22 November, 2010

यशवंताची शिकार




वन्यजीव कायद्या प्रमाणे आता बहुतेक प्राण्यांची शिकार करण्यावर बंदी आहे. पण असा कायदा होण्यापुर्वीची ही गोष्ट आहे. कोकणात शिकार करणे म्हणजे रानटी डुक्कर मारणे असं समिकरण आहे. शिकारीचं नुसतं नाव घेतलं तरी गावात भलताच उत्साह संचारतो. शिकारी संबंधीच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. पारावर होणार्‍या गप्पांना वेगळाच रंग चढतो. पुर्वी झालेल्या शिकारी, त्यात झालेल्या गमती-जमती, कुणाचा नेम कसा आहे , कोणी किती डुक्कर मारले पासून ठासणीची बंदूक कुणाकडे आहे आणि काडतूसची बंदूक कुणाकडे याचीही उजळणी केली जाते. मागच्यावेळी आपल्या वाट्याला कमी मटण आलं, फसवलं म्हणून एखाद्याची तक्रार असते. तर चलाखी करून कोणी डबल वाटा घेतला त्याची नक्कल करून दाखवली जाते. ' धुकटात पेट, खडपावर पेट ' या म्हणी मालवणी माणूसच जाणे. धुकटात पेट म्हणजे अंदाजाने बंदूक चालवणे आणि नेम लागला तर मात्र मिरवणे, खडपावर पेट म्हणजे जनावर समजून खडकावर गोळी घालणे. तर बघा, नुसत शिकार म्हणताच एवढ्या गोष्टी आठवल्या.

प्रत्यक्ष शिकारीचा दिवस उजाडला की त्यादिवशी कुणी शेतीच्या कामाला जात नसे. पेजेची न्याहरी करून सगळे तयार व्हायचे. त्यात बंदूक चालवणारे हाकारे  आणि हरकामे सारख्याच उत्साहाने एकत्र यायचे, व्युहरचना व्हायची, मागे केलेल्या चुका पुन्हा नको म्हणून एकमेकाना ताकीद दिली जायची. आधीच साफसूफ केलेल्या बंदूका खांद्यावर मारल्या जायच्या, देवाला गार्‍हाणं घातलं जायचं, जाणत्यांचे आशिर्वाद आणि हे सर्व पसंत नसणार्‍याच्या गाळी (शिव्या) घेउनच मंडळी निघायची.डोंगर-रानात जोरदार आरडा-ओरड करून डुक्कर उठवले जायचे. सकाळी सुरू केलेला हा प्रकार कधी-कधी दिवसभर चालायचा. कधी नशीबाने लवकरच यश यायचं. डुक्कर उठला, तो दिसला की एकच धावपळ उडायची. ' मार, अरे समोरच आहे, सोडूनको, आटकेचो आसा (आटकेचो म्हणजे आठ माणसानी उचलून नेण्या एवढ्या वजनाचा) एकच हलकल्लोळ माजायचा. डुक्कर दिसला, गोळी लागली तरी तो जखमी अवस्थेत जंगलात दुरवर जायचा. त्याला शोधून, पुर्ण मारून, त्याचे चारही पाय एका ओल्या वाशाला बांधून, शिकार सहा-आठ माणसांच्या खांद्यावरून गावात आणली जायची, सगळे विजयी वीर परतायचे, तेव्हा अख्खा गाव, पोरं-टोरं, बाया-बापडे, समस्त ग्रामस्त सगळे सगळे स्वागताला हजर असायचे. डुक्कर कापून सागोती (मटण)घेतल्याशिवाय कुणीच जागचा हालत नसे. वाटा घेऊन निघाले की मग प्रत्येकच्या घरात मटण शिजत असे. अख्ख्या अवाठालाच (वाडीला) रश्याचा दरवळ सुटत असे. त्या दिवशी तृप्त मनाने सगळा अवाठ झोपी जाई. पुन्हा एकदा शिकारीच्या गजाली ताजेपणाने करण्या साठी.

अख्ख्या अवाठाला सारख्या प्रमाणात सागोती वाटली तरी बंदूक मालकाला आणि शिकार्‍याला अधिकचा मोठा वाटा मिळत असे. यशवंत त्यापैकी एक होता. शिकारी आणि बंदूक मालक सुध्दा. पट्टीचा नेमबाज, उठलेला डुक्कर त्याच्या हातून कधीसुटला नाही. शिकारीला जायचं तर य़शवंत हवाच. पुढे पुढे तर त्याच्या सोईनेच शिकारीचा दिवस ठरायचा. यशवंताला वाटायचं शिकार मी करणार आणि त्यात एवढे वाटेकरी कशाला ? पण समजा त्याने एकट्याने शिकार केली तरी त्या दिड-दोनशेकिलो मटनाचं तो काय करणार होता ? गोव्याला रहाणार्‍या त्याच्या भावाने ही समस्या सोडवली. यशवंताने शिकार करायची आणि ते मटण भावाने गोव्याला आपल्या दुकानात विकायला ठेवायचं असं ठरलं. यशवंताला अख्खा डुक्कर फस्त करायचा मार्ग सापडला. शेतात भुईमूग तयार झाला की तो खायला रात्रीच्यावेळी डुक्कर येत. यशवंत मचाणावर दबा धरून बसू लागला. रात्रीचा अंधार, सोबत कुणी नाही अशा परिस्थितीत डुक्कर आले तरी नेहमीच शिकार व्हायचीच असे नाही. पण यशवंतला काहीतरी सावज मिळायचच. तो एकदा असाच बसला असताना डुक्कराची चाहूल लागली, यशवंत सावध झाला. चांदणी रात्र असल्याने त्याला सावज दिसत होतं. नीट नेमधरून त्याने बंदूक चालवली. जनावर ओरडलं. वर्मी गोळी लागलीय हे यशवंतानेअनुभवाने ओळखलं. झुडूपाच्या दिशेने हालचाल झाली. डुक्कर त्या दिशेने गेला होता. डुक्कराच्या ओरडण्याचा आवाजा येत होता. थोड्या वेळाने त्याचं ओरडणं थाबलं.

पहाट झाली तसा यशवंत खाली उतरला. आता त्याला घाई होती. शिकार शोधायची,  घरच्याना कळवायचं, डुक्कर कापायचा,  मटण साफ करायचं, डबे भरायचे आणि गोव्याला घेऊन जायचं. किती वेळ लागणार, सगळा हिशेब करतच यशवंत डुक्करालाशोधू लागला. चांगलं उजाडल्यावर डुक्कराच्या पायाचे ठसे दिसू लागले. त्या खुणांचा आणि रक्ताचा मागोवा घेत यशवंत एका पाणंदीपाशी आला. पलिकडे एका डबक्यात पाणी साचलेलं होतं. त्याच्या शेजारीच डुक्कराचं प्रचंड धुड पडलेलं होतं. यशवंतस्वतःवरच खुश झाला. उतावीळ झाला. आज खुप पैसे मिळतील, घरची मंडळी खुश होतील. मनातल्या मनात असे विचार करतच यशवंत डुक्कराजवळ गेला, समोर बसला, सुळ्याना हात घालून त्याला हालवण्याचा प्रयत्न केला तोच डुक्कर सर्वताकद एकवटून उठला, यशवंतला ढुश्शी देवून त्याने त्याला खाली पाडलं आणि एक..दोन.. अनेक वार त्याच्यावर करत राहीला. यशवंत बेशुध्द होई पर्यंत.


इकडे घरची मंडळी वाट बघत होती. रोज ठराविक वेळात परतणारा यशवंत आज दिवस वर चढला तरी कसा आला नाही म्हणून त्याचा मुलगा शेताकडे निघाला. मचाणापासून पाऊलखूणा धुंडाळत तो पाणंदी जवळ आला, समोर बघतोतर काय,यशवंताचीच शिकार झालेली. तो गलितगात्र होवून पडला होता. पोराने बोंब ठोकली, गावकरी जमा झाले. यशवंताची पालखी सरकारी दवाखान्यात अणण्यात आली. पायाची, बरगड्याची हाडं पार मोडून गेली होती. बर्‍याच उपचारानंतर यशवंत बरा झाला, जगला पण अपंग झाला. त्या प्रसंगा नंतर कुणी गावात अधाशीपणा केला तर लोक म्हणतात " यशवंताचा म्हायती आसा मा ? "

नरेंद्र प्रभू

3 comments:

  1. प्रभू साहेब,
    'यशवंताची शिकार...' कथा खुपच आवडली. ती वाचताना 'द.मा. मिरासदार आणि शंकर पाटलांची' आठवण झाली.
    तुमच्याकडून खुपखुप कथालिखान होवो हीच मनापासून शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. मस्त झाली आहे पोस्ट
    आवडली

    ReplyDelete
  3. विजयजी, आभारी आहे.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates