03 May, 2010

मोटरमनचं आंदोलन

 
 
मुंबईकर हा मुळात फार सहनशील प्राणी आहे. ‘प्राणी’ अशासाठी म्हटलं कारण घराबाहेर पडलं (यातले कित्तेक बेघर आहेत, ते कायमचेच घराबाहेर असतात.) की त्याना माणूसकीची वागणूक फारच कमी प्रमाणात मिळते. (ग्रंथालीचे दिनकर गांगल एकदा म्हणाले होते की “आपण माणूस आहेत ही भावना युरोपमध्ये गेल्यावर प्रकर्षाने जाणवली.”) घरातून बाहेर पडल्यापडल्या आपण एकदम रस्त्यावरच येतो. फुटपाथ दाखवा आणि एक लाख मिळवा अशी रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे. बरं रस्ते तरी नीट आहेत का? तर ते ही सतत खोदलेले असतात. (मलिदा खाण्यासाठी कुठचा रस्ता खोदू असं सगळ्या संबंधिताना झालेलं असतं.) हल्लीच “विकास हवा तर हे सगळं सहन केलचं पाहिजे असा दम मुख्यमंत्र्यानीच भरला.” एवढं करून टॅक्सी, रिक्षा काही करावी तर तो त्याला हवं तिकडेच जाणार म्हणतो. आपलं स्वतःचं वाहन असलं तरी पंचाईत कारण पार्कींगचा प्रॉब्लेम, ट्राफीक जाम. या सगळ्यात एक आधार वाटतो तो म्हणजे लोकलचा. त्या लोकलचं महत्व एवढं की ते आता त्या चालवणार्‍या मोटरमननाही समजलं. त्यानी आता असहकाराचं हत्यार उपसलंय. ते म्हणे उपाशीपोटी लोकल चालवणार. कारण त्याना जो कमीत कमी पन्नास साठ हजारावर मोबदला मिळतो तो पुरत नाही. ते म्हणे ३६५ दिवस गाड्या चालवतात. सगळीच वाहन (बस, टॅक्सी, रिक्षा, ट्रक) ३६५ दिवस चालू असतात. मोटरमना सुद्धा CL, PL असतातच. भत्ते असतातच, ऑपशनल हॉलीडे असतातच.

गेली दोन वर्ष मी पहातोय मध्य रेल्वेची वाहतूक तरी वेळेवर सुरू आहे पण पश्चिम रेल्वेचं काही खरं नाही. सदानकदा गाड्या उशिराने धावत असतात, कारण काय तर त्याना कमी मिळणारा ओव्हरटाईम. सद्ध्या उकाड्याने जीव हैराण होतोय, पावसाळा तोंडावर येतोय. खोदलेले रस्ते, गुडघाभर पाणी, संथ वाहतूक आणि हे सगळ सहन करत, खांबा खांबावरून हसणार्‍या राजकारण्यांची थोबाडं पहात, आपणाला कुणीच वाली राहिला नसल्याचं शल्य उरी बाळगून मुंबईकर वाटचाल करीत रहाणार. अगदीच राग आला तर असं कलकत्त्यात ( चुकलो रे बाबा कोलकात्यात) झालं असतं तर.............! म्हणत आपल्या गंतव्यस्थानी जाण्यासाठी जिवाची बाजी लावणार. काही जण मरणार काही जगणार उद्याचं मरण जगण्यासाठी. 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates