27 November, 2011

सदाबहार ‘गीतमाला’





देवी और सज्जानो.........., बहनो और भाईयो....... अशी हाक देऊन तमाम भारतीयांना चाळीस वर्षाहून जास्त काळ बिनाका गीतमाला या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडून ठेवणारे अमीन सायानी काल प्रत्यक्ष ऎकायला मिळाले. निमित्त होतं स्वरगंधारचे मंदार कर्णीक यांनी आयोजित केलेल्या गीतमाला के सुरीले संगीतकार- अमीन सयानी के साथ या कार्यक्रमाचं. रेडीओ सिलोन वरून दर बुधवारी रात्रौ आठ वाजता सादर होणार्‍या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने त्या काळी संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं होतं. तब्बल चाळीस वर्षाहून जास्त काळ बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने सर्व भारतीय एका सुत्रात बांधले जात होते. श्रीलंका ब्रॉडकास्टींग कॉर्पोरॅशन किंवा रेडीओ सिलोन हा तेव्हा सगळ्याना जोडणारा एक समान धागा होता. कानात प्राण आणून रसिक ती गाणी ऎकत होते. चारशेहून जास्त रेडीओ क्लब स्थापन झाले होते. त्या काळी घरोघरी रेडीओ नव्हते, मग छोट्या-मोठया हॉटेलच्या परिसरात किंवा शेजारच्या घरी जमून मंडळी या कार्यक्रमाची मजा अनुभवत असत. आपली आवडती गाणी ऎकण्याचं तेव्हाचं ते एकमेव साधन होतं. नुसती गाणी ऎकणं वेगळं आणि अमीन सयानीसारख्या निवेदकाकडून किस्से ऎकता ऎकता एक  एका गाण्याचा आनंद घेण वेगळं. संपुर्ण तासभर तमाम जनतेला एका जागी खिळऊन ठेवण्याची ताकत अमीन सयानी यांच्या निवेदनात होती आणि आजही आहे. गायक गायीकांचा सुरीलास्वर ऎकतानाच सयानीसाहेबांचं निवेदनही सुश्राव्य असच असायचं. एका अर्थाने हा सुरांचा जादुगारच आहे. अनेक संगीतकार गीतमालेत आपण कुठे आहोत यावरून आपली पातळी ठरवत असत.

हिंदी चित्रपट संगीत सृष्टीने तमाम भारतीयांचं जीवन खर्‍या अर्थाने सुसह्य बनवलं. लोक आपलं सुख-दुख: या गाण्यात शोधू लागले. लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, महंमद रफी, मुकेश, किशोर कुमार, मन्ना डे, हेमंत कुमार पासून अगदी अलका याज्ञीक या गायक-गायीका पर्यंत आणि नौशाद, हेमंत कुमार, ओ.पी. नय्यर, एस.डी बर्मन, सी. रामचंद्र, आर. डी बर्मन, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम, रवींद्र जैन अशा अनेक दिग्गज संगीतकारांचं संगीत जनसामान्यापर्यंत पोहोचलं, रुढ केलं ते गीतमालेनं. शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण, शैलेंद्र, मजरूह सुलतानपुरी, भरत व्यास, शाहीर लुधीयानवी, हसरत जयपुरी, आनंद बक्षी, अंजान, समीर अशा अनेक गीतकारांना ओळख प्राप्त करून दिली आणि त्यांचे शब्द रसिकांच्या हृदयावर कायमचे कोरले गेले. सामान्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आणले. गीतमालेची लोक चातका प्रमाणे वाट बघत असत. लहाणपणी कोकणातल्या कोचर्‍यासारख्या खेडेगावात असताना मी याचा अनुभव घेतला आहे.

स्वरगंधारने काल यशवंत नाट्यगृहात सादर केलेल्या या कार्यक्रमाला अंबरीश मिश्र यांचं निवेदन लाभलं होतं, काही मिनिटं स्वत: अमीन सयानीसाहेब रंगमंचावर अवतरले होते. बाकीच्या वेळात ते दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधत होते. जुन्या काळातील आठवणींना उजाळा देत होते. सोनाली कर्णीक अर्चना गोरे, हृषीकेश रानडे, संदीप शहा आदी गायकांनी आणि अमर ओक, सुराज साठे, अविनाश चंद्रचूड, मनीष कुलकर्णी, दत्ता तावडे  या मुझिशीयनसनी तर बहार आणली. सुमारे तीन तास चाललेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि जुन्या स्मृतींना उजाळा देत गेला. प्रत्येक क्षण मंतरलेला होता. भारलेला होता. श्रोतृवृंद आसनाला खिळलेला होता. कार्यक्रम संपल्यावर तरंगत आपापल्या घरी जाताना तरूण झाल्याचा भास प्रत्येकाला झाला असावा.                     

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates