30 August, 2009

प्रवास रंगे, स्वाईन फ्लू संगे

मित्रहो स्वाईन फ्लूने जी काही दहशत माजवली आहे त्यामुळे अनेकांना श्वास रोखावा लागत आहे. बाजूचा माणूस शिंकाला किंवा खोकला तर आता पुढचा श्वास आपण घ्यायचा की नाही हा प्रश्न पडतो. मग काय श्वास रोखला जातो. घाईघाईने रुमाल नाकाला लावला जातो आणि न चुकता एक जळजळीत कटाक्ष त्या शिंकणार्‍यावर टाकला जातो. तो शिंकणारा मात्र दुसरी शिंक आळवण्यात मग्न असतो.

हा स्वाईन फ्लू कुणाला पर्वणी, कुणाला वर्गणी तर कुणाला खंडणी देणारा ठरला. आमच्या सौ साठी मात्र ही पर्वणी ठरली. मुलीच्या शाळेला अनपेक्षीत सुट्टी मिळल्याने आणि परीक्षा रद्द झाल्याने मुलगी स्वाईन फ्लू जिंदाबाद ओरडत आली आणि ती सुट्टी आम्ही अक्षरश: साजरी केली. रेल्वेची तत्काळ सेवा कामाला आली. मला फिरायला आणि तीला माहेरी जायला फार आवडतं. एका दिवसात तयारी झाली. तीने शेजारी-पाजारी, मैत्रिणींना ती आनंदवार्ता कळवली. काहीजणांनी असूयेपोटी म्हटलं सुद्धा एसीने जाताय ना ? एसी मध्येच स्वाईन फ्लू जास्त पसरतो असं ऎकलय हीला जायचं तर होतं पण पुन्हा दहशतीने शंका उत्पन्न केली, खरच काय हो एसी मध्ये स्वाईन फ्लू पसरतो ?

मी.: नाही ग, तसं काही नाही, तसा तो पसरायला कुणीतरी स्वाईन फ्लूवाला आला पाहीजे ना आपल्या डब्यात.

सौ,: अहो कशाला पाहीजे तो.

मी.: स्वाईन फ्लू पसरवायला.

सौ.: माझी मैत्रिण म्हणत होती मास्क घेऊन जा म्हणून. मास्क आणूया काय हो ?

मी.: नको, बाकी सगळ्यांनी लावले म्हणजे आपण सेफ.

सौ.: काय हे, अशा परिस्थितीत सुद्धा तुम्हाला विनोद सुचतात.

मी.: आणि तुला माहेर.

तर अशा पाश्वभुमीवर आम्ही कोकणच्या प्रवसाला निघालो. ट्रेन मध्ये बसलो. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इतर प्रवाशांची वाट पहात होतो. एवढ्यात एक कुटूंब मुसक्या बांधून आलं. (चला यांच्या पासून आपल्याला काही अपाय नाही. मी मनातल्या मनात म्हटलं. माझ्या या मनातल्या मनातला हीने नजरेनेच दाद दिली.) डॅडा-डॅडी नव्हे डॅडा-मम्मी आणि दोन बाळं. आल्या आल्या पाण्याच्या बाटलीसाठी त्यांची धावपळ सुरू झाली. म्हणजे बघा, पाणी भरपूर पिलं पाहीजे तर यांच्या जवळ पाणीच नाही. ही माझ्या कानात कुजबुजली. गाडीला पॅट्रीकार आहे, पाणी येईल मी त्याना दिलासा दिला. आणखी एक लेकुरवाळी आली. सगळ्या जागा भरल्या, गाडी सुरू झाली, त्याना पाणी मिळालं.ती बाळं बर्थला लोंबकळू लागली, सुरपारंब्यांचा खेळ सुरू झाला. कोकणातली वानरं बिघडतील अशी मला भिती वाटू लागली. त्यांच्या चेहर्‍यांवरचे मास्क गळाले, खाली पडले, पायाखाली लोळले. या गडबडीत आमची निंद हराम आणि डॅडा-मम्मीला मात्र आराम. दोघही डाराडूर झोपलेली. मध्येच डॅडा उठले Where is your mask ? म्हणून ओरडले. आता ती बाळं खाली पडलेले मास्क उचलून एकमेकाकडे फेकू लागले ( स्टाईल: टोपीविक्या आणि माकड ) डॅडाची पुन्हा ओरड सुरू, ते मास्क त्यांच्या तोंडावर गेले. थोड्या वेळाने एक मास्क खाली आला तो त्या डॅडाचा होता. डॅडा मस्त झोपेत. मी सहज मम्मीकडे पाहीलं तीचा मास्क अंगाखाली होता.

जेवणाला सगळे उठले. जेवताना मास्क गळ्यात आले, पाणी आणि बिर्याणी मास्कनासुद्धा मिळाली. संध्याकाळ पर्यंत ते रंगरुपाने बदलले. मंडळींचं स्टेशन आलं. पुन्हा मास्क चढवले गेले. मंडळी ऎटीत उतरली. आमचा प्रवास अजून सुरूच होता. मास्क न लावल्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत याचा साक्षात्कार झालेला होता. शेवटी आम्हीही उतरलो. आम्हाला न्यायला आलेली मंडळी तोंडावर रुमाल दाबून गर्दीत आमचा शोध घेत होती. इतर लोकांना नजरेनेही टाळत होती, जणू आम्ही सोडून सर्व जीवाणू होते.

आमचं स्वागत करण्यासाठी घरी अडुळशाचा पाला घालून गरम केलेलं पाणी आंघोळीसाठी तयार होतं. बाधीत प्रदेशातून आल्यामुळे आमचे कपडे त्या पाण्यात बुडवले गेले. पाऊस असल्याने पुढचे तीन दिवस ते सुकले नाहीत. दरम्यान अळंबी, मासे, शहाळी, अळू, पालेभाज्या अशा पदार्थांचा आस्वाद घेत आम्ही प्रतिकार शक्ती वाढवली आणि पुन्हा कर्मभुमी कडे वळलो.

नरेन्द्र प्रभू


1 comment:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates