31 January, 2011

पुर्वांचलाची चित्र सफर भाग १३



पुर्वांचलाचा दौरा संपत आला, शेवटचं ठीकाण होतं गुवाहाटी. तसं हे पुर्वांचलाचं प्रवेशद्वारच, आम्हीही पहिले आलो ते इथेच पण गुवाहाटीला न थांबता आम्ही थेट काझीरंगाला गेलो होते. शेवटच्या दिवशी गुवाहाटी फिरायचं ठरवलं. सुरवात कामाख्या मंदिरापासून केली. निलाचल पर्वतावर वसलेलं हे आदिमायेच पुरातन मंदिर. गोव्याला असलेल्या कामाक्षीचं मुळ स्थान. गाडी जशी वर-वर चढू लागली तसं वरून ब्रम्हपूत्रेचं विस्तीर्ण पात्र नजरेस पडू लागलं. कामाख्या मंदिर खुप छान आहे. गुवाहाटीच्या आसपासचा परिसरही बघण्या जोगा. सागरासारख्या ब्रम्हपुत्र नदाला निरोप दिला तो आयुष्यभारासाठी आठवणी घेऊनच.


कामाख्या मंदिर 
बळी जाण्याची वाट बघणारं कोकरू





ब्रम्हपूत्र नद 


28 January, 2011

रोगी मारण्यात पटाईत


रविवारच्या लोकसत्तामध्ये सर्किट हे सदर वाचलं आणि मला आजपर्यंत भेटलेल्या तर्‍हेवाईक माणसांविषयी लिहावसं वाटलं. अशी जगावेगळी माणसं भेटली की ती कायमची लक्षात रहातात. अशी माणसं कधी लग्नात, ट्रेनमध्ये, मित्राच्या घरी, सहलीत कुठे वाट्टेल तिथे भेटू शकतात. हे असेच कोकणात भेटलेले बापू.

बापूंचं घर मुंबई गोवा महामार्गाला लागून. हे त्यांचं जुन्यापद्धतीच माडीचं घर, पार स्वातंत्र्यापुर्वीचं. हायवे झाला त्या आधीपासूनचं. त्यामुळे आता ते महामार्गाला जरा खेटूनच उभं आहे. घराशेजारच्या जागेवर बापूंचा पुर्वीचा मांगर होता (गुरांचा गोठा). गायी-गुरं विकल्यावर बापूंनी तिथे एक चाळ बांधली, पुढच्या बाजूला दुकानासाठीचे गाळे आणि मागच्या बाजूला भाड्याने देण्यासाठी दोन-दोन खोल्या. शेती सोडल्यावर संसाराला तेवढाच हातभार.

रस्त्याला लागूनच घर असल्याने शाळेतल्या शिक्षकांना किंवा नोकरदार वर्गाला बापूंच्या जागा सोईच्या होत, तीच गोष्ट व्यवसाय करणार्‍यांचीही. असेच एक दिवस दुपार टळून गेल्यावर मी बापूंकडे पोहोचलो. बापू माझी आणि आतून येणार्‍या चहाची वाट पहात आरामखुर्चीत पहूडले होते. एवढ्यात एक गृहस्थ घाई-घाईत बांपूंच्या ओट्यावर येऊन दाखल झाले. कोण बॉ ? बापूंचा प्रश्न,
तो:  नाय, भाड्याने जागा होई होती
बापू: खयची? रवाची काय गाळ्याची?
तो: गाळ्याची
बापू: कसला दुकान टाकतात? 
तो: दुकान नाय, मी डॉक्टर आसय
बापू: होय, माका वाटला दुकान...
.....

बापू: आमच्याकडे भाड्याक एक डॉक्टर आसत, रोगी मारण्यात पटाईत, तुमी कसले? (आर्. एम्. पी. म्हणजे Registered Medical Practitioner त्यालाच बापू रोगी मारण्यात पटाईत म्हणत होते.)   
तो: आर्. एम्. पीच
बापू: हो.....!, मग ते एक असताना तुमी कित्या आणखी?
......
बापू: दुसरा कायतरी करा...!
तो माणूस उठून गेला.
मी बापूना म्हटलं, करेना होता का तो धंदा, तुम्हाला भाडं मिळालं असतं.
अरे, मेलो हो पण आर्. एम्. पीच, भाडा खयसून देतोलो? माय.......... बापूनी एक जोरदार शिवी हासडली. 
बापूना समोर आलेला चहा रोजच्यापेक्षा गोड लागला असावा.

26 January, 2011

माफियासत्ताक



काल प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंधेला मालेगाव जिल्ह्याचे प्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेट्रोल माफियांनी भर रस्त्यात जिवंत जाळले. आपलं कर्तव्य चोख बजावत असताना या प्रामाणीक अधिकार्‍याचा दुर्दैवी अंत झाला. ज्या नराधमाने हे कृत्य केले त्याच्या विरोधात गेली तीन-चार वर्ष तक्रारी केल्या गेल्या आहेत, खटले सूरू आहेत. असं असूनही त्या राक्षसाची ही हिम्मत होते याचा अर्थ स्थानीक पोलीस, राजकारणी आणि महसूली अधिकार्‍यांची या माफियांना साथ असली पाहिजे. प्पर जिल्हाधिकारी स्थराच्या अधिकार्‍याला भररस्त्यात जिवंत जाळलं जात, या सारखी घटना पुरोगामी म्हटल्या जाणार्‍या महाराष्ट्रात होते याचा अर्थ या राज्यात, या देशात प्रजासत्ताक नसून माफीयासत्ताक आहे हे स्पष्ट आहे. सरकारने नेहमी प्रमाणे कडक कारवायीचे आदेश दिले आहेत, संबंधीताना कडक शासन केले जाईल असे आश्वासन दिले आहे. पण पडद्यामागचे खरे सुत्रधार, त्याना शासन कधी होणार? हा कळीचा मुद्दा आहे.

प्रामाणीक अधिकारी, माहितीचा अधिकार राबवणारे कार्यकर्ते यांचे सरेआम मुडदे पडत असताना मंत्री महोदय स्वत:चे सत्कार करून घेण्यातच मग्न आहेत. प्रजासत्ताकदिन साजरा करताना नेमकी सत्ता कुणाची हा प्रश्न पडतो.            

24 January, 2011

विसंवाद की अहंकार ?




एकदाच मिळालेला जन्म आणि त्या जन्मात जिवलग झालेले दोन प्रेमी, जातपात बाजूला सारून लग्नबंधनात बांधले जातात. जन्म जन्मांतरीचे होऊन जातात. संसारवेलीवर एक  फुल उमलतं. आता दिवस-रात्र कधी संपतात तेच कळणार नाही असं वाटतं. बाहेर पडणार्‍याला घराची सतत ओढ लागलेली असते, असे ते दिवस असतात..... असायला हवेत. पण नेमक्या याच वळणावर विसंवादाचे सूर उमटतात. पटेनासं होतं. शुल्लक गोष्टींचा बाऊ केला जातो. शत्रूला तरी चांगली वागणूक मिळेल, पण त्या एकेकाळच्या जिवलगाला फटकारलं जातं. उपमर्द होईल इतपत बोलणी खावी लागतात. हे दोन्ही बाजूनी चालू असतं. आजूबाजूची मंडळी आगीत तेल ओततात. त्यात सख्खे आई-वडीलही असतात. शादी निभानी है की निपटानी है? सारखे प्रश्न एकमेकांना विचारले जातात. पण खरं सांगू का शेवटी हा गुंता ज्याचा त्यानेच सोडवायचा असतो. एकदा शांत बसावं, आपल्यातला मी पणा बाजूला ठेवावा. स्वतः नीट विचार करावा. काय चुकलं ते मनोमन ओळखावं. चुक आपली असली तर ती मोकळेपणी कबूल करावी, दुसर्‍याची असेल तर माफ करावी. दोघांनीही एक-एक पाऊल पुढे यावं, नकळत हात हातात येतील. हो हे सांगायला खुप सोपं आहे याची कल्पना आहे मला. पण संवाद सुरू व्हायला काय हरकत आहे? नव्हे सुरू व्हायलाच हवा. पहिल्यांदा अहंकार आडवा येत असेल तर एखाद्या चांगल्या मणसाची मदत घ्यावी. पण तुटेपर्यंत ताणू नये. त्यात फायदा कुणाचाच नाही. तोटा दोघांचाही आणि मुख्य म्हणजे त्या बाळाचा, ज्याने जीवनाची नुकतीच सुरवात केली आहे.       
          

23 January, 2011

मरण साजरं केलं






चार चौघासारखं व्हावं म्हणून
मरणही साजरं केलं
मरण्याआधीच बापाला
सरणाच्या वाटेने नेलं

जीतेपणीचा दाह
मरणापुर्वीच जाळून गेला
चितेवर मग फक्त
लाकडासह सापळा जळला

अस्थींना नकोच होती
संगमाची एक वारी
पिंडासाठी कोण आता
कावळ्याची आशा धरी ?

कावळ्यांनीसुद्धा आता गाव सोडलं
पिंडाचं महत्व भटजीच्या दक्षिणेपुरतं उरलं
चार चौघासारखं व्हावं म्हणूनच
मरणही साजरं केलं

नरेंद्र प्रभू

22 January, 2011

पुर्वांचलाची चित्र सफर भाग १२




मेघालय गाठायचं आणि चेरापुंजीला न जाता यायचं हे कसं होणार. लहानपणापासून पुस्तकात वाचलेलं जगातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेलं ठिकाण म्हणजे चेरापुंजी, ते पहायची उत्सुकता तर होतीच, पण गेल्या दोन तीन वर्षापासून मोसिनराम या मोघालयातल्याच एका ठिकाणी चेरापुंजी पेक्षा जास्त पाऊस पडतो असं वाचनात आलं तेव्हा त्या दोन्ही ठिकाणी आम्ही जाऊन आलो. वाटेतच अशा अनेक गुहा लागल्या. एका ठिकाणी तर पिंडीवर नैसर्गिक रित्याच अभिषेक होत होता.       










LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates