31 January, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ५)

पुढचं प्रमुख आकर्षण होतं पँगगॉंग लेक. १४५ कि.मी. लांबीचं हे तळं (?) खार्‍या पाण्याचं आहे. भारत-चीन सीमेवरील या ठिकाणी जाताना नयनरम्य अशा प्रदेशातून आपली भ्रमंती होते. वाटेत लागतो छांगला पास. रस्त्यात याक, मरमऑट असे प्राणी दिसले.

आता पासेसना सरावलेले आम्ही कारु, शक्ती शक्ती अशी गावं पार करुन पँगगॉंग ला पोहोचलो. वाटेतलं बर्फ आता रोजचं झालं होतं. पण पासवर पोहोचल्यावर सैनिकांचं भेटणं आणि चहापान याने उबदार वाटायचं. वाटसरुच्या जीविताची काळजी आणि काही वैद्यकीय मदत लागली तर ती पुरवण्यासाठी हे सैनिक सदैव तयार असतात. त्याना पाहून त्यांच्या बाबतचा आदर आधिकच दुणावला. पँगगॉंगच्या काचेसारख्या स्वछ पाण्यात पाय देण्याची हिंमत होत नव्हती, एवढं ते थंड होतं. आत जाऊन लगेचच बाहेर आलो. पण सभोवताली जे सौंदर्य होतं त्याला तोड नाही. एवढ्या शांत धीरगंभीर वातावरणात आपण निसर्गाशी एकरुप होऊन जातो. निसर्गाशी तादात्म्य पावण्याचे असे क्षण आपल्या आयुष्यात फार कमीच येतात. नाही का ?


(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू



28 January, 2009

लडाख - भुतान छायाचित्र प्रदर्शन

हिमालयाची शुभ्र हिमशिखरं सर्वानाच साद घालत असतात, नव्हे अगदी वेद काळापासूनच आपणा सर्व भारतीयाना त्याच प्रचंड आकर्षण आहे. जसे देव, ऋषी- मुनी तिथे वास्तव्य करतात असं आपण मानतो, तसाच निसर्ग देवतेचा नित्यनेमाने नवा अविष्कार आपल्याला तिथे पहायला मिळतो. आपल्या देशाला पुर्वेकडे अरुणाचल प्रदेश पासून उत्तरेकडे काश्मिर पर्यंत हे देणं लाभलं आहे. जगभरातील निसर्गवेडे इथे धाव घेत असतात.

वॉन्डररर्स चे छायाचित्रकार गेले ते थेट लडाखला, जिथे त्यांनी टिपलाय एक अनोखा हिमालय. इतर ठिकाणांहून जवळ वाटणारं क्षितीज इथे पार दूरवर गेलेलं असतं. चोहिकडे रंगांची रांगोळी घातलेली दिसते. एवढ्या रंगछटा, आकार आणि भव्यता खरचं स्तिमीत व्हायला होतं. एक वेगळं जग, जिथे आहे चांद्रभूमी, जगातील सर्वात उंच मोटार वाहतुकीचा रस्ता, बौध्द गूंफा तर आहेतच पण आपल्याला नेहमी दुरावली असं वाटणारी सिधू नदी सुध्दा सामोरी येते. हे सर्व पाहून स्वर्ग भुमीवर आल्याचा भास होतो. हे झालं लडाख विषयी पण तिकडे पुर्वेला आहे भुतान. लडाखच्या अगदी विरूध्द असलेलं हिमालयाचं आणखी एक रुप, जिथे आहे नेत्रसुखद हिरवाई. चिड आणि पाईनचे भले थोरले वृक्ष व त्यातून बागडणार्‍या नद्या. नंदनवन म्हणाव तर हेच. दर मिनीटागणीक बदलणारे सृष्टीचे विभ्रम, वर्णन करणे केवळ अशक्य. हे सर्व पहण्याची संधी आपल्या दारी आणली आहे वॉन्डररर्सने. वॉन्डररर्स या हौशी छायाचित्रकारांच्या गटाची स्थापना श्री. आत्माराम परब यानी १० वर्षांपुर्वी केली, ती छायाचित्रकाराच्या सुप्त गुणांना जनतेसमोर आणण्यासाठी.

अशाच "वॉन्डररर्स " पैकी आत्माराम परब,हितेंद्र सिनकर, तुषार निदांबूर,नरेंद्र प्रभू, अतिष बँनर्जी, दिपांकर बँनर्जी,केदार मालेगावकर, सागर कर्णिक, संजय तिकोटीकर, विनायक परब, विश्वेश आठवले, जीतेंद्र सावंत व डॉ. घनश्याम बोरकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.. देशपांडे कला दालन, रविंद्र नाट्य मंदिर आवार , प्रभादेवी, मुंबई येथे ३१ जानेवारी ते ८ फेब्रूवारी २००९ , सकाळी ११ ते सायंकाळी ८ वा. पर्यंत सर्वंसाठी विनामूल्य आयोजीत करण्यात आले आहे. या प्रदर्शना दरम्यान हिमालयातील भ्रमंती, लडाखवारी, भुतान तसेच अन्य ठिकणांची माहिती, स्लाईड शो, चित्रफीत आणि मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करुन दिले जाईल. संपर्क: ९८९२१८२६५५, ९३२००३१९१०


25 January, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ४)

आज आम्ही लेहमध्येच फिरणार होतो. सिंधू नदी ( Indus) कित्येक वर्षे फक्त वर्णनातून ऎकलेली, वाचलेली आज प्रत्यक्ष समोर होती. घाटावर जाऊन पाण्याला स्पर्श केला. शांत, थंड जल, काठाला थोडीशीच हिरवाई.

भावनांनी मनात गर्दी केलेली. उत्तर-पुर्वेला काराकोरम रांगा, दक्षिण-पुर्वेला हिमालयाच्या रांगा आणि गाभा ट्रांस हिमालयन रांगांचा, अशा प्रदेशात आता आमचा संचार 

सुरू होता. थिकसे गुंफेत आम्ही पोहोचलो तेव्हा अर्ध्यातासात परत फिरु असं वाटलं पण दोन तास कसे संपले ते 

समजलच नाही. ही प्राचीन गुंफा नेत्रसुखद तर आहेच पण कोणतही औडंबर न माजवता धार्मिक स्थान कसं असावं त्याचं प्रतिकही आहे. उत्तम मूर्तीकाम, नक्षीकाम, कमानी, रंगसंगती यांचं मिश्रण आणि त्याचाच एक भाग बनलेले लामा जेमतेम चार महिने सोडले तर निसर्गाशी दोन हात करत जगणारी ही माणसं पण त्याची कसलीही खूण चेहरर्‍यावर न बाळगणारी, अगदी शांतपणे सगळं चाललेलं,

सगळे हसतमुख. प्रार्थना सुध्दा देवासाठी, दिखाव्यासाठी नाही. बुध्दाची भव्य मुर्ती तर बघत रहाण्यासारखी . फोटो काढण्यातच सगळा वेळ जातो खरं तर शांतपणे बसायला हवं होतं. लडाखी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनसुध्दा थिकसे गुंफेकडे पाहिलं जातं. त्यानंतर हेमिस ही लडखमधली सर्वात मोठी गुंफा पाहिली१६३० मध्ये बांधलेली ही गुंफा इतर गुंफांहून वेगळी आहे

शे पँलेस, लेहचा बाजार इत्यादी फिरताना लडाखी संस्कृतीचं दर्शन घडत होतं. आमच्यासारखे काही मोजके पर्यटक सोडले तर बहुसंख्य पर्यटक विदेशी होते. शांतीस्तुपाला गेलो, खाली लेह शहराचं विहंगम दृश्य पाहुन मन हरखून गेलं, भारलेल्या वातावरणातच त्या दिवशीचा सूर्य कधी मावळतीला गेला ते समजलच नाही.




(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू



24 January, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ३)

आम्ही लडाखमध्ये प्रवेश करत होतो. सभोवतालचं जगचं बदलून गेलं होतं. मातीचा रंग, ढगांचे आकार, आकाशाची निळाई सर्वच नेहमी पेक्षा वेगळं. सगळीकडे फक्त रंगांचीच उधळण. काय पाहू काय नको, कशाकशाचे म्हणून फोटो काढायचे ? आता थांबायचं नाही असं अनेकदा ठरवून आम्ही थांबतच गेलो. रांगोळीचे रंग कमी वटावेत असे मातीचे रंग, असंख्य छटा आणि आकार पुर्ण कॅनव्हासच निसर्गाने रांगोळीने भरुन टाकला होता.काही ठिकाणी क्‍वचित दिसणारं गवत सोडलं तर झाड हा प्रकारच आता नव्हता, पण मातीचे रंगच असे ही झाडांची उणीवच भासू नये. मोरपिसी,निळा,जांभळा, राखाडी,पाढरा जाऊदे रंग रंग आणि रंग! मधूनच वाहणार्‍या नद्या त्या रंगांशी खेळत डोंगरांचे, जमिनीचे आकार बदलत चालल्या होत्या.

लाचूंगला पास (१५८०० फूट ) , नकिला पास ( १६२०० फूट) हे आणखी दोन पास ओलांडून आम्ही पांग या गावी आले तेव्हा अगदी गळपटून गेलो हेतो. थोडी विश्राती घेऊन आम्ही निघालो तेव्हा कँप्टन मोरे पठार लागले.६० कि.मी. चं हे पठार उत्तम लँन्ड्स्केप असुनही फोटोकाढायचा उत्साह जरा कमीच झालेला. ( बारलाचला पासच्या धावपळीने बाधित झालो होतो) पण तेवढ्यात वाइल्ड अँस हा सहसा न दिसणारा प्राणी दिसला. आम्ही पुन्हा कँमेरे सरसावले, खाली उतरून त्यांचे फोटो घेतले, पुन्हा एकदा उत्साह संचारला. तांगलांगला पास (१७५८२ फूट) ला आम्ही पुर्वानुभवामुळे कमी हालचाल केली. आता उन्हं कमी कमी होत गेली. उप्शी, कारू अशी लेहजवळची गावं आली जवळ जवळ २२५ कि.मी. नंतर आम्ही मानवी वस्ती पहात होतो. आकाश जवळ आल्याचा भास होत होता . तारे मोठे दिसायला लागले होते. मुक्कामाला पोहोचलो तेव्ह रात्रीचे १०.३० वाजले होते

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....

लेखकः नरेंद्र  प्रभू



22 January, 2009

स्वत: बाबी कलिंगण

श्रीबाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले या वृताने मी अगदी भारावून गेलो आहेसिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा अशी स्थिती एके काळी होतीत्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची आता शासनाने दखल घेतली हे बरं झालं.

बोजा घेऊन रोज १४ १५ कि.मीपायी प्रवास करायचा आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर पुन्हा प्रयोगाची तयारी करायची,आपणच आपला मेकअप करायचा वस्त्र परिधान करायची आणि थंडीत कुडकुडतच प्रवेशावर प्रवेश करत रहायचे थेट सकाळ पर्यत.पुन्हा तेच कपाळावर बोजा " . बरं या प्रयोगाची कथासंवाद वैगरे त्यानीच ठरवलेलीलोकांच्या आग्रहास्तव कोणतेही आख्यान लावायला हि मंडळी केव्हाही तयारकोणतिही संहिता नसताना ५६ तास चालणारे दशावताराचे प्रयोग म्हणजे एक आच्छर्य आहेती एक पर्वणीच असते.

बाबी कलिंगण वयाच्या १५ व्या वर्षापासून आजतागायत ७५ व्या वर्षी सुध्दा दशावताराचे प्रयोग करीत आहेत १५ व्या वर्षी २५ पैसे रोजंदारीवर पार्सेकर दशावतारी मंडळात काम करणारे बाबी कलिंगण नंतर खानोलकरआजगावकरमामा मोचेमाडकरनाईक मोचेमाडकरअसा प्रवास करत पुन्हा पार्सेकर कंपनीत आलेनंतर कलेश्वर दशावतारी मंडळ ही कंपनी स्थापन केलीपण बाबी कलिंगण कुठेही असुदे त्याच्या नाटकाचा जो बोर्ड लागातो तो स्वतः बाबी कलिंगण अशी जाहिरात असलेलाचमग नाटकाला तुफान गर्दी होतेप्रत्यक्ष परमेश्वर अवतरणार असे समजून मालवणी जनता जनार्दनाचा ओघ जत्रेच्या ठिकाणी सुरू होतो. " स्वतः बाबी कलिंगण हा आता मालवणीतील वाक् प्रचार झाला आहेश्रीकलिंगण यांना यापूर्वी १९९४ मध्ये अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा पुरस्कार मिळाला आहेचया प्रसंगी पद्मश्री बाबी नालंग यांचीही आठवण येतेया दोन्ही कलावंतानी मच्छींद्र कांबळी प्रमाणेच दशावतार सुध्दा सातासमुद्रापलीकडे नेला. ' देव हेंचा भला करो '. 

20 January, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग २)


लेहच्या प्रयाणाचा दिवस उजाडलाहॉटेलच्या खिडकीतून पाहीले तर शुभ्र शिखरे खुणावत होतीरोहतांगपासला जास्त न थांबता आम्ही पुढे स्पितीच्या सुंदर दर्‍याखोर्‍यातून,पर्वतराजींमधून कोकसरमार्गे केलाँगला पोहोचलो तेव्हा सुर्य कलला होतादुसर्‍या दिवशी पहाटे ४.४५ ला केलाँग सोडलं ते त्या दिवशी संध्याकाळपर्यत लेहला पोहोचण्यासाठीच.तासाभरात बर्फाच्छादित हिमशिखरांवर पडलेली कोवळी उन्हं पाहून मन मोहून गेलंते दृश्य कॅमेर्‍यात बंदिस्त केलं तेव्हापासून कॅमेरा बाजुला ठेवताच आला नाहीआता वाटेत रहदारी नव्हतीचएखादं चुकार वाहन दिसायच तेसुधा लष्करी.वाहत्या नद्याशुभ्र शिखरंमध्येच दाटलेलं धुकंआता झाडांची जागा खुरट्या झुडुपांनी आणि काही ठिकाणी पोपटी हिरव्या अशा तृणांनी घेतली होती.आकाशाचा रंग गडद निळा होत चालला होतासतत चढ-उतार असणारे नागमोडी रस्ते काही वेळा नदीच्या पात्रातूनचक्क पाण्यातून जाणारेदर वळणावर एक नवीन दृश्य आम्ही डोळ्यात व कॅमेर्‍यात साठवत चाललॊ होतोद्राचा गाव सोडल्यावर पुढे बारलाचला पास (१६००० फूट उंच आला आणि आम्ही समोरचे दृश्य बघून फारच उल्हसित झालोचारही बाजूला बर्फच बर्फ आणि मधून जाणार्‍या रस्त्यावर आम्ही उभे. ( बारलाचला पासमधूनच चंद्रा आणि भागा या नद्यांवा उगम होतोपुढे तांडी या ठिकाणी एकत्र येऊन तिची चंद्रभागा होतेनंतर दोडा जिल्ह्यात तिला चिनाब म्हणतात.) 'एवढया उंचीवर जास्त जोरात हालचाल करू नकाअशा आयोजकांच्या सूचना अनावधानाने पाळता आल्या नाहीत त्याचा पुढे त्रास झालापण असं व्हायचच शेवटी याच साठी केला होता अट्टाहास.

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला चला.....

लेखकः नरेंद्र  प्रभू


17 January, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग १)

पश्चिम एक्सप्रेसने मुंबई सोडली आणि आम्ही चंदीगढच्या दिशेने निघालो. खरं तर मनाने आठ दिवस आधीच मुंबई सोडली होती. जेव्हा आत्माने ( हा आत्मा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. ) पूर्वतयारीसाठी दादरला एकत्र बोलावलं तेव्हापासूनच मी बेचैन होतो, जाण्याचा दिव

स येत नव्हता म्हणून. वाटेत कसलाही त्रास न होता आम्ही चंदीगढला उतरलो तेव्हा दोन दिवसांची सहल संपल्याचा भास होत होता. गाडीत खूप छान गप्पा झाल्या होत्या. लडाखला जायचा उत्साह आणखी वाढला. पाच- सहा तास विश्रांती घेऊन चंदीगढहून निघालो, आता रात्रीचा प्रवास करुन सकाळी मनाली गाठायची असा कार्यक्रम होता. पण सकाळी पाचच्या सुमारास चहाला थांबलो तेव्हापासून डुलकी घ्यायची वेळच आली नाही. कारण बाहेर निसर्गाचा सोहळा सुरू होता. रिमझिमणारा पाऊस, एका बाजूला पूर्ण जोशात वाहणारी बियास नदी, रस्त्याच्या बाजूने सफरचंदानी लगडलेली झाडं, जवळ जवळ चार तास हे नेत्रसुख अनुभवत आम्ही मनालीला पोहोचलो तर तिथेही पाऊस आमच्या स्वागताला हजर होता.

आतापर्यंत प्रवासवर्णनात वाचलेली, दृश्यमाध्यमातून पाहीलेली आणि कवितांमधून भेटलेली मित्र मनाली दोन्ही बाहू पसरून बोलावित होती, चिंब पावसात भिजायला.

तासा- दिडतासात ताजेतवाने होऊन आम्ही मनालीचा बाजार पालथा घातला. पुढे थंडीचा सामना करण्यासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी केली. दुपारनंतर हिडींबा मंदिर, मनू मंदिर, वशिष्ट मंदिर, गंघकमिश्रित गरम पाण्याचे झरे इत्यादी बघत आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही मनालीभर हुंदडत होतो. पावसाला, बियास नदीला आणि त्या बरोबर आमच्या मनाला उधाण आलं होतं. कुणाला कशाचीच पर्वा नव्हती. पण आत्माच्या चेहर्‍यावर मी काळजी बघत होतो. अंधारुन आलं आणि आकाशात नक्षत्रांच्या वेली दिसु लागल्या तीन दिवस पडणार्‍या पावसाने माघार घेतली तसा आत्माचा चेहरा फुलला. कारण उद्या लेहच्या दिशेने जाताना त्याला पाऊस नको होता. वातावरण आत्तापासूनच स्वछ व्हायला सुरुवात झाली होती.

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला ? चला.....

लेखकः नरेंद्र  प्रभू


डोंबिवलीमध्ये अवतरले लडाख...



डोंबिवलीमध्ये अवतरले लडाख...

छायाचित्र प्रदर्शन

छायाचित्रकार

आत्माराम परब, हितेंद्र सिनकर, तुषार निदाम्बूर, नरेंद्र प्रभू, केदार मालेगावकर, दिपांकर बॅनजी, सागर कर्णिक, विश्वेश आठवले, अपर्णा मोरे, मनोज नाईक, सागर सावंत आणि विनायक परब


16 January, 2009

हिरकणी

हिरकणी बुरूज सर्वानाच माहीत आहे आणि जिच्यावरून हे नाव पडलं ती हिरकणी सुद्धा. हिरकणी आणि बुरूज काल दोन्ही पावन झाले. इतिहासातली ती हिरकणी काल मी प्रत्यक्ष पाहिली यशवंत नाट्यगृहात. हिरकणीवत अपार मायेने ओथंबलेली आणि त्या रायगडाच्या बुरूजा प्रमाणे अभेद्य न डगमगणारी. मृदुमुलायम आणि कर्तव्य कठोर एकाचवेळी दोन रुपात.

रेणूताई गावस्करांचे लोण्यासारखे शब्द कानाला गोड वाटत होते, पण ह्रदयाला भिडायचे तेव्हा थांबा, पुढचं बोलायच्या आधी हे पचऊद्या म्हणावं असं वाटत होतं. माझी १० वर्षाची मुलगी रेणूताईंना म्हणाली " तुमची मुलाखत सिनेमा सारखी बघत होते.” खरच रेणूताईनी सगळ्यांच्या ह्रदयाचा ताबा घेतला होता. त्याची ती पावती होती.

हल्ली सारखं अंतर्मुख व्हायला होतं, मुंबई वरचे ह्ल्ले, रेणूताईची मुलाखत..., मुळापासून हादरवून टाकणार्‍या घटना. आपल्यासारख्याना भिती निर्माण झालीय की आपल्या अस्तित्वाचं काय होणार ? या ब्लॉग मध्ये मी पुर्वी उल्लेख केलाय (जागे व्हा ! अजून हल्ला बाकी आहे !!! त्या मुलाखतीत तज्ञांच्यामते "आपलं अस्तित्व रहाणार का ? “ हाच आता खरा प्रश्न आहे ) पण या मुलाखतीत ज्यांच्या अस्तित्वाला जन्मा पासुनच समाजाने नाकारलंय त्यांचा हात रेणूताईंनी हातात घेतला आणि काय घडलं ते अनुभव ऎकून थक्क व्हायला झालं.

मुलांना गोष्टी सांगताना एक आटपाट नगर होतं अशी सुरवात असावी असं रेणूताई म्हणाल्या. (माझ्या ब्लॉगची सुरवात तशीच झाली म्हणून मला खूप बरं वाटलं) तर तीन तास मंतरलेले होते यात शंका नाही. संवेदनाक्षम मनाला जागं करणारी ही मुलाखत चिकाटीने काम करायला लावेलच. कृतितून बोलावं असं रेणूताई म्हणाल्या तेव्हा थांबतो, पण एक गोड बातमी आहेः " दुर दर्शनच्या सह्याद्री वाहिनीने रेणूताईंना यंदाचा हिरकणी पुरस्कार जाहीर केला आहे. " खरच खुप आनंदाची गोष्ट. रेणूताई, अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!

नरेंद्र  प्रभू

13 January, 2009

दिपस्तंभ

एकलव्याची गोष्ट आपणा सर्वानाच माहित आहे. अर्जुनापेक्षा सरस म्हणून आपणाला त्याचं कौतुकही आहे, महाभारतातला हा उपेक्षित, किती काळ लोटला त्याला ! पण आज अजुनही त्याच भारतात अनेक प्रकारची आरक्षणं मिळुनही वर्गसंघर्ष आहेच. उपेक्षितातले उपेक्षित, अख्या समाजाने ज्याना परिघाबहेर ठेवलय, त्याना कोण आपलं म्हणणार ? मित्रांनो मी शरिरविक्रय  करणार्‍या महिलांच्या मुलांबद्दल म्हणतोय. प्रत्येक आईला आपलं मुल शिकावं, मोठं व्हावं असं वाटतं या मुलांच्या आयानांही तसं वाटतं, पण कोण शिकवणार त्यांना ? आपल्या महाराष्ट्रात शिक्षणाचे कारखाने खूप आहेत पण ते पैसे कमावण्या साठीचे, आधुनिक शिक्षणसम्राटांचे, श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारे, उपेक्षितांसाठी फक्त अंधार. पण एक दिपस्तंभ उभा आहे.... रेणू गावस्कर.

रेणूताईनी सुखासीन आयुष्याचा त्याग करून वेश्यांच्या मुलांना नवजीवन देण्यासाठी पुण्यात शाळा सुरू केली. ( अधिक माहिती साठी http://www.ekalavyapune.org/default.htm ) मुलांच्या कलाने घेतच त्याना योग्य दिशा दाखवत, आता त्यांच्या शाळेतली मुलं १० वीच्या परिक्षेला बसतील या बद्दल बोलताना मी रेणूताईंना ऎकलं. दोन चिमुरड्या त्यांच्या सोबत होत्या आजीचा हात धरून येतात तशा. डेव्हीड ससून पासून एकलव्य न्यास एक प्रदीर्घ प्रवास. या झंझावाता समोर संकटं टिकली नाहीत. पण जखमा झाल्याच असतीलच ना ? संकटं हिच संधी असं ताई म्हणतात, कसं शक्य झालं ते ? अनेक प्रसंग ज्यांची आपण कल्पनाही करू शकणार नाही, चला खुद्द रेणूताईच्याच तोंडुन ऎकूया..

गुरूवार १५ जानेवारी २००९ संध्याकाळी ६.३०

स्थळः यशवंत नाट्यगृह ,

शिवाजी मंदिर समोरील गल्ली,

दादर - माटुंगा


मुलाखत व सुत्र-संचालन

संपदा जोगळेकर – कुळ्कर्णी


संपर्कः

सुहास ९३२३५९८९०२, आत्माराम ९८९२१८२६५५, विनायक ९२२३२२२८३७, अतुल ९८१९०००२५१


नरेंद्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates