20 September, 2010

कारगील ते लेह

हिरवाईत न्हाऊन निघालेलं सोनमर्ग मागे टाकत काल जोझीला पार केला होता.  कारगीलकडे सरकत होतो तसतसा झाडझाडोरा कमी कमी होत गेला, पण रात्रीच्या काळोखात त्याची तेवढी कल्पना येत नव्हती. हॉटेल सियाचीन मधून बाहेर पडल्यावर उघडे पर्वत नजरेस पडायला लागले. उघडे असले तरी त्यांच्या सौदर्यात कमी नव्हती. अनेक रंगानी रगलेले हे पर्वत हेच खरं तर लडाखचं वैशिष्ट्य आहेत. जसा बाहेरच्या देखाव्यात फरक पडत होता तसा माणसांच्या चेहरेपट्टीतही फरक पडत गेला. श्रीनगरमध्ये मुस्लीम बहूल भाग तर मुलबेक गावानंतर आलेल्या नमकिला आणि फोटूला पास नंतर बौद्धधर्मिय लोक जास्त दिसायला लागले. लडाख हा जम्मू-काश्मिर राज्याचा भाग असला तरी भौगोलीक आणि सामाजिक दृष्ट्या तो भिन्न असाच आहे.
 



कारगील शहराजवळच एका पेट्रोल पंपावर गाड्या इंधनासाठी थांबल्या. पेट्रोल पंपाला लागूनच असलेल्या दुकानांच्या शटरवर कारगील युद्धाच्या खुणा अजूनही दिसतात. समोरच्या पर्वतराजींमधून कारगील शहरावर युद्धाच्या काळात पाकड्यांनी जो शस्त्रांस्त्रांचा मारा केला त्याच्या खुणा पाहून त्या काळातल्या समरप्रसंगाची कल्पना येवू शकते. हाच तो श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग जो पाकिस्तानला ताब्यात घ्यायचा होता. पाकव्याप्त काश्मीरच्या लाईन ऑफ कंट्रोल जवळून आमचा प्रवास सुरू होता. याच मार्गावरून युद्ध काळात रात्रीच्यावेळी श्रीनगर ते लेह अशी वाहतूक कित्येकवेळा केल्याची आठवण आमचा ड्रायव्हर सांगत होता. काही वेळा तर या भागात गाडीचे हेड लाईट बंद करून गाड्या हाकाव्या लागत. 
वळणा-वळणाचे ते हिमालयातले रस्ते ड्रायव्हरना अगदी पाठ होते. अशा रस्त्यंवरून गाडी हाकणं नवख्या चालकाचं काम नाहीच. आता श्रीनगर लेह हा मार्ग रुंदीकरणाचं काम ब्रो ने हाती घेतलं आहे. सगळीकडे रस्ता खणून ठेवल्यामुळे आमच्या प्रवासाचा वेग कमी झाला होता आणि वेळ वाढत चालला होता.

Moon Land
फोटूला पास मागे पडला आणि लामायूरू गाव जवळ आलं. दूरूनच लामायुरू मॉनेस्ट्री  आणि मुनलॅन्ड दिसायला लागली.  मुनलॅन्ड हे या भागातलं आणखी एक वैशिष्ट्य. चाद्रभुमीवर मानवाने पाऊल ठेवलं आणि बरोबर येताना तिथल्या मातीचे नमुने आणले त्या चंद्रावरच्या मातीच्या गुणधर्माशी मिळते जुळते गुणधर्म इथल्या मातीतही आहेत म्हणून या जागेला मुनलॅन्ड हे नाव पडलं. लामायुरू इथल्याच हॉटेल मध्ये आम्ही जेवायला थांबलो जेवणं आटोपली तेव्हा दुपारचे तीन वाजून गेले होते. लामायुरू इथे  बौद्धगुंफा असल्यामुळे आमच्या गाडीच्या मुस्लीम चालकांनी तिथे जेवण घेतलं नाही. पुढे जवळच असलेल्या खालसी या गावात ते जेवायला थांबणार होते. एकूण काय आजचा सुर्य आम्ही लेह मध्ये पोहोचायच्या आतच अस्ताला जाणार होता.  खालसी गाव यायच्या आधीच पुन्हा एका ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे थांबावं लागलं. त्यात अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेला. खालसी गाव आलं तेव्हा पाच वाजत आले होते. या गावात रस्त्याच्या आजूबाजूला जर्दाळूची झाडं होती. झाडांखाली पिकलेल्या जर्दाळूंची रास पडलेली होती.

लडाख भागात झालेल्या ढगफुटीमुळे तो भाग आचानक चर्चेचा विषय झाला होता पण त्या ढगफुटीत कारगील नंतरचा बराच भाग आला होता. त्याच्या खुणा आता दिसू लागल्या होत्या. ढगफुटीत नष्ट झालेली घरं रस्त्याच्या बाजूला दिसायला लागली. इथे लोकवस्ती अत्यंत विरळ असल्याने त्या ढगफुटीच्या विनाशाची मात्र तशी कल्पना येत नव्हती. गाडी नीमू गावाजवळ आली आणि तिथली सगळीच घरं वाहून गेलेली दिसली.  दोन ठिकाणी लष्कराने नव्याने तयार केलेले पुल दिसले. ढगफुटी व्हायच्या आधी तिथे रस्ता होता. आता त्याच जाग्यावर प्रवाह तयार झाल्याने पुल बांधावे लागले होते. सुर्यास्त झाला होता. माणसांनी कोलीत हातात घेतल्याने जळणारं श्रीनगर आणि निसर्गाचा कोप झाल्याने उध्वस्त झालेलं नीमू गाव, लेहच्या सीमेवर आम्ही दाखल झालो होतो. सिंधू आणि झंस्कार नद्यांचा जिथे संगम होतो तीथे गाड्या थांबल्या. सिंधूच्या तुलनेने स्वच्छ पाण्यात झंस्कारच्या प्रवाहातलं गढूळ मातकट पाणी मिसळत होतं. दोन संस्कृतींचा संगमही असाच होतो काय? थोड्याच वेळात पथ्थरसाहेब गुरूव्दाराजवळ थांबलो. आत शबत किर्तन चालू होतं. ढगफुटीत या गुरूव्दारातही चारफुट चिखल साचला होता. श्रीनगर मधल्या माणसांच्या मनात साचलेला चिखल बरा की हा चिखल? कोणता लवकर साफ होतो? अंधारलेल्या वाटेवरून गाड्या चालल्या होत्या तशातच लेह शहर आलं. शहरात प्रवेश करतानाच लक्षात येत होतं कि ऑल इज नॉट वेल.  एवढं असूनही बिजू हॉटेलच्या अनिलने जुले म्हणत लडाखी स्कार्प गळ्यात घातला. आम्ही अजूनही का पोहोचलो नाही म्हणून पद्माचा सारखा फोन येत होता. घराला मुकलेली ही माणसं आदरातिथ्यात जराही कमी पडत नव्हती. एकाच दिवसात माणसांचे किती नमूने पहायला मिळाले!   
                           

4 comments:

  1. रोहतांग बोगदा पूर्ण झाल्यावर श्रीनगर-लेह मार्गाचे महत्त्व कमी होऊन काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी दंगली करता येणार नाहीत या जाणिवेपोटी पाकिस्तान काश्मीरमध्ये सक्रिय आहे.

    ReplyDelete
  2. पाकिस्तान सरकार हे अतिरेक्यांच्या हातातलं बाहूलं आहे. स्वःताचे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि दुरर्‍याचं बरं बघवत नाही अशी स्थिती आहे दुसरं काय?

    ReplyDelete
  3. खुपच छान छायाचित्रे व माहितीपुर्ण लिखाण.

    ReplyDelete
  4. विजयजी, धन्यवाद.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates