16 March, 2010

डॉ. किबे



कोणत्याही सहलीवर असताना ज्या हॉटेल किंवा निवासस्थानी आपण राहतो ते आपलं तात्पुर्तं का होईना पण घरच असतं. ज्या खोलीत आपण राहात असतो तिथे बरोबरची व्यक्ती आधीपासून ओळखीची किंवा नात्यातली असली तर प्रश्नच नसतो पण परक्या माणसाबरोबर वास्तव्याची वेळ आली तर एकमेकांशी सूर जुळतीलच असं सांगता येत नाही. हल्ली तर दोन व्यक्तींसाठी असलेल्या खोलीत पलंगसुद्धा एकच असतो आणि त्याच्यावर पांघरूण पण एकच असतं. दोघांची देहयष्टी, झोपण्याचे प्रकार, झोपल्यानंतरचे प्रकार, आकार आणि आवाज या मुळे बर्‍याच वेळा दोघांची किंवा किमान एकाची झोपमोड होण्याची शक्यता असते. सहलीच्या व्यस्त दिनक्रमात प्रातर्विधी, आंघोळीत जाणारा वेळ यामुळेही अडचण होवू शकते. बाकी व्यसनं, सवयी असे अनेक घटक एकमेकांमधील संबंध कसे असतील ते ठरवतात. या झाल्या भौतिक गोष्टी पण स्वभाव आणि आचार विचार यामुळेही गोंधळ होवू शकतो.

नुकत्याच झालेल्या अंदमान सहलीदरम्यान डॉ. अरवींद किबेंचा मी रुमपार्टनर होतो. चेन्नईच्या हॉटेल मध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली आणि पुन्हा परतीच्या वाटेवर  चेन्नई विमानतळावर त्यांचा निरोप घेताना खुप जुन्या ओळखीच्या सहृदयाची ताटातूट होत आहे अशी भावना निर्माण झाली. तसे डॉ. किबे ऎशी वर्षाचे, वयाने, पेशाने, ज्ञानाने आणि सर्वार्थानेच मोठे असलेल्या डॉ. किबेंनी मात्र ते मला त्या सहा दिवसांच्या सहवासात कधी जाणवू दिलं नाही. रुममध्ये असताना अनेक विषयांवर चर्चा झाल्या, आध्यात्मावर तर रोजच त्यांचे मौलिक विचार ऎकायला मिळत. वैद्यकीय व्यवसाय, राजकारण, खेळ, पर्य़टन, योग आणि अध्यात्म सर्वच विषयांवर त्यांचा अभ्यास आणि आवड याचा मला प्रत्यय आला. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये केलेलं द्विशतक त्यांनी एखाद्या लहानमुलाच्या उत्साहाने साजरं केलं आणि हॅवलॉकला रात्रीच्या निवांत वेळी सागर किनारी तपस्व्यासारखी ध्यानधारणा केली. या वयातही असं समजून, समरसून जगणं आणि छोट्या-छोट्या तर नाहीच पण जगाच्या द्रुष्टीने मोठ्या दुःखाचाही बाऊ न करता ते वर्तमान कसा जगत आहेत हे जवळून पाहणं हा खरच एक सोहळा होता.                           

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates