26 August, 2012

कायद्यावर घाला! जनात आणि वनातही.



देशात आणि राज्यात अखंड अवनतीचंच राज्य सूरू आहे. इथल्या संविधानावर, कायद्यावर, निसर्गावर राजरोसपणे हल्ला होतो आहे. राजकीय नेतृत्व हतबल आणि संभ्रमावस्तेत चाचपडताना दिसत आहे. गुंडापुंडांच्या हातात सत्ता गेल्यासारखं वाटत राहतं. महाराष्ट्रातील सव्यसाची आणि झोकून देऊन काम करणार्‍या मानमीय व्यक्तिंपैकी राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचा लेख कायद्याचे राज्य आहे कुठे? (११ ऑगस्टाची दंगल)  आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची  पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया (पश्चिम घाट परिसर अभ्यास अहवाल) मुलाखत आजच्या लोकसत्ता मध्ये आली आहे. शहरात आणि गावात चाललेली अंधाधुंदी या वर प्रकाश टाकणारे आणि विचारकरायला लावणारे हे लेख जरूर वाचच.


गाडय़ांना आगी लावत, पत्रकारांवर पाशवी हल्ले चढवत, पोलिसांना जीवघेणं बदडून काढत आणि त्यांच्या बंदुका, काडतुसे हिसकावून घेऊन गुंड पळून जात असताना आणि सर्वात कळस म्हणजे महिला पोलिसांचा भरदिवसा हे पशुतुल्य हल्लेखोर विनयभंग करत असताना पोलिसांनी काय करायचे? महात्माजींच्या सत्याग्रहीप्रमाणे हात जोडून त्यांनी गुंडांना विनंती करायची, की कायद्यानं दिलेला अधिकार वापरून हा हिंसाचार, विनयभंग थांबवायचा? पोलिसांचा हा अधिकार का काढून घेतला गेला? हा संयम, ही पळवाट, की कायदे बिनदिक्कत तोडणाऱ्यांना पोलीस नेतृत्वाने आणि राज्यकर्त्यांनी दिलेले हे उत्तेजन? या राज्यात कायद्याचे राज्य आहे तरी काय, असा हतबल करणारा प्रश्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात उभा राहतो.  पुढे वाचा>>>    

            
पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या समितीने सारे वास्तव अहवालात मांडून  सूचना केल्या. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचा त्यात सहभाग होता. पण ते बदलून जाताच मंत्रालयाने अचानक ठरविले, आमचा अहवाल दडपून ठेवायचा. नव्या मंत्री जयंती नटराजन यांना विनंती केली, की मी तुम्हाला भेटू इच्छितो, म्हणजे या अहवालात काय आहे ते सांगता येईल, नंतर तुम्ही काय तो निर्णय घ्या. मात्र, त्यांनी भेट नाकारली.
मग लोकांनी माहिती अधिकाराखाली तो अहवाल मागितला व माहिती आयुक्तांनी आणि नंतर उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढून तो जाहीर करायला लावला..
पर्यावरण तज्ज्ञ आणि पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ.माधव गाडगीळ यांनी लोकसत्ताच्या आयडिया एक्स्चेंजकार्यक्रमात साधलेला मुक्त संवाद. पुढे वाचा>>>  


05 August, 2012

रौप्यमहोत्सवी ‘चौरंग’




अशोक हांडे हे नाव उच्चारताच जबरदस्त मनोरंजन, सादरीकरणातली श्रीमंती, उत्तम नियोजन, कसलेले कलाकार, अभ्यासातून आलेली परिपूर्णता, उत्सव आणि उत्साह अशा अनेक गोष्टींची दंगल मनात उसळते. हा हा म्हणता चौरंगला पंचवीस वर्ष पूर्ण झाली. मंगलगाणी दंगलगाणी पासून सुरू झालेल्या या संगीतमय प्रवासाचा प्रत्येक टप्पा आणि कार्यक्रम मी जवळून पाहिलाय. उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती आणि प्रयोगातील सातत्य हे तर आहेच पण एक मराठी शो मॅन हे सगळं करतो आहे हे पाहून प्रत्येक नव्या कार्यक्रमाच्यावेळी उर भरून यायचा, अभिमान वाटायचा. मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, आजादी ५०, माणिकमोती, गाने सुहाने, गंगा जमुना, अमृत लता, मधुरबाला, आपली आवड आणि अर्थातच मराठी बाणा, हे सगळे कार्यक्रम पाहाणे म्हणजे केवळ आत्मानंद होता. कार्यक्रमातून भारावून जाणारा रसिक अशोक हांडे हे नाव आपल्या हृदयावर कोरणारच अशी त्या प्रयोगांची छाप असायची, अजूनही तो सिलसिला चालू आहे. अशोक हांडेंच्या  चौरंग या संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आशोक हांडे आणि चौरंगच्या संपूर्ण टिमला मझ्या मना पासून शुभेच्छा!


अशोक हांडेंनी हे मनोरंजन विश्व कसं उभं केलं याची एक झलक आजच्या लोकसत्ताच्या रविवार वृत्तांत मध्ये त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून वाचता आली  ती पूढे देत आहे.

चौरंगावर डाव मांडला!
रोहन टिल्लू, रविवार, ५ ऑगस्ट २०१२

मंगलगाणी दंगलगाणी’, ‘अमृतलता’, ‘मधुरबाला’, ‘मराठी बाणायांसारखे अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करणाऱ्या चौरंगया संस्थेला ७ ऑगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास अभिमानास्पद तर होताच, पण त्याचबरोबर आव्हानात्मकही होता. या आव्हानांबद्दल आणि चौरंगच्या वाटचालीबद्दल चौरंगचे सर्वेसर्वा अशोक हांडे यांच्याशी केलेली ही बातचित..

गेल्या २५ वर्षांत तुम्ही अनेक दर्जेदार कार्यक्रम दिलेत. पण या सर्व कार्यक्रमांसाठीचं सांगीतिक बाळकडू नेमकं कुठे मिळालं?

हे बाळकडू आम्हाला पाजण्यात अनेक गोष्टींचा आणि गावांचा हात आहे. माझ्या बालपणाचा सुरुवातीचा काळ हा खेडेगावात वगैरे गेला. उंब्रज तालुक्यात आमचं गाव होतं. त्यामुळे ग्रामीण जीवन, बारा बलुते वगैरे आम्ही खूप जवळून पाहिलं होतं. या ग्रामीण जीवनात संगीताला, त्यातही लोकसंगीताला खूप वरचं स्थान आहे. लग्नापासून धार्मिक उत्सवांपर्यंत सगळीकडे लोकसंगीत अगदी ठासून भरलं आहे. त्यात तमाशाची पंढरी मानलं जाणारं नारायणगाव हे आम्हाला खूप जवळ. त्यामुळे तमाशाचा नादही (चांगल्या अर्थाने) लहानपणापासूनच लागला. शेतावर राखणीला मामाबरोबर जायचो. आम्हाला तमाशाचं वेड लागलं, त्याला कारण आमचा हा मामा! आम्ही राखणीला म्हणून जायचो आणि पाच किलोमीटर लांब धावत जाऊन तमाशा बघून यायचो. तर तात्पर्य हे की, लोकसंगीताचे संस्कार आमच्यावर लहानपणापासूनच झाले.


मग मुंबईचा प्रभाव तुमच्यावर नेमका किती आणि कसा पडला?

मुंबईचा म्हणण्यापेक्षाही रंगारी बदक चाळीचा प्रभाव माझ्यावर जास्त पडला. ही चाळ म्हणजे मुंबईतला महाराष्ट्र होता. महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातून लोक त्या चाळीत राहायला आले होते. ते आले ते त्यांची संस्कृती, लोकसंगीत वगैरेंची परंपरा घेऊनच आले. त्यामुळे रंगारी बदक चाळीत प्रत्येक सण साजरा करण्याची वेगवेगळी तऱ्हा होती. त्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाऊडस्पीकरवरून चालणारी गाणी. जुनी गाणी सतत वाजायची आणि आमच्या कानी पडायची. त्यामुळे त्या गाण्यांचे शब्दच नाही, तर दोन कडव्यांमधलं संगीतही अगदी मनात कोरलं गेलंय. याचा फायदा मला आवाज की दुनिया’, ‘अमृतलता’, ‘मधुरबालावगैरे कार्यक्रम करताना झाला.


हे संस्कार तुमच्या बरोबरच्या प्रत्येकावरच झाले असतील. पण मग अशोक हांडे, चौरंग आणि एकापेक्षा एक यश संपादन करणारे अनेक कार्यक्रम हा सिलसिला कसा सुरू झाला?

अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण या संस्कारांबरोबरच चिकित्सक शाळेत मी नाटकंही करायचो. रुपारेल कॉलेजमधून एकांकिका केल्या होत्या. कॉलेजच्या एनएसएस युनिटचा प्रमुख म्हणूनही मी जबाबदारी सांभाळली होती. त्या वेळी इंटरला असताना मंगल वाचनात दुर्गाबाई भागवतांचा महाराष्ट्राची दगडी शीरनावाचा धडा होता. त्याचबरोबर शि. म. परांजपे यांचा खरं सोनंहा धडाही होता. या दोन धडय़ांवरून मला पसायदान ते कसाईदानची कल्पना सुचली. त्यावेळी पु. लं.चा तीन पैशांचा तमाशाजोरात चालू होता आणि त्यात हे कसाईदान होतं. त्यातून मी ते उचललं आणि १९७७मध्ये रुपारेल कॉलेजच्या एनएसएस युनिटसाठी हा कार्यक्रम पहिल्यांदा सादर केला. तो सगळ्यांना खूपच आवडला. मग त्याच वर्षी कॉलेज डेलाही तो केला. मी १९८०मध्ये मुलुंडला राहायला आलो. तिथे आम्ही संस्था मुलुंडया संस्थेतर्फे तो मुलुंडमध्ये केला. मग विरंगुळा म्हणून गणपतीत वगैरे तो होतच राहिला. पुढे ३० एप्रिल १९८७मध्ये नाटय़दर्पण रजनीया कार्यक्रमात पसायदान ते कसाईदानआम्ही सादर केला. त्या वेळी एका वर्तमानपत्रात असं छापून आलं होतं की, यंदाच्या नाटय़दर्पण रजनीचं एकमेव फलित म्हणजे अशोक हांडे आणि त्याचा पसायदान ते कसाईदानहा कार्यक्रम. तर त्यानंतर आम्ही हा कार्यक्रम व्यावसायिक मंचावर आणण्याचं ठरवलं. त्यासाठी ७ ऑगस्ट १९८७ रोजी चौरंगनावाची संस्था स्थापन केली आणि पसायदान ते कसाईदानचा मंगलगाणी दंगलगाणीझाला.


आझादी ५०करताना भारताच्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे, हीच कल्पना डोक्यात होती का?

तसंच काही नाही. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने एखादा कार्यक्रम केला जावा, अशी इच्छा कोलकातामधील एका संस्थेने व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम हाती घेतला. पण या कार्यक्रमाची बीजं खूप लहानपणीच मनात रोवली गेली होती. मी चौथीत असताना आम्हाला शिंदे नावाचे सर शिकवायला होते. ते नेहमी एक कविता म्हणून दाखवायचे. 
गजनी, घोरी, गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोदी
सुलतान वेशी राज्य मिळविले, दिल्लीची गादी
ही कविता मनात घर करून बसली होती. आझादी ५०करताना या कवितेची खूपच मदत झाली. 


हात घालेल त्या कार्यक्रमात चौरंगने तुफान यश मिळवलं. पण त्यामागे अशोक हांडे नावाच्या कलाकारासह त्यात दडलेला व्यावसायिक आणि व्यवस्थापकही होता. हा व्यवस्थापक कसा घडला?

याला सर्वात मुख्य कारण म्हणजे आमचा परंपरागत आंब्यांचा धंदा. या आंब्यांनी मला व्यवसायाचा रस पाजला. लहानपणापासून वडिलांबरोबर आम्ही या धंद्यात भाग घेतला होता. त्यांनीच आम्हाला धंदा कसा करावा, याचं प्राथमिक शिक्षण दिलं. मग पुढे आम्हीही अनुभवातून शिकत गेलो. तर माझ्यातला व्यावसायिक हा कदाचित त्या जीन्स्मधून घडला असावा. पण व्यवस्थापक मात्र मी स्वत: घडवला. कॉलेजमध्ये असताना माझ्या प्रत्येक एकांकिकेचं प्रॉडक्शन कंट्रोल नेहमी मीच केलं आहे. मुलुंडमधील आमच्या संस्थेचं व्यवस्थापनही मीच केलं होतं. सुरुवातीला मंगलगाणी दंगलगाणीफार चालला नाही. पण आम्ही लंडनचा दौरा करून आल्यावर इथेही तो कार्यक्रम धो धो चालायला लागला. आमचे पहिले तीनशे-चारशे प्रयोग रिकामेच गेले होते. पण माझ्यातल्या व्यवस्थापकाने आणि व्यावसायिकाने हार मानली नाही. तसंच या आंब्याच्या धंद्यामुळे मी खूप फिरलो. त्याचाही फायदा मला दौरे आखताना झाला.


तुमच्या प्रत्येक कार्यक्रमापाठी एक तरी कथा आहे. त्याबाबत काही सांगाल का?

उगाच करायचा म्हणून मी कधीच कार्यक्रम केला नाही. त्या कार्यक्रमाला काही तरी हेतू हवा. तो नसेल, तर मग त्याला काही अर्थच राहत नाही. लताजींचा अमृतमहोत्सव झाला, तेव्हा एका वाहिनीवर त्यांच्या गाण्यांचा रिमिक्स कार्यक्रम सादर झाला होता. मला तो प्रचंड खटकला आणि त्याबाबत संतापही आला. एका महान गायिकेचा अमृत महोत्सव अशा प्रकारे साजरा व्हावा, याची खंत बोचत होती. त्यातूनच अमृतलतासमोर आला. माणिक वर्मा या शास्त्रीय आणि भावगीत हे दोन्ही प्रकार गाणाऱ्या माझ्या मते एकमेव गायिका. त्यांच्या मृत्यूनंतर भारती आचरेकर यांनी माझ्याकडे माणिक वर्मावर एखादा कार्यक्रम करावा, अशी विनंती केली होती. त्यातून माणिकमोतीतयार झाला. तीच कहाणी गंगा-यमुनाया कार्यक्रमाची. आपल्याकडे रुपेरी पडद्याला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्नयाच नजरेने मधुबालाकडे बघितलं जातं. पण त्या सौंदर्यवतीला आयुष्यात खूप सोसावं लागलं. ते सर्व मी मधुरबालाच्या रूपात मांडलं. यशवंतया कार्यक्रमात तर यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याची संधी मिळाली.


पण तुमचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे मराठी बाणा’. तर हा बाणानेमका कसा तयार झाला?

आम्ही नवीन शतकाच्या स्वागतासाठी सांगलीत स्वागत-२०००हा कार्यक्रम केला होता. त्यात गेल्या शतकात सांगलीचं नाव मोठं करणाऱ्या सांगलीच्या सुपुत्रांचा आढावा घेतला होता. त्या वेळी सांस्कृतिक आणि सांगीतिक क्षेत्रात भलंमोठं योगदान देणारे अनेक कलाकार आणि त्यांची कला समोर आली. त्या निमित्ताने इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. हा कार्यक्रम नंतर २२ ऑक्टोबरला गगनगिरी महाराजांच्या आश्रमात झाला होता. त्या वेळी तर लोक अक्षरश: बेभान झाले आणि त्याच वेळी आम्ही हा कार्यक्रम एका नव्या नावाने व्यावसायिक स्वरूपात आणायचं ठरवलं. नाव ठरलं, ‘मराठी बाणा’. विचार करा, २२ ऑक्टोबरला आम्ही हा कार्यक्रम करायचं ठरवलं आणि त्याचा पहिला प्रयोग अक्षरश: दहा दिवसांत मी दीनानाथ नाटय़मंदिरात १ नोव्हेंबर रोजी केला.


या यशात कलाकारांचा आणि चौरंगशी संबंधित सर्वाचाच वाटा असेल ना? मग हे कलाकार नेमके कसे निवडलेत आणि सांभाळलेत?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या चौरंगमध्ये पंक्तिभेद अजिबात नाही. सांगायचा मुद्दा म्हणजे, सर्वाना सारखी वागणूक मिळते. दौऱ्याच्या वेळी मी जे खातो तेच माझे कलाकारही खातात. तसंच आमच्याकडे चार बसेस आणि चार टेम्पो आहेत. सगळे कलाकार व्यवस्थित झोपून जातात आणि कपडेपट, सेट वगैरेही अगदी व्यवस्थित पोहोचतात. चौरंगसाठी काम करणं, म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्रम आणि कमीत कमी त्रास, हे कलाकारांना माहीत झालं आहे. त्यामुळे कलाकार आमच्याकडे अगदी आवर्जून काम करत असतात.


पंचवीस वर्षांची यशस्वी वाटचाल आणि एकापेक्षा एक दणकेबाज कार्यक्रम यानंतर आता चौरंगकाय घेऊन येणार आहे?

सुनील गावस्कर नेहमी सेन्चुरी केली की नव्याने गार्ड घ्यायचा. त्याचप्रमाणे आम्हीही आता पुन्हा एकदा गार्ड घेणार आहोत. आमचे सध्याचे कार्यक्रमच एवढे तुफान चालू आहेत की, सध्या तरी नवीन असं काहीच करत नाही. पण लवकरच आम्ही प्रेक्षकांसाठी नवीन कल्पनेवर आधारित कार्यक्रम नक्कीच घेऊन येऊ.  



04 August, 2012

जाता बुद्धाच्या देशा –भूतान भाग : 2


भारत-भूतान प्रवेशद्वार

सकाळचे सात वाजले तरी अजून चहा मिळाला नाही म्हणून मंडळींची चुळबूळ सुरू होती. भूतान मधील फुन्तशोलींग मधल्या हॉटेल मध्ये आम्ही होतो तरीपण भारतातल्या जयगावमधलेच कामगार तिथल्या हॉटेलमध्ये कामाला होते आणि साडेसात वाजल्याशिवाय त्यांना भूतान मध्ये प्रवेश मिळणार नव्हता. ते कामगार आल्यावरच चहा बनणार होता. आपल्याला कितीही घाई असली तरी त्या त्या ठिकाणचे व्यवहार तिथल्या पद्धती प्रमाणेच चालतात. चिंता मत करो साबजी, सब हो जायेगा अशी आश्वासनं गंभिरपणे घ्यायची नसतात. एरवी अंथरूणात लोळतपडणारे आपण अशा ठिकाणी गेलो की, विशेषत: हिमालयात गेल्यावर लवकर उठतो, तिथल्या हवामानामुळेच आपल्याला ताजतवानं वाटून लवकर जाग येते. थंड हवामान आणि उठल्या उठल्या लागणारा चहा या सवयीमुळे चहाला लागणारा उशीर नकोसा होतो.

स्वच्छ, सुंदर  भूतान
चहा मिळाला, नाश्ता तयार होईपर्यंत बाहेर फेरफटका मारून यावं म्हणून हॉटेलच्या बाहेर आलो. काल काळोखात निट न पाहिलेला भूतान-भारत सिमेवरचा भाग बघावा म्हणून तिकडे वळलो. भूतान मधले रस्ते झाडून स्वच्छ केल्यासारखे होते तर पलिकडचे जयगावचे रस्ते कचर्‍याने भरून गेले होते. काही पावलांच्या अंतरात हा जमीनास्मानाचा फरक होता. हा वृत्तीतला आणि वागणूकीतला फरक आहे. भूतान मधले लोक आपला परीसर स्वच्छ ठेवू शकतात तर आपण भारतिय का नाही? आपण भारतातले आहोत आणि घाण करणारे हेच ते लोक अशा नजरेने आपल्याकडे सगळे भुतानी पहात आहेत असा माला भास होवू लागला. सार्वजनिक स्वच्छतेबद्दल भूतानची जनता जागरूक आहेच.

फुन्तशोलींगचं विहंगम दृश्य
नाश्ता आटोपून निघण्याच्या तयारीने बाहेर पडलो. आज आमची गाडी सलीम चालवत होता. हा सलीम म्हणजे माहितीचा खजिनाच होता. (सलिम बद्दल वेगळं पोस्ट लिहायचा माझा विचार आहे.) शंभर सव्वाशे मिटर अंतर गेल्यावर फुन्तशोलींग शहर संपले आणि चढाव सुरू झाला. गाडी एक डोंगर चढत होती, असे सात डोंगर पार करून आम्ही १८० कि.मी. वरच्या थिंपू या भूतानच्या राजधानीच्या शहरात पोहोचणार होतो. उंचावरून फुन्तशोलींगचं विहंगम दृश्य दिसत होतं. एका वळणावर इंजिनीअरींग कॉलेज दिसलं, हे भूतान मधलं एकमेव इअंजिनीअरींग  कॉलेज, सलीमने माहिती पुरवली. संपूर्ण भूतान हिमालयात वसलेलं असूनही इथले रस्ते दृष्ट लागावेत एवढे उत्तम आहेत. हे भूतानचे रस्ते आपल्या लष्कराच्याच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या Dantak  या कंपनीने बनवलेले आहेत. भूतान मध्ये १९६० पर्यंत मोटरवाहतूकीचे रस्तेच नव्हते. त्यानंतर भारताशी झालेल्या करारानुसार तिथे रस्ते बांधले गेले. भूतानची संरक्षण व्यवस्थाही भारतच पाहतो. त्यामुळे तिथे आपलं भारतिय सैन्य खडा पाहा देत होतं.  

शिस्तबद्ध वाहतूक
वाटेत भारतिय लष्कराच्याच एका कॅंटीनमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. पुणे सातार्‍यकडचे काही सैनिक आम्हाला तिथे भेटले, पण मालवणी बोलणारा कणकवली जवळचा एक सैनिक भेटला तेव्हा तर आम्हाला खुप आनंद झाला. प्रसन्न करणारा गारवा आणि सृष्टी सौदर्याची मजा घेत आमचा प्रवास सुरू होता. वाटेत कुठेतरी रस्त्याचं काम सुरू होतं म्हणून गाड्या थांबल्या. पाय मोकळे करायला आम्ही गाडी बाहेर पडलो. थोड्याच वेळात वाहनांची रांग लागली. रस्त्यात एका मागोमाग एक थोडं अंतर ठेवून थांबलेल्या गाड्या पाहून त्यांच्या शिस्तीचं कौतूक वाटलं. पुढे जायची गडबड नाही की कर्कश हॉर्न वाजवणं नाही. साधारण तासाभराने वाहतूक पुन्हा सुरू झाली. दिवस मावळतीला चालला असतानाच आम्ही थिंपू शहरात प्रवेश करते झालो. ताबा इथे असलेलं वागचुक रिसॉर्ट येईपर्यंत दिवस काळोखात बुडाला. शहरापासून दूर टेकडीवर असलेल्या रिसॉर्टमध्ये पोहोचलो तेव्हा कडाक्याच्या थंडीने गारठायला होत होतं.

वांगचूक रिसॉर्ट
वांगचूक रिसॉर्ट हे थिंपू मधलं फोर स्टार हॉटेल आहे. गेल्या गेल्या गरमागरम चहाने आमचं स्वागत झालं. हॉटेलच्या मुलींनी आमच्या सामानाचा ताबा घेतला. मॅनेजरपासून कुकपर्यंत सगळ्या मुलीच कामं करताना दिसत होत्या. अप्रतिम रुम्स आणि आतलं वातावरण पाहून प्रवासाचा शिण कुठल्याकुठे निघून गेला. गरम पाण्याने आंघोळी झाल्यावर प्रशस्थ अशा डायनींग हॉलमध्ये मंडळी जमली पण बुखार्‍याजवळ गर्दी करून उभं राहण्यातच जास्त मजा येत होती. थंडीचा कडाका अजूनच वाढला होता.  

   

02 August, 2012

जाता बुद्धाच्या देशा – भूतान भाग : १



बागडोगरा विमातळ

पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक जीएनएच’ (Gross National Happiness) किती आहे हे पाहिलं जातं तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान. थिंपू या देशाच्या राजधानीच्या शहरातही सिग्नल यंत्रणा नसलेला पण वाहतूकीचे नियम अभावानेच मोडणार्‍या लोकांचा देश म्हणजे भूतान. इतर सारं जग उत्पन्न कसं वाढेल याच्या चिंतेत असताना पर्यटकांची गर्दी नाकारणार्‍या पर्यायाने पर्यटन उद्योगामुळे मिळणार्‍या मिळकतीवर पाणी सोडणारा देश म्हणजे भूतान. सगळा देशच जागतीक वारसा आहे असं मानून मनापासून तसं वागणार्‍यांचा देश म्हणजे भूतान. अखिल जगतात लोकशाहीचे वारे वाहात असताना राजेशाही पाहिजे म्हणून निदर्शन करणार्‍या मणसांचा देश म्हणजे भूतान. सार्वजनिक ठिकाणीही कमालिची  स्वच्छता असलेला आरोग्यदायी देश म्हणजे भूतान. टपरी किंवा झोपडपट्टी शोधूनही सापडणार नाही असा देश म्हणजे भूतान. हॉटेल पासून दुकानापर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान. हिमालयात वसलेला आपला सुंदर शेजारी देश म्हणजे भूतान. भूतान विषयी आजपर्यंत माहित असलेल्या ही वैशीष्ट्ये आता पडताळून पहायची होती. भूतानला जायच्या आधीच मन तिथे वास्तव्याला गेलं होतं. विमानाने जायचं असलं तरी तिथे थेट अवतिर्ण होता आलं असतं तर किती बरं झालं असतं!


बागडोगरा विमातळावर विमान उतरत होतं, खाली हिरवागार प्रदेश दृष्टीस पडत होता. चहाच्या बागा असाव्यात,पण तो गर्द हिरवेपणा पाहाता पाहाता विमानाने धावपट्टीवर हलकेच चाकं टेकवली. वर जाताना आकाशात भरारी घेण वैगेरे आपण म्हणतो पण जमिनीला पाय लागणं किंवा पाय जमिनीवर असणं किती महत्वाचं असतं ते आकाशात उंच गेल्याशिवाय कळत नाही. बागडोगरा हे नाव आपण सहसा ऎकलेलं नसतं. प. बंगाल राज्यातल्या दार्जिलिंग जिल्ह्यातला हा विमान तळ लष्कराचा असला तरी नागरी विमान तिथे उतरू दिली जातात. पुढे हे विमान असम राज्यात गोहाटीला जायचं होतं. मागे गोहाटीला जाताना आम्हाला प्रथम गोहाटीला उतरवून त्यावेळचं विमान नंतर बागडोगराला गेलं होतं. एवढ्या दूरवर येवूनही विमान आणखी पुढे जाणार आणि पुन्हा ते उतरणार ते आपल्याच देशात असा विचार मनात आला आणि आपला भारत देश खरच खंडप्राय असल्याचा अभिमान वाटायला लागला.

आपल्या देशातील महानगरं सोडली तर इरत ठिकाणची विमानतळं गजबजलेली नसतात. आलेल्या विमानातून उतरलेले प्रवासी तेवढेच बाहेर विखूरले जातात आणि पुन्हा सगळा परिसर सामसूम होवून जातो. आम्ही ताजे तवाने होईपर्यंत सहप्रवासी निघून गेले होते. आमची वाट पाहत असलेल्या बाहेरच्या वाहनात बसून आम्हीही निघालो आणि थोड्याच वेळात  शहरातली वाट संपवून मोकळ्या प्रदेशात आलो. सभोवताली चहाच्या बागा, मार्च महिना असल्याने प्रसन्न करणारी हवा आणि हसरे सोबती यामुळे प्रवास मजेत चालला होता.  वाटेत एक नक्षलबारीला जाणारी बस दिसली. म्हणजे नक्षलवादी चळवळीचं मुळ असलेला प्रदेश जवळच होता तर. नक्षलवाद, त्या वरचे उपाय, आदिवासी त्यांचे प्रश्न, तळागाळातल्या लोकांना न जुमानणारी आपल्या देशातली शासन यंत्रणा, झोटींगशाहीचं प्रतीक बनलेली प. बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बद्दल अनेक विचार मनात येत गेले. अशावेळी आपण नजरेने एक बघत असतो आणि मन भलतीकडेच भटकत राहातं, तसच काहीसं होत होतं. प्रवासात हे एक बरं असतं. दुसरं काहीच करत नसलो तरी आपण स्थळकाळाचं बंधन नसलेले विचार करू शकतो. एकाच दिशेने अखंड प्रवास सुरू असला की मग ती  विचारांची साखळीही लांब लांब होत जाते. तीन साडेतीन तासांचा प्रवास असल्याने ती प्रक्रिया चालूच राहिली. जलपायगुडीचा मैलाचा दगड दिसला. रल्वेने आलो असतो तर इथपर्यंत आलो असतो. रस्त्याला समांतर असे रल्वेचे रुळ दिसायला लागले. तिस्ता नदीवरचा पूल लागला. मग जंगल सुरू झालं. वाटेत एका ठिकाणी चहा घेण्यासाठी थांबलो, मोठा कप भरून चहा मिळाला पण चव यथातथाच होती. तिथलो लोक पचकवणी पण भरपूर चहा पिणारे आहेत.

सकाळपासून हजारो कि.मी. प्रवासहोवूनही तो अजून संपला नव्हता. गाडी बाहेरचं दृष थकवा दूर करत होतं. आता अंधारून यायला लागलं. उत्तर-पुर्वेकडचा हा भाग असल्याने तिथे लवकर काळोख होतो. तशातच खड्डे असलेला अत्यंत खडबडीत असा रस्ता लागला. पुढचे दहा किलोमिटर हा असाच रस्ता आहे ड्रायव्हर विनोदने पुस्ती जोडली. चला तेवढाच पाळण्यात बसल्याचा आनंद. प्रवासात हा असा ऍटीट्युड ठेवावाच लागतो. नाहीतर तो प्रवास आणखी कंटाळवाणा होतो. काही लोक तर या आधीचे कष्टप्रद झालेले प्रवास पुन्हा पुन्हा आठवून दु:खात भर घालून घेतात.

कितपर्यंत पोहोचलात? ड्रायव्हरला पुन्हा पुन्हा फोन येत होता. आत्मा आणि आणखी काही मंडळी भूतानच्या प्रवेशद्वारवरच्या फुन्तशोलींग या गावात आधीच पोहोचली होती. थोड्याच वेळात आम्हीही पोहोचलो. प्रवेश प्रक्रिया पुर्ण करून नामग्ये या हॉटेल मध्ये पोहोचलो. आपल्यापेक्षा त्यांची घड्याळं अर्धा तास पुढे होती.  तेवढा एक फरक सोडला तर अजून आपला देश सोडल्याची जाणीव होत नव्हती. नामग्ये हॉटेल मधली ती संध्याकाळ मात्र उत्साहवर्धक होती. माझा मित्र आत्मा सलीम या आमच्या तिथल्या व्यवस्थापकाबरोबर मराठीत बोलत होता ते ऎकून मी चक्रावलो होतो. या माणसाकडे अशी माणसं कशीबुवा आकर्शीत होतात?  सहलीला  अशा गोड धक्क्याने सुरूवात झाली होती.




LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates