01 January, 2010

वेगळ्या हिमालयाचे दर्शन घडविण्याचे प्रयत्न


image नरेंद्र प्रभू

पंचगंगा ते गंगा व्हाया मिठी’, ‘लडाख, प्रवास अजून सुरू आहे’ अशा पुस्तकांचे लेखन करणाऱ्या नरेंद्र प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र नाटय़मंदिरातील पु. ल. देशपांडे कलादालनात ‘आगळावेगळा हिमालय’ हे प्रदर्शन भरणार आहे. त्यासंदर्भात प्रभू यांच्याशी केलेली बातचीत..

आगळावेगळा हिमालयप्रदर्शनाचे वैशिष्टय़ काय?

विविध प्रकारे स्तंभलेखन करताना आणि ब्लॉगवर मनोगत लिहिताना माझ्यातला लेखक विकसीत होत गेला. माझी अशी एक स्वतंत्र शैली निर्माण झाली. त्यातूनच फोटोग्राफी,संगणक सल्लागार आणि पर्यावरण क्षेत्रात कार्य करताना जनसंपर्कही वाढला. साहजिकच या क्षेत्रात नवीन काय करता येईल याचा विचार सुरू झाला आणि नव्या वर्षात २ ते १० जानेवारीदरम्यान काही छायाचित्रकारांची आगळीवेगळी छायाचित्रे एकत्र करून त्यांचे प्रदर्शन भरवावे अशी संकल्पना पुढे आली. ती आता प्रत्यक्षात साकार होत आहे. आत्माराम परब यांच्या मनात विषय घोळत होता. माझ्यासह त्यांच्या काही मित्रांनी एकत्र येऊन आगळावेगळा हिमालयसाकारला. केवळ निसर्ग आणि पर्यटन एवढय़ापुरताच हिमालयहा विषय सीमित नाही तर तिथली आदिम संस्कृती, परंपरा, रितीरिवाज, वस्त्रप्रावरणे, जीवनमान कॅमे-यात बद्ध करून मुंबईकरांना सादर करण्याचा उद्देश होता. या निमित्ताने हिमालयातील दुर्लक्षित आणि अपरिचित अशा पर्यटनस्थळांचीही माहिती सर्वाना देण्यात येणार आहे.

किती छायाचित्रकार यात सहभागी होत आहेत?

वंडर्सही हिमालयात भ्रमंती करणा-या तरुण छायाचित्रकारांची संस्था आहे. गेली ८-९ वर्षे हिमालयात हिंडणारी, फिरणारी पण नवनिर्मितीचा वसा घेतलेली माणसे त्यात आहेत. संपूर्ण भारतातून हिमालयात पर्यटनासाठी लोक येतात. पण केवळ नयनसुख यापलीकडे कोणी फारसे जाताना दिसत नाहीत. लडाख, हिमाचल प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, तवांग,मेघालय, नागालँड, भूतान अशा हिमालय पट्टय़ात फिरून आम्ही छायाचित्रकारांनी केवळ तिथला निसर्गच नव्हे तर संस्कृतीही टिपली आहे. तिथल्या एका वेगळ्या हिमालयीन लाईफची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. मी, आत्माराम परब, तुषार निदांबूर, विघ्नेश नाईक, सुधीर धर्माधिकारी, सुरेंद्र तांबे, सुहासिनी मुतालिक, मेघन पाटणकर वगैरे १२ जणांची ८५ ते ९० छायाचित्रे रवींद्र नाटय़मंदिराच्या पु. ल. देशपांडे कला दालनात मांडण्यात येणार आहेत. २ जानेवारीला संध्याकाळी गौतम राजाध्यक्ष यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

वेगळा हिमालयम्हणजे नक्की काय?

हिमच्छादित शिखरे, गोठलेले तलाव, खळाळणा-या नद्या, तवांगचे जलाशय, निसर्गातल्या रंगांची उधळण, नेत्रसुखद हिरवळ,पाईनचे वृक्ष, स्पीटी व्हॅली, बौद्धकालीन गुंफा, लोकजीवन यांच्यासह आजवर दुर्लक्षित राहिलेली पर्यटनस्थळे, तिथल्या जीवनाचे हौशी छायाचित्रकारांनी केलेले चित्रण यातून वेगळा हिमालय उभा राहिला आहे. हे सारे टिपणाऱ्या छायाचित्रकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणेही आवश्यक होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. प्रदर्शनकाळात रसिकांसाठी चित्रफिती, स्लाईड शो, पर्यटन विषयक मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्षात हिमालयात न जाता भूलोकीचा स्वर्गअनुभवायचा असेल तर छायाचित्र प्रदर्शनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन मी सर्वाना करेन.
LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates