31 October, 2009

प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असतं...!


आज सकाळी घराबाहेर पडताना सेफ्टीडोअर बंद केलं, पण ते बंद झालं नाही. पुन्हा ढकललं. नाही, उपयोग झाला नाही. लॅच तपासलं तर ते बरोबर होतं. जरा वर खाली केलं तेव्हा ते बंद झालं. पुन्हा घरी आल्यावर तेच. अरे काय झालं, कालपर्यंत व्यवस्थित होतं. थोडा विचार केला. गेल्या आठ दिवसात वातावरण बदललं आहे. हवेतल्या बाष्पाचं प्रमाण कमी झालं आहे. पावसाळ्यात दारं जरा घट्ट होतात. कोरडेपणामुळे या दिवसात सैल झालेलं दार थोडं कललं असावं. वरच्या बाजूला दाब देवून ते जरा ढकललं. ते व्यवस्थित बंद व्हायला लागलं. तेव्हा विचार आला, प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असतं.

तुम्ही म्हणाल, हे काय, निर्जीव दाराचं काय म्हणणं असणार? पण रोजच्या सारखं ते लागलं नाही म्हणजे काहीतरी बिघडलंच नाहीका? मित्रहो, गोष्टी खुप शुल्लक वाटतात, छोट्या तक्रारी असतात तेव्हाच त्या निस्तरायच्या असतात. नाहीतर काट्याचा नायटा कधी होतो ते समजतच नाही. जेव्हा समजतं तेव्हा मोठं नुकसान झालेलं असतं. अगदी बारीकसं दुखणं आहे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याचं रुपांतर मोठ्या दुखण्यात होतं. कधी कधी जीवावर बेततं. जे शारिरीक दुखण्याचं तेच मानवी संबंधांचं. एखादी गोष्ट खटकते, मुलांच्या वागण्यात बदल होतात. बायको नीट बोलत नाही. मित्र रस्ता बदलतो, तेव्हा....., तेव्हा त्या प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असतं. बघा विचार करून. आपल्या बाबतीत असं काही असेल तर त्याकडे लक्ष द्या. आपण सगळेच सतत पळत आहोत. थांबून विचार करायला कुणालाच वेळ नाही. असं असलं तरी मित्रहो, थोडं थांबा, छिद्र लहान असतानाच ते बुजवा. गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. गोष्टी विकोपाला जायच्याआधी ती तक्रार ऎका, प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असतंच.

30 October, 2009

पूर्वांचलाची चित्र सफर भाग २


हे फोटो काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातले आहेत.

जंगली हत्ती


अशीच एक वाट, याच वाटेवर रान डुक्कर पाहिले. ते निघून जाई पर्यंत थांबून राहीलो.


वन विभागाचं कार्यालय.


रखवालदाराची केबीन



एक मस्त संध्याकाळ
रंगांचा उघडूनीया पंखा सांज कुणी ही केली....!

महाराष्ट्रातील पर्यावरणीय बदल भाग ३


(प्रतिभा दिवाळी अंक २००९ मधून प्रसिद्ध झालेला माझा लेख)

भ्रष्ट सरकारी यंत्रणा, राजकारणी, नफेबाज व्यापारी, निर्ढावलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या हे सर्व घटक जसे याला कारणीभूत आहेत तसेच आपणही याला कळत नक़ळत हातभार लावत आहोत. आपण या समाजाचाच एक भाग आहोत. तेव्हा ही परिस्थितीही आपणच बदलू शकतो. त्या साठी काही सवई बदलाव्या लागतील, थोडे नियम पाळावे लागतील. स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगण्या साठी आपण काय करू शकतो ते बघा. आवश्यक नसलेल्या ठिकाणचे विजेचे दिवे, पंखे बंद ठेवणे, सण समारंभातील विद्युत रोषणाईला आवर घालणे, प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा वापर बंद करणे, फटाक्यांना फाटा देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आवाजावर नियंत्रण, निर्माल्य तसेच जैविक कचर्‍यापासून कंपोष्ट खत निर्मिती, ग्रामिण भागात जंगलांची, झाडांची जोपासना, शहरी भागात अशी झाडे उद्याने, सोसायट्यांच्या आवारात लावता येतील. प्रत्येक घरात एक तरी असा कोपरा असतो की जिथे आपण जास्त नाही पण दोन तरी कुंडीतली झाडे लाऊ शकतो. इमारतीच्या गच्चीत फुलांची बाग फुलवू शकतो.

तिसरं महायुदध्द झाल तर ते पाण्यावरून होईल असे म्हटसे जाते. हे पाणी वाचवण्यासाठी आपण खुप काही करू शकतो. दाढी करत असताना बेसिनचा नळ चालू न ठेवणे, फ्लशच्या लाहान टाक्या बसवणे किंवा मोठ्या टाक्या असतील तर त्यात एक प्लास्टीकची बाटली भरून ठेवल्यास प्रत्येकवेळी एक लिटर पाण्याची बचत होवू शकते. ‘ रेन वॉटर हार्वेस्टींग ‘ म्हणजे पावसाच्या वाहून जाणार्‍या पाण्याची साठवण करून त्याचा वापर करणे तसेच ते पाणी जमीनीत मुरवणे या सारखे उपाय योजून पाण्याच्या समस्येवर यशस्वी मात केली जावू शकते. मुंबईतल्या चेंबूरमधील म्हैसूर कॉलनीगेली चार वर्षे करण्यात आलेल्या पर्जन्य जलसंधारणाने सोसायटीला २४ तास पाण्याचा पुरवठा होतो शिवाय खर्चात बचतही झाली आहे. तिकडे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील काही गावे केवळ ३५० मिलिमीटर पाऊस पडूनही पाण्याबाबत तृप्त आहेत. कारण पावसाचे पाणी जिथले तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना राबवून तेथील ग्रामस्थांनी तिथल्या नदी-नाल्यांना पुन्हा जिवंत केले आहे. असे काही पथदर्शी प्रकल्प आपणाला अजून वेळ गेलेली नाही, प्रयत्न केले तर आपणच आपली मदत करू शकतो हे दाखवून देतात. आपल्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस आणि सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍यांमधून खळाळत जाणारं पाणी ठिकठिकाणी अडवले तर त्यावर छोटे-छोटे जलविद्युत प्रकल्प उभे राहू शकतात. अशा प्रकल्पांसाठी तसेच कचर्‍यातून वीज निर्मिती साठी संघटीत प्रयत्न करणे, दबावगट तयार करणे आवश्यक आहे. सुर्यप्रकाशाची अक्षय उर्जा उपलब्ध असलेल्या आपल्या राज्यात सौरउर्जेचा प्रभावी वापर होणे गरजेचे आहे. सेंद्रीय खतांचा वापर करून जमीनीचा पोत आपण सुधारू शकतो. देवराया, तळी, डोह यांचे संवर्धन तसेच जपणूक करून पर्यावरणाच्या समतोलाला आपण हातभार लावुया. अन्यथा कवीच्या या ओळी खार्‍या ठरतील.

केवळ त्या नंतर

जेव्हा शेवटचं झाड तोडलं जाईल.

केवळ त्या नंतर

जेव्हा शेवटच्या विहिरीचं पाणी विषारी होईल.

केवळ त्या नंतर

जेव्हा शेवटचा मासा पकडला जाईल.

केवळ त्या नंतर

तुम्हाला समजेल, की पैसा खाता येत नाही.

29 October, 2009

पूर्वांचलाची चित्र सफर भाग १


अरूणाचल प्रदेश आपल्या भारताचा एक अविभाज्य भाग. आता पुन्हा चीनने कुरापत काढली आणि चार वर्षांपुर्वी मी,सौ आणि आमची मुलगी आम्ही तीघांनीच पूर्वांचलाची सफर केली होती त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. असम (आसाम नव्हे), मेघालय आणि अरूणाचल प्रदेश मध्ये फिरून जेव्हा तो भाग बघितला तेव्हातर मी त्याच्या प्रेमातच पडलो. अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि मोकळी हवा. प्रेमळ लोक आणि शांतता. पुन्हा कधीतरी त्याच प्रवासवर्णन करीन तो पर्यंत तिथे मी काढ्लेले फोटो क्रमशः देत आहे.

हे फोटो काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात प्रवेश करतानाचे आहेत.

पक्षांची माळ

पक्षांची माळ


दूर जाणार्‍या वाटा

एक रंगीत संध्याकाळ


महाराष्ट्रातील पर्यावरणीय बदल भाग २


(प्रतिभा दिवाळी अंक २००९ मधून प्रसिद्ध झालेला माझा लेख)

कोकणातील निसर्गसंपंन जमीनींवर आता धनदांडग्यांची नजर पडलेली आहे. खनीज उद्योजकांनी गोव्याची दुर्दशा केल्यावर आता त्याना जवळचा सिंधुदूर्ग-रत्नागिरी पादाक्रांत करायचा आहे. कळणे येथील ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता तिथे खाण उद्योगाला परवानगी देऊन सरकार आपण पर्यावरण विरोधी आहोत हे सिद्ध करत आहेच पण औष्णिकउर्जा प्रकल्प, सेझ सारखे प्रकल्प कोकणात आणून आपण त्या भागाचा विकास साधतो असे सांगून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. जे कोकणात तेच पश्चिम महाराष्ट्रात, लवासा सारखे प्रकल्प उभारताना अतोनात झालेली वृक्षतोड, डोगरांचे सपाटीकरण यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलाशयांच्या पर्जन्य क्षेत्राची हानी झाली आहे. यामुळे जमीनीची धुप होऊन तलावात गाळ जमा होईलच परंतू पर्जन्यामानात घट होण्याचाही धोका आहे.

औद्योगिक प्रगती बरोबर शहरे बकाल झालीच पण कारखान्यांचे दूषित आणि विषारी पाणी तसेच शहरातील सांडपाणी नद्या-नाल्यांमध्ये कोणतीही प्रक्रीया न करता वर्षोंवर्ष सोडल्याने जमीनीवरील तसेच भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. नद्या तेच पाणी शहरांना साभार परत करत आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी आणि त्या पाण्याची धनदांडग्यांकडून होणारी चोरी हे आता गुपित राहीलेले नाही. नदी पात्रातून होणारा वाळूचा उपसा एवढा अनियंत्रीत आहे की नदी पात्रात अनेक ठीकाणी डोह निर्माण झाले आहेत. ही रेती नद्यांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असते तसेच नद्यांवर बांधलेल्या पुलांचे संरक्षण करते. नदी वाहती रहाण्यासाठी जसे पाणी पाहीजे तशी ही रेती सुद्धा हवीच. वीस-पंचवीस वर्षांपुर्वी बारमाही वाहणार्‍या नद्या आता पावसाळा संपताच क़ोरड्या पडत आहेत. जिथे कुठे नदीत पाणी दिसते ते कारखान्यातले काळं, प्रदुषित मृत पाणी असते. ज्या मध्ये केवळ जिवाणूंची आणि विषाणूंची निर्मिती होऊ शकते. मुंबईत असलेला मिठी नाला एके काळी नदी होती हे सर्वच विसरून गेले आहेत. पुण्याची मुठा नदी असो की कोल्हापूरची पंचगंगा जिथे म्हणून ती शहरांच्या संपर्कात आली भ्रष्ट झाली, प्रदुषित झाली. दुसरीकडे नळ-पाणी योजनांमुळे विहिरी, तळी, तलाव अशांचे महत्व कमी होत गेले आणि ती नष्ट झाली किंवा प्रदुषित झाली.

शेती आणि ग्रामिण भाग वगळता शहरांचा विचार केला असता तेथील स्थिती अधिक भयावह आहे. जवळ जवळ सर्वच शहरांमधून रोज टनावारी घनकचरा उत्पन्न केला जातो. प्रक्रिया न करता सांडपाणी नद्या-समुद्रात सोडले जाते. वीजेचा अपव्यय, प्रकाशझोतातील क्रिकेटचे सामने, विद्युत रोषणाई, प्लॅस्टीकच्या पिशव्या, फटाक्यांची आतषबाजी, वाहनां मधून सोडला जाणारा धुर, कर्णकर्कश आवाज करणारी साधनं, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती, रासायनीक रंग, गुलाल, निर्माल्य, डास प्रतीबंधक फवारे, कृत्रिम फुले, थर्माकोल, स्वतःचं घर सोडून इतर सर्वत्र टाकलेला कचरा, इ-कचरा, हॉस्पिटल मधून बाहेर टाकला जाणारा कचरा हे सगळे प्रदुषण करणारे दृश्य घटक पर्यावरणाचा र्‍हास करत आहेत. या शिवाय इमारतीना बाहेरून लावलेल्या काचा, वातानुकूल यंत्रे, सौंदर्य प्रसाधने, फर्निचर, या पासूनही प्रदुषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. प्रदुषणात शहरीकरणामुळे वाढच होत चालली आहे.

निसर्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात घाव घातल्यावर तो कोपला नाही तरच नवल. निसर्ग दयामाया दाखवत नाही हे २६ जुलै २००५ ला मुंबईकरांना आणि त्या नंतर लगेचच सांगली, कोल्हापूरकरांना नाकातोंडात पाणी गेल्यावर समजले. गेल्यावर्षी तीच परिस्थिती गोदावरीकाठच्या नाशिककरांनी अनुभवली. सर्व भौतिक गोष्टींचा उपभोग घेता घेता माणूस हे विसरतो की तो या निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्गाविरूद्ध वागणे म्हणजे स्वतःचा खड्डा स्वतः खोदणे हे आपल्याला कधी समजणार ? रासायनिक खते परवडली असे म्हणायला लावणारे जेनेटीक बदल घडवून आणलेले अन्न आता खाद्यबाजाराचा ताबा घेण्याच्या मार्गावर आहे. आपल्या देशात अजून या अन्नधान्याला परवानगी नसली तरी सुस्त सरकारी व्यवस्था आणि भ्रष्टाचार यामुळे कायदा कागदावरच राहतो हे आपण पदोपदी अनुभवतोच. ......(क्रमशः)

28 October, 2009

निवडणूका संपल्या, आता भोंदूबाबाचे पाय धरायला राजकारणी मोकळे.


निवडणूका संपल्या. गेली दहा वर्षं नाकर्तेपणा दाखावूनही राज्य मिळालं, गादी मिळाली. अशोक चव्हाणांच्या रुपाने महाराष्ट्राला एक तरूण तडफदार मुख्यमंत्री मिळाला म्हणून नांदेड मधल्या त्यांच्या समर्थकानी (की चमच्यांनी?) आकडा टाकून वीज चोरून त्यांची पोस्टर उजळवून टाकली. हे सर्व बघायला अशोकरावांना मात्र वेळ नाही. नको, गैरसमज नको, मंत्रिमंडळ रचनेचा तीढा सोडवण्यात ते व्यस्त नाहीत तर सत्यनारायण राजू या पुठ्ठापुर्तीच्या एका भोंदूबाबाच्या पायी लीन होण्यात ते मग्न आहेत. स्वतःला साईबाबांचा अवतार समजणारा सत्यसाईबाबा हा देशाच्या माजी गृहमंत्र्याला सुद्धा असाच नाचवत होता. शंकरराव चव्हाण हे त्यांचं नाव. आपल्या वडीलांचीच परंपरा अशोकराव चालवणार असं दिसतय. शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या तेव्हा त्यांचे अश्रू पुसण्यासाठी या मुख्यमंत्र्याना तिकडे जावस वाटलं नाही पण सत्यसाईबाबा महाराष्ट्रात आल्या बरोबर त्याच्या समोर लोटांगण घालायला हे तिकडे धावले. आपल्या सरकारी निवासस्थानातही मुख्यमंत्र्यानी त्या बाबाला आमंत्रित केलं आहे. या बाबाने जादू करून वर्षा बंगल्याला सोन्याची कौल बसवावीत म्हणजे मी सुद्धा त्याच्या पाया पडेन. दुसरे जयंत पाटील, खुद्द सांगली-मिरजेत दंगल झाल्यावर ते तिकडे धावले नाहीत पण आज हे चरण धरायला ते तत्परतेने गेले. शिवराज पाटील चाकूरकरही इस्त्री मोडली तरी चालेल म्हणत गेले.

हातचलाखी करून अंगठी, सोन्याची चेन काढून त्या बाबाने त्यांना प्रसाद म्हणूनही दिले असेल. असे भक्त मिळाल्यावर सोन्याचा भाव कितीही वाढला तरी त्या बाबाला त्याची पर्वा नसणारच. प्रश्न तो नाही. अरे तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात. तुम्हीच जर असे भोंदूबाबांच्या नादी लागणार असाल तर तुम्ही कसली अंधश्रद्धा निर्मुलन करणार आणि ते विधेयक जे विधिमंडळात रखडलं आहे ते काय पारीत करणार?


महाराष्ट्रातील पर्यावरणीय बदल भाग १

(प्रतिभा दिवाळी अंक २००९ मधून प्रसिद्ध झालेला माझा लेख)

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षात महाराष्ट्राचा विकास किती झाला या विषयी वेगवेगळे दावे केले जात आहेत. निवडणूकीची आचारसंहीता लागू होण्यापुर्वी तर सरकार जनतेचाच पैसा वापरून स्वतःच्या कर्तुत्वाचा डंका पिटीत होते. मुंबई वगळता बहुतांश शहरे लोड शेडींगने हैराण असताना जाहिरात कंपन्यांना करोडो रूपये देऊन स्वतःचीच टिमकी स्वतः वाजवणार्‍यांची ही भुलथाप ग्रामिण महाराष्ट्रात मात्र दिसली नसणार कारण तिकडे अठरा-अठरा तास वीज गायब करण्याची किमया यांच्या कारभाराने आधीच करून ठेवली आहे. असा हा महाराष्ट्र इतका अगतिक कधीच नव्हता. आज जी मंडळी पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना आपले बालपण आठवत असेल मग ते शहरातले असो अथवा खॆड्यातले. जैवविविधतेने आणि निसर्गसौंदर्याने नटलेला आपला महाराष्ट्र नैसर्गिक साधन संपत्तीने परिपुर्ण होता. बारमाही वाहणारे नद्या-नाले, वर्षभर पाणी पुरवठा करणारे तलाव-विहीरी आणि नेमाने पडणार पाऊस अख्ख्या महाराष्ट्राची तहान भागवत होते. वीजेच्या पंपावर तेव्हा शेती अवलंबून नव्हती. हरीतक्रांतीच्या पर्वानंतर आणि विकासाच्या नावाखाली राबवलेल्या चुकीच्या योजनांमुळे हळूहळू या परिस्थितीत बदल होत गेला. ग्रामिण जीवनात जेवढा शासकीय हस्तक्षेप वाढला तेवढी ही परिस्थिती बिघडतच गेली.

हरीतक्रांतीचा उदो उदो करताना पारंपारीक शेतीला पुर्णविराम दिला गेल्याने सेंद्रीयखते, कंपोस्टखते यांचा वापर कमी होत गेला त्या बरोबर गाई-गुरांचे महत्व कमी झाले. त्याच वेळी रासायनीक खते, किटकनाशके यांचा वापर वाढत गेला. परिणामी बहुराष्ट्रीय कंपन्यांची तिजोरी भरत गेली आणि शेतकरी कर्जबाजारी झाला. रासायनीक खते, किटकनाशकांच्या वापरामुळे जमीनीचा पोत बिघडलाच पण त्याबरोबर हे पदार्थ पाण्यात मिसळले गेल्याने पाणी दुषीत झाले. माणसाच्या आरोग्यावर त्याचा परीणाम व्हायला लागला. पर्यावरणाच्या साखळीतले महत्वाचे घटक असलेले छोटे-मोठे जीवजंतू नष्ट झाले आणि शेतीवर पडणारी टोळधाड, किड याने शेतकरी त्रस्त झाला. धान्य, भाजी-पाला यांच्या पोषणमुल्यांवरही त्यांचा परिणाम झाला. उसासारख्या नगदीपिकांसाठी होणार्‍या पाण्याच्या भरमसाठ उपशामुळे जमीनीखालील पाण्याची पातळी सतत घटत गेली आणि जमीनीच्या पोटातले क्षार पृष्टभागावर आल्याने ती जमीनही नापिक झाली.

सद्ध्या जागतीक तापमानात झालेल्या वाढीमुळे (ग्लोबल वॉर्मींग) चर्चेत असलेले ओझोनचा थर, कार्बनडाय ऑक्साईड, यावर प्रभावी उपाय म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ती आपली वनसंपदा आक्रसत चालली आहे. वनजमीनींवर होणारे मानवी आक्रमण, अतोनात जंगलतोड, जंगलांचे चुकीचे नियोजन यामुळे जंगले ओसाड होत आहेत आणि जगण्यासाठी लागणारा प्राणवायु, मोकळी शुद्ध हवा मिळणं दुरापास्त झाले आहे. शहर आणि ग्रामिण भाग असा यात भेदभाव करता येत नाही. मुंबईचे नँशनल पार्क किंवा ठाण्याचे येऊरचे जंगल ही तर या शहराची फुप्फुसे पण या जंगलात अतिक्रमण करून निवारा करणार्‍या माणसाने जंगलाबरोबरच तिथल्या प्राण्यांनाही सळो की पळो करून सोडले आहे. ग्रामिण भागात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पानजीकच्या जमीनीवर कोळसा खाणीसाठी परवानगी देऊन संबंधितांनी जनतेविरोधात पाऊल उचलले आहे. सोलापूर जवळील नान्नज पक्षीअभयारण्य हे माळढोक या दुर्मिळ पक्षासाठी प्रसिद्ध आहे. वनाधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे तिथले माळढोक पक्षी धोक्यात आहेत. माळढोक पक्षांना उपकारक असणारे पण माणसाला बोचणारे तिथले गवत समूळ नष्ट करून कृत्रिम गवताची लागवड केल्याने शासनाचा पैसा तर पाण्यात गेलाच पण माळढोक पक्षाचा अधिवासही नष्ट झाला आहे. जंगले, नद्या, गवताळ कुरणे ह्या गुंतागूंतीच्या अशा क्लिष्ट संरचना आहेत कारण यांच्यात अक्षरश: हजारो घटक एकमेकांशी जोडलेले असतात. त्या मध्ये अवाजवी हस्तक्षेप हा विनाशाला कारणीभूत होतो. जी स्थिती जंगलांची तीच समुद्र किनार्‍यांची महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मुंबई पासून ते थेट सिंधुदूर्ग जिल्ह्यापर्यंत सर्वच किनार्‍यावर अतिक्रमणाने हैदोस घातला आहे. तिवाराच्या जंगलांची होणारी अतोनात तोड ही शेवटी तिथल्या मणसावर उगारलेली कुर्‍हाडच आहे हे त्सुनामी आल्यावरही आपण शिकलेलो नाही. माणसांपेक्षा तिवारंच्या जंगलांचे महत्व ते काय ? असे म्हाणून त्याचे आपल्या स्वार्थापायी समर्थन करणारे राजकारणी आपण गादीवर बसवतो तोपर्यंत पर्यावरणाचा र्‍हास हा ठरलेलाच आहे. (क्रमशः)


26 October, 2009

विचारांची आतषबाजी – नितीन पोतदार




कळेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट तरच होईल जय महाराष्ट्र

‘प्रोग्रेसीव्ह मराठी माणूस’ हा माझा ध्यास आहे. ज्याला तुम्ही आपल्या उणिवा समजता त्याच खर्‍यातर आपली ताकद आहेत. आपलेच लोक आपणावर टिका करतात हे लक्षात घ्या. मराठी माणूस मागे नाही. त्याची दिवसेंदिवस प्रगतीच होत आहे. कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार बोलत होते आणि जमलेला श्रोत्रूवर्ग विशेषतः तरूण-तरूणी टाळ्यांचा कडकडाट करत होता. त्रिमिती आयोजित ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा’ या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कवीवर्य प्रा. प्रविण दवणे यांनी पथ्थरसुध्दा सागर होवू शकतो मग तुम्ही आम्हीतर चालाती बोलती माणसं असं सांगून चेतवलेल्या स्फुलिंगावर वास्तव आपल्या बाजूने आहे हे सोदाहरण स्पष्टकरत पुन्हा एकदा फुंकर घातली.

मराठी माणूस चाकरमानी वृत्तीचा, डाऊन मार्केट, व्यापाराचं अंग नसलेला, बावळट अशी टीका केली जाते. पण ही टिका कोण करतं. तर मराठी माणूसच ती टिका करतो. पण आता तशी स्थिती राहीलेली नाही किंबहूना तशी ती कधीच नव्हती. राजकारण, व्यापार, उद्योग, क्रिडा, जाहीरात, बॅंकींग, विमा, माहीतीतंत्रज्ञान, माध्यमं या सर्व क्षेत्रात आजच्या घडीला अघाडीवर असलेल्या (राष्ट्रपती प्रतिभा पाटील, सचीन तेंडूलकर, भरत दाभोळकर, नितीन वैद्य, शोभा डे, नितीन सरदेसाई, विजय भटकर, चंदा कोचर अशी अनेक. स्वतः नितीन पोतदार हे अंरतराष्ट्रीय किर्तीचे गुंतवणूकतज्ञ आहेत.) अनेक दिग्गजांची नुसती नावं आणि हुद्दे सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही म्हणून वानगी दाखल काही उदाहरणं पडद्यावर दाखवली ती पाहताना उपस्थितांपैकी प्रत्येकाचीच छाती अभिमानाने फुलून आली.

पैसा म्हणजे भ्रष्टाचार, अधोगती, तो गैरमार्गानेच मिळवला असणार, पैशाबरोबर शंभर व्यसनं येतात या कल्पना आतातरी डोक्यातून काढून टाका. वर उल्लेखलेली मंडळी भरपूर पैसा येवूनही मातली नाहीत की व्यसनाधीन झाली नाहीत. सचोटी हा मराठी माणसाचा गुण आहे ती आपली उणिव नाही. मात्र हा गुण ‘कॅश’ करता आला पाहीजे. प्रत्येक मराठी माणूस किमान एकतरी छंद जपतो. तो छंद तुम्हाला पैसा मिळवून देवू शकतो. मात्र त्यासाठी तसा विचार केला पाहीजे. मराठी माणूस कुठल्याही दृष्टीने मागे नाही. भारतात सगळ्यात जास्त मर्सिडीज कार कोल्हापूरात विकल्या जातात या वरून काय ते समजा. पुढे जायचय ना? मग स्वतःचा शोध घ्या, आत्मपरीक्षण करा, निर्णय घ्या. मग यश तुमचच आहे. पण एक मात्र लक्षात ठेवा ‘कळेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट तरच होईल जय महाराष्ट्र’ हे आपलं ब्रीद असायला पाहीजे.

आपण मराठी माणूस परिसंवाद, सभा संमेलने खुप भरवतो, पण आपला समाज आर्थिक सक्षम कसा होईल यावर विचार करण्यासाठी एकत्र येत नाही या बद्द्ल खंत व्यक्त करताना त्रिमितीने ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा’ हा कार्यक्रम आयोजित केला त्याचं मात्र त्यानी मनापासून कौतूक केलं. त्रिमितीचा या कार्यक्रमला १०० रुपये तिकीट लावूनसुद्धा तुडूंब गर्दी झाली होती हे विशेष. जय महाराष्ट्र, जय मराठी.


25 October, 2009

मराठी मनावर ‘राज’ कोणं करतय ?


आजचा हा कळीचा मुद्दा आहे. गेली ४४ वर्ष शिवसेना आणि मराठी माणूस असं समीकरण होतं. त्या मुळेच केवळ त्या मुळेच छगन भुजबळ जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांना पद्मसिंह पाटलांच्या बंगल्यावर आसरा घ्यावा लागला. ती दहशत मराठी माणसाचीच होती. आता सदा सरवणकर राजरोस फिरतात तेव्हा त्याना अडवणारा कुणी नाही. ही अवनती का झाली? सत्तेवर आलात तेव्हा काय केलं? महापालिकेत सत्ता आहे मग अनधीकृत झोपड्या कशा उभ्या रहातात? चाळीस लाख झोपडपट्टी वासियांना मोफत घरे ही घोषणा झाली तेव्हा त्याना ती मिळाली नाहीत, पण त्या वेळपासूनच भैयांची आवक मात्र वाढाली. कृपाशंकर मुंबई प्रदेश कॉंग्रेसचा अध्यक्ष होतोच कसा? आणि त्याच्या घरी उद्धव ठाकरे गणपतीला जातातच कसे? मराठी माणूस हे कसं विसरेल? का विसरावं? कृपाशंकर मुंबई प्रदेश कॉंग्रेसचा अध्यक्ष होतो हा केवळ कॉंग्रेसचा प्रश्न नाही तो मुंबई आणि महाराष्ट्राचाही प्रश्न आहे. आता अशोक चव्हाणांच्या जागी त्याला बसवला तर चालेल का? तो संजय निरूपम त्याला कुणी पोसला? त्याला राज्यसभेचा खासदार कुणी केला ? आता तो भैयांसाठी वेगळे मतदार संघ मागतोय. कुठल्याही भाषेला विरोध असता कमानये पण मराठीला कुणी केलडावून दाखवणार असेल तर त्या माकडाच्या शेपटीला कोलीत लावायला नको? मराठी पाट्या लावा होssss म्हाणून का सांगावं लागतं? राज ठाकरेंनी मुद्दा उचलून धरला की लगेच दुसर्‍या दिवशी तो आमचच मुद्दा म्हाणून सांगायच आणि गप्प बसायचं. कृती कोण करणार? राज ठाकरेंनी ती केली म्हाणून लोकं त्यांच्या मागे गेली. जनतेला भुतकाळावर जगता येणार नाही. बाळासाहेबानी तेव्हा आवज उठवला लोक त्यांच्या बरोबर होते. आज राज ठाकरे ते काम करताहेत मग लोक त्यांनाच पाठींबा देणार. विधिनिषेध शुन्य भैये कुणाला टरकतात ते महत्वाचं. अग्रलेखातून गळा काढून काय साधणार? त्या पेक्षा उद्धव ठाकरेंनी लोकांसमोर यावं.

विचारांची आतषबाजी – प्रा.प्रविण दवणे

रात्री-बे-रात्री वाजवले जाणारे फटाके, त्या मुळे झोपेचं खोबरं झालेलं. त्यामुळे सकाळची झोप जरा जास्त घेऊन दिवाळीत पहाटे नाही पण दहा वाजता दामोदर नाट्यगृहात मंडळीनी गर्दी केली होती. त्रिमिती आयोजित स्वप्न बघा, स्वप्न जगा’ हा कार्यक्रम बघायला, नव्हे नव्हे ऎकायला रविवार सकाळ आणि ऎन दिवाळी सुरू असूनही सभागृह तुडूंब भरलं होतं. दवणे सरांचे मृदू मुलायम नवनीतासारखे शब्द मनाचा ठाव घेत होते. मग सुमारे दिड पावणेदोन तास केवळ मंतरलेले होते. दवणे सर म्हणाले हा मनोरंजनाचा नव्हे तर ‘मनोअंजनाचा’ कार्यक्रम आहे. समोर जमलेल्या होतकरू युवकांमध्ये आपल्याला बिजात दडलेला वृक्ष दिसतो आहे. त्याला आकाशचं निमंत्रण, पावसाची साथ आणि वार्‍याची साद मिळली ना म्हणजे त्याचं वृक्षात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही. पण असे मोठे झाल्यावर केवळ पैशाचा हव्यास नको. पैसा मिळवा पण तो साध्य म्हणून नव्हे तर साघन म्हणून. कसं ते स्पष्ट करताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक माणूस तहानेने व्याकूळ होवून मेला. पाण्याचा एकही थेंब पिऊ न शकल्याने अखेर त्याचा अंत झाला. तो असं काय करत होता ? तर तो आपल्या घरातच पाणी भरत होता. मोठ मोठी भांडी भरून झाली. कळशी, टोप, पातेली, वाट्या, पेले, चमचे सरते शेवटी चाळण आणि गाळणीसुद्धा भरण्याचा प्रयत्न झाला. त्या एवढ्या धावपळीत त्याला स्वतःला तहान लागली पण पाण्याच्या हव्यासापोटी तो भरलेल्या पाण्यापैकी पाणी प्यायला तयार नव्हता आणि त्याची अखेर झाली. असा पैशाचा हव्यास नको.

उतूंग शिखरावर जायचं स्वप्न बघा. उद्याचं सत्य हे आजचं स्वपनच असतं. ते पहायला शिका. पांघरूण घेऊन झोपला असाल तर ते दूर करा. खिडकी उघडा. परवासाठी आजच पेरूया. माध्यामांचा क्लोरोफॉर्म घेऊन मी कसा दिसेन ही काळजी नको तर मी कसा असेन याची काळजी घ्या. अभिरूचीचं अमृत प्या आणि खरेच अ-मृत व्हा. देवाने माणसं ही झेरॉक्स प्रमाणे एकसारखी जन्माला घातलेली नाहीत. पं. रवी शंकर, डॉ.अब्दूल कालाम हे जसे एकमेवाद्वीतीय तसेच आपल्या सारखे आपणच. प्रत्येक माणूस हा युनिक आहे आणि म्हणूनच एकमेव आहे. तीच खरी ताकद आहे. दुसर्‍या पासून प्रेरणा घ्या मात्र भरारी घेणारे पंख तुमचेच असू द्या. जो पोहायला शिकवतो त्याने हात पाय मारून तुम्हाला पोहता येणार नाही. त्याला मिठी मारू नका दोघेही बुडण्याची शक्यता असते. काहीही शक्य आहे. एका पथ्थराला स्वप्न पडलं आपण सागर व्हावं. त्याला दाटून आलं. पाझर फुटला, त्याचा ओहळ झाला, तो नदीला मिळाला, नदी सागराला मिळाली तेव्हाच तो पथ्थर सागर झालाच ना? एक पथ्थर पर्वतावरून असा उतरतो मग तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं. प्रतिकूल असं विणकाम करत गेलं की प्रविण काम होतंच. अडथळा आला म्हणजे समजावं आपल्याला गती प्राप्त झाली आहे. एका जागेवर थांबणार्‍याला अडथळा कसा येणार ? सरपटणार्‍या माणसांना कोसळण्याची भिती नसते. तेव्हा आपण का कोसळत नाही याचा विचार करा.


शिशिरात पानगळ होते ती नवी पालवी फुटण्यासाठी, नव्या आशेसारखी. आता समाजात पुर्वीसारखे महापुरूष नाहीत म्हणण्या पेक्षा तुम्ही व्हा ना महापुरूष. विचार हरवलाय तो शोधूया. जगण्याची कला आत्मसाथ करूया. खाणं आहे पण कसं खावं हे समजत नाही तो कर्मदरिद्री. जिवन आहे कसं जगावं हे समजत नाही तो कर्मदरिद्री. धनोरूग्ण आणि मनोरोग्ण यात काय फरक आहे ? त्यांच्या जवळ पक्वांन्न आहेत पण डायबेटीस झाला त्याला काय करणार ? पेढा नव्हता, त्या पेक्षा आता तो असूनही खाता येत नाही हे दुःख जास्त मोठं आहे. जाणार्‍या वेळाचं महत्व जो जाणतो तो त्याच्या प्रत्येक क्षणाची दिवाळी करतो. तेव्हा ‘घड्याळ माझा गुरू, घड्याळ कल्पतरू’ हा मंत्र जपा. आजच्या यशामध्ये एवढे गुंतू नका उद्याच्या स्वप्नांची काळजी घ्या. स्वप्न जगून ती सत्यात आणणारी माणसं आपल्यातच आहेत आपणही ते करू शकता.


23 October, 2009

मनसेने मुलूंड टोल नाका फ्रि केला.......!


आज मुलूंड ठाणे दरम्यान चालत्या लोकल ट्रेनवर पाण्याची जलवाहिनी कोसळून अपघात झाला. दोघेजण ठार तर काही जखमी झाले, अर्धी मुंबई विस्कळीत झाली. पुर्व द्रुतगती मार्गावर वाहतूकीची कोंडी झाली. रोज लोकलने प्रवास करणारे लाखो चाकरमानी मिळेल त्या वाहनाने घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी आपण ज्याना बिच्चारे म्हणतो ते टॅक्सी-रिक्षा ड्रायव्हर दाम दुप्पटीने पैसे वसूल करतात. त्यात टोल भरून प्रवास करावा लागतो. अशा वेळी प्रशासनाने हस्तक्षेप करून लोकांची सोय बघितली पाहीजे. प्रशासन जेव्हा हातावर हात घेवून बसतं तेव्हा खुप गैरसोय होते. आज मुलूंड टोल नाक्यावर मसैनिकांनी जावून टोल नाका फ़्रि केला ते उत्तम झालं. नाहीतरी हे टोलवाले मला वल्याकोळीच वाटतात.

20 October, 2009

शर्यत

मुख्यमंत्री होण्यासाठी

सगळ्यानीच कंबर कसली आहे

कमरेच्याहीवर वार करायला

त्यांची तलवार सज्ज आहे


कुणी साईबाबांचं दर्शन घेवून

मॅडमच्या दारी उभा आहे

कुणी अपक्षांच्या दाढ्या कुरवाळत

एक एक मणी मोजतो आहे


पैशांच्या थैल्या गाढवांवर वाहून

घोडेबाजार सजतो आहे

मतपेटी आड बसून

मतदार राजा हसतो आहे


आकडेमोड करून करून

डाव मांडला जात आहे

मांडलेला डाव नक्कीच मोडणार

फक्त थोडा अवधी आहे.


गगन सदन तेजोमय


दिवाळी पहाट हा आता महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा होत आहे. दिवाळीच्या दिवसात भल्या पहाटे उठून मंडळी जेव्हा अशा एखाद्या कार्यक्रमाला जातात तेव्हा ती दिवाळी नक्कीच संस्मरणीय ठरते. अशीच एक पहाट दिवाळीची उत्तम सुरवात करून गेली. ‘गगन सदन तेजोमय’ या आकर्षक शिर्षकाने सुरू झालेला ही पहाट उत्तरोत्तर रंगत गेली आणि तिचा कळसोध्याय होता तो म्हणजे सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे श्रीसिद्धिविनायक पुरस्कारांचा वितरण सोहळा. गार्गी पुरस्कार प्रदान करण्यात आला तो आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक असणार्‍या चंदा कोचर याना. फॉच्र्युनतर्फे जाहीर करण्यात आलेल्या सर्वात प्रभावी महिलांच्या यादीत गेली पाच वर्षे त्या आहेत. फोर्ब्सतर्फे जाहीर करण्यात आलेल्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीतही त्यांचे नाव विसाव्या क्रमांकावर आहे. कौटिल्य पुरस्कार देण्यात आला दिलीप नाचणे यांना. अर्थतज्ज्ञ डॉ. दिलीप नाचणे सध्या इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च या शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे संचालक असलेल्या नाचणेंनी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, स्टेट बँक ऑफ इंडिया इत्यादी संस्थांनी स्थापन केलेल्या समित्यांचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. वाल्मिकी पुरस्काराचे मानकरी होते दिनकर गांगल. ग्रंथाली आणि वाचकाचं अतूट नातं आहे. गांगलानी १९७४ साली ग्रंथालीही वाचक चळवळ सुरू केली. लेखक घडविणारा वाल्मिकीया शब्दांत त्यांचा गौरवपुर्ण उल्लेख केला गेला तो सार्थच आहे. ग्रंथालीचं पुस्तक वाचनीय असणारच याची वाचकांना खात्री असते. उत्तमोत्तम पुस्तके किफायतशीर किमतीत वाचकांना देणार्‍या गंथालीचे आभार मानावेत तेवढे थोडेच. पुढचा होता सुश्रूत पुरस्कार. तो डॉ. संजय ओक यांना प्रदान करण्यात आला. जीएस वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओकांनी शासकीय रुग्णालयांमधील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता असताना त्या संस्थेला आयएसओ प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे भारतात सयामी जुळ्यांवरील यशस्वी शस्त्रक्रिया असे अनेक विक्रम केले आहेत. एकलव्य पुरस्कार हा मानाचा पुरस्कार उदय देशपांडे यांना देण्यात आला. मल्लखांब या भारतीय खेळाचा प्रसार आणि प्रचार देश विदेशात करून त्यांनी या खेळाला वैभव प्राप्त करून दिलं आहे. त्यांनी शिकवलेल्या मुलांनी व्यासपीठावर मल्लखांबाच्या अप्रतिम कसरती करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात आपल्या असामान्य कर्तृत्वाने माहाराष्ट्राच्या आकाशात तळपणार्‍या या तेजस्वी सुर्यांचं दर्शन घेवून दर्शक जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्या वाटा अधिक प्रकाशमान झाल्या असतील.

19 October, 2009

देवा याना माफ कर


आज दिवाळीचे चार दिवस संपत आले. मागे उरला फटाक्यांचा कचरा, धुर आणि काजळी, आणि हो ठाण्यात अग्नीशमन दलाच्या सात जवानांचे मृतदेह. दिवाळी पहाट सारखे स्तुत्य उपक्रम एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला गल्ली-बोळात, रस्त्या-रस्त्यावर अनिर्बंधपणे वाजवले जाणारे फटाके. हल्ली मुलांचे डॉक्टर पालकांना सांगतात चॉकलेट आइस्क्रीम तो बच्चोंका हक है त्याच चालीवर पालक मुलांबरोबर स्वतःही फटाके वाजवण्याचा हक्क बजावताना दिसले. भल्यापहाटे पासून रात्री उशीरा पर्यंत वेळेची मर्यादा ओलांडून हे बजावण चालू होतं. हे ताळतंत्र सोडून वागणं नेहमीचच झालं आहे दिवाळी फक्त निमीत्त. आता बाविस तारखेला कुणीही निवडून येवो फाटाक़्यांपासून होणारं प्रदुषण मात्र तेवढच असणार याची खात्री देतो.

हे असे विनाशकारी फटाके पर्यावरणाचं दिवाळं वाजवतातच पण चीनी बनावटीचे हे फटाके वाजवून आपणच चीनच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करतो आहोत. दुसरा मुद्दा असा की नुकत्याच परतणार्‍या मांसूनने ग्लोबल वॉर्मींगचे धोके स्पष्ट केले आहेत. सिंधुदूर्ग जिल्ह्यात एका दिवसात एवढा पाऊस पडला की त्याने मागचे सर्व विक्रम मोडले. विध्वंस केला. जागतिक तपमान वाढीचा हा धोका आता आपल्या दारात नव्हे घरात आला आहे. आता घश्याचे,द्म्याचे विकार बळावतील, आवाजाचा त्रास तमाम जनतेला झाला असणारच (वाजवणार्‍यानादुद्धा होतो, ते कानात बोटं घालून वाजवतात). या सर्व गोष्टी सर्व प्रकारच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा संगितल्या जात आहेत पण....., आपण स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून घेतली तर त्याला कोण काय करणार. आपण येवढच म्हणू शकतो, देवा याना माफ कर ते आपल्या बरोबर आमच्याही पायावर कुर्‍हाड चालवताहेत.


शब्दांचा जादुगार - प्रविण दवणे



दवणे सरांचं लिखाण जेव्हा केव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा पासूनच खरं तर मी त्यांच्या प्रेमात पडलो. मुंबईत आल्या पासून एकदातरी प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती, त्यांचा ‘दिलखुलास’ कार्यक्रम बघायचा होता पण तशी संधी काल पर्यंत आली नव्हती. काल स्वप्न बघा स्वप्न जगा या कार्यक्रमात सरांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली, त्यांचे अमृताचे बोल ऎकले, दिवाळीत हा आनंद सोहळा अनुभवता आला. शब्दांची ताकद, भावनांचे तरंग एकूणच विचारांची दिवाळी काल खर्‍या अर्थाने साजरी झाली, त्याचा एक भाग होता आलं.

निघालो घेऊन दत्ताची पालखी हे भक्तिगीत एखाद्या संताला भगवंता विषयी वाटणार्‍या प्रेमातून, जिव्हाळ्यातून, भक्तितून जन्माला आलं असं कोणालाही वाटेल. ते भक्तिगीत परंपरागत म्हणूनही समजणारे कमी नाहीत. ते भक्तिगीत दवणे सरांनी लिहीलेलं आहे हे जेव्हा गुरूभक्तांना कळेल तेव्हा सरांच्याच दर्शनाला रांगा लागतील अशी स्थिती आहे हे मी नसोबाच्यावाडीला जावून आलो तेव्हा मला समजल. कालच्या व्यख्यानाचा हॅंगओव्हर अजून उतरला नाही. त्यातून बाहेर आलो, ते मनात उतरलं म्हणजे त्या विषयीचं पोस्ट लिहीनच. तोपर्यंत मनाची कवाडं उघडली गेली, सरांच्या दिलखुलास बोलण्याने दिल खुल गया एवढं मात्र नक्की.


16 October, 2009

‘करा पडतील ते कष्ट तरच होईल जय महाराष्ट्र’ विचारांची आतषबाजी...!


आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आधी उद्दिष्ट नक्की करावं लागतं. ध्येयपुर्ती होईल असं स्वप्न बघावं लागतं, त्या दिशेने वाटचाल करावी लागते. वाटेत येणार्‍या संकटांचा सामना करून पुढे जावं लागतं. जिद्दीने, चिकाटीने, सतत प्रयत्न करून आपण ते साध्य करू शकतो. अशी झुंज घेत असताना एखादा मार्गदर्शक, गुरू मिळाला तर..., तर तो मार्ग प्रशस्त होतो, यश कित्तेक पटीने मोठं होतं. एकेकाळी आपल्या सारखीच सामान्य असलेली पण आता त्यांच्या क्षेत्रात उच्च शिखरावर विराजमान झालेली एक सोडून दोन व्यक्तीमत्व आपल्या भेटीसाठी येत आहेत, प्रा. प्रविण दवणे आणि कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार. कवी, गीतकार, लेखक, नाटकार, वक्ता आणि उत्तम प्राध्यापक म्हणून प्रविण दवणे मराठी जगताला माहीत आहेतच पण निराश मनाला उभारी देण्याची ताकद त्यांच्या साहित्यात आहे. वृत्तपत्रात आलेला त्यांचा एखादा लेखही मरगळलेल्या मनात नवीन आशा पल्लवीत करतो. हेच प्रा. प्रविण दवणे स्वप्न बघा, स्वप्न जगा या मालेतलं पहिलं पुष्प गुंफणार आहेत. आपल्याला काय आवडायला हवं आणि यशाच्या वाटेवर कसं जावं, कसं चालावं या विषयी ते आपणाशी संवाद साधणार आहेत. दुसरे वक्ते नितीन पोतदार हे त्यांच्या आश्वासक लिखाणामुळे वचकाना परिचित आहेत. नवीन विचारांना चालना देणारे नितीन पोतदार हे कॉर्पोरेट लॉयर या काहीशा सामान्याना माहीत नसलेल्या क्षेत्रात कार्यरत असून देश-विदेशातील उद्योगांचं, ‘विलिनीकरण आणि सहकार्य करार’ या महत्वाच्या कामात प्रतिनिधित्व करतात, तसच विदेशी गुंतवणूकतज्ञ म्हणूनही ते जागतिक स्तरावर मान्यता पावलेले आहेत. जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी ‘कळेल ती भाषा, मिळेल ते काम आणि पडतील ते कष्ट तरच होईल जय महाराष्ट्र’ हे आपलं ब्रीद असायला हवं असं ते म्हणतात. ‘प्रोग्रेसिव मराठी समाज’ हे त्यांचं स्वप्न आहे आणि त्या विषयावरच ते आपल्याशी बोलणार आहेत. येत्या रविवारी, १८ ऑक़्टोबर २००९ रोजी सकाळी ठीक १० वा. परळ, मुंबई येथील दामोदर नाट्यगृहात त्रिमिती या संस्थेने हा मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

जागतिकीकरणाच्या या युगात स्पर्धेला आलेला प्रचंड वेग, त्या वेगाशी जुळवून घेताना भांबावलेला मराठी तरूण, नेमक्या कोणत्या मार्गावर चालावं याची दिशा शोधतो आहे. त्याला या विचारांमधून नक्कीच प्रेरणा मिळेल.


15 October, 2009

चीनचा निचपणा


भारताची सतत कुरापत काढायची हा चीनच्या परराष्ट्र धोरणाचाच एक भाग दिसतो. अगदी अरूणाचल प्रदेशपासून जम्मू-काश्मीर पर्यंत संपूर्ण सिमावर्ती भागात प्रत्येक राज्यात काहीना काही वाद उपस्थित करून भारतावर दबाव आणायचा आणि पाकिस्तानला फुस द्यायची हे चीनचं निचपणाचं धोरण आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये जलविद्यूत प्रकल्प उभारणे, हमरस्ते बांधणे, लेह-लडाख भागात घुसखोरी करणे, सिक्किमवर हक्क सांगणे, अरूणाचल प्रदेशमध्ये आपले राष्ट्रापती, पंतप्रधान गेले असता त्याला आक्षेप घेणे हे प्रकार आता वरच्यावर घडू लागले आहेत. अख्खा तिबेट गिळंकृत केल्यावर आता आजुबाजुच्या प्रदेशावर हातपाय पसरण्याचा चीनचा उद्देश आहे. पाकव्याप्त काश्मीर मधला हजारो हेक्टर भाग पाकने चीनला परस्पर बहाल केला आहे.


Made In Chaina असा शिक्का असलेल्या असंख्य वस्तू. खेळणी संपूर्ण भारतात रस्तो-रस्ती, गल्लो-गल्ली आपणाला पहायला मिळतात. विशेष दर्जा नसलेली ही उत्पादनं आपण कमी किंमत आहे म्हणून विकत घेतो. हरामखोर चीन्यांना धडा शिकवायचा असेल तर चीनी मालावर बहिष्कार घालणे हा एक उपाय होवू शकतो. चीनचा निषेध करायची ती एक परिणामकारक खेळी ठरेल.


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates