इतकचं काय गणपतीच्या मुर्ती, आकाश कंदील, विजेचे दिवे, फळ फळावळ हे सगळंच चीनी होत चाललय. दिवाळीचा चीनी फराळ आला तर नवल वाटायला नको.  

सीमेवरच्या शत्रूला परत जा म्हणून सांगताना आता सैनिकांबरोबरच नागरीकही आपली भुमिका बजावू शकतात. चीनी मालाला नकार देवून आपण ती बजावली पाहीजे. फटाक्यांसारख्या आवाज आणि हवेचं प्रदुषण करणार्‍य़ा वस्तू तर कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.  चिनी फटाके तर नकोच नको.      



16 October, 2014

माजोरडे


काल मतदान झालं आणि आता महाराष्ट्रात सत्तेवर कोण येणार यासाठी १९ तारखेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. भाजपला पुर्ण बहूमत की...?  असा प्रश्न असताना प्रचारादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वाने जे वक्तव्य केलं ते ‘माजोरडे’ या एकाच शब्दात जोखता येईल.

उत्तर प्रदेश, बिहारच्या पोटनिवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यापासूनच सामनामधून भाजपला कमी लेखण्याचे, टोमणे मारण्याचे, घालून पाडून बोलण्याचे उद्द्योग सुरू झाले आणि शेवटी मोदींचा ‘बाप’ काढण्यापर्यंत मजल गेली. या सगळ्या प्रचारात मातोश्री म्हणजे रायगड, उद्धव ठाकरे म्हणजे शिवाजी महाराज, निवडणूका म्हणजे अफजलखानाची भेट असं चित्र उभं करण्यात आलं. शिवसैनिक म्हणजे बाघनखं, कोथळा काढू, अफजलखानाची फौज, दिल्लीवरून स्वारी, हत्तीची सोंड कापून काढू (अमित शहांना उद्देशून), दिल्ली की बिल्ली, शिवसेनेशी फारकत म्हणजे हिंदुत्वाची काडीमोड, अशी खालच्या पातळीवरची आणि असंबद्ध टिका करण्यात आली. आदिलशहा, कुतूबशहाला लोळवला तसा अमितशहाला लोळवू आणि भांडी घासायला लावू अशी भाषा केली गेली. मोदींना ‘चायवाला’ म्हणून हिणवलं गेलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला निघालेत म्हणून खोटा प्रचार केला. मुख्य म्हणजे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला विरोध न करता भाजप एक नंबरचा शत्रू म्हणून आरोळी ठोकली. एका अर्थी त्यांचाच प्रचार केला.      

भाजपने विश्वासघात केला, खंजीर खुपसला अशी टिका शेवटपर्यंत करीत असताना आपण निवडून आल्यावर काय करणार हे सांगायला ते विसरले, मराठी गुजराती वाद निर्माण करून समाजात नसलेली तेढ निर्माण केली, मुंबईतले उद्योग गुजरातमध्ये नेले जात आहेत अशी ओरड करून आपण महापालिकेत सत्ता असतानाही साधे खड्डेमुक्त रस्ते देवू शकत नाही याचा त्यांना विसर पडला. भारतातल्या पाच राज्यांपेक्षा जास्त अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेची सत्ता वीस वर्षाहून जास्तकाळ उपभोगूनही नागरी सुविधांची बोंब असताना राज्य पुन्हा आमच्या ताब्यात द्या असं हे लोक कसं म्हणू शकतात? मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणत असताना आपलं उत्पन्न आणि उद्योग याची वाच्यता न करण्याची काळजी घेतली. महाराष्ट्रात विरोध आणि तिकडे दिल्लीत मंत्रीपद शाबूत ठेवण्याची कसरत करताना दुटप्पीपणा केला. कोणतही कर्तृत्व नसताना आपला बाळबुद्धीचा मुलगा नेता म्हणून लादताना घराणेशाहीचा दुसर्‍यावर केलेल्या आरोपाचा विसर पडला. पंतप्रधान दिल्ली सोडून प्रचाराला का येतात असं विचारत असातानाच दहा वर्षापुर्वीची बाळासाहेबांची चित्रफित दाखवून मतांचा जोगवा मागितला.    


एकूण काय शिवकाळानंतर बराच काळ निघून गेला आहे, चौथीच्या पुस्तकानंतर इतिहास आहे हेच यांना माहीत नाही. मतदार मुर्ख नाही हे निकालात कळेलच. वानर्‍याच्या सभेत गुडघ्यावर आलेच आहेत पुढे किती दांभिकपणा करतात ते दिसेलच.    
  

13 October, 2014

प्रकाश बाबा आमटे - एक सर्वांग सुंदर चित्रपट



डिप्रेशन आलेल्या माणसाला औषधाशिवाय बरं करणारा हा चित्रपट आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. फक्त प्रचंड इच्छाशक्ती घेवून आनंदवनातून सात दिवसाचा खडतर प्रवास करून एका अरण्यात प्रकाश आणि मंदाकिनी हे डॉक्टर दाम्पत्य पोहिचतं
आणि निवार्‍यापासून सगळ्या गोष्टी स्वत:च्या हाताने उभरतं. पहिल्या दिवसापासून केवळ संघर्ष करीत आदिवासींना अपलसं करतं. त्या जंगलात जे जे म्हणून आजारी पडतात त्यांना आपल्या दिव्यस्पर्शाने उपचार करीत रहातं. मग त्यात माणसं. जनावरं. माकडं, साप, वाघ, अस्वलं हे सगळं आलं.  

नक्षलग्रस्त भागात केवळ मानव सेवा करीत असताना सरकारी बाबूगिरीचा फटकाही त्याना बसतो. पद्म पुरस्कार डावावर लावावा लागतो. साप विंचू अंगाखांद्यावर झेलत असताना कमालीची गरीबी पाहून पुर्ण अंग झाकणारे कपडेही डॉ. प्रकाश आमटे घालायचं सोडून देतात. आदिवासीची सेवा करताना, कितीतरी शस्त्रक्रिया करताना, प्रत्यक्ष धन्वंतरीचाच अवतार असल्या सारखे ते भासत राहातात.    वाघाच्या मृत्यू झाल्यावर ते मुलगा जावा तसा शोक करतात, सगळंच विलक्षण. असा जीता जागता माणूस आज आपल्यात प्रत्यक्ष आहे हे सत्य आहे. इथेच आपल्या महाराष्ट्रात, हेमलकसा या गावी. नतमस्तक व्हायचं हे अशांपुढे.

चित्रपट पहिल्या क्षणापासून प्रेक्षकांचा ताबा घेतो. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा सहज सुंदर अभिनय. नाना तर कसलेला अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ताही. प्रकाश आमटेंची भुमिका नानाला समजावण्याचा प्रश्नच आला नसेल. आनंदवनात आणि हेमलकशाला जावून या माणसाने कितीतरी वेळा काम केलं आहे, आर्थिक मदत केली आहे.


वेगळ्या विषयावरचा चित्रपट असूनही तो कुठेही रेगाळत नाही की कुणावर आरोप करीत नाही. पहिल्या क्षणापासून प्रवाही असा हा चित्रपट प्रकाश आमटेच्या जीवनासारखा, प्रकाशा सारखा. आणि म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून पहाण्यासारखा.
               


                            
 

हॉर्नबिल फेस्टिव्हल नागालॅण्ड



पूर्वांचलातील नागालॅण्ड हे राज्य आता पर्यटकांच्या नकाशावर येत आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांप्रमाणे नागालॅण्ड हे आणखी एक राज्य विकासाच्या नार्‍याला ओ देत प्रगतीकडे वाटचाल करायला सिद्ध झालं असून दरवर्षी मोठ्याप्रमाणात साजरा होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल हे त्याचं द्योतक आहे.           

अखंड भारताचा अविभाज्य भाग असलेले उत्तर पूर्वेकडील नागालॅण्ड हे राज्य, उत्तर पूर्वेच्या इतर राज्यांप्रमाणेच सगळय़ाच बाबतीत उपेक्षित राहिलेले आहे. उत्तर पूर्वेच्या या राज्यांपैकी नागालॅण्ड हे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीमुळे वादग्रस्त आणि तणावग्रस्त होते. परंतु दहा-बारा वर्षांपूर्वी झालेल्या वाटाघाटीनंतर या राज्यामधील परिस्थितीत प्रचंड सुधारणा झाली आहे. परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे आणि पर्यटनासाठी पोषक होऊ लागली आहे. पर्यटनच या राज्याला समृद्ध करू शकेल हा विचार घेऊन दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन मंत्रालयाने विकासाला चालना मिळावी म्हणून 'हॉर्नबिल फेस्टिव्हल' सुरू केला. पहिल्या सहा-सात वर्षांत या फेस्टिव्हलला विशेष यश मिळाले नाही तरीही हा फेस्टिव्हल सुरू ठेवण्यात आला आणि आता गेल्या तीन वर्षांत याला पर्यटकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे.

नागालॅण्ड हे राज्य १६ विविध आदिवासी जमातींनी बनलेले असून त्यानुसार या राज्याच्या विविध भागांचे विभाजन झालेले आहे. या सर्व जमाती आपल्या भूभागाच्याच रक्षणांसाठी प्रचंड रक्तपात करीत. मुळात या जमाती शूर योद्धे म्हणून प्रसिद्ध होत्या. अतिशय वेगळी आदिवासी संस्कृती असलेल्या या जमातींची प्रत्येकाची वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे आणि आजच्या आधुनिक जगातदेखील ती संस्कृती यांनी टिकवून ठेवली आहे. प्रत्येक जमातींचा पेहराव, दागिना, घरांची पद्धत, डोक्यावर परिधान करण्याची पद्धत, चालीरीती आणि शस्त्र अशा नाना भिन्न वेगवेगळय़ा गोष्टींमुळे हे राज्य सांस्कृतिकदृष्टय़ा आजही प्रचंड श्रीमंत आहे. पर्यटन विभागाने हीच श्रीमंती सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'ची सुरुवात केली.

या फेस्टिव्हलमध्ये किसामा नावाच्या एका गावाबाहेरील मोकळय़ा परिसरात या सर्व सोळा जमातींच्या प्रतिनिधींना एक जागा दिली जाते. या जागेमध्ये ही मंडळी आपापल्या पारंपरिक पद्धतीने घरांची बांधणी करतात. तिथे काही कुटुंबे त्यांच्या पूर्ण पारंपरिक वेशभूषेसह घरातील सर्व पारंपरिक वस्तूंसह फेस्टिव्हलच्या काळात पाहावयास मिळतात. त्यांच्याशी संवाद साधता येतो. त्यामुळेच आपणास केवळ काही एकरांच्या जागेत संपूर्ण नागालॅण्डचा अनुभव घेता येतो. नागालॅण्डची भौगोलिक रचना पाहता या सर्व भागांना आपण वेगवेगळी भेट दय़ायचे ठरवले तर किमान एक महिना लागतो.

या फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी १ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये केले जाते. १ डिसेंबर हा नागालॅण्ड या राज्याचा स्थापना दिवस. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून हे आयोजन केले जाते. १ डिसेंबरला राज्याचे मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, इतर निमंत्रित पाहुणे आणि पर्यटकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात येते आणि सुरू होतो आठवडय़ाभरासाठी जल्लोष. प्रत्येक जमातीच्या घरासमोर मोकळी जागा असते त्या जागेमध्ये ही मंडळी आपापली पारंपरिक नृत्ये साजरी करीत असतात. काही बायका-मुले बांधलेल्या घरांमध्ये काम करीत असतात. थोडा वेळ विश्रांती घेऊन हे असेच दिवसभर सुरू असते. सर्व घर जवळजवळ असल्यामुळे एका घरातून दुसऱ्या घरात शिरताना जणू काही एका संस्कृतीमध्ये आपण जात आहोत असे वाटते.

प्रत्येक जण आपापली वाद्य्ो जोरजोरात वाजवत असतो. याची सर्वच नृत्ये समूह नृत्ये असतात. नाचताना एक विशिष्ट हेल काढून आवाज काढला जातो. त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा उत्साह आणि जोश असतो. हे सर्व लोक योद्धे या श्रेणीत मोडत, त्यामुळे शिकारी हा त्यांचा शौर्याचा एक भाग असायचा. त्यामुळेच यांनी शिकारीत मारलेल्या प्राण्यांच्या हाडापासून, चामडय़ापासून बनविलेल्या अनेक वस्तू आपणास पाहायला मिळतात.

आलेल्या सर्व पर्यटकांना फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाच्याच घरासमोरील नृत्याखेरीज इतर नृत्याचा एकत्र आनंद घेता यावा म्हणून याच भागात असलेल्या एका मोकळय़ा मदानात सर्व जमातींच्या एकत्रित नृत्याचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर या जमातीच्या मनोरंजनासाठी थायलंड, म्यानमार अशा देशांमधून आलेल्या कलाकारांचे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. याच भागात पर्यटकांसाठी नागालॅण्ड राज्याची प्रातिनिधिक कलात्मक वस्तूंची बाजारपेठ असते. वेगवेगळय़ा प्रकारचे खादय़पदार्थाचे स्टॉल असतात. एकंदरच वातावरण उत्सवमय असते.

पर्यटकांसाठी पहिलाच दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी जवळपास सर्व गोष्टी आपल्याला जवळून पाहता येतात. त्यांचा पर्यटक आयुष्यभरासाठीचा अनुभव पाठीशी बांधून ठेवू शकतो. त्यानंतरच्या पाच दिवसांमध्ये सकाळी दहा ते बारा आणि दुपारी दोन ते चार या वेळांमध्ये पहिल्या दिवशी उपस्थित राहू न शकलेल्या लोकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते.
नागालॅण्ड हे राज्य पर्यटनास प्रतिकूल आहे, अशा प्रकारचा समज रूढ झालेला होता. त्यामुळे या भागात पर्यटन अतिशय तुरळक होते. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने या भागात पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. सर्वात महत्त्वाचे, पर्यटकांच्या सुरक्षेविषयी सांगावेसे वाटते की, हा भाग अतिशय सुरक्षित आहे. या राज्यातील प्रत्येक गावाबाहेरच्या वेशीवर एक मोठे प्रवेशद्वार असते आणि त्यावर 'आम्ही आपले स्वागत करीत आहोत,' असा मजकूर गावाच्या नावासह लिहिलेला असतो. माझ्या आजवरच्या पर्यटनात कुठल्याही राज्यामध्ये अशा प्रकारचे स्वागत कोणीही केलेले दिसले नाही. एकंदरच पहाडी लोकांप्रमाणेच हे नागा लोक खूप प्रेमळ आणि दिलदार आहेत. त्यामुळे या भागात पर्यटनासाठी लोकांनी जरूर जावे आणि त्याच्या आदरातिथ्यांचा लाभ घ्यावा.

पर्यटनाच्या माध्यमातूनच आपण आपल्या देशातील निसर्ग, सौंदर्य संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वास्तू अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी पाहू शकतो. 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'सारख्या उत्सवामुळे तर एकाच ठिकाणी आपणास संपूर्ण राज्याची ओळख होऊ शकते आणि नागालॅण्डसारख्या हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या या राज्याची एक वेगळी आठवण मनावर कायमची कोरली जाते.

नागालॅण्डचे नवनियुक्त राज्यपाल ना. पद्मनाभ आचार्य यांची अलिकडेच मुंबईत भेट घेतली तेव्हा त्यांनी हॉर्नबिल फेस्टिव्हलच्या माध्यमातून ते राज्य देशातील पर्यटकांना आकर्षित करू इच्छित आहे असं सांगितलं. तिथल्या जन-जातींच्या भाषेतले काही शब्द जरी आपण अवगत केले आणि त्यांच्याशी वार्तालाप केला तरी तिथलं समाजमन आपल्याशी जोडलं जाईल. या वर्षी १ ते १४ डिसेंबर २०१४  या कालावधीत साजर्‍या होणार्‍या हॉर्नबिल फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संखेने कोहीमा इथे यावं असा मनोदय राज्यपाल महोदयानी व्यक्त केला.

हॉर्नबिल फेस्टिव्हल आणि पूर्वांचलातील इतर उत्तमोत्तम स्थळांच्या सहलीवर जाण्याकरीता आत्माराम परब: 9892182655 वर संपर्क साधावा.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates