26 January, 2010

हे खरे भारतभूषण


महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वीज अभावानेच पेटते. लोडशेडींग ही आता सवय झालेली आहे. विद्यार्थ्यांचं उज्वल भवितव्य तर या काळेखाने पार झाकोळून टाकलं आहे. विजेअभावी काळोखात बुडालेल्या खेडय़ापाडय़ातील गोरगरिबांसाठी प्रकाशाचे स्वप्न पाहणारा नायक आपण या आधी स्वदेश चित्रपटात पाहिला आहे. पण तो झाला चित्रपट, तीन तासांनंतर विसरून जायचा. पण तसं प्रत्यक्षात घडल आहे. कोणत्याही भरमसाट नफ्याची अपेक्षा न करता आणि अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पुण्यातील आशिष गावडे या युवकाने स्वतःला या कामासाठी वाहून घेतले आहे. दहा मिनिटे सायकलिंग करा आणि चार तास वीज मिळवाहा अवघड, पण अभिनव प्रयोग जिद्दीने पूर्ण करीत आणला आहे. आशिष गावडे व अमेरिकेतील त्याचे मित्र अनिरुद्ध अत्रे यांच्या बॉटम ऑफ पिरॅमिड एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल इनोव्हेशन प्रा. लि.या कंपनीद्वारे हाती घेतलेल्या संशोधनातून लवकरच खेडय़ापाडय़ातील झोपडय़ा विजेच्या प्रकाशाने लखलखणार आहेत.

विजेअभावी खेडय़ापाडय़ातील विद्यार्थी शिक्षणाच्या स्पर्धेत मागे पडू नयेत, माफक खर्चात अभ्यासासाठी पुरेल इतका प्रकाश त्यांना मिळायला हवा, या हेतूने सुरू केलेल्या या संशोधनातूनच एका कुटुंबाला कंदिलातील रॉकेलसाठी आठ-नऊ महिन्यांत कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या किमतीत तब्बल सहा वर्षेपर्यंत दररोज चार तास उजेड देऊ शकणारा रिचार्जेबल दिवा आशिषने विकसित केला आहे.

या दिव्याचा चार्जर म्हणून सायकलच्या पॅडलिंगचा वापर केला गेला आहे. दहा मिनिटे पॅडलिंग केले, की त्याला जोडलेल्या यंत्रणेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेवर हा दिवा चार्ज होतो. नंतर गरजेनुसार कोठेही त्याचा वापर करून त्यापासून चार तास उजेड मिळविता येतो. अत्यल्प किमतीत हा दिवा उपलब्ध केला जाणार असल्याने झोपडीत राहणाऱ्या, इतकेच नव्हे तर आदिवासी पाडय़ांमध्ये राहणाऱ्यांनाही त्याचा खर्च पेलणे सहज शक्य होणार आहे.

आशिष गावडे व अनिरुद्ध अत्रे या ध्येयनिष्ठ तरुणांची ही कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात पाबळच्या विज्ञानाश्रमाचेही मोलाचे साहाय्य लाभले आहे. तिथेच त्यांचे हे प्रयोग विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी पाहिले. या प्रयत्नाबद्दल डॉ. माशेलकर यांनी कौतुक तर केलेच, पण त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत व मार्गदर्शनही ते पुरवित आहेत.

काल देशासाठी महत्वाची कामगीरी पार पाडणार्‍यांना पद्म पुरस्कारांची घोषणा झाली, माझ्या मते आशिष गावडे आणि अनिरुद्ध अत्रे खरे भारतभूषण आहेत.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates