13 September, 2010

जोझीला

श्रीनगरच्या हाऊसबोट वरचं रात्रीचं जेवण खासच होतं. गोश्त आणि शामी कबाब अजून विसरता येत नाहीत. सकाळी लवकर उठण्याची घाई नव्हती तरी स्वच्छ हवेमुळे पहाटेच जाग आली. पक्षांच्या किलबिलाटामुळे कधी एकदा बाहेर पडून आसमंत न्याहाळतो असं झालं होतं. एका बाजूला सरोवर आणि दूसर्‍या बाजूला पर्वत रांगा, सुर्य किरणं येऊ घातलेली, माझा मित्र मानव हाऊसबोटीच्या सज्ज्यात ट्रायपॉड लाऊन मासे टीपणार्‍या पक्षांची छायाचित्र घेण्यात मश्गूल होता. इकडे काठावर फुलांची फुलण्यासाठी अहमहमीका लागली होती. येणार्‍या शिशीरा आधी त्यांना फुलून घ्यायचं होतं जणू. यवढ्यात समोरून शिकार्‍यांची हालचाल दिसायला लागली. ते आमच्या दिशेनेच येत होते. आमच्या हाऊसबोट मधल्या वास्तव्याची वार्ता त्यांच्या पर्यंत पोहोचली होती तर. गेले दोन-तीन महिने संचारबंदीमुळे तिकडे पर्यटकांनी पाठ फिरवली असल्याने हे हातावर पोट असणारे अगदी धायकूतीला आले होते. आम्ही एकूण अकरा आणि हे विक्रेतेही जवळ जवळ तेवढेच. शाली, तयार कपडे, कीचेन्स, कलाकुसरीच्या वस्तू, केशर, कहावा हर तर्‍हेच्या वस्तू त्यांनी आणल्या होत्या, पण माझं लक्ष वेधून घेत होती ती शिकार्‍यातून ओसंडून वाहणारी फुलं.

आजचा आमचा प्रवास द्रास मार्गे कारगील पर्यंतचा होता. सामानाची आवरा आवर करून मंडळी तयार झाली. गाड्या आल्या, सामान लावलं जात होतं. उन्हाचा त्रास नको म्हणून एका झाडाखाली सावलीला मंडळी थांबली होती. जवळच्याच क्वॅलीस गाडीच्या बोनेटवर कुणी पर्स तर कुणी हातातली पिशवी ठेवली होती. समोरून एक काश्मिरी मध्यमवयीन गृहस्थ(?) आला, सगळ्यांचा अकला काढत, उद्धार करीत त्याने त्या पिशव्या उधळून लावल्या. काल पासून आम्हाला कसलाच उद्रेक पाहायला मिळाला नव्हता, याने झलक दाखवली. या लोकांची मानसिकताच तशी झालीय, तो आमच्याकडे इंडीयन म्हणून पाहात होता. सगळा राग डोळ्यात उतरला होता. कसं होणार? यानाच पर्यटकांची गरज जास्त आहे. काश्मिर जळतय, हे त्यात तेल ओतताहेत. आमच्या सारखे जे फुटकळ पर्यटक आले त्याना हे असं दर्शन, वा..रे मेहमाननवाजी... आमचे ड्रायव्हर दूरून हे सगळ बघत होते. पण काहीच बोलले नाहीत. कदाचीत त्यांच्या मनात आमच्या विषयी वेगळॆ भाव नसावेत. आम्हाला हाच जोझीला पार करायचा होता, खर्‍या जोझीलाची काळजी वाटत नव्हती.  

गाड्या चालू झाल्या, वाटेत गंधरबाल, कंगन ही करफ्यूग्रस्त गावं लागली. श्रीनगर ते सोनमर्ग नव्वद किलोमीटरचा प्रवास तसा धोक्याच्याच होता पण तो भाग मागे पडला. नितांत सुंदर अशा काश्मिरच्या खोर्‍यातून आमचा प्रवास सूरू होता. जागोजागी रानफुलांचा गालीचा पसरलेला होता आणि रस्त्याच्या दुतर्फा सफरचंदानी लगडलेल्या बागा लक्ष वेधून घेत होत्या. दोन तसात सोनमर्ग आलं, चला आता मानवनिर्मित धोक्यांची शक्यता जवळजवळ नाही. नैसर्गिक अडथळे हा तर आमच्या साहसी पर्यटनाचाच भाग होता. 
दुपारचं जेवण आटोपून आम्ही जोझीलाच्या दिशेने निघालो. आमच्या लेह-लडाख सफरीची हे खरी सूरवात होती. जोझीला पास...... हाच तो पास जिथे कारगील युद्धाच्यावेळी जवानांच्या फलटणीच्या फलटणी युद्धातूर होवून निघाल्या होत्या. आज आणि उद्या आम्ही त्याच प्रांतातून मार्गक्रमण करणार होतो. कॅप्टनमोड ला गाड्या थांबवण्याच्या सुचना मी ड्रायव्हरना दिल्या होत्या पण बालतालच्या बरोबर समोर आमच्या गाड्या थांबल्या. काय झालं? एकदोन मिनीटं गाडीतच थांबून खाली उतरलो तेव्हा समजलं पुढे लॅन्डस्लायडींग झालं आहे. चला आता बसा. मी कमेरा घेवून आजूबाजूचे फोटो काढत होतो.
 पुढे दूरवर येणार्‍या ट्रकची लांबच लांब रांग लागली होती. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे (BRO) जवान रस्ता मोकळा करण्यात मग्न होते. तीथेच अर्धा-पाऊण तास गेला. रस्ता मोकळा झाला. आमची एक गाडी पुढे निघून गेली, मागे राहिलेल्या आमच्या दोन्ही गाड्यात जवान चालक होते. समोरून येणार्‍या वाहनांचा अडथळा नको म्हणून आमच्या ड्रायव्हरने कच्च्या रस्त्याला गाडी घातली. त्या उभ्या चढावर गाडी चढेना, मग आम्ही खाली उतरलो. मागून ढकलत एक एक गाडी वर चढवण्याचा प्रयत्न झाला पण तीसर्‍या प्रतत्नानंतर तो नाद सोडून पुन्हा मुळ मार्गावर परतावरं लागलं.
 त्या व्यापात एक तास वाया गेला. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते आणि बराच पल्ला पार करायचा होता. द्रास, कारगील आता काळोखतच येणार याची काळजी वाटायला लागली. रस्ता जेमतेम असल्याने गाड्या वेगातही धावू शकत नव्हत्या, पुढे एका वळणावर ती आमची पुढे गेलेली गाडी उभी होती. आमच्या गाड्याही थांबल्या. दोन्ही तरूण चालकांची बिनपाण्याने हजामत होत होती. पुढे जायचा नाद त्याना भारी पडला होता.                                         

5 comments:

  1. "हो नक्कीच नरेंद्र जी...मी आत्ता वाचले प्रत्यक्ष तुम्ही तिथला अनुभव सांगितला त्यामुळे जास्त मनाला भिडले...आणि शब्दातून तिथली परिस्थिती समजते...:))"
    "खूप छान माहिती दिली आहे....आपण प्रत्यक्ष ह्याचा अनुभव घेतला..:))"

    Santosh Chandrashekhar Joshi

    ReplyDelete
  2. फोटो आणि लेख उत्तम

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates