31 July, 2010

खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर



तीन बाजूला कृष्णानदीचा किनारा लाभलेलं खिद्रापूर हे गाव तिथे असलेल्या पुरातन कोपेश्वर मंदीरामुळे खरं तर उभ्या भारताला माहित असलं पाहिजे होतं. पण भारताचं जाऊद्या, महाराष्ट्राची भटकंती करणार्‍या बर्‍याच जणांना त्याची गंधवार्ताही नाही. मलासुद्धा माझे मित्र रत्नदिप पाटील यांच्या मुळे एवढ्या सुंदर जागेची माहिती मिळाली आणि लगोलग मी त्या अप्रतीम मंदिराला भेट दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूर रल्वे स्टेशनला उतरून मी प्रथम नरसोबाच्या वाडीला गेलो. (दत्त अवतार नरसिंहसरस्वतींच दर्शन घेणं हा एक उद्देश होताच.) नरसोबाच्या वाडीहून कुरूंदवाड मार्गे खिद्रापूर हे अवघं १६ कि.मी. एवढंच अंतर पार केलं की आपण कोपेश्वराच्या प्राचीन मंदिरापाशी येऊन पोहोचतो. मंदिराच्या प्रवेश द्वारात येईपर्यंत आतील सौंदर्याची कल्पना येत नाही. पण आत नजर जाताच कोपेश्वर मंदिराचं अप्रतिम शिल्प नजरेश पडतं आणि आपण स्तिमीत होऊन जातो.

शैव आणि वैष्णवपंथाच्या एकात्मतेचं प्रतिक म्हणून या मदिराकडे पाहिलं जातं. सुमारे दिड हजार वर्षापुर्वी आपल्या देशात वास्तुशास्त्र आणि शिल्पकला किती बहराला आली होती त्याचा हे मंदिर म्हणजे उत्कृष्ट नमुना आहे. शंकराचं मंदिर असलं तरी सभामंडपात नंदी नाही आणि गाभार्‍यात शिवलिंगाजवळच विष्णूची प्रतिमा म्हणून शाळुंखा स्थापित केली आहे. मुख्यमंडपात असलेलं स्वर्गद्वार, तिथल्या खांबांवर आणि भिंतीवर असलेलं कोरीवकाम यातून जशा पुराणातल्या अनेक कथा जिवंत होतात तसच सोळा किर्तीमुखांचं उत्कृष्ट शिल्प नजरेस पडतं. स्वर्ग मंडप एकूण ४८ खांबांवर उभा आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस खाली गजपट्टी, वर शंकर, विष्णू, गणेश अशा अनेक देवदेवतांबरोबरच स्त्रि-पुरूषांची शिल्पं पहायला मिळतात.
 
अजंठा आणि वेरूळ इथल्या शिल्पकलेहून काकणभर सरसच असा असलेली हा शिल्पखजिना दुर्लक्षित झाला आहे हे मात्र नक्की.                           



























27 July, 2010

उत्साहाचा झरा


मरगळलेलं मन, उदास वतावरण, काळजी, चींता अशा अनेक गोष्टींमुळे मनात मळभ दाटून येतं आणि नेमक्या त्याच वेळी एखाद्या मित्राचा फोन येतो.............. बोलणं संपतं.......... आणि आधी दाटून आलेले ते कृष्णमेघ पार नाहीसे होतात. लख्ख प्रकाश पडतो. आपण उत्साहने कामाला लागतो. उदास वाटणं किंवा उत्साही वाटणं या आपल्या मनाच्या आत दडलेल्या लाटा, कधी कुठची येवून थडकेल सांगणं कठीण. हेच मन मग आपल्याला विचारांच्या खोल खोल गर्तेत घेवून जातं. आणि तेवढ्याच वेगात तेच मन उभारी घेतं. असं होतं खरं. प्रिय व्यक्ती भेटणं, चांगले विचार, लेख वाचनात येणं, या जन्मावर... या जगण्यावर...... शतदा प्रेम करावे.... सारखं गाणं,  कारणं काहीही असोत पण मनाला उभारी येते, चैतन्याचा झरा पुन्हा वाहू लागतो हे महत्वाचं. आजच माझ्या मित्राचा फोन आला आणि मला अशी अनुभूती आली, ती आपल्या पर्यंत पोहोचवली एवढच.        

23 July, 2010

युनिकोडची संगणकावर स्थापना


संगणकावर अनेकाना मराठीतून लेखन करायचे असतं. परंतू अनेक अडचणींमुळे ते राहून जातं. समजा मराठी मधील एखादं सॉप्टवेअर टाकलं तरी मग किबोर्डवरची नेमकी कोणती की दाबली असता आपणाला हवे असलेली अक्षरं उमटलतील अशा संभ्रमात मंडळी पडतात. शिवाय फॉन्ट चा अडथळा असतोच. त्यातून पार पडलं तरी आपण पाठवलेलं लिखाण दुसर्‍या व्यक्तिच्या संगणावर नीट दिसेल का? अशी शंका उरतेच. अशा मित्रांसाठी युनिकोड ही प्रणाली अस्तित्वात आहे. आपल्या संगणकावर असलेल्या विंडोज प्रणालीमध्ये त्याचा अंतरभाव केलेला आहे.

विंडोज एक्स्पी असलेल्या संगणकात युनिकोड इंस्टॉल करण्यासाठी पुढील पायर्‍या आहेत.

·         Start > Control panel > Regional and Language options या ठिकाणी गेल्यावर वरच्या बाजूला असलेल्या Languages वर क्लिक करा.

·         विंडोज एक्स्पीची सीडी सीडी-ड्रायव्हरमध्ये घाला.

·         चौकटीच्या दुसर्‍या भागात खाली Supplemental language support म्स्धल्या दोन पर्यामधील Install files in complex and right-to-left languages (including Thai) हा पिहला पयार्य निवडा.

                         
                         
·         प्रथम Apply आणि नंतर OK या बटनांवर खुणांवर क्लिक करा.

·         आता आपल्या संगणकावर युनिकोडाची  प्रणाली उतरवून इंस्टॉल केली जाईल.

·         संगणक  Restart करण्याची सूचना येईल तसे करा.

·         आता आपल्या संगणकावर युनिकोड कायर्रत झालेले असेल.

·         आता आपल्याला आपल्या संगणकावरचा देवनागरीमधला मजकूर दिसू लागेल.

·         संगणकावर असलेल्या नोटपॅड, वर्ड वैगेरे प्रणालींचा वापर करून आपल्याला फोनोटिक प्रकाराने (इंग्रजीच्या उच्चाराप्रमाणे लिहिणे) मराठी लेखन करावयाचे असेल तर आपणाला अजून एक गोष्ट करावी लागेल.

  • मायक्रोसॉप्टच्या http://download.fyxm.net/Indic-IME-53429.html या संकेतस्थळावरून marathi.ime  ही झिप प्रकारातील फाईल उतरवून घ्या.
  • ही उतरवून घेतलेली फाईल unzip करताना REL-WBDLIC-EXT-IME-Marathi-05-Mar-2008 अशाप्रकारचा फोल्डर दिसेल, त्या मधली setup ही फाईल रन करा. दिलेल्या सुचनांचं पालन करा.



·         आता आपल्याला संगणकावर मराठी किबोर्ड इंस्टॉल करावा लागेल. त्यासाठी  Start > Control panel > Regional and Language options वर जा या ठिकाणी गेल्यावर जी चौकट उघडते त्यातील Details वर क्लिक केल्यावर पुढील प्रमाणे चौकट उघडेल.

                         
                         
·         या चौकटीतल्या Add या खुणेवर क्लिक करा.
·
·          Add Input Language अशी खूण असलेली एक लहान चौकट उघडेल. त्या चौकटी मधल्या Input language मध्ये Marathi ची निवड करा. नंतर Keyboard layout/IME मध्ये Marathi Indic IME ची निवड करा.


·         OK वर क्लिक करा. आता दुसर्‍या चौकटीत Apply  व नंतर Ok वर क्लिक करा.

·         आता टास्कबारच्या ठिकाणी उजवीकडे MA अशी खूण येईल. तिथे EN अशी खूण दिसत असेल तर Alt आणि Shift  एकाच वेळी दाबून MA ही खूण आणता येईल.

  • आता आपल्या संगणकाच्या टास्कबारच्याठिकाणी language option EN/MA दिसू लागेल
  • नोटपॅड, वर्ड वैगेरे प्रणालींचा वापर करून MA वर क्लिक करून आपल्याला मराठी लेखन कराता येईल. असे करताना कंट्रोल पॅनेलच्याठिकाणी खाली दिल्या प्रमाणे दिसू लागेल.   
 
   

आता आपण फोनोटिक प्रकाराने (इंग्रजीच्या उच्चाराप्रमाणे लिहिणे) संगणाकावर लिहू शकाल. 

18 July, 2010

आपण जे खातो, तसे आपण होतो


सतरा जुलैच्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत वैपुल्य आणि वैफल्य हा छाया दातार यांचा फारच सुंदर लेख आला आहे. अमेरिकेतील जीवनशैली विशेषत: खाद्यशैलीवर छायाताईंनी खुपच छान प्रकाश टाकला आहे. एका कॅलरीसाठी दहा कॅलरी खर्च होणारी उर्जा, ग्लोबल वॉर्मींग, ल्कायमेट चेंजसारख्या गंभीर विषयांकडे केले जाणारे दुर्लक्ष, फास्ट, कनव्हिनियंट, चीप हा मंत्र. मासासाठी जनावरांना नेहमीचं अन्न सोडून प्रक्रिया केलेलं अन्न खायला लावणं असे अघोरी प्रकार, हेच पदार्थ नंतर माणसांच्या खाण्यात आल्याने त्यांच्यावर होणारे विपरीत परिणाम, येणारा लठ्ठपणा हे त्या लेखातले प्रमुख मुद्दे आहेत. हा लेख मुळातूनच वाचण्याजोगा आहे म्हणून इथे त्याची लिंक देत आहे. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=86398:2010-07-16-08-48-20&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194 तो लेख आपण जरुर वाचावा. पण पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे आपण शहरी भारतीय सुद्धा यात मागे नाही. प्रसार माध्यमातून हल्ली त्याची चर्चा सुद्धा होत असते. पण लक्षात कोण घेतो! आपल्या शहरात, आजुबाजुला पुढील प्रकारच्या गोष्टी नेहमी घडत असतात तिकडे खरच आता जाणीवपुर्वक बघणं आवश्यक झालं आहे.
 
  • लहान थोरांच्या खाण्यात येणारी जंक फूडस्.
  • रसायनांचा वापर करुन पिकवलेली फळफळावळ.
  • कोंबडीच्या पिल्लांना हार्मोंसची मात्रा देवून बारा महिन्यां ऎवजी चार महिन्यात विक्री योग्य बनवणे.      
  • रंगवलेल्या भज्या.
  • दुधातली भेसळ.
  • मॅकडोनाल्ड, केंटूकी सारख्या अमेरिकी खाद्यपदार्थ पुरवणार्‍या दुकानात होणारी गर्दी.  
ही यादी आणखीही वाढवता येईल पण महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण या चक्रामधून सुटणार कसे? अमेरिकेप्रमाणे आपल्या आजुबाजुलाही खाण्यामुळे आलेला लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो. आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे ते जंक फूड खाणं हे प्रतिष्टेचं मानलं जातं. ऑफिसच्या कॅंटीन मध्ये जर कुणी पोळी-भाजी खाणारा दिसला तर त्याच्याकडे कधी सुधारणार हा अशा नजरेने पाहिलं जातं. पुर्वी ऑरगॅनीक म्हणजे सेंद्रीय खतं वापरलेलेच अन्न पदार्थ, फळफळावळ, भाज्या खाणारे आपण भारतीय रसायनयुक्त शेतमालाला कधी सरावलो ते आपलं आपल्यालाच समजल नाही. फळांचा राजा हापूस, त्याची ती अप्रतीम चव आता फक्त आठवायची, त्याचा स्वाद केमिकल्सनी कधीचा नाहीसा केलाय. नुकताच बोर्डीला जावून आलो तिकडे आंबे, पपई यांची चव चाखली, स्वाद घेतला मन तृप्त झालं. ती फळ संद्रीय खतांवर वाढलेल्या झाडांना लागलेली होती आणि नैसर्गीकरीत्या पिकलेली होती. अमेरिकेला हसता ह्सता तेच दु:ख आपल्या दारीही उभं ठाकलय, जरा विचार करायला हवा.                   

16 July, 2010

छत्री


त्री, डोक्यावर असली की कसं सुरक्षित वाटतं. उन्हा-पावसापासून जसं संरक्षण मिळतं तसं दुष्ट कावळ्याने जरी नेम धरून कार्यभाग उरकला तरी छत्री असली, म्हणजे..., डोक्यावर उघडी असली की त्या कावळ्याचा हेतू सफल होत नाही. अगोदर फक्त राजे-रजवाड्यांच्याच डोक्यावर असणारी छत्री आता सगळेच जण राखून असतात. चीन्यानी तर तिची किंमत एवढी कमी केली आहे की संक्रांतीला वान म्हणून कुणी छत्र्या वाटल्या तर फारसं आश्चर्य वाटायला नको. पण या चीनी छत्र्या राजकारण्यांनीच वाटाव्यात, मतादानाच्या आधी वाटल्या की निवडणूकीचा निकाल लागेपर्यंत मोडल्याच म्हणून समजा, अगदी त्यांच्या आश्वासनांसारख्या. असो.. ही छत्री ज्याने कुणी शोधून काढली त्याचं मला नेहमी कौतूक वाटतं. त्या छत्रीचा आकार आणि रचना मला नेहमीच भुरळ घालत आलीय. छत्री उघडताना एखाद्या धनुर्धराच्या आवेशात ती उघडावी आणि अस्मानी संकटापासून मुक्तता करून घ्यावी. पण बटनछत्री आल्यापासून तो रुबाब राहीला नाही. बटनछत्री उघडायला गेली की कित्येकदा ती उघडण्या ऎवजी क्षेपणास्त्रासारखी दुसरीचकडे जाऊन पडते आणि लॉंचींग पॅड सारखा दांडा हातातच राहतो. शिवाय इज्जतीचं खोबरं होतं ते वेग़ळच. आजुबाजुचे लोक अशा काही नजरेने आपल्याकडे बघतात की ही जगातली अशी पहिलीच घटना असावी. तो पर्यंत आपण लाजुन चुर..., छत्री चिखलाने माखलेली...., आणि वरून पाऊस असल्याने भिजलेले.... ठासणीची बंदुक काखेत धरून त्यात दारू भरावी तसा दांड्यात दांडा अडकवेपर्यंत आपण घामाघूम होतो. इतका वेळ गुप्ती प्रमाणे बाळगलेली ती छत्री आपले सुप्तगुण दाखावयला सुरवात करते. तशी छत्रीधारी माणसंही तिचा अनेक प्रकारे उपयोग करतात. कधी समोरून येणार्‍या माणसाला चुकवणयासाठी, कधी तोंड लपवण्यासाठी, तर कधी म्हातार्‍या व्यक्तीला टेकायची काठी म्हणूनही छत्रीचा उपयोग होतो. माझ्या ओळखीतल्या एक काकू भल्या पहाटे दुध आणायला जाताना नेहमी छत्री घेऊनच बाहेर पडत. एकदा कडाक्याच्या थंडीत मी पहाटे फिरायला बाहेर पडत असताना इमारतीच्या खिंडीत (गेटवर) मी त्याना अडवलं आणि विचारलं तुम्ही नेहमी ही छत्री घेऊन दुध आणायला का जाता ?  क्षणाचाही विलंब न लवता त्या मला म्हणाल्या अरे कुत्री किती वाढलीत, सारखी भुंकतात आणि अंगावर येतात. त्यांना हाकलायला ही छत्रीच बरी पडते, आणि तुझ्यासारख्यांच्या टाळक्यातही घालता येते त्यांच्या या उत्तराने माझं शंकानिरसन झालं असलं तरी त्या दिवशी पासून मी त्यांच्या पासून छत्रीभर अंतर राखूनच असतो. तरी मनात अजून एक शंका आहेच, पावसाळ्यात या काकू दोन छत्र्या घेवून निघतात की काय. एक कुत्र्यांपासून आणि दुसरी पावसापासून संरक्षणासाठी. पण मी आता हे येत्या पावसाळ्यात दुरूनच बघणार असं ठरवलं असतानाच त्या काकू मला परत दिसल्या जांभळीच्या झाडाखाली जांभळं वेचताना. मी दुर कुत्र्यांसोबत घुटमळत त्यांच्यावर नजर ठेवून पाहू लागलो, तर काय वेचलेली जांभळं त्या छत्रीत गोळा करत होत्या. छत्र्रीचा असाही उपयोग होईल असा मी कधी विचारही केला नव्हता. गरज ही शोधाची जननी आहे हेच खरं. आता इथे या प्रकरणात ‘गरज’ या शब्दाबरोबर ‘हाव’ हा दुसरा शब्दही जोडायला हरकत नाही. उपयोगाएवढ्या छत्र्या बाळगायच्या तर काकूंसारख्याना अर्धा डझन तरी छत्र्या लागतील यात शंका नाही.
माझ्या लहानपणी मामांनी आमच्यासाठी वेताचे दांडे असलेल्या छत्र्या आणल्या होत्या. माझ्यापेक्षा उंच असलेली ती छत्री घेऊन मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा ती धरायला माझा एक छत्री नसलेला मित्र असायचा म्हणून बरं, नाहीतर ‘भिजलो चालेल, छत्री नको’ अशी आणखी एक म्हण प्रचलित झाली असती. मामांनी आणलेली आपली छत्री इतरांपेक्षा जास्त टिकली पाहीजे म्हणून माझ्या भावाने एक वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपल्या छत्रीला डंबर फासलं. आधीच जड असलेली ती छत्री आणखी जड झाली. शिवाय डांबर सुकल्याने आयत्या वेळी ती उघडेनाच. महत्प्रयासाने त्याने ती उघडली तर पुन्हा बंद व्हायचं नाव नाही. छत्री बंद करण्याच्या खटाटोपात त्याच्या हाताला तिची तार लागून रक्त आलं, पहील्याच दिवशी वजनाने त्याची बेळकूटं भरून आली. शेवटी त्याने ती छत्री गरम पाण्याच्या हंड्यात बुडवली आणि डांबर काढण्याचा प्रयत्न केला. डांबर काही निघालं नाही पण आईने घातलेल्या धपाट्यामुळे त्याच्या पाठीवर मात्र छत्री उमटली. पावसाळा संपला तशी ती छत्री खुंटीला टांगली गेली. हिवाळ्यात एका रात्री सगळेजण गाढ झोपले असताना माणसाचं धुड पडावं तसा आवाज झाला. वडील उठले, त्यानी चाहूल घेतली, खुप वेळ कुणाचाच आवाज नाही. दिवा लावून त्यानी पाहीलं पण कसलीच जागमाग नाही. सकाळी आईने कचरा काढताना पाहीलं तर काय माझ्या भावाची, वेताचा दांडा असलेली ती वजनदार छत्री खुंटीला सोडून खाली पडली होती. दांडा सरळ झालेला. हल्ली पुन्हा तसली छत्री वापरणारे लोक दिसतात तेव्हा मझ्या समोर तो प्रसंग उभा राहतो.
गावी आठवडा बाजाराला येणारा कासार भली थोरली छत्री घेऊन यायचा तेव्हा याचं कुटूंब खुप मोठ्ठ असणार असं मला वाटायच. बाजार उलगल्यावर ती छत्री उलटी खांद्यावर मारून तो निघायचा तेव्हा एखादा बंदूकधारी इसम चालल्याचा भास व्हायचा. आता छत्र्या नॅनो झाल्या, एक सोडून तिला दोन फोल्ड आले. काळ्या रंगाचा मक्ता मोडून छत्रीने इतर रंगांचे कपडे परिधान केले. त्यावर जाहिराती आल्या. मोठा झाल्यावर कासाराची छत्री मोठी का ते समजल, पण लेडीज छत्री लहान का असते हा अजून मला पडलेला यक्ष प्रश्न कुणी सोडवेल का ?

नरेन्द्र प्रभू

10 July, 2010

पाऊस मनातला


 
मन पाऊस पाऊस
गात्र गात्र झालं ओलं
नसा नसातून वाहे
त्याचं भावंडं धाकलं

एका सरीतच न्हालं
मन ओलं ओलं चिंब
थेंबा थेंबातून दिसे
जीवनाचं प्रतिबींब

मन एवढं एवढं
जसा राईचाच दाणा
कोंब फुटला केव्हाचा
आता फुटू पाहे पान्हा

मन झालं आता तृप्त
पाऊसही तो थांबला
धरणीच्या लेकराला
त्याने घास भरवला

नरेंद्र प्रभू

09 July, 2010

नान्नजचा माळढोक


माळढोक हा दुर्मिळ पक्षी. एकेकाळी महाराष्ट्राच्या गवताळ भागात आढळणारा हा पक्षी बेसुमार शिकार आणि त्याच्या आधिवासावर होणार्‍या अतिक्रमणामुळे महाराष्टातून हद्दपारच झाला होता. सोलापूरचे प्राध्यापक बी.एस्. कुलकर्णी यांना तो १९७२ च्या दरम्यान पुन्हा आढळून आला. माळढोकचा पुन्हा शोध लागल्यावर सोलापूरपासून वीस किलोमीटर अंतरावरच्या नान्नज इथल्या माळरानाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. माळढोक पक्षांची संख्या वाढावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. माळढोक हा उंच, डौलदार, देखणा पक्षी पहावा म्हणून माझे मित्र रत्नदिप पाटील यांच्या सोबत नान्नजला जायचा बेत आखला.

सोलापूर शहर सोडून बार्शीकडे जाणार्‍या रस्त्यालाच नान्नजला जाणारा फाटा आहे. सभोवतालचा गवताळ प्रदेश आणि रानफुलं पाहता पाहता मधूनच होणारी पक्षांची कुजबुज आपलं लक्ष वेधून घेते. आजुबाजुच्या झुडूपांवर उडणारी फुलपाखरं मन प्रसन्न करतात तरीपण माझी नजर शोधत होती ती त्या माळढोक पक्षाला. आल्या सारखा दिसला पुरे अशी रुखरुख लागून राहिलेली. वाटेत दिसणारे वेडा राघू, सातभाई, चंडोल, टिटवी, धावीक असे पक्षी आणि बागडणारी हरणं यांची नजाकत टिपत त्यांच्या हालचाली, सवयी यांची माहिती रत्नदिपकडून घेत आमचं मार्गक्रमण सुरू होतं. आता आम्ही अभयारण्याच्या गाभ्यात येऊन पोहोचलो होतो. जवळच असलेल्या गेट मधून आत गेल्यावर जंगल वाचनाच्या नियमाप्रमाणे सगळे आवाज बंद केले. जवळच असलेल्या एका उंच मचाणावर चढून अख्खा परिसर न्याहाळला. गवताळ रानमाळ असल्याने दुरवरचा विस्तीर्ण प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत होता. पण इथून माळढोक दिसण्याची शक्यता नव्हती.

माळरानात चालत पुढे गेलो. तिथे एका ठिकाणी एक झोपडी होती. त्या झोपडीत बसून पक्षांचं निरिक्षण करता येईल अशी तिची रचना होती. थोड्याच वेळात दुरवर माळढोक पक्षांची हालचाल दिसू लागली. ते आमच्याच दिशेने येत होते. सुरवातीपासून वाटत असलेली चिंता क्षणात मिटली. आम्ही दुर्बिणी सरसावून बसलो. उंच पांढरी मान प्रथम दिसली. लांबूनच त्याच्या उंचीची कल्पना येत होती. थोड्याच वेळात मानेखालचा राखाडी मातकट रंग दिसू लागला. आमच्या पासून काही अंतरावर चरणार्‍या त्या पक्षाची ऎट पाहण्याजोगी होती. पावसाळ्यात या पक्षांचा विणीचा हंगाम असल्याने ते एवढ्या सहज दृष्टीस पडतात. आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गेलो होतो. 

हाच तो माळढोक काही वर्ष अज्ञातवासात जावून पुन्हा एकदा परतला होता. त्याने आम्हाला तर दर्शन दिलं पण तो असाच दिसत रहावा असं वाटत असेल तर त्याचं निट संवर्धन झालं पाहिजे. त्यांची कमी होत जाणारी संख्या आणि वनअधिकार्‍यांची अनास्था यामुळे हा पक्षी पुन्हा संकटात आहे. त्याच्या आधिवासाला पोषक असलेलं गवत समुळ नष्ट करून कृत्रिम गवत लागवड करणारे अधिकारी जोवर वनखात्यात चरताहेत तो पर्यंत माळढोक संकटात आहे हे नक्की.   

05 July, 2010

गावाकडचा पाऊस


' नेमेची येतो बघ पावसाळा, हे सृष्टीचे कौतूक जाण बाळा ' या उक्ती प्रमाणेच नेमाने येणार्‍या पावसाचे ते दिवस. जागतिक तपमावाढीमूळे होणार्‍या दुष्परीणामांच्या आधीचे. सात जुनला मृगाचा पाऊस पडणार म्हणजे पडणारच. खरोखरच कौतूक करण्यासारखा. अंग अंग पुलकीत करणारा, अंतर्बाह्य ओलंचिंब करणार. शेतकरी राजाला आनंदीत करणारा आणि आम्हा मुलांना नाचवणारा. वेड्या पक्षांची मग गडबड उडायची, कुणाची घरटी अजून बांधून व्हायचीत, तर कुणी फक्त आडोसा शोधणारा. माणसांचंही तसच, लांबलेली कामं आटोपती घेता घेता भंबेरी उडायची. पण या पावसाच मात्र सर्वत्र स्वागतच व्हायचं. हा हा म्हणता दाटून आलेले ढग कोसळायला लागायचे आणि फिरत्या रंगमंचाप्रमाणे सृष्टीचं रुप पालटून जायचं. ढोल, नगारे, ताशे सगळं एकदम बडवतच तो यायचा, सगळ्यांना खडबडून जागं करायचा. सार्‍या आसमंतात आता त्याचच अधिराज्य असायचं. वातावरणात मृदगंध भरून रहायचा. पहीला पाऊस..., कधी पडणार ?... त्याला मात्र काळवेळ नसायची, कधी रात्री बे रात्री, तर कधी भर दुपारी. चिंब न्हावू घालायला तो अधीर असायचा. मातीच्या नसानसात शिरून पांढुरके ओले कोंब बाहेर काढेपर्यंत त्याला उसंत नसायची. चार-आठ दिवसात हिरवागार गालीचा पसरून झाला की मग जरा दम घ्यावा तसा थांबायचा.

आम्हा मुलांची मात्र त्याच दरम्यान घाई असायची ती शाळेच्या तयारीची. नवी पुस्तकं, नव्या वह्या, कधी नवी छत्री तर कधी जुनी दुरूस्त करून घ्यायची. नवा वर्ग, नवे शिक्षक, नवीन अभ्यास. पाऊसही दरवर्षी नव्याने भेटणारा. हवा हवासा वाटणारा.वर्गाच्या बाहेर लक्ष वेधून घेणारा, खट्याळ. छत्री नसताना वाटेत गाठणारा, खोडकर आणि ध्यानीमनी नसताना ओढ्याला पुर आणणारा, अडेल. आमच्या शाळेच्या रस्त्यावर मोजून पाच ओढे होते. पावसाळ्यात मग रोजच अडथळ्यांची शर्यत पार करत शाळेत पोहोचायचं. कधी जास्त पाऊस पडला तर शाळा लवकर सुटत असे, पण आम्ही मात्र रोजच्या वेळेतच घरी पोहोचत असू. त्या आयत्या मिळालेल्या वेळेत आम्ही आत्ताच्या भाषेत परिसर अभ्यास करत फिरायचो. वाट वाकडी करून कोणत्या ओढ्याला किती पाणी आलय ते बघता बघता कधी कधी ओढा ओलांडण कठीण होत असे आणि मग मात्र रडकुंडीला येत असू. भुकेने जीव व्याकूळ व्हायचा , पण दुसर्‍या दिवशी पुन्हा तेच.

'क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फेरूनी ऊन पडे' या कवितेच्या ओळी शिकल्यापासून माझी खुपदा भंबेरी उडालेली आहे. श्रावणातला पाऊस हा असाच पडणार असा नियम आहे असं मानून मी छत्री नेत नसे आणि मग कधी पावसाने संततधार धरली तर मात्र पंचाईत व्हायची. नेमका त्या वेळी माझ्याशी कट्टी केलेलाच मित्र भेटायचा. छत्री तशी दप्तर भिजू नये म्हणूनच असायची. गावी उभाआडवा पडणारा पाऊस छत्रीला मित्र मानत नाही आणि म्हणून तिला जुमानतही नाही. त्या मुळे कित्येकदा वह्या-पुस्तकं चुलीच्या पट्यावर सुकवावी लागत. ज्ञानात उर्जा ही अशी निर्माण व्हायची.

नागपंचमी पासून दसर्‍यापर्यंत सगळे सण हे पावसाळ्यातले पण श्रावणात दर रविवारी काढावी लागणारी पत्री आणि चतुर्थीत गणपतीची माटवी या साठी रानफुलं आणि फळं कुठे मिळतात ते मला पक्क माहिती असायचं. कधी कधी मी त्यांच्या जास्त प्रेमात पडायचो, मग आईला पुजेला वेळ व्हायचा आणि मला जेवायला उशिरा मिळायचं. तरी सुध्दा नुकताच पाऊस पडून गेला आणि तृणपात्यांवर पडलेली कोवळी उन्हं पाहिली की नेहमीच तसंच व्हायचं. होणारच, कुबेराचा खजिना सगळीकडे सांडलेला असायचा. मग वरून आकाशही स्पर्धेत उतरायचं. इंद्रधनुष्याचं टोक थेट क्षितीजाला टेकायचं. एवढं मोठ्ठं चित्र चितारलं जात असताना मी घरात कसा जाऊ ?

किती पावसाळे बघितले तरी पाऊस म्हटलं की मन भरून येतं. मला गावी घेऊन जातं. वारं कानात शिरतं आणि मातीचा सुगंध नाकात. मन मोहरून जातं. पावसाचं गाणं गावू लागतं. किंबहूना मनच पाऊस होतं

नरेंद्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates