15 July, 2013

तो घर पहातोय बांधून




त्याने घर बांधायचं ठरवलं. मुंबईत नाही हो... (तशी त्याने मुंबईत अनेक जणांची घरं करून दिली आहेत, आणि त्याने स्वत:ही अनेकांच्या मनात घर केलं आहे. असे अनेकजण अनेकदा आपलं घर सोडून भर रविवारी दुपारी सुद्धा त्याला भेटायला कुठे कुठे जात असतात आणि तो कुठे आहे याचा शोध घेत असतात.) तर त्याने घर बांधायचं ठरवलं, आपल्या गावी असलेलं आपलं जुन घर पाडून त्या जागी नवीन घर बांधायचं त्याने नक्की केलं. ते त्याने कधीच नक्की केलं होतं.  ते घर मनात बांधूनही तयार होतं. पण प्रत्यक्षात त्याने जुनं घर जानेवारीमघ्ये पाडायला घेतलं. घर बांधायला घेतात, याने पाडायला घेतलं, म्हणजे जुन घर पाडायचं कंत्राट दिलं. कंत्राटाची रक्कम ठरली तरी तो कंत्राटदार ते पाडेना, मेल्या घर पाडूचे पैसे कसले घेतं? आमी मुंबयत उभे रवलो ते तेच्या बापाशीमुळे भावाशीन कर्तव्याची जाणीव करून दिल्यार बाबलो घर पाडीना. तेका आता पैसे घेतल्या शिवाय घर पाडूचा नव्या कंत्राट करूचा होता. ता तेना केल्यान आणि एक दिवस घर पाडल्यान.

घर पाडल्या पासून तो जवळ जवळ दर आठवड्याला गावी जाऊ लागला. पहिल्यांदा पाडलेल्या आणि नंतर उभ्या राहणार्‍या घराचे फोटो आम्हाला दाखवायला लागला. म्हणता म्हणता घर उभं राहीलं. हळू हळू घराला घरपण आलं. ते पहायला गावकरी आले तसे मुंबईचे मित्रही जाऊ लागले. तो घर बांधतोय म्हणून या वर्षी पाऊसही लवकर आला. त्यानेही ते घर पाहीलं. पावसाला ते घर पाहून एवढा आनंद झाला की त्याचे आनंदाश्रू आल्यापासून वाहातच राहिले. ते घर न्हाऊन निघालं, बाजूला उभी केलेली खोप जमीन उमळल्यामुळे डोलू लागली. त्या डोलार्‍यात राहणं कठीण झालं. नव्या घरात शिरणं क्रमप्राप्त झालं.

नव्या घरात फक्त गणेश पुजन करून रहायचं त्याने ठरवलं पण गावचे लोक भट जेववतलो म्हणून आनंदीत झाले. भल्या पहाटे सात वाजता तो कणकवली स्टेशनवर ट्रेनमधून उतरला. स्टेशन आल्यावर (म्हणजे गाडी स्टेशनात आल्यावर) त्याला जाग आली. धावपळीत तो उतरला, अजून डोळ्यावरची झोप गेली नव्हती म्हणून भल्यापहाटे हो..... पहाट खरोखरच भली होती. गाडी निघून गेल्यावर स्टेशनवर सन्नाटा पसरला. एका बाकड्यावर सामान ठेवून तो लघूशंकेला गेला, नंतर घोटभर चहाच्या शोधात, मग आता गावात कसा पोहोचणार ही दीर्घशंका. हे सगळं घडत असताना सामान गप गुमान पडून होतं. तिकडून मालवणी पोलिस हातातली लेडीस (लेडीज नव्हे) छत्री हालवीत आला. ह्या सामान कोणाचा? बॉम्ब स्पोटाचा? असा त्याला प्रश्न पडला. छत्री लंबकासारखी हालायला लागली. पण आवर्तन समप्रमाणात नव्हती. प्रश्नांचा ग्राफ जसा वर खाली होई तसं लंबकाचं आंदोलन कमी जास्त होत होतं. समस्त मालवण्यांवरचं संकट आता आपणच निवारणार या बद्दल पोलिसाला शंका उरली नाही. हातात काठी ऎवजी लेडी....स छत्री असल्याने त्याने ती सामानाला लावली नाही. आता काय करावे बरे? असा दशावतारी छाप पश्न पोलिसाला पडला असतानाच तो आला. पोलिसाला न बघताच आपलं सामान उचलायला लागला, ह्या सामान तुमचा? या पोलिसाच्या प्रश्नाला अं... हो... एवढच उत्तर देऊन स्टेशनाच्या बाहेर निघाला. मालवणी पोलिसाला शौर्यपदकाने हुलकावणी दिल्याने तो हिरमुसला झाला. बॉम्ब स्पोटाची मक्तेदारी काय मुंबयचीच? मालवणचा अनुषेश कधी भरून काढणार? असा विधान सभेत विचारायचा प्रश्न त्याने दादाना विचारायचं ठरवलं.

मुंबईहून येऊन अर्धाअधिक तास होवून गेला होता. आता घराकडे निघायची त्याला घाई झाली होती. एवढ्यात गेले दोन दिवस गावात डीम लाईट आहे, जनरेटर घेवूनच ये, असा आईचा आदेश त्याला भ्रमणध्वनीवरून...... (मोबाईलवरून हो..) आला. जनरेटवाल्याच्या घरात लाईट फुल्ल होती. तो डाराडूर झोपला होता. याने फोनावर फोन केले पण तो दाद देईना. त्याच्या घरात बिडी जलायलेची रिंग टोन वाजत असल्याने तो त्याला झोपेतच दाद देत होता. स्वप्नातच त्याच्या हाताला निखारा लागल्याने तो उठला असावा.  याच्या कितव्यातरी फोनला त्याने ह..लो.. असा लो स्वर काढला आणि जनरेटरच होयो मा? घेवन जावा म्हणाला.

रिक्षा आणि छोटा हत्तीच्या मधल्या आकाराची रिक्षा ठरवून तो सामान उचलून उभा राहिला. ठरवलेली रिक्षा कटोकट येऊन उभी राहिली. सामानासकट तो रिक्षात बसला. पण रिक्षा हालायला तयार नाही, अंकूशा वायच स्टेरींगवर बस म्हणताच किडकिडीत अंकूश स्टेरिंगवर स्थानापन्न झाला, साईड ग्लासमध्ये आपला भांग तपासू लागला. मायxx बघतं खय? डी ओडून धर आणि चावी दबून धरअसं म्हणत मालक मागे इंजिनाकडे धावला. त्याने कायतरी खटपट केली पण इंजिन चालू होईना. तो पुन्हा स्टेरींगजवळ आला. ह्या काय तुझो बापूस? मेल्या डी पुर्ण ओढून धर मरे आणि चावी सोडू नको... पुन्हा खटपट झाली, आता इंजिन चालू झालं. न जमणार्‍या बेबल्याचं लग्न जमल्यावर बापाच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद त्याच्या चेहर्‍यावर उजळून गेला. वाटेत जनरेटर घेऊन रिक्षा गावकडे निघाली.

हेच्या फुडे रिक्षा जावची नाय म्हणत घरापासून फर्लांगभर अंतरावर उभी राहिली. जनरेटर, सामान उतरवलं. त्याने थेट नव्या घराची पाहणी केली, राजस्थानी कामगारांना सुचना दिल्या. त्याने बरोबर करता है म्हटलं ते याला बरोबर करतय असं ऎकू आलं. त्याने तेच म्हटलं होतं. तो राजस्थानी कारागीर तिकडे आठ वर्षापासून रहात होता. कणकवलीत किती आणि कशी घरं बांधली त्याचा फोटो अल्बम त्याच्याजवळ होता. आता गिर्‍हाईकाच्या घराजवळ उभी रहाणारी रिक्षा घ्यावी असा त्याच्या मनात विचार सुरू झाला होता.

सामानाची यादी करून कुडाळच्या दिशेने हा निघाला. तिकडे सामान घेऊन ते घरी नेण्यासाठी एका हसतमुख टेम्पोवाल्याचा टेम्पो ठरवला. भाडं ठरवलं, सामान चढवल्यावर टेम्पोमालकाचं डोक्याचं इंजिन बिघडलं. त्याची मान नाय, नाय अशी हालायला लागली. भाड्यात दिडशे रुपये कमी पडतत असं त्याचं म्हणणं होतं. (भाड्याचा हिशेब करताना त्याची चूक झाला असावी) वाद सुरू झाला. सामन उतरून ठेव. आणखी पाचशे रुपये जास्त देईन पण तुझा टेम्पो नको याचा मालवणी बाणा बोलला. तिथल्या कमगारांना सामान चढवण्यापेक्षा उतरून ठेवायचीच सवय असल्यासारखे ते सरसावले. मग कानात बाली घातलेला दुकानाचा मालक मध्ये पडला, फरकाचे दिडशे मै देता हू म्हणाला. तरी हे दोघे अडलेलेच. मग सुलह झाला. टेम्पो निघाला तसा टेम्पो घेण्याचा विचार बालीवाल्याने सुरू केला.   

आज भट जेववणार म्हणून गावकर्‍यांची वर्दळ घराजवळ सुरू झाली. आबा मात्र त्यात नव्हता. तेका बाबा जावन आमंत्रण दी, करवादलो हा, असा माझ्या कानार ईला  असं आई म्हणाली.

आबा खय गेले? आबाच्या उघड्या दाराला याचा प्रश्न.
sss, कोणss म्हणत बाई बाहेर आली.                        
आबा खय गेले?
बॅंकेत, पेंशनचा काय झाला ता बघूक गेलेहत.
नाय, आज गणेश पुजन आसा म्हणान बोलवक इल्लय
हो आज करतात? आमका ठावक नाय.
(आम्हाला सगळं माहित आहे हा. कधी बोलवता की बोलवतच नाही ते बघत होतो असे भाव डोळ्यात असलेली बाईआजी बोलली.)
चला बाकीचे न बोलवता येतील हेच एक आमंत्रण होतं असं म्हणत तो घरी आला.
चिर्‍यांच घर बांघलं, त्यात आनेकांचा हातभार लागला. त्यात भार घेणारे आणि हात लावणारे असे दोन्ही प्रकारचे लोक जमले होते. भटजी आले. पुजा झाली, जेवण तयार झालं. आबा संकासुराच्या आवेशात हजर झाला.
तुझीच एकाची कमी होती कोणतरी बोललं.
मी रिकामो नाय रे, बॅंकेत गेल्लय, आमका खय बोलवल्यानी? आबा उवाच.
भटजी जेऊन निघाले.
प्रसाद देत असताना आबा मात्र दिसत नव्हता. तेचो पयलो बाजूक काड, मगे कटकट नको आई त्याला म्हणाली.

यात ते राजस्थानी कामगार कुठेच नव्हते. आजचा वेळ वाया जाऊ नये म्हणून ते दुसर्‍या साईटवर गेले होते.          

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates