07 August, 2013

उत्तराखंडचा धडा – भाग एक : काय घडलं



आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून परिसर या सदरात दि. १, ३ आणि ३ ऑगष्ट २०१३  उत्तराखंडावरच्या आपत्ती संदर्भात माझं लेखन असलेला कार्यक्रम प्रसारीत झाला त्यातला हा पहिला भाग:


आपल्या भारत देशातलं उत्तराखंड हे राज्य हिमालयाच्या अंगाखांद्यावरचं आणि म्हणूनच निसर्गसंपदेचं वरदान असलेलं आहे. गंगा, भागिरथी, अलकनंदा, मंदाकिनी अशा अनेक नद्या इथेच उगम पावतात आणि पुढे काठावरच्या प्रत्येक गावाला, शहराला भरभरून देतच जातात. या नद्यांच्या पाण्याने आणि त्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे या नद्यांच्या खोर्‍यातला हजारो वर्ग किलोमीटरचा प्रदेश सुजलाम सुफलाम झाला आहे.  या भौतिक संपत्ती बरोबरच आध्यात्मिक आनंदासाठीही जगभरातील लोक तिथेच धाव घेतात. उत्तराखंडचं गुढ गंभिर वातावरण, शुभ्र बर्फाच्छादीत शिखरं, प्रसन्न मोकळी आल्हादायक हवा, हिरवागार परिसर आणि खळाळत्या नद्या या सर्वांमुळे हा भाग तिथे गेलेल्या प्रत्येकालाच भुरळ घालतो. अनेक तपस्वी आणि ऋषीमुनींनी इथे साधना केली आणि तो यज्ञ पुढे तसाच चालू रहावा या उद्देशाने मंदिरांची, धर्म स्थळांची स्थापना केली. या प्रदेशाला देवभुमी म्हणून ओळखलं जातं ते त्याचमुळे. अशा या निसर्गरम्य प्रदेशावर आकाशातून एकच वार झाला आणि काही काळातच होत्याचं नव्हतं झालं. सगळीकडे हाहाकार माजला. या एकाच धक्क्याने आधुनिक संपर्क यंत्रणा हा डाव्या हातचा खेळ समजणार्‍या माणसाला हतबुद्ध करून टाकलं. वाहतूकीचे रस्ते त्यावरच्या लाखमोलाच्या गाड्यासह अदृश्य झाले. नद्यांनी रौद्र रुप धारण केलं आणि दोन्ही हात फैलावत काठावरची गावं, घरं, इमारती, धर्मशाळा, हॉटेलं आपल्या कवेत घेतलं. बरं हे करताना जरा म्हणून उसंत दिली नाही. झर्‍याचा ओहळ, ओहळाची नदी, नदीची महानदी आणि महानदीचा महासागर होवून गेला. हे सारं निमिषात घडलं. राजाने मारलं आणि पावसाने झोडलं तर तक्रार तरी कुणाकडे करायची? नैसर्गिक आपत्तीने उत्तराखंडवर घाला घातला असा आक्रोश सुरू झाला.

पण, ही आपत्ती नैसर्गिक होती की मानव निर्मित? जगातली सर्वात तरूण आणि पृथ्वीच्या उत्पती नंतर सर्वात शेवटी तयार झालेला ठिसूळ प्रदेश म्हणजे हिमालय. जोराच्या वार्‍यानेही या जमीनीची सतत धुप होत असते. तिव्र डोंगर उतारावरून वाहत येणारे प्रवाह तर ही माती घेवून पठारी प्रदेशाकडे सतत धाव घेत असतात. याला अडवायचं कुणी? निसर्गानेच याचं उत्तर शोधलं आणि वनराई आणि वृक्षांच्या मदतीने ही धुप थांबवली. जमीन थोडी स्थिर झाली. या झाड झाडोर्‍याच्या मदतीने तिथल्या कष्टाळू भुमीपुत्रांनी आपलं जीवन सुखकर नसलं तरी सुसह्य बनवलं. तिथली जनाता  निसर्गाच्या कलाने घेत आपलं जीवन जगत होती. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या चारधामांच्या मंगलमय आसमंतात भक्तीचा ओलावा होता. पण हळूहळू त्याचं बाजारीकरण झालं. पुण्य कमावण्यासाठी तिथे रिघ लागली. त्या गर्दीच्या गरजांची पुर्तता करण्याच्या निमित्ताने व्यापारी वृत्तीची माणसं त्या ठिकाणी गोळा होवू लागली. पार गोमुख पासून गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सगळ्याच नदी काठावर, तसंच पात्रात बांधकामं उभी राहिली. यात्रा आणि पर्यटन या मधली रेषा पुसट झाली. भक्ती बरोबरच भौतिक सुखाची पुर्तता करण्यासाठी जे पाहिजे ते आणि जे खपेल त्याची दुकानं उभी राहिली. पैशाने देव विकत घेतला जावू लागला आणि सगळ्याच प्रकारचा बाजार इथे मांडला गेला. भक्तीभाव हरवला आणि कर्मकांडाला अतोनात महत्व आलं.


एकीकडे हे होत असताना विकासाची गंगा सर्वांच्या दारी पोहोचली पाहिजे या नावाखाली मोठमोठी धरणं आणि विज प्रकल्प याच ठिसूळ प्रदेशात उभारले जावू लागले. अतोनात जंगलतोड करण्यात आली. पर्यावरण तज्ज्ञ आणि संस्थांच्या इशार्‍याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत सतांध राजकारणी आणि कंत्राटदारांच्या हिताच्या या योजना उत्तराखंडच्या बोकांडी बसत गेल्या. या प्रकल्पांतर्गत फार मोठ्या प्रमाणात खोदकाम झालं, त्यातून बाहेर आलेली दगड-माती नदी पात्रात बिनदीक्कत फेकण्यात आली. काठावरच्या इमारती आणि पात्रातला ढिग यामुळे नद्यांचा श्वास कोंडला गेला, प्रवाह अडवला गेला. एवढं झाल्यावरही पाण्याने आपला धर्म सोडला नाही, ते वाट फुटेल तिकडे सखल भागात जात राहिलं. आणि १७ जून २०१३ हा दिवस उजाडला. प्रलयंकारी पावसाने एकाच झटक्यात होत्याचं नव्हतं केलं. सगळी अतिक्रमणं क्षणार्धात हटवली. सावरायला म्हणून वेळ मिळाला नाही. राहत्या निवार्‍यासहीत माणसं वाहून गेली. बाजार आणि बाजारू सगळंच गांगार्पण झालं.                         

1 comment:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates