28 August, 2010

पुन:श्च हरिओम


शो मस्ट गो ऑन...!  हे पोस्ट टाकलं पण लडाखला त्या वेळी जाऊ शकलो नाही. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग बंद असल्यामुळे त्या वेळी नाईलाज झाला होता. आता ते मार्ग खुला झाला असल्याने पुन्हा लडाखला जायचं ठरलं आणि तो दिवस आता उद्यावर आलाय. उद्या श्रीनगर मार्गे लडाखला जायला निघणार आहे. लेहमध्ये ढगफुटी  झाल्या पासून तिथलं जीवन ठप्पच झाल आहे. ते आता हळू हळू पुर्व पदावर येत आहे. झालेलं नुकसान लवकर भरून येणं कठिण आहे. अठरा ऑगस्टला माझे मित्र आत्माराम परब लडाखला जाऊन तिथल्या मित्रांची विचारपूस करून आले. जे नुकसान झालं त्याचा अंदाज इथे बसून येणार नाही असं त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं. आता प्रत्यक्षात मी जात असल्याने मला ते सर्व पाहता येईल. बरोबर येणारे पर्यटक आणि आत्माराम यांच्या बहाद्दरीला दाद दिली पाहीजे. लडाखचा या वर्षाचा पर्यटनाचा हा शेवटचा महिना. लडाख मधला पर्यटकांचा ओघ कमी होता नये  हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही आताची ट्रीप जात आहे. आल्या नंतर त्याबद्दल लिहीनच. टूर पुन्हा सुरू झाली हे मात्र नक्की.

संगीतासारखा दूसरा विसावा नाही. आत्ताच Satyajit Prabhu a Tribute to Acoustic Melodies हा सतू वरचा संगीताचा बहारदार कार्यक्रम पाहून, ऎकून तृप्त झालो. ती उर्जा घेऊनच लडाखला जातोय. पुन्हा भॆटूच.     

21 August, 2010

बाळासाहेब नव्वदीत


दसावाच्या कार्यक्रमात करुणा देव आणि बाळ कुडतरकर 
नव्वद वर्षाचा युवा आवाज असं ज्याला आजही म्हणता येईल तो आवाज म्हणजे आकाशवाणीचे सदाबहार कलावंत बाळ कुडतरकर यांचा आवाज. बाळ कुडतरकर, निलम प्रभू (आताच्या करूणा देव) आणि प्रभाकर जोशी यांच्या आवाजाचं गारूड  सत्तर, ऎशी च्या दशकात सर्वानीच अनुभवलय. आकाशवाणीवरची नाटकं, श्रुतिका या अशा काही झोकात सादर होत की केवळ आवाजाच्या जादूवर सगळा प्रसंग डोळ्यासमेर तरळत असे. पुन्हा प्रपंच सारखी श्रुतिका ऎकतना तर ते प्रसंग डोळ्यासमोर घडताहेत असा भास होत असे. त्या काळात ज्यांनी आकाशवाणी ऎकली असेल त्यांना शब्दांची आणि आवाजाची ताकद काय असते त्याचा प्रत्यय आलाच असेल. गेल्याच वर्षी दादर सार्वजनिक वाचनालयातर्फे झालेल्या एक कार्यक्रमात बाळ कुडतरांना ऎकायची संधी मला लाभली होती. ( वाचा: आकाशवाणीचे मुकुटमणी (भाग:१) आणि आकाशवाणीचे मुकुटमणी (भाग:२))  

      हे कलाकार सुद्धा सरकारी नोकरीतच होते. पण आपल्या कामावर असलेली त्यांची अधळ निष्ठा आणि झोकून काम करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी मिळालेल्या संधीचं सोन केलं. तो काळ आता खुप मागे गेला, बरीच वर्ष त्यांचा आवाज ऎकायला मिळाला नाही तरी मनाच्या एका सोनेरी कप्प्यातून त्याचे प्रतिध्वनी अजूनही ऎकू येतात. आज लोकसत्ता मध्ये बाळ कुडतरकरांवरचा करूणा देव यांचा एक लेख वाचला आणि या आठवणी जाग्या झाल्या. लोकसत्ताचा लेख आपण वाचा: आमचेही बाळासाहेब!          

20 August, 2010

इपिक ब्राऊजर - भारतीयांचा भारतीयांसाठी



 भारतीयांचा भारतीयांसाठी 
सध्या मी इपिक ब्राऊजर च्या प्रेमात पडलोय. हा मस्त इंटर्नेट ब्राऊजर भारतीयांसाठी भारतीयांनी बनवलेला आहे. सर्वकाही भरतीय असून हा ब्राऊजर मराठी, हिन्दी, गुजराथी, कन्नड़, तेलुगु, बंगाली, तामिळ, मल्याळम, उर्दू आणि पंजाबीसहीत बारा भारतीय भाषांना पुर्णपणे सपोर्ट करतो. त्यासाठी आवश्यक असलेला वर्ड प्रोसेसरही यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. बहुतांश शब्द आपण कसेही टाईप केले तरी ते बरोबर केले जातात आणि त्याला पर्याय उपलब्ध करून दिले जातात.
इंटरनेटवरून कुठलीही गोष्ट डाऊनलोड करताना भिती असते ती व्हायरसची, पण इपिक मध्ये antivirus scanner अंतर्भूत केलेला आहे. आपण काहीही डाऊनलोड केले तरी ते स्कॅन करूनच घेतले जाते.
बाऊजर च्या डाव्या बाजूला असलेलं पॅनल खुप उपयोगी आहे नव्हे ती एक जादूच आहे. सर्वात वर असलेल्या India वर क्लिक केल्यास भारतातल्या बहुतांश भाषा तसचं राज्यांच्या बातम्या घेऊन हा ब्राओझर हजर होतो. महाराष्ट्राच्या बाबतीत लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, प्रहार  इत्यादी इ पेपर आपणास सहज पहाता येतात.
भारतीय वॉलपेपरचा खजिना, विंडोज एक्सप्लोरर, व्हिडीओ, कामचं लिस्ट, टायमर, फेसबूक, आर्कूट, ट्विटर सारख्या साईटस्, जिमेल, याहू मेल, गेम्स्, बुकमार्कस्, आणि अनेक गोष्टी या इपिक मध्ये आहेत.  खरच खुप उपयोगी ब्राऊजर आहे. नक्की वापरून बघा. हा ब्राऊजर आपण इथून फुकट डाऊनलोड करू शकता. कराच..! 
डाऊनलोड

19 August, 2010

लडाख मधला पर्यटकांचा ओघ कमी होता नये


लडाखच्या दिशेने जाताना आत्माराम परब सृष्टीसौदर्याची माहिती करून देताना
नितांत सुंदर अशा लडाखमध्ये ढगफुटी झाली आणि काही कळायच्या आतच तिथलं सगळं पालटून गेलं. गाव, घरं वाहून गेली. दोनशेवर माणसं प्राणास मुकली. सरकार आणि सामाजीक संस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. (माझा मित्र आत्माराम परब कालच इशा टुर्स तर्फे मदत घेऊन लडाखला रवाना झाला आहे.)  काल अभिनेता अमिर खान लेहला जाऊन आला. हा एक माणूसकी असलेला आणि पाय जमिनीवर असलेला अभिनेता. त्याने आपण मदत जाहिर केली आणि बॉलिवूडलाही आवाहन केलय. पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासन दिलय, तरीही तिथली जनता हवालदील झालीय. होणारच, देशातली इतर ठिकाणं आणि लडाख मध्ये फरक आहे तो मुख्य वातावरणातला. जवळ जवळ सात महिने कडाक्याची थंडी (वजा १० ते वजा १५) तपमान. या वातावरणात घराबाहेर पडण्याची कुणाची शामत होत नसते. त्या दरम्यान तिथले सर्व व्यवहार थंडावलेलेच असतात. लडाखला जे जावून आलेले आहेत त्यांना या परिस्थितीची पुर्ण कल्पना आहे. पुर्ण लडाख प्रांत या दरम्यान देशाच्या इतर भागापासून तुटलेला असतो. अशा विषम वातावरणात राहायचं असल्याने वर्षातल्या जेमतेम चार-पाच महिन्यातच तिथल्या लोकांना वर्षाची बेगमी करावी लागते. या चार महिन्यात जी कमाई होईल तीच्यातच पुर्ण वर्षभर गुजारा करावा लागतो.

हॉटेल बिजू मधली एक प्रसन्न सकाळ 
आजच आमचे मित्र (आमचे म्हणजे माझे आणि आम्हा लडाखवर प्रेम करणार्‍या मंडळींचे) लडाखच्या बिजू हॉटेल चे मालक आशिकभाईचा फोन होता. ते खुपच व्यथित झाले आहेत. ती ढगफुटी झाल्या पासून तिथले सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. तिथले आर्थिक व्यवहार मुख्यतः पर्यटनावर अवलंबून असतात आणि तोच व्यवसाय आता धोक्यात आला आहे. सहा ऑगस्ट नंतरची सगळी हॉटेल आरक्षणं पर्यटकांनी रद्द केल्याने आता पुढच्या हिवाळ्यात खायचं काय हा प्रश्न तिथल्या लोकांना सतावतो आहे.

अभिनेता अमिर खानची लेह भेट 
काल अभिनेता अमिर खानने नेमकं याच मुद्द्यावर बोट ठेवलं आणि तमाम भारतीयांना आवाहन केलं की त्यानी लडाखच्या पर्यटनाकडे सकारात्मक दृष्टीने पहावं. तिथला पर्यटनाचा ओघ कमी पडू देऊ नये. लडाख आता पुर्व पदावर आलं आहे. जेव्हा ही घटना घडली त्यानंतर लगेचच माझे मित्र आत्माराम परब यांनी लोकसत्ता मध्ये लेख लिहून पर्यटकांनी घाबरून जावू नये आणि लडाखसारख्या स्वर्गिय सौदर्याकडे पाठ फिरवू नये असं आवाहन केलं होतं. गेली पंधरा वर्ष सातत्याने लडाखला जाऊन तिथला निसर्ग लोकांच्या समोर आणलेल्या या जिप्सीच्या सूरात आपला सूर मिसळला पाहिजे.                

17 August, 2010

‘कॉमन वेल्थ’ मराठी अभिमानगीत







                                  स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी गोरेगावच्या
अ.भि. गोरेगांवकर शाळेच्या १६०० विद्यार्थ्यांनी मराठी अभिमानगीत एका सुरात म्हटलं. दूरचित्रवाणी संचावर बातम्यांच्या गदारोळात ही बातमी बघून खुप बरं वाटलं. संगीतकार कौशल इनामदार यांनी मराठी अभिमानगीताच्या माध्यमातून मराठीची एक असाधारण सेवा केली आहे. मराठीसाठी एवढी भव्य दिव्य गोष्ट गेली जवळ जवळ दोन वर्ष सात्यत्याने काम केल्यानेच ते करू शकले. या दोन वर्षात त्यानी बाकीची सर्व कामं बाजूला ठेऊन केवळ या गीताचाच ध्यास घेतला होता. सुप्रसिद्ध कवी, गीतकार, गझलाकार सुरेश भटांचे शब्द आणि ११२ प्रस्थापित गायक आणि ३५६ समूह गायक अशा ४५० हून अधिक गायकांनी गायलेलं हे गीत म्हणजे मराठी माणसासाठी एक स्फुर्तीगीतच आहे. सामान्य माणसांकडून (त्यात काही असामान्यही आहेत) प्रत्येकी पाचशे रुपये जमा झाले आणि त्या रकमेतून हे गाणं साकार झालं. त्या अर्थाने ही कॉमन वेल्थ आहे, मराठी माणसाची सांसकृतीक ठेव आहे. मराठीच्या हकासाठी आपण भांडत असतो पण मराठीसाठी असलेलं आपलं कर्तव्य तर आपण विसरलो नाहीना? असा प्रश्न मला पडला तो कौशल इनामदार यांचं फेसबूक वरचं आवाहन वाचलं तेव्हा. आपणही ते वाचा, विचार करूया आणि मुख्य म्हणजे कृती करूया. 

कौशल इनामदार यांचं फेसबूक वरचं आवाहन:
मराठी अभिमानगीताचा दुवा आपल्याला देत आहे. आपण जरूर ऐकावं, आवडलं तर आपल्या मित्रांनाही तो आनंद द्यावा. मराठीचा अभिमान जागृत करायचा असेल तर एक अहिंसक व्यासपीठ असणंही गरजेचं आहे, आणि संगीतापेक्षा संयुक्तिक माध्यम आणखी काय असू शकतं. अमराठी लोकांना आपल्या भाषेचा आदर करायला सांगण्याआधी मराठी लोकांमध्ये अभिमान जागृत करण्याची अधिक गरज आहे. सुरेश भटांचे शब्द ११२ प्रस्थापित गायक आणि ३५६ समूह गायक अशा ४५०हून अधिक गायकांनी गायलेलं हे गीत बाकी काही नाही तर एक चैतन्य जरूर निर्माण करेल यावर माझा विश्वास आहे. महाराष्ट्रगीताबाबत आपण एक चूक केली. ५० वर्षांमध्ये आपण या गीताशी रोजचा संपर्कही ठेवला नाही. आज मराठीच्या दुरवस्थेला आपली अनास्था हे एक मोठं कारण आहे. ही चूक आपण (मराठी माणसं) मराठी अभिमानगीताबाबतीत करू नये असं मला वाटतं. आज अ.भि. गोरेगांवकर शाळेच्या १६०० विद्यार्थ्यांनी हे गाणं एका सुरात म्हटलं. मराठी भाषेला छोट्या मुलांसारखा दुसरा ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर नाही! आपल्या माध्यमातून आपण हे मराठी अभिमानगीत पोचवलंत तर आमच्या कार्याला मदत होईल. धन्यवाद.

16 August, 2010

या मुजोरांना हीच भाषा कळते काय?



कायदा सर्रास धाब्यावर बसवणार्‍यांचंच हे राज्य आहे काय असा प्रश्न हल्ली वारंवार पडतो. सामान्य माणूस कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना धनदांडगे, राजकारणी, बिल्डर, व्यापारी मात्र कायद्याचं सतत उल्लघन करताना दिसतात. मल्टिप्लेक्स मध्ये मराठी चित्रपटांचे कमीत कमी ४४ खेळ लावले पाहिजेत असा कायदा आहे. त्यासाठी मल्टिप्लेक्सच्या मालकांना राज्य सरकारच्या करांतून कर सवलत मिळते. आजपर्यंत करोडो रुपयांची अशी कर सवलत घश्यात घालून हे मालक मोकळे झाले, पण ही सवलत घेताना किमान ४४ खेळांची अट हे मल्टिप्लेक्स मालक सोयीस्कररीत्या विसरले. कुणी हा कायदा त्यांच्या लक्षात आणून दिला तर त्याला ते भिक घालत नाहीत. मेहरबानी म्हणून मराठी चित्रपटांचे खेळ सकाळच्या वेळात आणि ते सुद्धा कामाच्या दिवसात लावले जातात. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करूनही त्यांना चित्रपटगृह मिळत नाही. चित्रपट कामगारांच्या संस्थेने वारंवार विनंती करूनही हे मुजोर मालक त्यांना दाद देत नाहीत. ज्या सरकारचा या मालकांवर वचक पाहिजे ते सरकार आणि कायद्याची अंम्मलबजावणी करणारे अधिकारी मालकांच्या ताटाखालची मांजरं बनली आहेत. अशा परिस्थितीत कायदा दाखऊन द्यायचं स्वातंत्र्य कुणी स्वातंत्र्यदिनाच्या पुर्व संधेला घेतलं तर ते चुक आहे काय? या मुजोरांना हीच भाषा कळते काय? सरकार आतातरी त्यांना वठणीवर आणणार काय? की पोलीस संरक्षणात हिंदी, गुजराती, तेलगू, मल्याळम चित्रपटांचे खेळ चालू ठेवून पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार?


मराठी माणसाने अस्मितेचा मुद्द उपस्थित केला की त्याला राष्ट्रीयत्वाचे धडे द्यायचे आणि तीच अस्मिता त्या चंद्राबाबूने दाखवली की त्याला कोंबडी वडे खिलवायचे? गिरण्यांच्या जमीनी बिल्डरांच्या घशात घालताना गिरणी कामगारांची देणीही थकवायची? बांद्र्याच्या सरकारी वसाहतीमधून सरकारी कर्मचार्‍यांना हाकलून ते श्रीखंड बिल्डरांसोबत वाटून खायचं? बांधकामांच्या ठिकाणी झालेल्या डासांच्या तावडीत मुंबईकरांना देवून मलेरीयाची जोपासना करायची? दिल्लीत कॉमनवेल्थ घोटाळा, मुंबईत जमीन घोटाळा, कायद्याचं राज्य मागणार्‍यांना काय द्या आणि बोला म्हाणायचं, असच जर चालणार असेल तर या मुजोरांना वठणीवर कोण आणणार हा खरा प्रश्न आहे.
     

15 August, 2010

सच्चा नाना



काही व्यक्तिमत्व अशी असतात की कोणत्याही परिस्थितीत, कितीही कठीण प्रसंगात ती आपला मुळ धर्म, स्वभाव सोडत नाहीत. नाना पाटेकर हा त्यातलाच एक, सच्चा माणूस. पराकोटीचं दारिद्र्य आणि नंतर आलेली सुबत्ता या दोन्ही वेळी आतला माणूस नानाने सतत जागता ठेवला. त्याचे नाटक, सिनेमे गाजत असताना बॉलीवूडचे नट नट्या जसे नखरे करतात तसे नानाने कधी केले नाहीत. जे काही असेल ते सरळ, साधं, सोप.  अभिनायाचं जबरदस्त अंग असलेला हा अभिनेता तोंडाला रंग फासून क्वचीतच सेटवर गेला असेल. भुमिका जगणारा आणि अभिनय हे काम नसून विरंगूळा आहे असं म्हणणारा नाना म्हणूनच अख्ख्या भारतीय सिनेजगतात उठून दिसतो.
नाना मातीत पाय असणारा कलावंत आहे. पुण्याजवळ आजूबाजूला जंगल असलेल्या त्याच्या गावातल्या घरात तो रहातो. निसर्गाशी एकरूप होतो. दुरदर्शन संच, वर्तमानपत्र, मोबाईल असल्या साधनांपासून स्वतःला आवर्जून दूर ठेवतो आणि हे करत असताना कलेची उपासना करतो. आपल्यातलाच माणूस शोधतो. एकाच वेळी बाळासाहेब ठाकरे आणि बाबा आमटेंवर पराकोटीचं प्रेम करतो. माझी ओंजळ अजून छोटीच आहे असं म्हणून अनेक संस्थांना कोणताही गाजावाजा न करता आर्थिक मदत करतो. (आनंदवनात त्याने केलेल्या मदतीतून इमारत उभी राहिली, पण त्याचा उल्लेख कुठेच नको असं नानाने सांगितलं हे मी विकास आमटेंच्या तोंडून ऎकलं तेव्हा थक्क झालो होतो.)

आज हे लिहिण्याचं कारण म्हणजे आयबीएन लोकमतवर ग्रेट भेट मध्ये काल रात्री नाना पाटेकरची एक छान मुलाखत ऎकली. आजही ती दुपारी बारा वाजता पुन्हा ऎकता येईल. जरूर ऎका आणि नानाचा सच्चेपणा अनुभवा. (नाना खरच मोठा माणूस त्याला अरे तूरे करण्याचा उद्देश नाही, पण सचिन तेंडुलकर, गावस्कर ही माणसं देव माणसं वाटतात. तसं गणपतीलाही आपण अहो जाहो कुठे करतो?)                      

13 August, 2010

आक्रोश







डोळ्यात आसवांची धग ही अजून ओली
अवचीत पावसाची सर ती सरून गेली

तो हुंदका कुणाचा दाबीत ओठ होता
आक्रोश वेदनांचा कानात येत होता

रंगात रंगलेला तो आसमंत गेला
चिखलात रंग सारा बेरंग होत गेला

मातीच माणसाची घटका भरून गेली
अन उब माऊलीची घटकेत दूर झाली

जो थांबला जरासा, त्याला नसे निवारा
करीती अजून दंगा, पाऊस, उन, वारा

नरेंद्र प्रभू

11 August, 2010

धीरे धीरे जींदगी की रप्तार तेज हो रही है।


कुठून सुरू करू? कसं सावरू?
गेले आठ-दहा दिवस मनाला शांती म्हणून नाही. माझा मित्र चेतन गेला त्यातून सावरतो न सावरतो तोच लेह लडाख मधली ढगफुटी झाली आणि पुन्हा हादरून गेलो. तिथे अजून चारशेच्यावर माणसं बेपत्ता आहेत. अतिशय विरळ लोकसंखेचा हा प्रांत, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली म्हणजे आलेल्या प्रलयाची कल्पना येऊ शकते. निसर्गाशी दोन हात करत जगणारी तिथली मंडळी या आघातानंतरही पाच दिवसात कामाला लागलीत. आणखी जेमतेम एकच महिनाचा वेळ त्याना सावरायला मिळणार आहे. नंतर तिथला हिवाळा सुरू होत आहे.

तिथल्या कणाकणात, वातावरणात अध्यात्म भरून राहिलं आहे. लडाखला गेल्यावर आपल्याला त्याचा प्रत्यय येतो. आनंद हा तिथला स्थायीभाव आहे. बर्फाच्या पांढर्‍या रंगातूनही सप्त रंग निर्माण करण्याची कला ते लोक जाणून आहेत. कितीही कष्ट करायची त्यांची तयारी आहे. ढगफुटी नंतर गुंफेत आश्रयाला गेलेले लोक आता आपल्या घरांकडे परतत आहेत. लेह मनाली राष्ट्रीय महामार्ग छोट्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग अजून बंद आहे. नुकतीच नीमू ते लेह वाहतूक सुरू झाली आहे. दोन्ही बाजूची ट्रक वाहतूक लवकरार लवकर सुरू होवूदे. जेणे करून त्या भागातला पुरवठा पुन्हा सामान्य होईल. थोडक्यात, धीरे धीरे जींदगी की रप्तार तेज हो रही है।            


आपण प्रार्थनाच करू शकतो!.  

10 August, 2010

पद्मा संकटात आहे...!

सागर सावंत, मुक्तार,आत्माराम,दोन चालक आणि पद्मा 

पद्मा’, लडाखला जातोय म्हटलं की तिथे आधार देणारी नाव सर्वप्रथम तोंडावर येतात त्यातला अग्रणी. हसतमुख आणि मदतीला तत्पर. निसर्गताच प्रतिकूल वातावरणात राहणारा, पण त्या निसर्गाला आपला मित्र मानून जिद्दीच्या जोरावर वर येऊ पहाणारा. स्वतःच्या मनगटावर त्याचा विश्वास, सतत कार्यरत राहणारा. प्रथम एक गाडी, मग दुसरी असं करत करत त्याने आपला ट्रांन्सपोर्टचा छोटासा उद्योग सुरू केला. जेमतेम चार महिने चालणार्‍या लेह-लडाखच्या हंगामात असा धंदा करणं म्हणजे साहसच. इतर ठिकाणी वाटतं तेवढ सोपं काम नाही ते. घराच्या आसपास असलेल्या जमिनीतही तो कसायचा. तिथली शेतीही तीन महिन्यांची. चार महिने कष्ट करायचे  आणि जी कमाई होईल त्यातच वर्षभर गुजराण करायची.

या सगळ्या पायर्‍या पर्यंत चिखल भरून गेला. 
हेच ते मनोहारी पर्वतकडे जे काळ ठरले.

  
या वाटेवरून पुन्हा कधी चालता येईल का? 
पद्माचं साबू हे गाव लडखमधलं मॉडेल व्हिलेज. ते पहायला पर्यटकांची तिकडे ये जा असायचीच. इशा टुर्सचे पर्यटक तर तिकडे हमखास जायचेच. इशा टुर्सच्या आत्माराम परबांनी पद्माला कायम मदतीचा हात पुढे केला होता. त्यांचा पाठींबा असल्यानेच घराच्या बाजूलाच पद्माने चार खोल्यांचं गेस्ट हाऊस बांधलं. गेल्या रविवारी त्याचं उद्घाटन व्हायचं होतं. पण नियतीच्या मनात वेगळाच डाव सुरू होता. पद्माच्या घर, दार, अंगणातून सतत दर्शन देणारे मनोहारी डोंगरच काळ होऊन त्याच्या घराच्या दिशेने झेपावले. येताना विनाशात कसूर रहायला नको म्हणून त्यांनी दगड ढोंडे काठ्या जे मिळेल ते आणलं. काही कळायच्या आत त्याच्या घराचा खालचा मजला पण्यात गेला, सगळीकडे चिखलाचं साम्राज्य. वेळ पण अशी की जी शत्रूवरही येऊ नये. भर मध्यरात्री सगळीकडे अंधकार असताना लडाखमध्ये कधी न पडणारा पाऊस आकाशीची कुर्‍हाड होऊन बरसला आणि काय होतय ते कळायच्या आत होत्याचं नव्हतं झालं. घारात चिखल घुसला, गेस्ट हाऊस चिखलात बुडून गेलं. शेतीत चिखल भरल्याने त्या शेतीला तो कायमचा मुकला. घराशेजारी उभी असलेली जीप आणि बस नाहीशी झाली (दुसर्‍या दिवशी ती बस चोळामोळा होऊन अठरा कि.मी. अंतरावर आढळली, जीपचा अजून पत्ता नाही) एवढ सगळ झालं पण आम्ही भाग्यवान म्हणायचे पद्मा आणि त्याचे कुटुंबीयांची जीव त्या प्रलयातून वाचले. आता पुढचं जीवन त्याच्या समोर प्रश्नचिन्ह होऊन उभं आहे. त्याला मदतीचा हात द्यायचाय. सगळे लोक लडाखमधून सुटका करून घेत आसताना (काही विदेशी पर्यटक सोडून) इशा टुर्सची १२ ऑगस्ट २०१० ची सहल ठरल्या प्रमाणे न्यायचा निर्णय आत्मारामने घेतला. उद्देश एवढाच, लडाखींचा मान राखूनच त्यांना मदत करायची. पण आज सकाळ पर्यंत हरप्रकारे प्रयत्न करूनही आम्हाला त्या निसर्गाच्या रौद्ररुपामुळेच माघार घ्यावी लागली. पुढे जाण्यासाठी तुर्तास एक पाऊल मागे टाकलय. पण १८ ऑगस्ट २०१० ला आत्माराम केवळ आमच्या लडाखी मित्रांना भेटण्यासाठी, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुद्दामहून जाणार आहे. अली, मुक्तार हे आपले आणखी काही मित्र, त्यांचा अजून पत्ता लागलेला नाही. जे काही फोन लागले त्यातून एवढच समजलं. हे हिमनगाचं टोक आहे हे नक्की. त्या गावातल्या प्रत्येक घराची हीच कथा आहे. प्राणाला मुकले ते चिखलात गाडले गेले. वाचले ते उघड्यावर आहेत. एवढं असूनही पद्मा आमचं स्वागत करायला तयार होता. त्याला आणि इतर लडाखी मित्रांना एकाकी पाडून चालणार नाही. त्यांना मदतीचा हात द्यायलाच पाहीजे. आम्ही कामाला लागलोय आपणास मदत करायचीय ना? आपण ती करू शकता.
हाच हात मदत मागतोय.
An Appeal from Team Isha Tours

Mr Atmaram Parab will be flying to Leh on the 18th of August and we request you to send in your donations before that date to facilitate the disbursement of the funds to the right people.
This is an informal attempt at fund collection purely on humanitarian grounds , because of our 10 year relationship with Ladakh and Leh, hence no formal receipts will be issued . But a letter of thanks for the money received will be given to every individual contributor (with the amount of contribution mentioned) to serve as proof of receipt.
Funds in the form of cash or cheque can be handed over at our offices in Thane, Dadar and Borivali .Cheques will have to be made out in the name of ISHA TOURS. . For those who wish to transfer funds Online :-

SBI Current  Acc NO : 31077059976
Account Name -   ISHA TOURS .
The ISFC code :- SBIN0005354.

In the case of Online transfer kindly mail or Sms the details (alongwith Name, Contact details and amount transferred) to us so as to enable us to make a note and issue a letter for the same.
For any Queries our addresses and contact nos are as Follows:
Thane: 1A , Murlidhar CHS, Behind Godbole Hospital, Brahman Soc, Naupada, Thane west. Ms 
Vidya Parab  - 09320231910

Dadar- Hendre Castle, Opp Bharat Petroleum Pump , Gokhale Road (North) , Dadar West, Mumbai.  Ms Smita Rege Tel - 09320031910

Borivali– 103 Sai Adarsh, Plot no 447, Off Link road, Borivali (West) 
Ms Anila Naik Tel – 09324531910

TEAM ISHA TOURS.
Smita.ishatour@gmail.com                            

08 August, 2010

साद देती हिमशिखरे




लडाख असा नुसता शब्द उच्चारला तरी अंगावर रोमांचं उठायचे पण त्या ढगफुटीने सगळं बदलून टाकलं. आता लडाख म्हटलं की काळजीच जास्त वाटते. तिकडचे आमचे काही मित्र त्या ढगफुटीने प्रभावीत झाले आहेत. तिथलं संकट आसमानी आहे. १२ ऑगस्ट ला श्रीनगर मार्गे लडाखला जायचं आहे. थोड्या थोड्या वेळाने जाणार्‍या मंडळींचे फोन येत आहेत. लडाखला जे झालं ते झालं, होऊन गेलं.

नुकताच दिपक घोलपांचा फोन येऊन गेला. त्यानी महाराष्ट्र सरकारच्या दिल्लीस्थित हेल्पलाईनला फोन केला होता. कारगील-लेह रस्ते वाहतूक सुरू व्हायला अजून सहा-सात दिवस लागतील असं त्यांना सांगण्यात आलं. आज पासून सातव्या दिवशी आम्ही लेहला असणार आहोत. म्हणजे सात दिवस लागले तरी आपण जाणार तेव्हा रस्ता नक्की खुला झालेला असणार. पण मला वाटतं त्या आधीच पुढील दोन दिवसातच रस्ते खुले झाल्याची बातमी येईल. लष्कराच्या अभियंत्यांनी आधीच कामाला सुरूवात केली आहे. बातम्या पुढील प्रमाणे आहेत.

“The arrangements for dispatch of the bodies of non-local deceased persons are being made. Repair work on the Srinagar Ladakh National Highway is also being conducted by HIMANK,” an official spokesman said.

IGP Kashmir Farooq Ahmad said police, army, CRPF, ITBP men are carrying out the rescue operations. “Even some foreign tourists have joined the rescue operations. About 500 persons are missing,” he said.

They said in addition, satellite and radio communications have been established at important locations by the army. “The Army engineers are clearing the landslides and launching the essential bridges, so as to open both the highways to traffic,” the officials added.

More>>>

आणखी एक सकारात्मक बातमी:

Curfew lifted from Kashmir Valley, life returns to normal


07 August, 2010

शो मस्ट गो ऑन...!



मन मानत नाही तरी चार दिवसांपूर्वी माझा प्रिय मित्र चेतन जानी गेला ही गोष्ट खरी आहे. तो निघून गेला पण मागे उरलेल्यांना त्यांचं काम केलच पाहिजे. किंबहूना अधिक जोमाने काम केलं पाहिजे. अंत्यविधीला जाऊन आलो, नातेवाईकांना भेटून आलो. पुढच्या आठवड्यात चाळीस जणांना घेऊन सहलसाठी म्हणून लेह-लडाखच्या टूरवर जायचं म्हणून तयारीला लागलो (म्हणजे कामं आटोपायच्या) तर ती ढगफुटीची बातमी आली. पहिल्यांदा काहीच संपर्क होत नव्हता. नेमकं काय झालयं? कुठे झालय? दुरदर्शन वाहिन्यांवर दाखवतात तेवढं त्याला महत्व द्यायचं काय? (चलचित्र लेहची आणि बाकी भाष्य स्टुडीओमधलं अशी तर्‍हा असते.) दुरदर्शन आणि आकाशवाणी वरच्या बातम्या ऎकलेल्या बर्‍या. अशा अवस्थेत कालचा दिवस काढला. आज मात्र लेहला फोन लागले. आमचा मित्र पद्मा सुखरूप आहे. नव्या लेह शहराला त्या ढगफ़ुटीची झळ पोहोचलेली नाही हे समजलं. कारगील-लेह हा राष्ट्रीयमहामार्ग निमू गावाजवळ पूल वाहून गेल्याने बंद आहे हे समजलं. दुसरीकडे लेह-मनाली हा मार्गही बंद आहे. पण हे दोन्ही मार्ग दोन दिवसात सुरू होतील, ब्रोची माणसं कामाला लागली आहेत. लेह मध्ये सामान्य नागरीकांपेक्षा सैनिकच अधिक आहेत, शिवाय सीमावर्ती भागाशी संपर्क तुटलेला ठेवणं देशाला परवडणारं नाही. थोडक्यात परिस्थिती चार दिवसात पुर्ववत होईल. ज्या आमच्या मित्राचा मी वर उल्लेख केला त्या पद्मा च्या घरातही पाणी शिरलं, शेतीवर चिखल चढला. तो स्वतः त्या परिस्थितीतून सावरला आहे आणि आम्ही तिकडे येणार म्हणून वाट बघत आहे. सब ठिक हो जायेगा आप आ जाओ असे त्याचे धीराचे शब्द आहेत मी स्वतः Wait and Watch’ पेक्षा ‘Show Must Go On’ वर विश्वास ठेवतो. बारा ऑगस्टची बँच जाणारच.          
       

06 August, 2010

लेहमध्ये ढगफुटी



जम्मू काश्मीरातील लेह भागात काल गुरुवार मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अनपेक्षीत ढगफुटीमुळे मोठी जीवित आणि वित्तहानी, तसच मालमत्तेचं नुकसान झालं आहे. श्रीनगर-लेह तसच लेह-मनाली राष्ट्रीयमहामार्ग बंद झाले असून लष्कराच्या सहा हजार जवांनांनी तत्काळ मदतकार्य सुरू केलं आहे. पुरामुळे अनेक घरे तसेच नदीवरील दोन पूल वाहून गेले आहेत. सीआरपीएफचा कॅम्प, भारत संचार निगमचं मुख्य कार्यालय यांना मुख्यता हानी पोहोचली असून विमानवहातूकही बंद आहे.
लडखमध्ये असे ढग जमा होतात पण ते बरसतातच असे नाही. हा फोटो माझ्या जुलै २००७ च्या सहलीमधला आहे. 
  
वर सांगितल्या प्रमाणे बातम्या प्रसारमाध्यमातून सांगितल्या जात आहेत. मात्र दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून दाखवण्यात येणारी छायाचित्र जुनी असून अजून पर्यंततरी मिडीया तिथे पोहोचलेला नाही. येत्या १४ ऑगष्टला आम्ही एकेचाळीसजण कारगील-लेह मार्गावर असणार आहोत. तो पर्यंत लेहकडे जाणारे दोन्ही रस्ते नक्की सुरू होतील. अजून आठ दिवसांनी तिथलं जनजीवन मार्गावर येईल यात शंका नाही. परवाच या सहलीसाठीची माहिती घेण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो तेव्हा कुणीतरी तिथे पाऊस पडतो का म्हणून विचारलं होतं. लेह मध्ये संपुर्ण वर्षात पाच मी.मी. एवढाच पाऊस पडतो आणि बर्‍याच वेळा तो बर्फवृष्टीच्या स्वरूपात असतो. नजिकच्या इतिहासात अशी घटना प्रथमच घडली असून नक्की काय झाले आहे त्याचा अजून नेमका अंदाज येत नाही. लेह मध्ये असलेले आमचे मित्र पद्मा ताशी, आशिक हुसेन यांच्याशी माझे मित्र आत्माराम परब (संचालक इश टुर्स) वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून अजून संपर्क होत नसल्याने फोन सेवा सुरळीत सुरू झल्यानंतरच परिस्थितीचा अंदाज येऊ शकेल.

लडाख सारख्या दुर्गम भागात सहलीवर जाणं यामुळेच काहीअंशी नशीबावर अवलंबून असतं. सहलीत सहभागी झालेल्यांना एवढच सांगणं आहे की त्यांनी गडबडून जावू नये. दोन तीन दिवसात तिथल्या स्थितीचा अंदाज आल्यावर पुढील निर्णय घेता येईल. तो पर्यंत सर्वकाही मार्गावर याव म्हणून प्रर्थना.

04 August, 2010

चेतन अचेतन झाला आणि......!



चेतन गौरीशंकर जानी, माझा जीवाभावाचा मित्र, काल परवापर्यंत हसत खेळत आमच्यात वावरणारा, काल अचानक आम्हाला सोडून गेला. चार दिवसाचा ताप हे तात्कालीक कारण पण आत होणारा त्रास ना त्याने कुटुंबियांना सांगितला ना मित्रांना.काम हाच त्याचा आराम होता. आजारी असताना सुद्धा तो काम करत राहिला. कंपनीसाठी, कुटुंबासाठी, त्याचं मात्र जगणं राहून गेलं, पान्नासीचं वय हे काय जगाचा निरोप घेण्याचं असतं? बरं चांगलीच माणसं अशी जातात. लोकांना मदत करण्यात चेतन कायम आघाडीवर असायचा. कुणाच निधन झालं तर प्रसंगी रजा काढूनही तो अंत्यविधीसाठी हजर रहायचा, सामान जमवण्यापासून सगळं करायचा. लोकांना खांदे देता देता स्वात:च कधी खांद्यावर आला समजलच नाही. मन मानायला तयार नाही पण उद्या कांगाला गेलो की चेतन जानीची खुर्ची खाली असणार. कंपनीचा ताळेबंद नीट करता करता स्वतःच्या जीवनाची खेळी मात्र तो अर्ध्यावर टाकून गेला. त्याच्या खर्चाची बाजू अपूर्ण राहीली. चेतन गेला आणि एक चैतन्य काळाच्या पडद्याआड गेलं. अजून खुपशे डाव खेळायचे राहून गेले. परवाच फ्रेंडशीप डे होऊन गेला. आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा फ्रेंडशीप डेच होता. असा मित्र मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती आता तो नाही हे माझं दुर्दैव. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.  
    

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates